PALGAM KOT

TYPE : COASTAL FORT

DISTRICT : VALSAD

HEIGHT : 0

GRADE : EASY

उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने वसई ते दमण या समुद्री पट्ट्यात त्यांनी बांधलेले अनेक लहान मोठे गढीवजा कोट पहायला मिळतात. यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन फारच थोडे अवशेष शिल्लक आहेत. संजाण-उंबरगावच्या मध्यवर्ती भागात पोर्तुगीजांची निर्मिती असलेला पलगाम कोट हा असाच एक लहानसा कोट. एकेकाळी स्वराज्यात असणारा हा भाग भाषावार प्रांत रचना करताना गुजरात राज्यात सामील झाला. वसई मोहिमेनंतर पोर्तुगीजांचे येथुन उच्चाटन झाल्यावर हा प्रांत स्वराज्यात आल्याने मी या कोटांचा उल्लेख महाराष्ट्रातील किल्ले या सदराखाली करत आहे. आमचे एक दुर्गवेडे मित्र श्री. जगदीश धानमेहेर यांनी दिलेल्या माहितीमुळे आम्ही या कोटाला भेट देऊ शकलो. पलगाम कोट पहाण्यासाठी संजाण उंबरगाव हि दोन्ही रेल्वे स्थानके एकसमान म्हणजे ६ कि.मी.अंतरावर आहेत. या दोन्ही रेल्वे स्थानकातून पलगाम येथे जाण्यासाठी खाजगी रिक्षांची सोय आहे. पलगाम गावात शिरताना रिक्षा तळासमोर हा कोट असल्याने फारशी चौकशी करावी लागत नाही. ... कोटाजवळ आल्यावर वडाच्या झाडांनी वेढलेली पलगाम कोटाची वास्तु पहायला मिळते. हि वास्तु दोन भागात विभागलेली असुन या इमारतीच्या बांधकामात ओबडधोबड दगडांचा तसेच विटांचा वापर केलेला आहे. इमारतीच्या आतील भिंतींना चुन्याचा गिलावा केलेला आहे. इमारतीच्या भिंतीत वरील मजल्यासाठी वासा रोवण्यासाठी असलेल्या खोबण्या दिसुन येतात. बाहेरील भागात मुख्य दरवाजा असलेली भिंत पुर्णपणे ढासळलेली असुन आतील भागात जाण्यासाठी दुसरा लहान दरवाजा आहे. वास्तुच्या वरील मजल्यावर चारही बाजुच्या भिंतीत खिडक्या तसेच कोनाडे दिसतात. वास्तुची एकुण रचना व त्यात असलेली जुजबी संरक्षण व्यवस्था पहाता हा कोट नसुन पोर्तुगीज वखार असावी असे वाटते. पलगाम गावं तुंब नदीकाठी वसलेले असुन आजही या नदीतुन लहान होड्यांची वाहतुक सुरु असते. त्यामुळे या ठिकाणी वखार बांधणे साहजिकच आहे. नदीच्या दुसऱ्या काठावर कतलवाडा किल्ला आहे. कोटाची सध्याची अवस्था फारच दयनीय असुन कोट पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. पोर्तुगीज हि दर्यावर्दी जमात. पोर्तुगालशी जलमार्गाने थेट संबंध ठेवता यावा यासाठी त्यांनी बहुतांशी कोट सागर किनाऱ्यावरच बांधले. वसई ते दमण परिसरातील गढीकोट हे समुद्राशी समांतर रेषेत आहेत. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. १७३९ च्या वसई मोहिमे दरम्यान हा भाग मराठ्यांच्या ताब्यात आला. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण ज्यांना प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!