NARAYANGAON
TYPE : NAGARKOT
DISTRICT : PUNE
HEIGHT : 0
पुणे-नाशिक महामार्गाने पुण्याहून नाशिककडे जाताना चाकण, मंचर, संगमनेर, सिन्नर यासारखी मध्ययुगीन काळातील अनेक महत्वाची शहरे पहायला मिळतात. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात पुण्याहुन ७५ कि.मी अंतरावर असलेले नारायणगाव त्यापैकी एक. नारायणगाव शहर मुंबई पुण्याहुन जवळ असल्याने तेथे जाण्यासाठी मुंबई-पुणे येथून वाहनांची चांगली सोय आहे. मध्यम आकाराचे पुणे जिल्ह्यातील तमाशाची पंढरी म्हणुन ओळखले जाणाऱ्या या शहराची स्वतःची अशी एक वेगळीच ओळख आहे. प्राचीन काळापासूनच नारायणगाव हे जुन्नर-पैठण या व्यापारी मार्गावरील एक महत्वाचे नगर होते. जुन्नर सोडल्यानंतर व्यापाऱ्यांचा पहीला मुक्काम हा बहुदा नारायणगाव येथेच पडत असावा. इतके महत्वाचे नगर म्हणजे त्याला कोट असणे साहजिकच आहे. नारायणगाव गाव मीना नदीच्या काठावर वसलेले असुन गावाच्या एका बाजुस मीना नदी वहाते. गावाच्या रक्षणासाठी या नदीचा वापर खंदकाप्रमाणे केलेला असुन गावाच्या तीन बाजुस तटबंदी उभारण्यात आली होती. वाढत्या शहरीकरणाने या कोटाच्या तटबंदीचा घास घेतला असुन आज अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत तुरळक अवशेष शिल्लक आहेत.
...
नारायणगाव यस.टी. स्थानकाजवळ आपल्याला या नगरकोटाचा उत्तराभिमुख असलेला मुख्य दरवाजा पहायला मिळतो. आज केवळ हा दरवाजा शिल्लक असुन त्याच्या आसपासचे बुरुज व तटबंदी मात्र पुर्णपणे नष्ट झालेली आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असून आतील बाजुस तटबंदीला लागून दरवाजावर जाण्यासाठी नव्याने पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. या दरवाजाचे आता पुर्णपणे नुतनीकरण झालेले असुन त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती स्थापन केलेली आहे. या दरवाजाला आता छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार हे नाव देण्यात आले आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर सरळ जाणाऱ्या रस्त्याने चालत गेल्यास ५५० मीटर अंतरावर कोटाचा दुसरा दरवाजा आहे. हा दरवाजा दोन गोलाकार बुरुजात बांधलेला असुन दरवाजाच्या वरील भागात नगारखाना आहे. या दरवाजाचे देखील काही प्रमाणात नुतनीकरण करण्यात आले असुन त्याला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक नाव देण्यात आले आहे. हा दरवाजा पाहुन डावीकडे वारूळवाडीला जाणाऱ्या रस्त्याने नदीच्या दिशेने वळले असता साधारण ३०० फुट अंतरावर कोटाच्या तटबंदीतील आजही शिल्लक असलेला एक बुरुज त्याच्या मूळ रुपात पहायला मिळतो. घडीव दगडात बांधलेला गोलाकार आकाराचा हा बुरुज नदीच्या दिशेला असुन आतील बाजूने पोकळ आहे. बुरुजात जाण्यासाठी दरवाजा असुन त्याच्या माथ्यावर जाण्यासाठी दरवाजाच्या आत दगडी जिना आहे. बुरुजाची पडझड झाली असली तरी या बुरुजात सैनिकांची राहण्याची सोय असल्याचे आतील कोनाडे पहाता लक्षात येते. कोटाचे इतकेच अवशेष आज शिल्लक असुन ते पहाण्यासाठी साधारण पाऊन तास लागतो. कोटाचा एकुण आकार पहाता मुख्य दरवाजे वगळता ये-जा करण्यासाठी या कोटाला अजून लहान दरवाजे असावेत पण तटबंदी नष्ट झाल्याने ते देखील नष्ट झाले आहेत. नारायणगावचा इतिहास अगदी सातवाहन काळापर्यंत मागे जात असला तरी याचा लिखित इतिहास सुरु होतो तो पेशवे काळापासुनच. इ.स.१६०५ पासून जुन्नर परगणा मालोजीराजांकडे होता. शहाजीराजांनी अनेकदा आपली नोकरी बदलली मात्र जुन्नर ते चाकणपर्यंतच्या परिसराचा ताबा सोडला नाही. जुन्नर परगण्यामध्ये नारायणगाव आणि खोडद आदी गावाचा समावेश होत होता. नारायणगड किल्याची तटबंदी बाळाजी विश्वनाथ यांच्या कालखंडात बांधली गेली व उर्वरित बांधकाम नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाले याची नोंद नानासाहेब पेशव्यांच्या रोजनिशीमध्ये मिळते. पहिल्या बाजीराव पेशव्यांचा नारायणगडाशी जवळचा संबंध होता. बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहूंनी पेशवेपदाची सूत्रे बाजीरावाकडे सोपवली तेव्हा नारायणगाव आणि नारायणगडाचा सरंजाम त्यांना दिल्याचे पत्रांमध्ये उल्लेख सापडतात. पेशव्यांतर्फे हा भाग सयाजी पवार ह्यांना सरंजाम म्हणून देण्यात आला होता. नानासाहेब उर्फ बाळाजी बाजीराव पेशव्याच्या कालावधीत पेशवाईचा आर्थिक कारभार सदाशिवराव भाऊकडे असता इ.स.१७५८ मधील नारायणगडाचा आर्थिक हिशेब आपणाकडे तातडीने सादर करावा हा त्यांचा आदेश पेशवे दप्तरामध्ये पहायला मिळतो. १९४२ मध्ये महात्मा गांधीच्या भारत छोडो आंदोलनाला या गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. माजी पोलीस पाटील कै.रावजी पाटील काळे, श्री बाळा पाटील गायकवाड यांच्या समवेत ग्रामस्थांनी नारायणगडावर राष्ट्रध्वज फडकविला होता.
© Suresh Nimbalkar