NAGAR FORT
TYPE : GROUND FORT
DISTRICT : NAGAR
HEIGHT : 0
GRADE : EASY
सह्याद्रीच्या डोंगररांगात भुईकोट किल्ले तसे कमीच. केवळ सपाट भूप्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भुईकोट किल्ल्यांची बांधणी करण्यात आली होती. अशाच काही अभेद्य भुईकोटापैकी एक किल्ला म्हणजे नगरचा भुईकोट किल्ला. किल्ल्याची आजही असणारी भक्कम स्थिती पाहून तो पाचशे वर्षांपूर्वी बांधला असे वाटत नाही इतक्या सुस्थितीत हा भुईकोट किल्ला आहे. मनमाड-दौंड रेल्वेमार्गावर अहमदनगर हे मध्य रेल्वेचे स्थानक आहे. अहमदनगर रेल्वे स्थानकांपासून ५ कि.मी. अंतरावर भिंगार उर्फ नगरचा किल्ला असुन तेथे जाण्यासाठी रिक्षा व बसची सोय आहे त्यामुळे दहा मिनिटांत आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. नगरचा किल्ला बांधला तेव्हा गावापासून एक किमी अंतरावर होता आता मात्र किल्ल्याच्या सभोवताली शहर पसरले आहे. सध्या किल्ला भारतीय सैन्यदलाच्या ताब्यात असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव किल्ला सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळात पहाता येतो.
...
किल्ल्यात जाण्यासाठी सरकारी ओळखपत्र जवळ असणे आवश्यक आहे. आज आपण खंदकावर बांधलेल्या पुलावरून ज्या दरवाजाने किल्ल्यात प्रवेश करतो ते किल्ल्याचे मूळ प्रवेशद्वार नसुन त्याच्या उजव्या बाजूला किल्ल्याचे खरे प्रवेशव्दार आहे. वाहतुकीच्या सोईसाठी किल्ल्याचे प्रवेशव्दार बदलण्यात आले आहे. या दरवाजाच्या डाव्या बाजूला तिरंगा फडकताना दिसतो. दरवाजा समोर दोन चौथऱ्यावर दोन तोफा त्यांच्या गाड्यासह ठेवण्यात आल्या आहेत.किल्ल्याच्या सभोवती १५० फुट रुंदीचा खंदक असुन खंदकाच्या एका बाजूला किल्ल्याची तटबंदी आहे तर दुसऱ्या बाजूची भिंत दगडाने बांधलेली आहे. खंदकाच्या बाहेरच्या बाजूने सिमेंटची भिंत बांधुन त्यावर कुंपण केले आहे. पूर्वीच्या काळी किल्ल्याच्या संरक्षणासाठी या खंदकात पाणी सोडुन त्यात मगरी व सुसरी सोडल्या जायच्या. काहीसा वर्तुळाकार असलेला हा किल्ला अंतर्गत ६० एकरवर पसरलेला असुन खंदकासहित किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ ८० एकरपेक्षा जास्त आहे. किल्ल्याच्या सर्व बाजूंनी उंच दगडी तटबंदी असुन किल्ल्याला एकुण २२ बुरूज आहेत. किल्ल्याचे मूळ बांधकाम दगडी चि-यांचे असुन अलीकडील बांधकाम विटांचे आहे. किल्ला सैन्यदलाच्या ताब्यात असल्याने आजही खूपच चांगल्या अवस्थेत आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशदार पश्चिमेकडे शहराच्या दिशेला असुन पूर्वेला बुरूजात अजुन एक दरवाजा आहे. दोनही दरवाजासमोरील खंदकावर अलीकडील काळात बांधलेले लाकडी पूल असुन पुर्वी किल्ला नांदता असताना दोनही दरवाजासमोरील पुल काढता घालता येत असत. किल्ल्यात शिरल्यावर उजवीकडे नोंदणीकक्ष व डावीकडे गाड्यांसाठी वाहनतळ आहे. वाहनतळासमोर दरवाजाच्या दोनही बाजूला किल्ल्याच्या तटबंदीवर जाण्यासाठी जिना आहे. किल्ला केवळ तटबंदीवरूनच पहाता येतो. तटबंदीच्या दुसऱ्या बाजूला तारा बांधलेल्या असुन तटावरून किल्ल्यात उतरणाऱ्या वाटा व जिने बंद करण्यात आले आहेत. