NESARIKHIND

TYPE : BATTLEFIELD/ SAMADHI

DISTRICT : KOLHAPUR

महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील घटप्रभा नदीच्या काठी वसलेले गाव म्हणजे नेसरी. नेसरी स्मारकाच्या वाटेवर नेसरी चौकातच प्रतापराव गुजरांचा घोड्यावरील युद्धाच्या आवेशातील देखणा पुतळा आहे. पुतळ्याच्या उजव्या बाजूने स्मारकाकडे जाण्याचा रस्ता आहे. नेसरी स्मारक म्हणजे स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या अपूर्व बलिदानाने पवित्र झालेले स्थान. इतर स्माराकांपेक्षा ह्या स्मारकाची अवस्था फारच चांगली आहे. आता मध्ये बाग करून नीट काळजी घेतली आहे. छानसे बांधकाम, राखलेली बाग, सात ढाली आणि सात तलवारी आणि या पराक्रमाचे यथार्थ वर्णन करणारी माहीती. स्मारकात आतमध्ये डाव्या बाजूस शिवाजी महाराजांचा १८/२० फुट उंच सिंहासनारूढ पुतळा असुन मधोमध स्तंभ आहे त्यावर त्या युद्धाची माहिती लिहून ठेवली आहे आणि स्तंभासमोर शुरतेचे प्रतिक म्हणून एक ढाल आणि तलवार आहे. स्मारकातील महत्वाची वास्तू म्हणजे त्या सात शूरांच्या शुरतेचे प्रतिक म्हणून उभारलेले एक देखणे शिल्प. ... खाली सहा ढाली त्यावर खांबासारख्या सात तलवारी आणि त्या तलवारींवर एक ढाल. म्यानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात…”हे कुसुमाग्रजांचे काव्य ऐकलं की, अंगावर रोमांच उभे राहतात. कारण सरसेनापती प्रतापराव गुर्जरांचा पराक्रम या काव्यातून उलगडण्यात आलाय. वेडात मराठे वीर दौडले सात असे ज्यांच्याबद्दल बोलले जाते ते शूर सेनानी म्हणजे सेनापती प्रतापराव गुजर आणी त्यांचे सहा शिलेदार विसोजी बल्लाळ, विठोजी शिंदे, विठ्ठल पिलदेव अत्रे, दीपाजी राऊतराव, सिद्दी हिलाल, कृष्णाजी भास्कर ह्यांच्या स्वामिनिष्ठेचा, पराक्रमाचा इतिहास होय. या सात वीरांनी सुमारे बारा हजार सैन्यावर चाल करुन मोठा पराक्रम केला होता. हि लढाई कोल्हापुरातील नेसरी येथे महाशिवरात्री दि. २४ फेब्रुवारी १६७४. यादिवशी झाली होती. कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेसरीच्या खिंडीत प्रतापरावांनी बलिदान दिले. त्यांच्याच दैदिप्यमान पराक्रमाचा हा एक आढावा. प्रतापराव गुर्जर. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेतला एक महत्वाचा पैलू. कुडतोजी गुर्जर असं त्यांचं मुळ नावं. मात्र स्वराज्य स्थापनेचा वसा घेतलेल्या या मावळ्यानं अख्ख मराठ्यांचं साम्राज्य पराक्रमानं गाजवलं. शिवछत्रपतींच्या सैन्यदलात ज्याप्रमाणे तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखे मावळे होते, त्यांच्यासरखेच एक म्हणजे प्रतापराव गुर्जर. याच प्रतापरावांनी आपल्या 14 वर्षांच्या कारकिर्दीत मोघलांना सळो की पळो करुन सोडलं होतं. घटना 1674 सालाची. घडले असे कि, राज्याभिषेकाच्या सुमारास आदिलशाही सरदार बेहलोलखान स्वराज्यामध्ये धुडगूस घालत होता. महाराजांनी सेनापती प्रतापराव गुजर ह्यांस खानावर धाडले. प्रतापरावांनी खानाला नेसरीच्या मैदानात चारी मुंड्या चित केले. खान शरण आला आणि तह केला. प्रतापरावांनी खानाला क्षमा करून सोडून दिले. परंतु खान पुन्हा मराठी मुलुखात धुडगूस घालू लागला. तेव्हा महाराजांनी सेनापतीस खरमरीत पत्र लिहिले ..."स्वराज्यावर चालून येणाऱ्या गनिमास गर्दीस मिळवल्याशिवाय आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका..." प्रतापराव संधी शोधत होते परंतु बेहलोलखान आता २० हजार सुसज्ज फौजेसह होता. परिस्थिती अत्यंत बिकट होती कारण रायगडावर राजाभिषेकासाठी तर सरसेनापतीस जावेच लागणार! परंतु राजांनी तर "तोंड दाखवू नका" असा इशारा दिला होता. सरनौबत कात्रीत सापडले होते. ......हेच ते कुड्तोजी गुजर ज्यांनी मिर्झा राजे जयसिंगाच्या छावणीत जाऊन त्यांच्यावर आत्मघातकी हल्ला केला होता परंतु मुत्सद्दी जयसिंगाने त्यांना सोडून दिले होते. महाराजांनी त्यांना प्रतापराव हा किताब देऊन सेनापतीपद दिले....