NIPPANI
TYPE : GADHI/ NAGARKOT
DISTRICT : BELGAON
HEIGHT : 0
GRADE : EASY
बेळगावमधील निपाणी शहर येथील तंबाखूसाठी संपुर्ण भारतात प्रसिद्ध आहे. स्वराज्यात असणारा हा मराठी प्रांत भाषावार प्रांतरचना करताना कर्नाटक राज्याला जोडला गेला. आजही मराठी संस्कृती जपुन असणारा हा प्रांत कर्नाटक राज्यात असला तरी मनाने मात्र महाराष्ट्रात आहे. आज बेळगाव जिल्ह्यात असणारे किल्ले हे स्वराज्यातील मानकरी असल्याने या किल्ल्यांना मी महाराष्ट्रातील किल्ले समजतो व त्यांचा उल्लेख महाराष्ट्रातील किल्ले म्हणुन करत आहे. बेळगाव जिल्ह्याची भटकंती करताना मला येथील ३५ पेक्षा जास्त गढीकोटांना भेट देता आली. त्या सर्व गढीकोटांची माहीती मी दुर्गभरारी या संकेतस्थळावर देण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाची पाने चाळताना काही ठिकाणी निपाणी येथे किल्ला असल्याचे वाचनात आले व आमच्या बेळगावच्या दुर्गभ्रमंतीत निपाणी किल्ल्याचे नाव सामील झाले. निपाणी शहर कोल्हापुरपासुन ४३ कि.मी. अंतरावर तर बेळगावपासुन ७४ कि.मी.अंतरावर आहे.
...
कागल-संकेश्वर दरम्यान महामार्गावर असलेल्या या शहरात निपाणकर देसाई यांचा राजवाडा असुन त्यांचे वंशज आजही येथे वास्तव्यास असतात. निपाणकर देसाई यांचा राजवाडा तटबंदीच्या आत वसलेला असुन या राजवाड्याचा परिसराचा उल्लेख निपाणीचा किल्ला म्हणुन येतो. हा राजवाडा इ.स.१८०० साली सिधोजीराव निंबाळकर यांनी बांधलेला असुन या राजवाड्याच्या आसपास अर्धवट बांधकाम केलेले निपाणी किल्ल्याचे अवशेष आहेत. याबाबत मिळालेल्या नोंदीनुसार इ.स.१८२७ सालीं निपाणीच्या किल्ल्यास आंत घेऊन त्याभोवती तट बांधण्याच्या कामास निपाणीच्या अप्पा देसायानें सुरवात केली पण दक्षिणेकडच्या बाजूचें काम पूर्ण झाल्यावर हें काम आपल्या हातून पूर्ण होणें शक्य नाहीं असें वाटल्यावरून त्यानें ते काम बंद केलें. आज आपण राजवाड्याच्या परीसरात किल्ल्याचे हे अवशेष पाहू शकतो. राजवाड्यातील मालकांच्या परवानगीने आपण राजवाडयाचा मर्यादीत व किल्ल्याच्या बाहेरील भागात फिरू शकतो. राजवाड्याभोवती असलेल्या तटबंदीत पुर्वाभिमुख महादरवाजा असुन या दरवाजाच्या डावीकडे गोलाकार बुरुज तर दरवाजावर नगारखाना आहे. राजवाड्याभोवती असलेल्या तटबंदीत मुख्य दरवाजाशेजारी आतील बाजूने बुरुजावर व तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. घडीव दगडात केलेल्या या बांधकामात बुरुजाला लागुन असलेल्या तटबंदीत एक ओवरी बांधलेली आहे. दरवाजाच्या उजवीकडे काटकोनात बांधलेली तटबंदी असुन त्यात अर्धवट बांधकाम केलेला दरवाजा आहे. महादरवाजाने आत आल्यावर समोरच मारुतीचे मंदीर असुन शेजारी राजवाड्याचे अतिशय सुंदर असे मुख्य प्रवेशद्वार आहे. दरवाजाच्या या दगडी बांधकामात मोठया प्रमाणात कलाकुसर केलेली आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजुस ३-३ कमानी