PANDAVGAD

TYPE : HILL FORT

DISTRICT : RAIGAD

HEIGHT : 590 FEET

GRADE : MEDIUM

महाराष्ट्रातील काही किल्ले आपली इतिहासातील ओळख व अस्तित्व हरवल्याने काळाच्या पडद्याआड गेले आहेत. इतिहासाशी धागादोरा जोडणारी एखादी ओळ कधी कधी या किल्ल्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत पण ती तात्पुरतीच. अंगाखांद्यावर गडपणाचे कोणतेच अवशेष न उरल्याने दुर्गप्रेमींची पावले देखील येथे वळत नाहीत. असाच एक गिरीदुर्ग मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असुन पुर्णपणे विस्मृतीत गेला आहे. खारघरमध्ये असलेला पांडवकडा धबधबा हे नवी मुंबईकरांचे पावसाळ्यातील आवडते पर्यटन स्थळ. पण पांडवकडा हे नाव ज्या पांडवगड किल्ल्यामुळे या धबधब्याला पडले तो पांडवगड अंगाखांद्यावर किल्ल्याचे अवशेष नसल्याने फारसा कुणाला परीचीत नाही. पुण्याच्य पेशवे दफ्तरातील एका पत्राच्या ओळीत असलेले बेलापुर जवळील पांडवगड हा उल्लेख वगळता या किल्ल्याचा कोठेही उल्लेख आढळत नाही. त्यामुळे किल्ल्याचा इतिहास एका ओळीतच संपतो. पांडवगडचे स्थान म्हणजे पांडवकडा धबधब्यासमोर असलेला आडवा डोंगर. ... गुगल नकाशावर हे ठिकाण आता BEST VIEW POINT OF PANDAVKADA WATERFALL असे नोंदले गेले आहे. पांडवकडा पहाण्यासाठी सर्वप्रथम हार्बर रेल्वेने नवी मुंबईतील खारघर रेल्वे स्थानक व तेथुन रिक्षाने धामोळे गाव गाठावे. खारघर रेल्वे स्थानक ते धामोळे गाव हे अंतर ४.५ कि.मी.आहे. धामोळे गावातुन पांडवकड्याकडे जाण्यासाठी मळलेली वाट आहे. या वाटेने साधारण १५ मिनिटे चालल्यावर आपण पांडवकडा धबधबा वाहणारा डोंगर व त्याला जोडणाऱ्या शेजारील डोंगरधारेजवळ येतो. येथुन सरळ जाणारी मळलेली वाट पांडवकडा धबधब्याच्या दिशेने जाते तर एक पुसटशी वाट शेजारच्या खाली उतरत आलेल्या डोंगराच्या घळीच्या दिशेने जाते. गडावर कोणी जात नसल्याने वाट मळलेली नाही त्यामुळे वाटेचा अंदाज घेत घेत आपण डोंगराच्या माथ्यावर जावे. धामोळे गावातुन गडाच्या माथ्यावर येण्यासाठी साधारण १ तास लागतो. गडमाथ्यावर खुरट्या झुडूपात लपलेला एक जुना चौथरा वगळता आज कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. त्यामुळे या ठिकाणाला गड का म्हणावे हा प्रश्न मनात निर्माण होतो. पण या डोंगरावरून दिसणारा एकुण परीसर पहाता या ठिकाणी गड असावा याची मनाला खात्री पटते. पांडवगडच्या माथ्यावरून चंदेरी, मलंगगड, प्रबळगड. इरशाळगड, माणिकगड, कर्नाळा हे किल्ले तसेच दूरवर समुद्राला भिडणारे बेलापुर खाडीचे पात्र नजरेस भरते व या ठिकाणाचे महत्व लक्षात येते. पावसाळ्यात पांडवकडा परीसरात झालेल्या अपघातामुळे येथे पावसाळी भटकंती बंदी असल्याने हि भटकंती शक्यतो उन्हाळ्यातच करावी. शिवाय पावसाळ्यात गडावर वाढणाऱ्या गवतामुळे माथ्यावर असलेला चौथरा देखील सहजपणे दिसुन येत नाही. धामोळे गावातुन पांडवगडावर जाऊन पुन्हा गावात येण्यासाठी साधारण ३ तास लागतात. वाटेत पाण्याची सोय नसल्याने पुरेसे पाणी सोबत घेऊनच गडावर जावे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!