PAITHAN

TYPE : MEDIEVAL EKNATH MANDIR / SHRINE

DISTRICT : AURANGABAD

पैठण शहर महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर असून औरंगाबादेपासून ५० कि.मी.अंतरावर गोदावरीकाठी ते वसले आहे. पैठण हे तेथील संत एकनाथांची समाधी, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान तसेच पैठणी साडी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. पैठणी हे नाव ज्या ठिकाणावरुन पडले ते पैठण महाराष्ट्राच्या इतिहासात गेली २५०० वर्ष स्वतःचे वेगळेपण राखून आहे. पूर्वी सातवाहन राजाची राजधानी म्हणून यांस महत्व होते. याचे मूळ नाव "प्रतिष्ठान" होते. राजा रामदेवराय यादवांच्या काळात पैठणला धार्मिक महत्व प्राप्त झालं. दक्षिण काशी म्हणून पैठणला ओळखलं जाऊ लागलं. त्या काळापासून अगदी आत्तापर्यंत संस्कृत आणि धर्मशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या इथल्या पंडितांनी दिलेला धर्मनिर्णय अखेरचा मानला जाई. याशिवाय पैठणचे आणखी एक महत्त्व म्हणजे महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी काही काळ पैठणला राहिले होते. ... पैठणपासून जवळच असणारे मुंगी हे गाव निंबार्कस्वामींचे जन्मगाव. इ.स. १३१२ च्या सुमारास यादवांचं राज्य संपुष्टात येऊन पैठण मोगलांच्या ताब्यात गेलं. त्याकाळी हजारो हिंदुंना धर्मांतरित करण्यात आलं. स्वातंत्रोत्तर काळापर्यंत पैठण निजामांच्या अधिकार क्षेत्रात होतं. पैठणने जगास अनेक नररत्नेर दिली असून शून्याचा शोध लावणारे गणितज्ञ भास्कराचार्य, संत भानुदास, संत एकनाथ, कवी मुक्तेचश्वर, संत गावोबा, निर्णयसिंधुकार भट्टोजी दीक्षित, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे गागाभट्ट, गानकलेत निष्णात असणारे नाथवंशीय रामचंद्रबुवा, मय्याबुवा, छ्य्याबुवा, काशिनाथबुवा त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भारताचे माजी गृहमंत्री कै. शंकरराव चव्हाण आदींचा त्यात समावेश होतो. पण या सगळ्यांपेक्षा पैठण आपल्या लक्षात राहते ते एकनाथ महाराजांमुळे. १६व्या शतकातील संत एकनाथ महाराज यांची पैठण ही जन्मभूमी आणि कर्मभूमी. एकनाथ महाराजांचा वाडा पैठणमध्ये होता. या वाड्याचेच मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे. गावातील नाथमंदिर हे श्री एकनाथ महाराजांचे देवघर असून येथील मुख्य मूर्ती श्री विजयी पांडुरंगाची आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात एकनाथांच्या पूजेतला बाळकृष्ण ठेवला आहे. नाथांची कुलस्वामिनी एकविरा देवीसह अनेक देवतांच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत. आषाढी वारीसाठी पंढरीस जाणाऱ्या एकनाथ महाराजांच्या पादुका येथेच आहेत. श्रीखंड्यासने ज्या रांजणात पाणी भरले तो रांजण, ज्यावर चंदन घासले ती सहाण, ज्यात श्रीकृष्ण गुप्त झाले तो उद्धव खांब येथे आहे. नाथमहाराज ज्या खांबास टेकुन प्रवचन करीत तो पुराणखांबही येथेच आहे. भगवान दत्तात्रेयांनी जेथे उभे राहून चोपदारकी केली ते स्थानही येथे दाखविण्यात येते.एकनाथांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांढुरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असत अशी श्रद्धा आहे. पाण्याचा तो हौद आजही या वाड्यात आहे. या वाड्याला आतले नाथ आणि गावाबाहेर गोदावरीच्या पात्रात ज्या ठिकाणी एकनाथांनी देह ठेवला त्या ठिकाणाला बाहेरचे नाथ असं गावकरी म्हणतात. तिथे एकनाथांचे समाधिमंदिर बांधण्यात आले आहे. फाल्गुन वद्य षष्ठीला नाथषष्ठी म्हणतात. ही एकनाथ महाराजांची पुण्यतिथी. यानिमित्त सहा दिवसांचा मोठा उत्सव होतो. अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सव संपतो. सद्यस्थितीत पैठण हे शहर संत एकनाथ यांच्यामुळे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असुन प्रतिदिनी नाथांच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांची संख्या २ ते ३ हजार एवढी आहे. येथे दर शुद्ध एकादशीस एक लाख भाविक तर वद्य एकादशीस अंदाजे ३० हजार भाविक जमतात. एकनाथषष्ठी हा येथिल मुख्य