PAARDI

TYPE : HILL FORT

DISTRICT : VAPI

HEIGHT : 90 FEET

GRADE : EASY

महाराष्ट्र व गुजरातच्या सीमावर्ती भागात असलेल्या किल्ला पारडी शहरात पारडी नावाचा किल्ला आहे. या किल्ल्यामुळे शहराचे नाव किल्ला पारडी असे पडले असले तरी शहराच्या मध्यवर्ती भागात एका लहानशा टेकडीवर असलेला हा किल्ला मात्र गावात अनेकांना माहीतच नाही. पारडी गावाकडून वाहणाऱ्या पार नदीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला असावा. एकेकाळी स्वराज्यात असणारा हा प्रदेश भाषावार प्रांत रचना करताना व इतर काही कारणामुळे गुजरात राज्यात सामील झाला. कधीकाळी हा किल्ला स्वराज्यात असल्याने मी या किल्ल्याचा उल्लेख महाराष्ट्रातील किल्ले या सदराखाली करत आहे. किल्ला पारडी शहर जरी रेल्वे स्थानक असले तरी येथे थांबणाऱ्या रेल्वेगाड्या अनियमीत असल्याने वलसाड अथवा वापी येथे उतरुन तेथे जाणे जास्त सोयीचे आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेले किल्ला पारडी शहर वलसाडहुन १३ कि.मी. वर तर वापीहुन १७ कि.मी.अंतरावर आहे. ... या दोन्ही ठिकाणाहुन पारडी येथे जाण्यासाठी शेअर रिक्षा उपलब्ध आहेत. शहरातील टपाल कार्यालयामागे साधारण १०० फुट उंचीच्या झाडीने भरलेल्या टेकडीवर असलेला हा किल्ला गावात फारसा कोणाला परिचित नसल्याने पत्ता विचारताना किल्ल्याबाबत न विचारता पोस्ट ऑफिसची चौकशी करावी. महामार्गावरून १० मिनिटे चालत आपण किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचतो. साधारण आयताकृती आकाराचा हा किल्ला अडीच एकर परिसरावर दक्षिणोत्तर पसरला असुन किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी उत्तरेकडे व दक्षिणेकडे असे दोन दरवाजे आहेत. टपाल कार्यालयाकडून होणारा आपला प्रवेश उत्तरेकडील दरवाजाने होतो. या वाटेवर पायऱ्यांच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा बसवलेला आहे. किल्ला सुशोभित करताना त्यात अनेक बदल करण्यात आले आहे. येथे असलेल्या मुळ दरवाजासमोर सिमेंटच्या दरवाजाची नवीन कमान उभारल्याने मूळ दरवाजा या कमानीमागे लपला आहे. या दरवाजाच्या डाव्या बाजुस एक मोठा अष्टकोनी बुरुज असुन या बुरुजावर घडीव दगडात बांधकाम केलेला १२ फुट उंच गोलाकार स्तंभ आहे. या बुरुजावर तोफांसाठी झरोके तर बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या बांधल्या आहेत. बुरुज पाहुन पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या बाजुला तटबंदीला लागुन एक कबर आहे तर उजव्या बाजुस असलेल्या बुरुजावर व तटबंदीवर कोठड्या आहेत. ब्रिटीशांनी या किल्ल्याचा वापर तुरुंगासाठी केल्याने त्यांच्या काळात या कोठड्या बांधल्या गेल्या. या कोठड्याच्या समोर काही दुमजली वास्तुंचे अवशेष असुन त्यावर मोठया प्रमाणात झाडे वाढली आहेत. या वास्तूंच्या मागील बाजुस असलेल्या तटबंदीत बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या बांधल्या आहेत.किल्ल्याच्या पुढील भागात पारडी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नव्याने बांधलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्या ओलांडुन पुढे गेल्यावर उजव्या बाजुस तटबंदीत एक बुरुज असुन डाव्या बाजुस किल्ल्यास पाणी पुरवठा करण्यासाठी बांधलेली खोल विहीर आहे. या विहिरीत मोठया प्रमाणात झाडी वाढली असुन विहिरीला लागुनच एका वास्तुचे अवशेष आहेत. या भागात मुलांना खेळण्यासाठी उद्यान बनवले आहे. हा भाग पार केल्यावर आपण किल्ल्याच्या दक्षिण दरवाजात पोहोचतो. हा दरवाजा व त्याची कमान आजही सुस्थितीत असुन दरवाजावरील भागात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या बांधल्या आहेत. दरवाजाच्या आतील बाजुस तटाला लागुन काही वास्तूंच्या भिंती आहेत. दरवाजाच्या बाहेरील बाजुस चुन्यामध्ये नक्षीकाम केलेले असुन या दरवाजा शेजारी असलेल्या बुरुजाचे बांधकाम पुर्णपणे विटामध्ये केलेले आहे. या ठिकाणी आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ला फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!