PALSHI

TYPE : NAGARKOT

DISTRICT : AHMADNAGAR

HEIGHT : 0

GRADE : EASY

अहमदनगर म्हणजे बेलाग किल्ले, सुंदर ऐतिहासिक वाडे व अनेक गढ्या असणारा जिल्हा. या नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात पळशी या गावी होळकरांचे दिवाण रामाजी कांबळे-पळशीकर यांचा भुईकोट किल्ला आहे. याला भुईकोट म्हणण्यापेक्षा नगरकोट म्हणणे जास्त योग्य ठरेल कारण संपुर्ण पळशी गाव या किल्ल्यातच वसले आहे. पळशी गावात भेट देण्यासारख्या तीन वास्तू आहेत. एक म्हणजे पळशी किल्ला दुसरे पळशी विठ्ठल मंदीर आणी तिसरी वास्तू म्हणजे लाकडातील नक्षीकाम केलेला पळशीकरांचा वाडा. किल्ल्यातील पळशीकरांच्या वाड्यात लाकडावर केलेले अप्रतिम कोरीवकाम पहाण्यासारखे आहे. पुणे–अहमदनगर रस्त्यावर शिरूर गाव ओलांडले की पारनेर हे तालुक्याचे गाव गाठायचे. पारनेरनंतर हाच रस्ता पुढे २० कि.मी.वर टाकळी ढोकेश्वर येथे नगर–कल्याण महामार्गला मिळतो व पुढे वासुंदे-खडकवाडी गावामार्गे २० कि.मी.वरील पळशी गावात पोहोचतो. ... पुणे ते पळशी किल्ला हे अंतर १३० कि.मी. आहे. पळशी नदीच्या काठावर पळशीचा भुईकोट किल्ला उभा असुन गावाजवळ जाताच किल्ल्याची आजही सुस्थितीत असणारी तटबंदी पहायला मिळते. पळशी गाव किल्ल्यात वसलेले असुन गावाने किल्ल्याचा पुर्वेकडील अर्धा भाग व्यापला आहे तर पश्चिमेचा अर्धा भाग ओसाड आहे. किल्ल्यात गाव असल्याने किल्ल्याच्या आतील भागात पक्के रस्ते असुन आतील रहदारी किल्ल्याच्या उत्तरेला आणि पूर्वेला असलेल्या मोठ्या दरवाजातून होते. साधारण आयताकृती आकाराचा हा किल्ला पुर्व-पश्चिम पसरलेला असुन किल्ल्याचे क्षेत्रफळ ३३ एकर आहे. पळशी भुईकोटाला चहुबाजूने अखंड दगडी तटबंदी असुन या तटबंदीत मुख्य दोन दरवाजाशेजारी प्रत्येकी दोन असे चार व तटबंदीमध्ये दहा असे भक्कम १४ बुरुज आणि २ मोठे दरवाजे व १ लहान दरवाजा असे एकुण ३ दरवाजे आहेत. मुख्य दरवाजे दक्षिण व पश्चिमेच्या तटबंदीत असुन लहान दरवाजा उत्तर दिशेला तटबंदीत आहे. दरवाजाच्या आतील बाजूने वरील बाजुस जाण्यासाठी जिना आहे. तटबंदीची उंची १५ फुट असुन बुरुजांची उंची २० फुटापेक्षा जास्त आहे. किल्ल्याच्या दक्षिण तटबंदीतील उत्तराभिमुख मुख्य प्रवेशद्वाराची लाकडी दारे आजही शिल्लक असून त्याला व पश्चिमेच्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. दक्षिणेचा मुख्य दरवाजा नुकताच रंगवलेला असून दरवाज्याच्या बाहेर दोन्ही बाजूंस कोरेलेले शिलालेख देवनागरी भाषेत असल्याने वाचता येण्यासारखे आहेत. यातील डावीकडील शिलालेखात श्री अंबाचरणी तत्पर रामरावअप्पाजि निरंतर शाखा आश्र्चलायान गोत्र वसिष्ट उपनाव कांबळे || वृ त्रि कुळकर्णी जाहागीरदार सा अंबल यानि काम केले || सन १२०७. असा उल्लेख आहे. यातील सन १२०७ या उल्लेखामुळे हा शिलालेख अलीकडील काळातील वाटतो. उजवीकडील शिलालेखात पुढील मजकूर कोरला आहे. श्री गणेशायनमः|| पळसीचे नगर दुर्ग बांधावयास प्रारंभ शके १७०९ प्लवंगनाम संवस्तरे श्रावण शुक्ल १३ त्रयोदसीस || सिद्ध जाले१७१९ पींगळ नाम संवस्तरे मार्गशीर्ष शुद्ध १३त्रयोदसी. यावरून रामराव आप्पा यांनी १७ व्या शतकाच्या अखेरीस हा किल्ला बांधला व किल्ला बांधण्यासाठी १० वर्षांचा कालावधी लागला हे कळते. या भव्य दरवाज्यातून आत शिरल्यावर सर्वत्र घरे दिसतात. या वाटेने पुढे जाताना डाव्या बाजुला मध्ययुगीन काळातील वेगळ्याच धाटणीचे दगडी बांधकामातील महादेव मंदिर दिसते. मंदिरात महादेवाची संगमरवरी पिंड असुन गाभाऱ्याच्या दरवाजावर कोरीव काम केलेले आहे. मंदीरातील मूळ शिवपिंडी व नंदी भग्न झाल्याने मंदिराबाहेर ठेवलेले असुन सोबत