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूने बुरुजांवर चढून किल्ला पाहण्यास सुरुवात करावी. पहिल्या बुरुजावर ध्वजस्तंभ असुन याच बाजूला खाली जुन्या काळातील तुरुंग दिसून येतात. किल्ल्याला एकुण २२ बुरुज असून तटबंदीची लांबी पावणेदोन कि.मी.आहे. फांजी वरून चालायला सुरुवात केल्यावर आपल्याला एकामागे एक असे तटबंदीतील बुरुज पाहायला मिळतात. बुरुजांचे बांधकाम पहाता हे बुरूज दुमजली, तीन मजली असल्याचे जाणवते. या बुरुजांच्या व तटबंदीच्या बांधकामात अनेक कोरीव दगड पाहायला मिळतात. वेगवेगळ्या राजवटीत या किल्ल्याचे बांधकाम दुरुस्त करताना त्यासाठी किल्ल्यातील जुन्या बांधकामाचे दगड वापरण्यात आले. अहमदशहाने आपल्या पराक्रमी सेनापती व कर्तबगार सरदारांची नावे या बुरुजांना दिली होती. अनेक बुरुजावर दगडावर कोरलेले पर्शियन शिलालेख दिसून येतात. इंग्रजांच्या काळात बुरुजावर बऱ्याच ठिकाणी विटांमधील बॅरॅक्स बांधल्या गेल्या. पुढे जाताना आपण सात व आठ या दोन बुरुजामधील एका भव्य बुरुजावर पोहोचतो. या भव्य बुरुजाला दुहेरी तटबंदी असुन यातील सात क्रमांकाच्या बुरुजाच्या भिंतीवर एक पर्शियन शिलालेख कोरलेला आहे. या बुरुजावरून खाली किल्ल्यात उतरण्यासाठी जिना असुन बाहेरील तटबंदीत जाण्यासाठी दुसरे छोटे दार आहे. या दरवाजाने आपण तटबंदीतील भूयारी मार्गात शिरतो. हा मार्ग बुरुजावर बाहेर पडतो. या बुरुजावर एक उंच लाकडी खांब रोवलेला आहे. हा बहुदा निशाणाचा खांब असावा. या खांबावर रात्रीच्या वेळी तेलाचा दिवा लावुन दुरवर इशारत केली जाई. पुढे गेल्यावर ९ व १० क्रमांकाच्या बुरुज व फांजीखाली खोल्या बांधलेल्या असून १० क्रमांकाच्या बुरुजावरून खाली उतरणारी एक दगडाची बांधीव वाट आहे. या वाटेचा उपयोग तटावर अवजड तोफा चढवण्यासाठी केला जात असे. ११ क्रमांकाच्या बुरूजात खालील बाजुस किल्ल्याचा दुसरा दरवाजा असुन त्याच्या छताला जाड साखळदंड लावलेले पाहायला मिळतात. याच बुरुजावर लोखंडाच्या कड्या एकमेकात गुंफून बनवलेला झुलता पुल पाहायला मिळतो. आपत्तीप्रसंगी बाहेर पडता यावे याकरिता इंग्रजांनी हा झुलता लाकडी पूल बांधला होता. किल्ल्याचा दरवाजा मात्र मूळ बांधकामात असुन त्याआधी तेथे काढता-घालता येणारा पूल असण्याच्या खुणा खंदकाच्या समोरील बाजुस दिसुन येतात. १२ क्रमांकाच्या बुरुजाच्या पुढे तटबंदीत एक पीराचे स्थान आहे. १३ क्रमांकाच्या बुरुजाच्या भिंतीत नक्षीदार कोनाडे दिसुन येतात. १४ क्रमांकाच्या बुरुजात खंदकात उतरण्यासाठी भुयारी जिना असुन याचा खालील टोकाकडील भाग ढासळलेला असण्याने थेट खंदकात जाता येत नाही. १५व्या बुरुजावर तोफ बांधण्याची एक भलीमोठी गोलाकार कडी दिसते. १६व्या बुरुजावर एक पर्शियन शिलालेख कोरलेला असुन १७ व्या