NIMGAONJALI

TYPE : MANSION

DISTRICT : NAGAR

HEIGHT : 0

GRADE : EASY

पेशवाईच्या अखेरच्या काळात तिचा कोसळता डोलारा सांभाळण्याचे काम ज्या सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांनी केले त्यांचा रहाता वाडा आजही आपल्याला नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या निमगाव जाळी गावात पहायला मिळतो. निमगाव जाळी गाव नगरपासून ८० कि.मी. अंतरावर तर संगमनेर या तालुक्याच्या ठिकाणाहुन २० कि.मी.अंतरावर आहे. त्रिंबकजी डेंगळे यांच्या काळात गावाभोवती बांधलेली तटबंदी आज बहुतांशी नष्ट झाली असुन त्यातील केवळ दोन दरवाजे शिल्लक आहेत. यातील पश्चिमेकडे असलेला दरवाजा म्हणजे पुणे दरवाजा तर उत्तरेकडे असलेला दरवाजा खिडकी दरवाजा म्हणुन ओळखला जातो. पुणे दरवाजा दोन बुरुजात बांधलेला असुन त्याचे आता सरदार त्र्यंबकजी डेंगळे प्रवेशद्वार असे नामकरण करण्यात आले आहे. या दरवाजाच्या आतील बाजुस देवड्या असुन त्याचे लाकडी दार मात्र नष्ट झाले आहे. या दरवाजा बाबत असे सांगीतले जाते कि त्रिंबकजींच्या कारभाऱ्यानी या गावकुसास उत्तरेकडे तोंड करून दिल्ली दरवाजा उभारला होता पण त्रिंबकजी यांनी पेशव्यांप्रती आपली निष्टा व्यक्त करण्यासाठी दिल्ली दरवाजा पाडून त्या ऐवजी पश्चिमेला म्हणजे पुण्याकडे तोंड करून पुणे दरवाजा बांधायला सांगितले. ... आज त्या दिल्ली दरवाजाच्या जागी असलेला छोटा दरवाजा म्हणजे खिडकी दरवाजा आहे. त्रिंबकजी डेंगळे यांचा वाडा गावाच्या एका बाजुस असुन चौकोनी आकाराचा हा वाडा साधारण पाउण एकरवर पसरलेला आहे. काळाच्या ओघात या वाड्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असुन आज थोडेफार अवशेष शिल्लक आहेत. संपुर्ण वाड्याभोवती २० फुट उंच तटबंदी उभारली असुन या तटबंदीची बहुतांशी पडझड झाली आहे. तटाचा फांजीपर्यंत भाग दगडांनी बांधलेला असुन वरील बांधकाम विटांनी केलेले आहे. या तटबंदीच्या उत्तर बाजुच्या कोपऱ्यावर एक पडझड झालेला बुरुज पहायला मिळतो. दक्षिणेकडील तटबंदीत आत जाण्यासाठी घडीव दगडात बांधलेला दरवाजा असुन त्यावर कमळाची फुले तसेच देवळ्या कोरलेल्या आहेत. वाड्याच्या प्रशस्त भिंती पहाता कधीकाळी हा वाडा दुमजली असल्याचे दिसुन येते. वाडयाच्या बांधकामात घडीव दगड तसेच विटांचा वापर केलेला आहे. वाड्यात दोन चौक असुन मागील चौकाची पडझड झालेली आहे तर दर्शनी भागातील चौक आजही तग धरून आहे. या चौकात दोन घरे असल्याने हा चौक आजही वापरात आहे. या चौकात एक बंदिस्त आड असुन त्या शेजारी घोडे बांधले जात असत. संपुर्ण वाडा फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. पेशवाईच्या अखेरच्या काळात इंग्रजांशी अखेरपर्यंत लढा देणारे बाजीराव पेशव्यांचे मुख्य कारभारी म्हणजे त्रिंबकजी डेंगळे. एक सर्व सामान्य नोकर,जासुद ते दुसऱ्या बाजीराव पेशव्याचे मुख्य कारभारी असा प्रवास करत निमगावजाळी इथल्या