NAGARDHAN
TYPE : GROUND FORT
DISTRICT : NAGPUR
HEIGHT : 0
GRADE : EASY
महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुर जिल्ह्यात रामटेक व नगरधन हे दोन महत्वाचे किल्ले आहेत. यातील रामटेक हा गिरीदुर्ग विदर्भात धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे पण नगरधन हा भुईकोट त्यामानाने अपरीचीत आहे. नागपुर- नगरधन हे अंतर ३७ कि.मी.असुन रामटेक या तालुक्याच्या ठिकाणापासून नगरधनचा किल्ला ६ कि.मी. अंतरावर आहे. नागपूर-जबलपूर या राष्ट्रीय महामार्गावर मनसर गाव आहे. या मनसर गावातून रामटेककडे जाण्यासाठी फुटतो. या रस्त्याने रामटेकला आल्यावर तेथून सहा कि.मी.वर नगरधन गाव गाहे. नागपुर शहरापासुन जवळच असलेल्या या किल्ल्यांना जाण्यासाठी वाहनांची चांगली सोय असल्याने एका दिवसात हे दोन्ही किल्ले सहजपणे पाहुन होतात. नगरधनचा किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असुन त्यांनी २०१२ मध्ये तटबंदी व आतील भाग दुरुस्त करून किल्ल्याला पुर्वीचे सौंदर्य प्राप्त करून दिले आहे.
...
किल्ला पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत उघडा असतो. सोमवारी किल्ला बंद असतो. नगरधन किल्ला गावाबाहेर असुन गावातुन बाहेर पडल्यावर समोरच किल्ल्याची तटबंदी व बुरुज दिसुन येतात. किल्ल्याची तटबंदी व दरवाजा पिवळसर पण काळ्या रंगाची झाक असलेल्या दगडांनी बांधलेली असुन तटबंदीची उंची साधारण २० ते २२ फुट उंच आहे. तटबंदीवर चर्या असुन त्यात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या बांधल्या आहेत. उत्तराभिमुख असलेला हा दरवाजा साधारण १२ फुट उंच असुन वरील बाजुस नगारखाना व टोकाला दोन मनोरे आहेत. दरवाजाच्या कमानीच्या मध्यावर गणेश प्रतिमा कोरलेली असुन चौकटीच्या कोनाड्यात कमळ,चषक,द्वारपाल अशी विविध शिल्पे कोरलेली आहेत. मुख्य दरवाजाला समांतर आतील बाजुस काटकोनात दुसरा उत्तराभिमुख दरवाजा आहे. हा दरवाजादेखील गणपती, हत्ती,शरभ अशी विविध शिल्पे कोरून सुशोभित करण्यात आला आहे. किल्ल्यात शिरलेल्या व्यक्तीला थेट आत जाता येऊ नये यासाठी हि रणमंडळाची रचना असुन हा संपुर्ण भाग तटबंदीवरून माराच्या टप्प्यात आहे. या भागात चौथऱ्यावर आठ ओवऱ्या असुन येथील जनतेच्या दिवाणी कामकाजाच्या या कचेऱ्या असाव्यात. दुसऱ्या दरवाजातून आत शिरल्यावर डाव्या बाजुस तटबंदीमध्ये एक लहान दरवाजा असुन त्यातुन तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी तटावर आल्यावर समोरच फांजीवर एक कबर आहे. इथुन पुर्ण किल्ल्याचा अंतर्भाग नजरेस पडतो. चौकोनी आकाराचा हा किल्ला दोन एकरवर पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत एकुण सात बुरुज आहेत. यातील एक बुरुज चौकोनी, दोन बुरुज षटकोनी तर उर्वरीत चार बुरुज गोलाकार आहेत. तटावर चढउतार करण्यासाठी अनेक ठिकाणी तटाला लागुन पायऱ्या बांधलेल्या आहेत. तटबंदीची फांजी साधारण ४ फूट रुंद असून तटबंदी अखंड असल्याने त्यावरून संपुर्ण किल्ल्याला फेरी मारता येते. येथुन सर्वप्रथम किल्ल्याच्या दरवाजावरील नगारखाना व त्याशेजारील मुर्तीचे दर्शन घेऊन पुर्व दिशेने गडफेरीस सुरवात करावी व दक्षिणेकडील तटावरून खाली उतरावे. किल्ल्याच्या तटावरून रामटेक किल्ल्याचे सुंदर दर्शन