असुन समोरील बाजुस कारंजे व त्याशेजारी पाण्याचे टाके आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर मोकळा चौक असुन समोरच निपाणीकर सरकारांचा चौसोपी दुमजली वाडा आहे. या चौकात डावीकडे बाहेर जाण्यासाठी लहान दरवाजा असुन उजवीकडे दुसरा लहान दरवाजा आहे. उजवीकडील दरवाजाने बाहेर गेल्यावर आपल्याला पाण्याची दोन लहान टाकी तसेच एक खोल हौद तर एक मोठा हौद पहायला मिळतो. हा त्या काळातील तरणतलाव असुन त्याचे योजनाबद्ध बांधकाम केलेले आहे. मोठ्या हौदाच्या काठावर आराम करण्यासाठी नक्षीदार सज्जा बांधलेला असुन शेजारील भिंतीत दोन दालने बांधलेली आहेत. हे पाहुन झाल्यावर पुन्हा चौकात यावे. चौकातुन समोर असलेल्या दरवाजाने आत शिरल्यावर आपण वाडयाच्या आतील चौकात येतो. या चौकात चारही बाजुस वाड्याचे बांधकाम असुन या बांधकामात असलेल्या लाकडांवर मोठ्या प्रमाणात कलाकुसर केलेली आहे. राजवाडा पाहुन झाल्यावर महादरवाजातून बाहेर पडुन शेजारील तटबंदीत असलेल्या दरवाजाच्या आतील भागात जावे. या भागात पाच दरवाजांच्या कमानी व त्याशेजारी बुरुजांचे अवशेष पहायला मिळतात. यातील ३ दरवाजे हे आतील वास्तुंचे दरवाजे आहेत. या भागात आपल्याला किल्ल्याची लांबलचक तटबंदी पहायला मिळते. या तटबंदीत दोन ठिकाणी तटावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या असुन तटाबाहेर जाण्यासाठी लहान दरवाजा बांधला आहे. या तटबंदीत एका ठिकाणी तीन कमानी पहायला मिळतात. तटाजवळ दलदल व काही प्रमाणात झाडी असल्याने जवळ जाता येत नाही. या भागात असणारे बहुतांशी बांधकाम हे किल्ल्याचे अर्धवट झालेले बांधकाम आहे. राजवाडा व परिसर पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. निपाणी शहर अलीकडील काळात म्हणजे १९ व्या शतकात वसलेले असुन शहरातील १२ व्या शतकातील जैन मंदीरे वगळता येथे कोणतेही प्राचीन अवशेष दिसुन येत नाहीत. निपाणी शहराच्या स्थापनेचा मान सिधोजीराव निंबाळकर म्हणजेच आप्पा देसाई निपाणकर यांना जातो. दौलतराव शिंदे यांच्या पदरी सरदार असलेल्या सिधोजीराव निंबाळकर यांना इ.स.१८०० सालीं दौलतराव शिंदे यांनी आपल्या पलटणी देऊन परशुरामभाऊ पटवर्धनाची जहागीर काबीज करण्यासाठी पाठवले. यातील पायदळाच्या पलटणी नंतर परत गेल्या पण निंबाळकरांच्या उर्वरीत फौजेनें पटवर्धनाच्या मुलुखांत बरीच लुटालूट केली व ते निपाणी येथे स्थायीक झाले. इ.स.१८०३ सालीं जनरल वेलस्ली म्हैसूरहुन बाजीरावाच्या मदतीकरता पुण्याकडे जात असतांना आप्पा देसाई बाजीरावच्या पक्षास मिळाला. इ.स.१८०३ साली कोल्हापूरकरांच्या वतीने तळूरचा देसाई चंद्राप्पा याचें मनोळीला वेढा घालुन निपाणीचा काही मुलुख उध्वस्त केला पण वेलस्लीनें सैन्य पाठविल्याने निपाणीचें रक्षण झालें. चंद्राप्पा देसाई कोल्हापुरास पळून गेला आणि तळूरचा कोट निपाणीकरांच्या ताब्यात आला. इ.स.