त्रिंबकजी डेंगळे यांनी पेशव्यांच्या दरबारात महत्वाचे स्थान मिळवले. जून १८१७ च्या तहानंतर दुसरे बाजीराव पेशवे यांनी शिंदे, होळकर, भोसले यांना एकत्र करुन इंग्रजांना येथून घालवण्याचा घाट घातला. बाजीराव पेशव्यांनी गणपतराव पानसे यांच्याकडील तोफखाना काढून त्र्यंबकजी डेंगळे यांना त्याचे प्रमुख नेमले. त्रिंबकजी डेंगळे यांनी इंग्रजांना शह देण्यासाठी भांबुरड्याला तोफांचा कारखाना सुरू केला. पेशवाईच्या अखेरच्या काळात भारतातील जवळपास सर्व राजे, संस्थानिक इंग्रजांना शरण आले होते. पुण्याच्या शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकवावा यासाठी एल्फिस्टन पुण्यात येऊन पोहोचला होता. सदाशिव माणकेश्वरनंतर इंग्रज अधिकारी एलफिन्स्टन याच्याशी संपर्क ठेवण्याचे काम डेंगळेंकडे आले. त्याच्या स्पष्ट व चढाऊ धोरणामुळे एलफिन्स्टन नाराज झाला. इंग्रजांची येथुन हकालपट्टी करण्याचा त्र्यंबकजीचा डाव एलफिन्स्टनच्या लक्षात आला. या धामधुमीत बडोद्याच्या गायकवाडांचे वकील गंगाधर शास्त्री पंढरपुरला आले असता त्यांचा खून झाला. इंग्रज अधिकाऱ्यांनी या खुनाचा ठपका त्रिंबकजींवर ठेवला व त्रिंबकजीला खुनाच्या आरोपाखाली आमच्या ताब्यात द्या नाहीतर लढाईला तयार अशी धमकी बाजीराव पेशव्यांना दिली. त्रिंबकजीं डेंगळे यांना ताब्यात घेऊन आधी वसंतगड (सातारा) येथे व नंतर ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले पण १२ सप्टेंबर १८१६ ला त्र्यंबकजी डेंगळे यांनी तुरुंगातुन पलायन केले. ५ जुलै १८१७ रोजी बाजीराव-इंग्रज तह झाला व मराठ्यांची सत्ता संपुष्टात आल्याने त्र्यंबकजीची कोंडी झाली. त्यांनी खानदेशात जाऊन भिल्ल पलटण उभी केली व इंग्रजांविरुद्ध लढा देणे चालू ठेवले. इंग्रज राजवटी विरुद्ध उठाव केल्याने इंग्रजांनी पेशव्यांवर दबाव आणला व त्यांना ताब्यात देण्यासाठी पुरंदर,सिंहगड हे किल्ले ओलीस ठेऊन घेतले. इतिहासात एखाद्या व्यक्तीसाठी किल्ले जामीन ठेवायची ही पहिलीच वेळ होती. त्रिंबकजींची इंग्रजांना एवढी दहशत होती की त्यांनी त्रिंबकजींना पकडून देणारास दोन लाख रुपये आणि एक हजार रुपयांचा इनामगाव दिला जाईल असे जाहीर केले. त्रिंबकजी नाशिक जिल्ह्यातील अहिरवाडी या त्यांच्या सासरवाडी गावात आले असता तेथील जयाजी पाटील याने २८ जून १८१८ रोजी मालेगावला जाऊन पोलिसांना खबर दिली व कॅप्टन स्वॅन्स्ट्नच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकजी डेंगळे पकडले गेले. त्रिंबकजींनी पुन्हा ठाण्याच्या तुरुंगात नेण्यात आले पण त्यांचा पूर्वानुभव बघता ५ एप्रिल १८१९ रोजी त्यांना ठाण्याहून बोटीने कलकत्त्याला व तेथुन चुनारच्या तुरुंगात नेण्यात आले. अखेरची दहा वर्षे त्रिंबकजी डेंगळे याच तुरुंगात होते. १६ ऑक्टोबर १८२९ रोजी तुरुंगातच त्रिंबकजीं डेंगळे यांचा मृत्यु झाला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!