होते. किल्ल्यातील मुख्य अवशेष दक्षिण तटबंदीला लागुनच आहेत. दक्षिणेकडील तटबंदीत तीन कमानीचे दालन असुन या दालनाखाली किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दुसरा लहान दरवाजा आहे. किल्ल्याच्या दक्षिणपश्चिम तटबंदीला लागुन एक मोठा चौथरा असुन या चौथऱ्यावर कोरीवकाम केलेला मध्यम आकाराचा हौद आहे. या हौदाच्या चारही बाजुस आत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या हौदाच्या मागे तटाकडील बाजुस दुसरा मोठा खोल हौद असुन या हौदाच्या तळात एक गोलाकार खोल विहीर आहे. या हौदात उतरण्यासाठी १५ पायऱ्या असुन या हौदातून व विहीरीतून पाणी उपसण्याची सोय केली आहे. या वास्तुची प्राकारभिंत पुर्णपणे नष्ट झाली असुन केवळ दरवाजाची कमान शिल्लक आहे. येथील एकंदरीत रचना, त्यातील कलात्मक हौद व आत येण्यासाठी असलेला स्वतंत्र दरवाजा पहाता हि दरबाराची जागा असावी. किल्ल्याच्या दक्षिणपूर्व तटबंदीला लागुन किल्ल्यातील सर्वात सुंदर वास्तु आहे. हि वास्तु म्हणजे या किल्ल्याचे वैभव आहे. येथे चौकोनी आकाराची तीन मजली विहीर असुन या विहीरीच्या तळमजल्यावर पाणी तर वरील दोन मजल्यावर राहाण्याची सोय व एक मंदीर आहे. हि वास्तु जरी एकच असली तरी विहीर व या कक्षात जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहे. विहिरीत उतरण्यासाठी साधारण ४० पायऱ्या असुन मंदिराच्या दालनात व कमानीयुक्त कक्षात जाण्यासाठी भुमीगत पायऱ्या आहेत. हि दालने जमिनीखाली व पाण्याजवळ असल्याने येथील वातावरण कमालीचे थंड आहे. या कक्षांचा वापर उन्हाळ्याच्या दिवसात विश्रांतीसाठी होत असावा. या वास्तूभोवती असलेली प्राकाराची भिंत आजही काही प्रमाणात शिल्लक असुन यातील दरवाजाची केवळ कमान शिल्लक आहे. येथुन मुख्य दरवाजाकडे आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ला पहाण्यास एक तास पुरेसा होतो. नगरधन हा नंदीवर्धन नावाचा अपभ्रंश आहे. इ.स.२७० ते ५०० पर्यंत वाकाटकांची सत्ता विदर्भ भागावर होती. नंदीवर्धन, प्रवरपूर, वत्सगुल्म ही ठिकाणे त्याकाळी प्रसिद्ध होती. यातील नंदीवर्धन म्हणजे आजचे नगरधन ही वाकाटकांची राजधानी होती. विंध्यशक्ती (इ.स. २५० ते इ.स. २७०), प्रवरसेन पहिला (इ.स. २७० ते इ.स. ३३०), हरीसेन (इ.स. ४७५ ते इ.स. ५००) हे वाकाटकांचे महत्त्वाचे राजे होऊन गेले. विंध्यशक्ती हा वाकाटक घराण्याचा संस्थापक होता. विंध्यशक्तीचा पुत्र प्रथम प्रवरसेन हा सर्वात बलशाली राजा होता. प्रथम प्रवरसेन याचा पुत्र रुद्रसेन (व्दितीय) याची पट्टराणी प्रभावती होती. ही प्रभावती चंद्रगुप्त (व्दितीय) याची कन्या होती. रुद्रसेन (व्दितीय) याने आपली राजधानी नंदिवर्धन येथे आणली. राजा रुद्रसेन अल्पायुषी ठरल्याने राज्यकारभार राणी प्रभावतीच्या ताब्यात आला. या प्रदेशाची व्यवस्था लावण्यासाठी तिच्या सोबत महाकवी कालिदासांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यावेळी त्यांचा मुक्काम नगरधन किल्ल्यातच होता. नंतरच्या काळात या दुर्गाच्या अवशेषावर गोंड राजाच्या राजवटीत किल्ला बांधण्यात आला. पेशव्यांच्या काळात नागपूरकर भोसल्यांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली म्हणजे इ.स.५ व्या शतकापासुन आजवर हा किल्ला नांदता आहे.
© Suresh Nimbalkar