१८०८ सालीं आप्पा देसाइनी विश्वासराव घाटगे यांना मदत करून त्याच्या ताब्यांत असलेल्या चिकोडी व मनोळी या भागाचे कोल्हापूरकरांपासून रक्षण केलें. याच सुमारास कोल्हापूरच्या सैन्यानें सांवतांच्या वाडीस वेढा दिल्यामुळें खेम सांवताची बायको लक्ष्मीबाई हिनें विश्वासराव घाटगे व आप्पा देसाई यांनां आपल्या मदतीस बोलाविलें. तो लक्ष्मीबाईच्या मदतीस गेला व वाडीचा वेढा उठवून त्यानें घाटावरील कोल्हापूरकरांच्या मुलुखावर स्वारी केली. आप्पा देसाई यांनी सांवतवाडी संस्थानावरहि आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. याच काळात अप्पास पेशव्यांकडून सरलष्कर हा किताब, मनोळी व हुकेरी हे परगणे व ५४११२० रुपये सालीना उत्पन्नाचा फौज सरंजामाचा मुलुख मिळाला. कोल्हापुरकरांचे व आप्पाचें मनोळीवरून सहा वर्षे (१८०४-१८०९) भांडण चाललें व शेवटीं पेशव्यांच्या वतीनें आप्पानें अधिकार चालवावा व कोल्हापुरच्या राजकन्येशीं यानें लग्न करावें असें ठरलें. हे लग्न झाले तरी भांडण काही मिटले नाही. इ.स.१८११ साली आप्पानें कोल्हापुरास वेढा दिला पण यावेळी एलफिन्स्टन मध्यें पडला व झालेल्या तहानुसार करवीरकरांनी चिकोडी आणि मनोळीवरील सर्व हक्क सोडले. इ.स.१८१३ च्या सुमारास बाजीरावाच्या चिथावणीमुळें अप्पांनी कोल्हापूरकरांचा कांहीं मुलूख सोडण्याचें नाकबूल केल्यावरून इंग्रजांनीं त्याची चतुर्थांश जहागीर बाजीरावास दिली तरीही आप्पा देसाईनी बाजीरावचा पक्ष सोडला नाही. १ जानेवारी १८१८ रोजीं झालेल्या कोरेगांवच्या लढाईत अप्पा देसाई पेशव्यांच्या बाजूने लढत होते. बाजीरावाच्या दरबारी बापू गोखले नंतर आप्पा देसाई हे दुसरे उत्तम सेनापती होते. १८१८ सालीं आप्पा पेशव्यांच्या बाजूनें लढल्याने त्याच्या जहागिरीतील चिकोडी व मनोळी परगणे ब्रिटिशांनीं खालसा करून कोल्हापूरकरांस परत केले. इ.स. १८०० व १८०३ सालीं अप्पांनी इंग्रजांस दिलेली मदत या गोष्टी लक्षात घेऊन पेशवाईच्या अस्तानंतर इंग्रजांनी आप्पा देसाईची जहागीर खालसा न करता त्याचा लष्करी सरंजाम तो मरेपर्यंत त्याच्याकडे ठेवण्याचें ठरविलें. पुढें त्यानें आपला पुतण्या मुरारराव यास दत्तक घेतलें. नंतर १८३९ सालीं हा मरण पावला व त्याचा लष्करी सरंजाम बेळगांव, धारवाड आणि सोलापूर या जिल्ह्यांत विभागण्यांत आला. आप्पाच्या मृत्युनंतर त्यांची जेष्ठ पत्नी दत्तकातर्फे सर्व अधिकार पहात होती. इ.स.१८४० साली तिच्या मृत्युनंतर अप्पांच्या उर्वरीत ५ बायकांमध्ये भांडणे लागली व दुसऱ्या क्रमांकाच्या पत्नीकडे सर्व अधिकार आले. अप्पांच्या उर्वरीत चार बायकांनी अप्पांचा भाऊ व ३०० अरबांच्या मदतीनें दत्तकपुत्रासोबत राजवाडा व निपाणी कोटाचा ताबा घेतला. यावर १८४१ साली इंग्रजांनीं किल्ला ताब्यात घेऊन अरबांस शिक्षा करण्यांत आली. यावेळी किल्ला निकामी करण्यांत आला व ज्यांनी यात भाग घेतला त्या सर्वांचे तनखा बंद करण्यात आले.
© Suresh Nimbalkar