PABAL

TYPE : CITY FORT

DISTRICT : PUNE

HEIGHT : 0

GRADE : EASY

पाबळ म्हटले कि आपल्याला आठवते ती पेशवे बाजीरावांची मस्तानी. कारण बाजीराव पेशवे यांनी पाबळ येथे मस्तानीसाठी वाडा बांधल्याचे व याच ठिकाणी तिचा मृत्यु झाल्याने तिची समाधी असल्याचे वाचनात आलेले असते. पण या दोन गोष्टी शिवाय पाबळमध्ये इतर काही वास्तु असल्याचे आपल्या ध्यानी नसते. आपल्या सारखे दुर्गप्रेमी व इतिहासप्रेमी गढी पाहण्याच्या ओढीने पाबळला जातात खरे पण या गढीचा आज एक दगडही जागेवर शिल्लक नाही. पुणे –शिक्रापुर- पाबळ हे अंतर ५५ कि.मी. असुन पाबळला जाण्यासाठी यस.टी. तसेच महानगर पालिकेची पुणे-पाबळ बससेवा उपलब्ध आहे. मस्तानी गढी हे ठिकाण गावातील लोकांच्या विस्मृतीत गेले असुन तेथे जाण्यासाठी जैन धर्मशाळा अशी विचारणा करावी. या धर्मशाळेशेजारील जागेत असलेल्या गढीत मस्तानीचे वास्तव्य होते. आज मस्तानी रहात असलेल्या या गढीचा एकही दगड जागेवर नसुन येथे बुलडोझर फिरवुन त्याचे सपाटीकरण करण्यात आले आहे. येथे एक फलक लावलेला असुन त्यावर या गढीची माहीती लिहिलेली आहे. फलकावरील माहीतीनुसार दगडमाती व विटांचा वापर करून बांधलेली हि गढी ३६ गुंठे क्षेत्रफळावर असुन तिच्या बाहेरील तटबंदीमध्ये आठ बुरुज असल्याचे नमुद केले आहे. ... गढीचा दरवाजा पुर्वाभिमुख असुन गढीच्या मध्यभागी असलेल्या वाड्यात मस्तानी याचे बारा वर्ष वास्तव्य असल्याचे म्हटले आहे. गढी पासुन साधारण अर्धा कि.मी.अंतरावर गावाबाहेर मस्तानी यांची समाधी आहे. या समाधीस्थळाकडे जाताना वाटेत आपल्याला एक जैन मंदिर पहायला मिळते. पेशवे बाजीराव यांची पत्नी मस्तानी रहात असल्याने पाबळ गावाभोवती कोट उभारला गेला. कधीकाळी पाबळ गाव हे या कोटाच्या आतच वसलेले होते पण आता वाढत्या वस्तीने या कोटाचा घास घेतलेला असुन कोटाचा मुख्य दरवाजा वगळता तटबंदी व इतर अवशेष नामशेष झालेले आहेत. या दरवाजाशेजारी देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. दरवाजाची उंची अंबारीसकट हत्ती जाईल इतकी असुन दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. लाकडी दरवाजा अडकवण्यासाठी असलेली दगडी बिजागरे शिल्लक असली तरी दरवाजाची लाकडी दारे मात्र नष्ट झालेली आहेत. या दरवाजाने बाहेर पडुन सरळ रस्त्याने पाच मिनिटे चालत गेल्यावर आपण मस्तानी यांच्या समाधी स्थळाजवळ पोहोचतो. संपत्तीच्या लोभाने काही समाजकंटकानी या समाधीचे १९९८ व २००९ असे दोनदा खोदकाम केल्याने मुळ समाधीची तोडफोड झाली आहे. सध्या अस्तित्वात असलेली समाधी म्हणजे घडीव दगडात बांधलेला चार फुट उंचीचा दगडी चौथरा असुन त्यावर घडीव दगडात बांधलेला ताबूत आहे. या समाधीच्या आसपास जमीनीत खांब रोवण्यासाठी असलेले खळगे पहाता कधीकाळी या समाधीवर छप्पर असावे. या समाधी शेजारी राजस्थानी पद्धतीची दुसरी समाधी छत्री असुन आसपास सहा थडगी आहेत. समाधी स्थळाभोवती नव्याने कुंपणाची भिंत बांधलेली असुन त्यात दरवाजा लावण्यात आला आहे. मस्तानीचे वंशज मोहम्मद इनामदार हे या समाधीची देखभाल करतात. सध्या हे समाधीस्थळा पुर्णपणे दुर्लक्षित झालेले असुन हा ऐतिहासिक ठेवा असल्याने त्याचे संरक्षित स्मारक म्हणुन जतन करणे गरजेचे आहे. या शिवाय नगरदुर्गाच्या दरवाजाच्या उजवीकडे असलेल्या नागेश्वर मंदीराजवळ आपल्याला प्राचीन दगडी पुष्करणी पहायला मिळते. पाबळ गावातील या सर्व वास्तु पाहण्यास साधारण एक तास पुरेसा होतो. बाजीरावांच्या आयुष्यातील सोनेरी पान असलेल्या सौंदर्यवती मस्तानीचे स्मरण करण्यासाठी एकदा तरी पाबाळला भेट द्यायला हवी. दिल्लीचा वजीर मोहम्मद खान बंगेश याच्या तावडीतुन बुंदेलखंडचा राजा छत्रसाल याची सुटका केल्यावर छत्रसालने वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्न असलेला मुलूख व त्याची कन्या मस्तानी बाजीरावास दिली. राजा छत्रसाल याची ही मुलगी इ.स. १७२९ च्या सुमारास पेशवे बाजीराव यांच्याशी लग्न करून पुण्यात आली. पेशवे घराण्यात द्विभार्या प्रथा नसल्याने मोठ्या प्रमाणात अंतर्गत वादळ उठले. घरातील या अंतर्गत कलहामुळे मस्तानीला दूर ठेवण्यासाठी पेशवे बाजीरावांनी पाबळला तिच्यासाठी आठ बुरुजांची बळकट गढी बांधली व तिच्या खर्चासाठी केंदूर, पाबळ व लोणी ही तीन गावे इनाम दिली. उत्तरेतील मोहिमेवर असताना २८ एप्रिल १७४० रोजी नर्मदेच्या दक्षिणतिरी रावेरला बाजीराव पेशवे यांचे निधन झाले. बाजीराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर मस्तानीने हिरा गिळून आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. जिथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या जागी तिची समाधी बांधण्यात आली.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!