NHAVIGAD

TYPE : HILL FORT

DISTRICT : NASHIK

HEIGHT : 3650 FEET

GRADE : HARD

नाशिमधील बागलाण प्रांत म्हणजे दुर्गांची खाण आहे. एकापेक्षा एक असे सरस किल्ले या प्रांतातील सेलबारी-डोलबारी या डोंगररांगेवर वसलेले आहेत. पण प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी आपले बंधु व्यंकोजीराजे यांना इ.स.१६८० मध्ये लिहिलेल्या पत्रात उल्लेखलेला किल्ला म्हणजे नाहावागड उर्फ रतनगड. या पत्रात महाराज व्यंकोजीराजे यांना लिहीतात, दुसरा नाहवागड बागलाणच्या दरम्यान मुलकात आहे.तो कठीण तोही घेतला. हे दोन किल्ले (अहिवंत व नाहवा ) नामोशाचे पुरातन जागे कबजा केले. त्या किल्ल्यावरही बहुत मालमत्ता सापडला व त्याच बरोबर जमेत होती ते मुलकात पाठवून धामधुम केली. बागलाण मधील सटाणा तालुक्यात असलेला हा किल्ला नाशिक पासुन ताहराबादमार्गे १२८ कि.मी.अंतरावर असुन सटाणा या तालुक्याच्या ठिकाणाहुन ३८ कि.मी. अंतरावर आहे. भिलवाड हे किल्ल्याजवळील गाव मांगी-तुंगी या जैन तीर्थक्षेत्रामुळे चांगलेच प्रसिध्द असुन तिथवर येण्यासाठी वाहनांची चांगली सोय आहे. येथुन पाताळवाडी हि नहावागडाच्या पायथ्याशी असलेली छोटीशी वस्ती ५ कि.मी. अंतरावर असुन खाजगी वहानाने थेट या वस्तीपर्यंत जाता येते. ... भिलवाड पासुन नाहवागड सतत नजरेस पडत असला तरी पाताळवाडीत पोहोचल्यावर गावामागे दक्षिणोत्तर पसरलेल्या या गडाचा आकार हरीहरगड प्रमाणे जाणवतो. पाताळवाडी वस्तीतुन किल्ल्याखालील पठारावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. या पठारावर न्हावीगडाची एक सोंड उतरलेली असुन या सोंडेवर किल्यावर जाणारी वाट आहे. या सोंडेच्या पायथ्याशी वाघदेवाच ठाण असुन येथे एका ओंडक्यावर सूर्य-चंद्र व वाघ कोरलेला आहे. या ठिकाणी असलेले दगडी अवशेष व चौथरा पहाता येथे कधीकाळी गडाच्या वाटेवरील मेट असावे. हे ठिकाण म्हणजे खानदेश-बागलाणची हद्द असुन या सरहद्दीवर हा किल्ला वसलेला आहे. आज पठाराच्या एका बाजुस नाशिक जिल्हा तर दुसऱ्या बाजुस धुळे जिल्हा आहे. पाताळवाडी गावातुन या पठारावर येण्यास अर्धा तास पुरेसा होतो. पठारावरून सोंड चढुन थोडे वर आल्यावर मुख्य वाटेवरून एक पायवाट डावीकडे जाताना दिसते. या पायवाटेवर एका झाडावर झेंडा फडकताना दिसतो. या वाटेने थोडे पुढे आल्यास कातळात कोरलेले मोठे फुटके कोरडे टाके असुन या टाक्यावर अठरा हात असलेली सप्तशृंगी देवीची मुर्ती कातळात कोरून रंगवलेली आहे. या टाक्यापुढे काही अंतरावर थोडे वरील बाजुस पाण्याचे दुसरे टाके आहे. या टाक्यात पिण्यायोग्य पाणी असुन सध्या गडावर पिण्याच्या पाण्याची हि एकमेव सोय आहे. हि दोन्ही टाकी पाहील्यावर मागे फिरून आपल्या पुढील वाटचालीस सुरवात करावी. या वाटेने थोडे वर चढल्यावर आपण सोंडेच्या टोकाशी असलेल्या बुरुजाखाली येतो. येथुन किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. येथुन सरळ वर जाणारी कातळात कोरलेल्या पायऱ्याची वाट आपल्याला थेट बुरुजावर नेऊन सोडते पण काही ठिकाणी पायऱ्या तुटल्या असल्याने धोक्याची आहे. पायऱ्या तुटलेल्या ठिकाणी आपल्याला प्रस्तरारोहण करावे लागते. या सोंडेखाली डावीकडे वळणारी दुसरी वाट असुन पहिल्या वाटेच्या तुलनेने हि वाट सोपी आहे. या वाटेने किल्ल्याचा डोंगर उजवीकडे व दरी डावीकडे ठेवत थोडे पुढे आल्यावर डोंगराच्या पोटात कोरलेले गुहेवजा टाके पहायला मिळते. वाटेच्या पुढील भागात कातळात उघडयावर कोरलेली दोन टाकी असुन या दोन्ही टाक्यातील पाणी शेवाळाने हिरवेगार झाले आहे. वाटेत पुढे गुहेत कोरलेले खांब टाके असुन त्यातील पाणी वापरात नसल्याने खराब झाले आहे. हे टाके पाहुन पुढे आल्यावर वर जाण्यासाठी कातळात कोरलेली पायऱ्याची वाट सुरु होते. या