NIMBLAK

TYPE : GADHI

DISTRICT : SATARA

HEIGHT : 0

GRADE : EASY

महाराष्ट्रात गढीकोट वाडे यांची संख्या हजारोच्या घरात असली तरी यातील बहुतेक वास्तु या मध्ययुगीन कालीन किंवा त्याच्याही अलीकडील काळातील आहेत. यात प्राचीन गढी अथवा वाडे अभावानेच पहायला मिळतात. अशीच एक प्राचीन गढी म्हणजे निंबळक येथे असलेली निंबराज परमार(पवार) म्हणजेच राजे निंबाळकर यांची गढी. सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात निंबळक गावात असलेली हि गढी फलटण शहरापासून १५ कि.मी. अंतरावर आहे. १४ व्या शतकात बांधलेल्या या गढीची आज मोठया प्रमाणात दुरावस्था झाली आहे. एका चौथऱ्यावर उभ्या असलेल्या या गढीच्या बांधकामात घडीव तसेच ओबडधोबड दगडांचा वापर केलेला आहे. आयताकार आकाराची हि गढी पुर्वपश्चिम बांधलेली असुन गढीचा परीसर साधारण अर्धा एकरचा आहे. गढीचा दरवाजा पुर्वाभिमुख असुन गढीच्या तटबंदीत एकुण चार बुरुज आहेत. गढीच्या एकंदरीत बांधकामात कोणतीही सुसूत्रता नसुन कसल्याही प्रकारचे कोरीवकाम दिसुन येत नाही. ... गढीच्या तटबंदीची रुंदी १०-१२ फुट असुन उंची २०-२५ फुट आहे. गढीच्या तटबंदीची आतील भिंत चिकणमातीने बांधलेली असुन काही ठिकाणी ती कोसळली आहे. तटबंदीत बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या आहेत. गढीचा दरवाजा मुळ बांधकामातील नसुन नंतर बांधण्यात आला असला तरी बराच जुना आहे. दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडुन तटबंदीतच वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. गढीत शाळा बांधलेली असुन या शाळेच्या बांधकामाने गढीच्या आतील मूळ अवशेष पुर्णपणे भुईसपाट केलेले आहे. जवळपास ६० वर्ष निंबाळकर घराण्याचा उदय व उत्कर्ष पहाणारी हि गढी आज मात्र ओंस पडली आहे. गढीच्या आत पाहण्यासारखे काहीच नसल्याने गढी फिरण्यास १५ मिनीटे पुरेशी होतात. महाराष्ट्रांतील राजघराण्यांत फलटणचे निंबाळकर घराणे फार जुनें असून सुमारे साडेसातशें वर्षापासुन हे घराणे महाराष्ट्रात आहे. दिल्लीच्या सुलतानांच्या उत्तर हिंदुस्थानात वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे काही राजघराणी दक्षिणेकडे आली यात धारचे परमार घराणे होते. यातील निंबराज परमार नांवाचा एक पुरुष फलपत्तन म्हणजेच आजच्या फलटण जवळ शंभुमहादेवाच्या रानांत इ.स.१२७३ च्या सुमारास येऊन राहिला. निंबराज यांनी शंभूमहादेवाच्या पायथ्याशी वसाहत केली व येथे निंबाच्या झाडाखाली सापडलेल्या मूर्तीला निमजाईदेवी नाव देऊन तिचे लहानसे मंदिर बांधले. निंबराज पवार याने स्वतःचे सैन्य गोळा करून निंबळक गाव वसवले. त्यावरून निंबराज ज्या गावीं राहिला त्या गावास निंबळक व तेथे रहाणारे त्याचे वंशज यांना निंबाळकर नाव पडले. निंबराज पवार याच्या इ.स १२९१ मधील मृत्युनंतर त्याचा पुत्र पोदखला जगदेव गादीवर आला. पोदखलाने इ.स. १३०१ मध्ये खानदेश व बऱ्हाणपुर लुटल्याने अल्लाउद्दीन याने इ.स. १३०९ मध्ये निंबळकवर हल्ला केला. यात झालेल्या पराभवानंतर पोदखला याने दिल्ली सुलतानांचे मांडलिकत्व पत्करले. या काळात पंजाब प्रांतात मोगलांबरोबर झालेल्या युद्धात पोदखला याने दिल्ली सुलतान महम्मद तुघलक याच्या वतीने सैन्यासह भाग घेतला व मोठा पराक्रम गाजवला पण यात इ.स.१३२७ त्याचा मृत्यु झाला. पोदखला उर्फ धारापतराव याच्या पराक्रमाबद्दल त्याचा मुलगा निंबराज दुसरा याला इ.स.१३२७ ला निंबळक गावच्या आसपासचा साडेतीन लाख रुपये उत्पन्नाचा मुलुख नाईक हि पदवी व सरंजाम देण्यात आला. नवीन मिळालेल्या जहागिरीत निंबळक हे ठिकाण गैरसोयीचे वाटल्याने निंबराज दुसरा याने या नवीन मिळालेल्या जहागिरीच्या मध्यभागी फलपत्तन म्हणजेच फलटण येथे नव्याने गाव वसवून इ.स.१३३० साली आपला मुक्काम तेथे हलवला व निंबळक गढीचे महत्व कमी होऊन फलटण गाव वाढीस लागले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!