NARAYANPUR
TYPE : NAGARKOT
DISTRICT : NANDURBAR
HEIGHT : 0
GRADE : EASY
अदीवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात एकेकाळी एक दोन नव्हे तर तब्बल १५ किल्ले गिरीदुर्ग, भुईकोट व गढी या स्वरुपात अस्तित्वात होते. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे महाराष्ट्रातील गडकिल्ले या पुस्तकातील ७ किल्ले वगळता इतरत्र कोठेही या किल्ल्यांचा उल्लेख दिसुन येत नाही. यात नारायणपुर या गढीवजा किल्ल्याचा उल्लेख असुन फारच त्रोटक माहिती उपलब्ध आहे. आजच्या संगणकाच्या युगात आंतरजालावरही या किल्ल्यांची माहिती दिसुन येत नाही. आमच्या दुर्गभरारी या समुहाने या सर्व किल्ल्यांचा अभ्यासपुर्ण दौरा केला असता मिळालेली माहिती या संकेतस्थळावर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. यातील हटमोईदा व अष्टे या दोन गढी पुर्णपणे नष्ट झालेल्या असुन उरलेले १३ गढीकिल्ले त्यांचे उर्वरित अवशेष संभाळत काळाशी झुंज देत आजही उभे आहेत. या १३ किल्ल्यात १ गिरिदुर्ग असुन ३ भुईकोट २ नगरकोट तर उरलेल्या ७ गढी आहेत.
...
यातील बहुतांशी गढीकोटात गावे वसलेली असल्याने गावातील वाढत्या वस्तीने या कोटांच्या अवशेषांचा घास घेतला आहे तसेच स्थानिकांची उदासीनता देखील या कोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. नारायणपुरचा नगरकोट हा त्याचे एक जिवंत उदाहरण. नारायणपुर मध्ये असलेले ११ व्या शतकातील नारायणाचे म्हणजेच विष्णुचे प्राचीन मंदिर पहाता हे गाव व कोटदेखील तितकाच जुना असल्याचे जाणवते. एकेकाळी खानदेशाचा भाग असणारे हे गाव खानदेशच्या विभाजनानंतर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्याचा भाग बनले. नारायणपुरला भेट देण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम नंदुरबार शहर गाठावे लागते. नंदुरबार ते नारायणपुर हे अंतर १० कि.मी.असुन करणखेडा मार्गे तेथे जाता येते. नारायणपुर हे गाव नदीच्या काठावर कोटाच्या आत असल्याने किल्ला शोधण्यास फारशी अडचण येत नाही. चौकोनी आकाराचा हा कोट नदीच्या काठी ३ एकर परिसरावर वसलेला असुन चार टोकाला चार बुरुज अशी त्याची रचना आहे. गावातील वाढत्या वस्तीमुळे कोटाची दक्षिणेकडील तटबंदी पुर्णपणे नष्ट झालेली असुन इतर तीन बाजुची ७-८ फुट उंचीची आजही शिल्लक आहे. सध्या या तटबंदीचा उपयोग नवीन घर बांधताना घराचा पाया म्हणुन केला जात असल्याने ती देखील किती काळ शिल्लक राहील ते सांगता येत नाही. कोटाच्या आतच गाव असल्याने आतील प्राचीन वास्तु पुर्णपणे नष्ट झाल्या आहेत. एका चौथऱ्यावर मारुतीचे जीर्णोद्धार केलेले मंदिर असुन आतील भग्न झालेली साधारण ५ फुट उंचीची मारुती मुर्ती बाहेर ठेवलेली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या कोटाच्या दक्षिणेकडील तटबंदीत कोटाचा मुख्य दरवाजा होता तर उत्तरेला एक व नदीच्या दिशेने एक असे दोन लहान दरवाजे होते. यातील उत्तरेला असलेल्या लहान दरवाजाचे अवशेष आजही पहायला मिळतात. कोटाचे फारसे अवशेष नसल्याने १५ मिनिटात किल्ला पाहुन होतो. कोटातील वसाहतीला पाणीपुरवठा करण्यासाठी कोटाच्या बाहेरील बाजुस असलेल्या ओढ्यावर बांधलेला जुना दगडी बंधारा आवर्जुन पाहावा असा आहे. मुख्य प्रवाहाला बांध घालुन पाणी अडवुन व नंतर दुसरा लहान बंधारा घालुन हे पाणी कोटाकडे वळविले आहे. या शिवाय गावाबाहेर ११ व्या शतकातील नारायणाचे म्हणजेच विष्णुचे प्राचीन मंदिर आहे. मंदिर पुर्णपणे कोसळलेले असुन सर्वत्र कोरीव दगड व प्राचीन मुर्ती पहायला मिळतात. सध्या या भागाचा ताबा काही अनैतिक प्रवृत्तींनी घेतला असुन ते या अवशेषांची छायाचित्रे घेण्यास व तेथे फिरण्यास मनाई करतात. सदर व्यक्ती महाराष्ट्रातील नसुन त्यांना हिंदी मराठी बोलता येत नाही. स्थानिकांच्या अज्ञानतेचा फायदा घेत या प्राचीन मुर्ती येथुन नाहीशा होण्याची दाट शक्यता आहे यासाठीच येथे प्राचीन मुर्तीची छायाचित्रे घेण्यास मनाई केली जात असावी. मंदिर परिसरात विष्णुच्या सुंदर मुर्ती पसरलेल्या आहेत पण त्यांची छायाचित्रे घेऊ दिली नाहीत.
© Suresh Nimbalkar