पायऱ्या चढुन कातळात कोरलेल्या पण कमान नसलेल्या दरवाजाने आपला गडाच्या खालील भागात प्रवेश होतो. या दरवाजा शेजारी बुरुज बांधलेला असुन दरीच्या काठाने काही प्रमाणात तटबंदी दिसुन येते. या दरवाजाने आत शिरल्यावर वाट उजवीकडे सोंडेवरील बुरुजाच्या दिशेला वळते. वाटेच्या सुरवातीस कातळात कोरलेली दोनखांबी गुहा असुन त्यापुढे एक फुटके टाके आहे. या वाटेने पाच मिनीटात आपण खालुन पाहीलेल्या बुरुजाच्या माथ्यावर पोहोचतो. येथुन खाली पाहिले असता बुरूजाखालुन थेट वर येणाऱ्या वाटेची कल्पना येते व त्यातील धोका लक्षात येतो. बुरुजाकडून गडाच्या माथ्यावर जाणारी वाट पुर्णपणे कातळात कोरलेली असुन या पायरीमार्गावर माती साठल्याने त्या सावधगिरीने पार कराव्या लागतात. या वाटेने दहा मिनीटात आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. गडाचा दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन त्याचा केवळ उंबरठा शिल्लक आहे. पाताळवाडीतुन गडाच्या माथ्यावर प्रवेश करण्यासाठी दीड तास लागतो. किल्ल्याचा निमुळता माथा समुद्रसपाटी पासुन ३६५० फुट उंचावर असुन दक्षिणोत्तर साधारण अडीच एकरवर पसरलेला आहे. गडमाथ्यावर सुरवातीस कातळात कोरलेले मोठे टाके असुन या टाक्याच्या आत तीन लहान टाकी कोरलेली आहेत. या टाक्यात पाणी जमा करण्यासाठी त्याच्या काठावर चर खोदण्यात आला आहे. टाक्याच्या पुढे काही अंतरावर उध्वस्त वाड्याचा चौथरा व भिंती असुन वाड्याच्या मागील बाजुस पाण्याचे दुसरे टाके आहे. या टाक्याच्या काठावर अजुन काही वास्तुंचे चौथरे आहेत. माथ्याच्या दक्षिणेला एक सुळका असुन या सुळक्याला प्रदक्षिणा करताना त्याच्या उजव्या बाजुस एक बुजलेले तर एक पाण्याने भरलेले अशी दोन पाण्याची टाकी पहायला मिळतात. सुळक्याच्या डावीकडे दगडमातीने भरलेली दोन टाकी आहेत. या सुळक्याच्या पोटात एक नेढे असुन सोपे प्रस्तरारोहण करून सुळक्यावर जाता येते. सुळक्याच्या माथ्यावर कोणतेही अवशेष नसले तरी येथुन दिसणारा परीसर मन मोहुन टाकतो. माथ्यावरून पुर्वेला तांबोळ्या, मांगीतुंगी तर दक्षिणेला मुल्हेर, मोरागड, हरगड, साल्हेर- सालोटा हे किल्ले नजरेस पडतात. संपुर्ण गडमाथा फिरण्यास पाउण तास पुरेसा होतो. गडावरील कातळकोरीव पायरीमार्ग व खांबटाकी पहाता गड प्राचीन काळापासूनच नांदता असावा. शिवपूर्वकालीन इतिहासात नाहवा गडाचा उल्लेख तुंबोळा नावाने येतो. तवारीख अल्फी या ग्रंथातील माहीतीनुसार हिजरी ८३५ म्हणजे इ.स.१४३१ मधे गुजरातच्या सुलतानचा राजपुत्र महमदखान हा नंदुरबारच्या मोहीमेवर असताना अहमदशहा बहमनी याने त्याच्यावर चाल केली. पण गुजरातचे सैन्य वेळेवर त्याच्या मदतीस आल्याने बहमनी फौजेला माघार घ्यावी लागली. या सैन्याने परत जाताना तुंबोळा किल्ल्याला वेढा घातला. यावेळी पाठलागावर असलेले गुजरातचे सैन्य व अहमदशहा बहमनी फौज यांच्यात न्हावीगडाच्या (तुंबोळा) पायथ्याशी मोठी लढाई झाली. यात दोन्ही बाजुचे प्रचंड नुकसान झाले पण लढाई निर्णायक न ठरल्याने दोन्ही सैन्यांनी रात्रीच्या अंधाराचा फ़ायदा घेऊन माघार घेतली. इ.स. १६७० मध्ये कांचनबारीच्या लढाईनंतर मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला व आसपासचा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात आणला पण तो नंतर पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेला असावा. शिवकाळात या गडाचा उल्लेख नाहावागड असा आला आहे. कालांतराने नाहावागडचे न्हावीगड असे सोपे नामकरण झाल्याने इंग्रजी कागदपत्रात या किल्ल्याचा बार्बरस फोर्ट नावाने उल्लेख येतो. खाजगी वाहन सोबत असल्यास न्हावीगड व मांगी-तुंगी सुळके एका दिवसात पहाता येतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!