उत्सव असून या तीन दिवसीय उत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ५ ते ६ लाख भविक पैठणमध्ये येतात. एकनाथषष्ठी उत्सवातल्या तीनही दिंड्या ह्या ठिकाणाहून निघतात. त्याचप्रमाणे आषाढीचा पालखी सोहळाही या ठिकाणाहून निघतो. प्रत्येक एकादशीस येथे महापूजा करण्यात येते. गोकुळ अष्टमीचा उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे इतरही पारंपारिक, नैमित्तिक उत्सव येथे साजरे केले जातात. येथे अनेक मठ मंदिर असून वारकरी शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी येथे राहतात. येथे महाराष्ट्र शासनाने संतपीठाची उभारणी केली आहे. मंदिर परिसरात नाथ वंशीयांची घरे आहेत. गोदावरीच्या काळावर नागघाट म्हणून एक ठिकाण आहे. झानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले ते याच ठिकाणी. इथे रेड्याची मोठी मूर्ती आहे. पुरातत्त्वीय दृष्टीने पैठणमध्ये प्रागैतिहासिक तसेच इतिहासपूर्व कालीन अवशेष सापडलेले आहेत. सातवाहन राजांच्या महालाच्या खाणखुणा, कोरीव खांब वगैरे असणाऱ्या या प्रासादाच्या आवारात एक विहीर आहे. या विहिरीला शालिवाहनाची विहीर म्हणतात. ऐतिहासिक काळाचा विचार करता सातवाहन कालापासून यादव कालापर्यंतच्या पुरातत्त्वीय नोंदी पैठणसंदर्भात सापडतात. आजदेखील विविध काळातील अवशेष जुन्या शहराच्या टेकाडावर (पालथी नगरी) पहायला मिळतात. जसे की, भव्य वाडे, कोरीव खांब, तीर्थस्तंभ वगैरे. इथे सापडलेले विविध तऱ्हेचे मणी, भाजक्या मातीच्या वस्तू बांगड्या आणि सातवाहन कालीन नाणी ज्ञानेश्वर उद्यानातील बाळासाहेब पाटील पुरातन वस्तुसंग्रहालयात पहायला मिळतात. काही नाणी ही सातवाहन काळापेक्षा जुनी आहेत. इथे सापडलेली विदेशी नाणी पाश्चात्य जगताचा संबंध दाखवून देतात. जायकवाडी धरण- जायकवाडी धरण पैठण शहराजवळच आहे. जायकवाडी धरण आशिया खंडातील सर्वात मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक आहे. त्याची लांबी१०किमी आहे. या धरणाला पाण्याच्या विसर्गासाठी एकूण २७दरवाजे आहेत.हे धरण पसरट स्वरूपाचे आहे.जायकवाडी धरणामुळे तयार झालेल्या जलाशयाचे नाथ सागर असे नाव आहे. गोदावरी आणि प्रवरा नद्यांचे पाणी यात येते. हे जलाशय ५५किमी लांब व २७किमी रुंद आहे. जायकवाडी धरणाच्या पाण्यावर १२मेगावॅट वीज निर्मिती करण्याची क्षमता असलेले एक जलविद्युत केंद्र आहे. वीजनिर्मितीसाठी वापरले पाणी पंप वापरून मुख्य जलाशयात परत टाकले जाते. ज्यामुळे त्या पाण्याचा वीजनिर्मितीसाठी पुनर्वापर करता येतो.पैठण हे नाथ सागर जलाशय आणि ज्ञानेश्वर उद्यान या लोकप्रिय पर्यटनस्थळांसाठीही प्रसिद्ध आहे. नाथ सागर जलाशयात येणाऱ्या स्थलांतरित पक्षांना पाहण्यासाठी अनेक पक्षिअभ्यासक या ठिकाणी येतात. ज्ञानेश्वर उद्यान हे म्हैसूरच्या वृंदावन उद्यानाप्रमाणे असल्यामुळे हे पर्यटकांचे अतिशय लाडके स्थळ आहे. संत ज्ञानेश्वर उद्यान- ज्ञानेश्वर उद्यान महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या उद्यानांपैकी एक आहे. जे म्हैसूर वृंदावन गार्डनसदृश आहे. १२५हेक्टर पसरलेले हे उद्यान जायकवाडी धरणाच्या शेजारीच आहे. जिथे संगीतावर नाचणारे कारंजे एक स्वर्गीय अनुभव देतात. जायकवाडी पक्षी अभयारण्य- नाथ सागर जलाशयात उथळ पाण्यामध्ये विविध आकारांची ३०बेटे निर्माण होतात. या बेटांवरील झाडे स्थलांतरित पक्षांना एक आदर्श निवारा पुरवतात. या धरणाच्या परिसरात पक्षी अभयारण्य तयार केले गेले आहे.ज्यामुळे अनेक रहिवासी आणि स्थलांतरित पक्षांच्या प्रजातींना इथे निवारा मिळतो. जवळजवळ २००तऱ्हेचे पक्षी इथे आढळतात, ज्यात स्थलांतरित पक्ष्यांच्या ७०हून अधिक प्रजाती आहेत. यापैकी ४५ प्रमुख प्रजाती विदेशातून स्थलांतर करून येतात. जैन तीर्थ पैठण- पैठण हे एक प्रसिद्ध दिगंबर जैन अतिशय क्षेत्र देखील आहे. येथील मंदिरात २०वे जैन तीर्थंकर भगवान मुनिसुव्रतनाथ यांची एक सुंदर काळ्या रंगाची वाळूची मूर्ती आहे. पैठण शहरात व जवळच असलेल्या औरंगाबाद येथे राहण्याची सोय उपलब्ध आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!