एक रेखीव मुर्ती वा नागशील्प ठेवलेले आहे. मंदिरासमोर एक वीरगळ असुन मंदिराच्या मागील भिंतीवर मारुती शिल्प हनुमान कोरले आहे. मंदिर पाहून पुढे गेल्यावर उजव्या बाजूस एक गल्ली जाते. या गल्लीत एकुण चार वाडे आहेत. हे सर्व वाडे खालील भागात दगड व वरील भागात चौकोनी विटांचा वापर करून बांधलेले आहेत. यातील दोन वाडे पुर्णपणे कोसळलेले असुन एका वाड्याच्या दोन भिंती उभ्या आहेत. या भिंतीतील बांधकामात चुन्यात बनविलेले कोनाडे पाहाण्यासारखे आहेत. तिसरा वाडा पुर्णपणे बंद असुन त्याचा केवळ नक्षीदार दरवाजा बाहेरून पहाता येतो. चौथा वाडा पळशीकरवाडा असुन पळशीकरांचे वंशज रामराव कृष्णराव पळशीकर यांच्या ताब्यात हा वाडा आहे. वाड्याचा दरवाजा आणि चौकट यावर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. दरवाजातून आत शिरल्यावर आतील बाजुस सोपा असुन त्यावर लाकडी माळा आहे पण येथे अंधार असल्याने नीटपणे पहाता येत नाही. हा भाग पार केल्यावर डाव्या बाजूला वाड्याचा दुसरा दरवाजा आहे. त्यातून आत गेल्यावर आपण वाड्याच्या चौकात प्रवेश करतो. वाडा चौसोपी असुन वाड्यात एक भाडेकरु रहातात. वाड्याची कुठल्यही प्रकारचे निगा न राखल्याने त्याची दुरावस्था झालेली आहे. वाडा बांधला तेंव्हा तीन मजली होता पण आज केवळ तळमजला व वरील एक मजला शिल्लक आहे. चौकात आल्यावर वाड्याच्या खांबांवर व तुळयांवर अप्रतिम नक्षीकाम कोरलेले पहायला मिळते. वाड्याला तळघर असुन ते बंद केलेले असल्याने पहाता येत नाही. चौकात दगडात बांधलेली एक लहान विहीर असुन तीच्या तोंडावर लोखंडी जाळी बसवली आहे.या विहीरीशेजारी मोरी असून त्यात एक दगडी पाट आहे. वाड्याच्या उजव्या भागात देवघर आहे. देवघरच्या बाजूला असलेल्या खोलीच्या दरवाजावर,चौकटीवर व लाकडी भिंतीवर कोरीवकाम केलेले आहे. या खोलीत वाड्यातील दुसरी विहीर आहे. वाड्याच्या डाव्या बाजुच्या भिंतीतील एका लहान जिन्याने पहिल्या मजल्यावर जाता येते. या मजल्यावरील खांब पाकळ्यांसारखे कोरलेले आहेत. वाड्याचा दुसरा मजला ढासळलेला असुन त्यावर पत्रे घातलेले आहेत. वाडयाच्या बाहेर आल्यावर दरवाजा समोरून जाणारी वाट पुढे देवीच्या मंदिराकडे जाते.या मंदिराच्या सभामंडपाला तीन दरवाजे असुन गाभाऱ्यात डोक्यावर नागाचा फ़णा असलेली, हातात चक्र व गदा घेतलेली आणि पायाशी हत्ती असलेली देवीची मुर्ती आहे. मंदिराच्या बाहेर एक चौकोनी बारव असुन शेजारी पाणी जमा करण्यासाठी हौद बांधलेला आहे. मंदीराच्या मागुन तटबंदीच्या दिशेने चालत गेल्यास गडाचा तिसरा लहान दरवाजा नजरेस पडतो. इतर दोन दरवाजांच्या मानाने लहान असा हा दरवाजा तटबंदीत चौकट घालून एका बुरुजाच्या आधाराने बांधला आहे. दरवाजाच्या आतील बाजुस तीन विरगळ पहायला मिळतात. यातील एक विरगळ चौकोनी आहे. दरवाजा समोर चिंचेच्या झाडाखाली एका उध्वस्त वास्तूचे अवशेष असुन त्यात एक कबर आहे तर पुढे तटबंदीला लागुनच एक भली मोठी चौकोनी पायऱ्यांची बारव आहे. या ठिकाणाहुन असलेल्या कच्चा रस्त्याने ५ मिनिटात आपण किल्ल्याच्या पूर्व दरवाजापाशी पोहोचतो. दरवाजाच्या दोन्ही बाजूस भक्कम बुरुज असुन दरवाजावर चढून जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाजा वरून संपूर्ण किल्ला तटबंदी तसेच आजूबाजूचा परीसर दिसतो. येथे आपले किल्ला दर्शन पुर्ण होते. दरवाजाच्या बाहेर थोड्या अंतरावर पळशी नदीचे पात्र आहे. नदीचे पात्र ओलांडून गेल्यावर आपण विठ्ठल मंदिरापाशी येतो. किल्ला पहाण्यासाठी दीड तास लागतो. किल्ल्यात वस्ती असल्याने देवळात रहाण्याची तसेच जेवणाची व्यवस्था होते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!