NANDOSHI

TYPE : GADHI

DISTRICT : SATARA

HEIGHT : 0

GRADE : EASY

महाराष्ट्रातील कित्येक गढीकोटांची नोंद सरकारी दफ्तरात किंवा दुर्गप्रेमींच्या यादीत दिसत नाही. कागदोपत्री गढी अथवा कोट अशी कोणतीही नोंद नसलेली सातारा जिल्ह्यातील नांदोशी गावात असलेली गढी त्यापैकी एक. या गढीवजा कोटाची माहिती आंतरजाल व इतर कोठेही सापडत नसल्याने या गढीची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न. मराठयांच्या उत्तरकाळात पेशवे सत्तेच्या केंद्रस्थानी असताना महाराष्ट्रात बरेच भुईकोट व गढ्या बांधल्या गेल्या. यातील काही भुईकोट वाडे हे खाजगी स्वरूपाचे असुन त्यांचा उपयोग महसूल जमा करण्यासाठी व स्वसंरक्षणसाठी होत होता. नांदोशी गढीबाबत इतरत्र फारशी माहिती मिळत नसल्याने स्थानिक वयोवृद्ध ग्रामस्थांनी दिलेल्या माहीतीनुसार सदर गढी देवस्थानास इनाम असुन तिचा वापर धार्मीक कार्यक्रमांसाठी केला जात असे. या गढीसाठी सातारा गादीकडून देवस्थान वतन इनाम म्हणुन मिळाले होते. वतन खालसा झाल्यावर या गढीची देखभाल करणे अवघड झाल्याने या गढीचा वापर पुर्णपणे थांबला गेला व हि गढी दिवसोदिवस उध्वस्त होत चालली आहे. ... स्थानिकांची या वास्तुप्रती असलेली उदासीनता देखील या गढीच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात नांदोशी येथे असलेल्या या गढीला भेट देण्यासाठी आपल्याला सातारा अथवा पुसेसावळी शहर गाठावे लागते. नांदोशी गाव साताऱ्यापासुन रहिमतपुरमार्गे ३६ कि.मी. अंतरावर असुन रहिमतपुर- नांदोशी हे अंतर १५ कि.मी. आहे. नांदोशी गावात हि गढी गोसाव्याची गढी म्हणुन ओळखली जाते. गढीच्या बाहेरील बांधकामाची मोठया प्रमाणात पडझड सुरु असली तरी आतील अवशेष मात्र आजही मोठया प्रमाणात शिल्लक आहेत. पुर्वपश्चिम पसरलेल्या या गढीत प्रवेश करण्यासाठी उत्तरेकडे व पश्चिमेकडे असे दोन दरवाजे असले तरी यातील पश्चिमेकडील दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन उत्तरेकडील दरवाजा मात्र आजही काही प्रमाणात शिल्लक आहे. साधारण आयताकृती आकार असलेली हि गढी दीड एकर परीसरात पसरलेली असुन गढीचे बांधकाम दोन भागात विभागलेले आहे. यातील एक भाग साठवणुकीसाठी तसेच खास लोकांसाठी होता तर दुसरा भाग हा दैनंदिन कामकाजासाठी वापरला जात असे. गढीची तटबंदी साधारण वीस फुट उंच असुन या तटबंदीत असलेले चार बुरुज ढासळलेल्या अवस्थेत आजही शिल्लक आहेत. यातील तीन गोलाकर बुरुज गढीच्या बाहेरील तटबंदीत असुन एक षटकोनी बुरुज गढीच्या अंतर्गत भागात आहे. तटबंदी व बुरुजांचे खालील बांधकाम घडीव दगडात केलेले असुन फांजीवरील बांधकाम विटांनी केलेले आहे. यात तटावरील पाणी बाहेर जाण्यासाठी बांधलेल्या अनेक दगडी पन्हाळी दिसुन येतात. तटाच्या फांजीवरील भागात काही ठिकाणी खोल्या बांधलेल्या असुन या खोल्यांना काही ठिकाणी कमानी व झरोके दिसुन येतात. गढीच्या आतील पहिल्या भागात असलेल्या दरवाजाच्या भिंतीमध्ये फांजीवर तसेच वरच्या भागात जाण्यासाठी जिना आहे. गढीच्या आत मोठया प्रमाणात गवत वाढलेले असुन आत पुर्वीच्या दैनंदिन वापरातील पाण्याची ढोणी, जाती, पाटा-वरवंटा अशा अनेक दगडी वस्तु पहायला मिळतात. गढीच्या पहिल्या भागात असलेल्या षटकोनी बुरुजावर चढल्यास एका नजरेत संपुर्ण गढी व आसपासचा परीसर नजरेस पडतो. गढीच्या दुसऱ्या भागात काही दगडी कमानी असुन येथे घोड्याच्या पागा असल्याचे सांगितले जाते. या भागात घडीव दगडात बांधलेली सुंदर विहीर असुन या विहिरीच्या तळाशी कमानीवजा दरवाजा आहे. विहिरी शेजारी असलेल्या पायऱ्यांनी या तळातील दरवाजात जाता येते. या भागात आपल्याला एका मोठया वास्तुचा चौथरा पहायला मिळतो. या भागात आजही सुस्थितीत असलेली एक कोठारवजा दुमजली वास्तु असुन या वास्तुच्या आतील भागातुन वर जाण्यासाठी जिना आहे. येथे आपली गढीची फेरी पुर्ण होते. गढीपासुन काही अंतरावर एक बाग असुन या बागेत दोन चिरेबंदी मंदीरे काही घडीव दगडात बांधलेल्या चौथऱ्यावर असलेल्या समाध्या व एक दगडी बांधकामातील पायऱ्या असलेली गोलाकार विहीर पहायला मिळते. या बागेबाहेर असलेला अर्धवट गाडलेला कमानीदार दरवाजा कधीकाळी या बागेला तटबंदी असल्याची जाणीव करून देतो. अतिशय शांत व निसर्गरम्य असलेला हा परीसर आवर्जुन भेट देण्याजोगा आहे. गढीकडून या बागेकडे जाताना एक चुन्याचा घाणा पहायला मिळतो. संपुर्ण गढी व परीसर पहाण्यास एक तास पुरेसा होतो. काही काळाची सोबती असलेल्या ह्या गढीचे साक्षीदार होण्यासाठी या गढीला लवकरात लवकर भेट दयायला हवी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!