NASTANPUR

TYPE : GADHI

DISTRICT : NASHIK

HEIGHT : 0

GRADE : EASY

नाशिकहून मनमाडमार्गे चाळीसगावला जाताना नांदगाव ओलांडल्यावर महामार्गाला लागुनच नस्तनपूर म्हणुन एक लहान खेडेगाव लागते. येथे असलेल्या शनीदेव मंदिरामुळे या भागात हे गाव प्रसिध्द आहे पण याच गावात अगदी रस्त्यला लागुन असलेला नस्तनपूर भुईकोट मात्र कोणाला माहित नाही. स्थानिक लोक या किल्ल्याला खोजा राजाचा किल्ला म्हणुन ओळखतात. इतिहासात किंवा इतर ठिकाणीही या किल्ल्याची माहिती अथवा नोंद दिसत नाही. स्थानिकांना या किल्ल्याबाबत विचारले असता बऱ्याच दंतकथा सांगितल्या जातात पण त्या दंतकथा कमी आणि भाकडकथा जास्त असल्याने त्याचा इथे उल्लेख करणे टाळले आहे. नाशिक- नस्तनपूर हे अंतर १२८ कि.मी.असुन महामार्गावरून गावात शिरतानाच किल्ल्याचे ३०-३५ फुट उंचीचे बुरुज दिसुन येतात पण त्याप्रमाणात तटबंदी मात्र दिसुन येत नाही. ... गावात शिरतानाच किल्ल्याच्या बुरुजाबाहेर एका झाडाखाली काही तोफगोळे व प्राचीन शंकरपार्वती मुर्ती दिसुन येते. या मूर्तीत शंकर पार्वती कैलासावर बसलेले असुन रावण कैलासपर्वत हलवत असल्याचे दर्शविले आले आहे. या बुरुजाच्या पुढे आल्यावर तटबंदी ऐवजी पाच-सहा फुटाची लहान भिंत असुन तेथुन किल्ल्यात प्रवेश करता येतो. गावाने स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासल्याने आपल्याला नाकाला रुमाल लावूनच किल्ल्यात फिरावे लागते. या वाटेने किल्ल्यातील सर्वात उंच बुरुजावर आल्यावर येथुन किल्ल्याची संपुर्ण रचना व आतील अवशेष पहाता येतात. साधारण त्रिकोणी आकाराचा हा किल्ला ९ एकर परिसरावर दक्षिणोत्तर पसरलेला असुन गडाच्या तटबंदीत एकुण अकरा बुरुज आहेत. गडाचे बुरुज व त्यावरील बांधकाम ढासळलेले असले तरी गडाचे बांधकाम तटबंदी बांधण्यापुर्वीच थांबवलेले दिसुन येते. त्यामुळे कोठेही तटबंदीचे ढासळलेले दगड दिसुन येत नाही. किल्ल्याचे उत्तराभिमुख प्रवेशद्वार दोन बुरुजांमध्ये बांधलेले असुन हे बुरुज व दरवाजा यांच्या वरील भागात विटांचे सुंदर कमानीदार बांधकाम केलेले आहे. यातील एक बुरुज काही प्रमाणात ढासळलेला असल्याने त्यावर सहजपणे जाता येत नाही. सर्व बुरुजांवर बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या ठेवण्यात आल्या आहेत. किल्ल्याच्या रक्षणासाठी दक्षिण भागात खंदक खोदलेला असुन मुख्य दरवाजाकडे येणारा मार्ग किल्ल्याची तटबंदी व खंदक यामधुन येतो. या वाटेवर खंदकाच्या दिशेने तीन बुरुज बांधलेले असुन या बुरुजात कोठारे आहेत तसेच एका बुरुजाबाहेर गणपतीचे मंदिर आहे. किल्ल्यात तीन मोठया विहिरी असुन यातील सर्वात मोठया बुरुजाखाली असलेल्या विहिरीचे पाणी संपुर्ण किल्ल्यात खेळवले आहे. या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या असुन विहिरीच्या वरील बाजूस व बुरुजाच्या तळात असलेल्या वास्तुचा हवामहाल म्हणुन वापर केला जात असावा. किल्ल्याच्या पश्चिम कोपऱ्यात मस्जिद असुन या मस्जीदीसमोर एक चौकोनी विहीर आहे. किल्ल्याच्या मध्यभागी कोरीव व घडीव दगडात बांधलेला पण सध्या अर्धवट कोसळलेला हमामखाना आहे. या हमामखान्याच्या मागील बाजूस चौकोनी विहीर असुन एका बाजुस एका रांगेत २१ कमानी दिसुन येतात यातील दोन कमानी ढासळलेल्या आहेत. हा घोड्यांचा तबेला असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय किल्ल्यात पाणीसाठा करण्यासाठी विहिरीप्रमाणे तीन गोलाकार टाकी बांधलेली दिसुन येतात तसेच इतर काही वास्तु ढासळलेल्या अवस्थेत दिसुन येतात. किल्ल्याचे बांधकाम पहाता हा किल्ला १८ व्या शतकाच्या सुरवातीस बांधण्यात आला असावा व याच काळात ब्रिटीश सत्ता येथे रुढ झाल्याने त्यांनी पुढील बांधकामास मनाई केल्याने काम थांबविण्यात आले असावे असे दिसते. किल्ला अर्धवट झाल्याने त्याभोवती सहा फुट उंचीची साधारण भिंत घालण्यात आली. या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्याने किल्ल्याची खूप पडझड झालेली आहे. स्थानीक लोकांकडुन या ठिकाणी खोजा नाईक नावाचा भिल्ल राजा होऊन गेला व त्या राजाने हा किल्ला बांधला अशी कथा सांगण्यात येते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!