अखेर खान पुन्हा एकदा समोर आला. त्यावेळी बहलोल खान हा कोल्हापूर जिल्ह्यात नेसरीच्या खिंडीत तळ ठोकून असल्याची खबर प्रतापरावांना मिळाली. त्यावेळी प्रतापराव गडहिंग्लज जवळच्या सामानगड किल्ल्यांवर होते आणि ज्यावेळी बहलोलची खबर प्रतापरावांना लागली परंतु त्यावेळी प्रतापरावाकडे अवघे १२०० सैन्य होते तर खानाचा सैन्यासागर १५००० ! प्रताप रावांनी आपल्या फौजेला खानाच्या तोंडी न देता सरळ एकट्याने खानाच्या फौजेवर चालून गेले. अगदी अचानक हल्ला...क्षणमात्र विचार न करता त्यांचे सहा शिलेदार देखील पाठोपाठ आपल्या सेनापती सह दौडू लागले...सातही जण जाऊन खानाच्या फौजेला भिडले, एकच वीज तळपली आणि क्षणार्धात काळाकुट्ट अंधार!!! काय ती स्वामीनिष्ठा आणि काय तो पराक्रम! शिवरायांना आपल्या पत्रातील मजकूर प्रतापराव इतका मनाला लाऊन घेतील असे वाटले नव्हते. परंतु प्रतापरावासारखे अस्सल स्वामीनिष्ठ सेवक असेच अनोखे पराक्रम घडवून आणतात. आणि समोर पसरलेल्या गनिम सैन्य सागरावर आपल्या सेनापती पाठी चालून जाणारे त्यांचे सहा शिलेदार म्हणजे तर स्वमिनिष्ठेचा कळस. प्रतापराव तर सुडाने पेटून उठले होते, विवेकावर वीरश्री स्वर झाली होती. मात्र हे सहा शिलेदार निव्वळ स्वामीनिष्ठेने पेटून उठले होते! . पराकोटीची स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यावरील प्रेमापोटी या सात वीरांनी स्वतःस मरणाच्या हवाली केले. हि घटना माहित झाल्यावर महाराजांस अतीव दुःख झाले व या सात वीरांचे स्मारक महाराजांनी नेसरीजवळ उभारले. प्रतापरावांच्या बलिदानानं नेसरीची खिंड पावन झाली खरी मात्र याच खिंडीचा इतिहास लिहीला गेला तो कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्तींनी. इतका पराक्रम गाजवूनही प्रतापराव हे इतिहासामध्ये उपेक्षित राहिले. सभासदाच्या बखरीत प्रतापराव गुजर या महान सेनापती बद्दल पुढीलप्रमाणे लिहिले आहे. पन्हाळगडाच्या लढाईच्या समयी नेताजी पालकर समयी न आल्यामुळे मराठ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे राजेंनी नेताजी पालकर याला बुलावून आणिला आणि “समयास कसा पावला नाहीस?” म्हणून शब्द लावून, सर्नोबाती दुर करून, राजगडाचा सरनौबत कडतोजी गुजर होता, त्याचे नाव दूर करून प्रतापराव ठेवले, आणि सर्नोबती दिली. प्रतापरावांनी सेनापती करीत असता श्याहान्नाव कुळीचे मराठे चारी पातशाहित जे होते व मुलखांत जे जे होते ते कुल मिळवले. पागेस घोडी खरेदी केली. पागा सजित चालिले व शिलेदार मिळवीत चालिले. असा जमाव पोक्त केला. चाहु पाताशाहित दावा लाविला. विजापूरहून बलोल्खन बारा हजार सैन्यानिशी चाल करून आला. तो फौजेनिशी हिकडे चालला हि खबर राजीयांस कळोन कुळ लष्कर प्रतापराव यास हुकुम करून आणविले आणि हुकुम केला कि, “विजापूरच्या बलोलखान एवढा” वळवळ बहुत करत आहे. त्यास मारून फत्ते करणे. म्हणोन आज्ञा करोन लष्कर नावाबाव्री रवाना केले. त्यांनी जाउन उम्बारीस नावाबास सांगितले. चौतर्फा राजियाचा फौजेने कोंडून उभा केला. पाणी नाही असा जेर केला. युद्धही थोर जहाले. इतक्यात अस्तमानही जाला. मग निदान करून नवाब पाणियावर जाऊन पाणी प्याला. त्याजवरी प्रतापराव सरनौबत यास आंतस्त कळविले कि “आम्ही तुम्हावरी येत नाही. पातशाहाच्या हुकुमाने आलो. याउपरी आपण तुमचा आहे. हरएक वक्ती आपण राजियाचा दावा न करी.” असे किती एक ममतेचे उत्तर सांगोन सला केला. मग राजीयांचे लष्कर निघोन गेले. राजीयांनी प्रताप्रावांस पाठविले कि, “तुम्ही लष्कर घेओन जाऊन बलोलखान येतो, यांशी गांठ घालून, बुडवून फत्ते करणे नाहीतर तोंड नं दाखविणे.” ऐसे प्रतापराव यांस निक्षून सांगून पाठविले. त्यावरी प्रतापराव जाऊन बलोलखानशि गांठले. नेसरीवारी नवाब आला. त्यांने गाठीले. मोठे युद्ध झाले. अवकाल होऊन प्रतापराव सर्नोबत तलवारीचे वाराने ठार झाले. रण बहुत पडिले. रक्ताच्या नद्या चालल्या. प्रतापराव पडले, हि खबर राजीयानी ऐकून बहुत कष्टी जाले आणि बोलले कि, “आज एक बाजू पडली!” या सात वीरांच्या बलिदानाने स्वराज्यातील मावला पेटून उठला. या वीरांचा पराक्रम इतिहासात कायमचा अमर झाला. मराठ्‌यांच्या इतिहासाची साक्ष देणार्याक या प्रतापरावांच्या बलिदान स्मारकाला मानाचा मुजरा…
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!