बुरुजानंतर तटबंदीला अधिक मजबुती यावी यासाठी फांजीवर पायऱ्यासारखे तीन स्तर करण्यात आले आहेत. २१व्या बलदंड बुरुजात आपल्याला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार पहायला मिळते. किल्ल्याचे मुख्य प्रवेशदार दुहेरी असुन रणमंडळ व एकामागोमाग एक असे दोन दरवाजे अशी याची रचना आहे. प्रवेशव्दारा समोर तटबंदी व बुरुजाचा आडोसा उभा करण्यात आला आहे जेणेकरून दरवाजावर सरळ हल्ला करता येऊ नये. खंदकावरून गेल्यावर बुरूजाची भिंत उजवीकडे ठेवत गोलाकार वळसा घेऊन आपण दारासमोर पोहोचतो. ह्या रचनेमुळे आतील सैन्याला बाहेरील शत्रूवर हल्ला करणे सोपे जाते. किल्ल्याचे दोनही लाकडी दरवाजे आजही शिल्लक आहेत. दोनही दरवाजाला दिंडी दरवाजे आहेत. मुख्य दरवाजावर हत्तीच्या धडकेपासून बचावासाठी खिळे लावलेले असुन तळात २.५ इंच व्यास असणारे हे खिळे १ फुट लांब आहेत. जमीनीपासून हे खिळे ६ फुट उंचीवर सुरू होऊन दर दीड फुटावर एक अशा ह्या आठ रांगा आहेत. दरवाजाच्या वरच्या दोन्ही बाजूस फुल कोरलेली आहेत. दोनही दरवाजांच्या मध्ये बंदीस्त आवार आहे. दुसरा दरवाजा पश्चिमाभिमुख असून त्यावर देखील काही प्रमाणात लोखंडी खिळे आहेत. या दरवाजाच्या दोनही बाजुला शरभाने आपल्या पुढील दोन पायात दोन हत्ती पकडलेले व्दारशिल्प आहे. दोन्ही दरवाजांच्या वरील भागात बुरुजावर काही खोल्या बांधलेल्या आहेत. ह्याच्या तुलनेत पूर्वेकडील दरवाजा साधारण आहे पण तो दरवाजा आपल्याला खाली उतरून पहाता येत नाही. किल्ल्याचे मुख्य प्रवेशव्दार पाहून पुढे गेल्यावर आपण पुन्हा किल्ल्यात प्रवेश केला त्या ठिकाणी येतो. जेथून किल्ला पाहायला सुरुवात केली त्याच ठिकाणी परत आल्यावर आपली तटबंदी फेरी पुर्ण होते. निजामशाही काळात किल्ल्याच्या मध्यभागात व तटबंदीच्या आतल्या बाजूस सोनमहल, मुल्कमहल, आबाद महल, गगन महल, मीना महल, बगदाद महल असे एकूण सहा राजमहाल होते. या इमारतींच्या मध्यभागी राजघराण्यातील मुलांच्या शिक्षणासाठी एक मदरसा बांधला होता. दिलकशाद, हबशीखाने अशा इतर वास्तूंची निर्मिती गरजेप्रमाणे होत गेली. या साऱ्यांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून चार मोठय़ा विहिरी किल्ल्यात खोदण्यात आल्या. गंगा, यमुना, मछलीबाई, शक्करबाई अशी त्यांची नावं होती. आता या विहिरींचं आणि महालांचं अस्तित्व दिसत नाही. तटावरून फिरताना केवळ एकच विहीर नजरेस पडते. इंग्रज राजवटीत किल्ल्यातील अनेक इमारती पाडून नव्या इमारती बांधल्या गेल्या.किल्ल्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नेताकक्ष नावाची जागा आहे. इंग्रजांनी भारतीय नेत्यांना याच ठिकाणी स्थानबद्ध केले होते. पंडित नेहरूंच्या काही वस्तू येथे पाहता येतात. तसेच काही नेत्यांच्या हस्ताक्षरातील पत्रेही या ठिकाणी ठेवलेली आहेत.किल्ला आरामात पाहाण्यासाठी २ तास लागतात. याशिवाय नगर शहरात पाहाण्यासाठी रणगाडा म्युझियम, चांदबिबी महाल, फरियाबाग्, बागरोजा घुमट अशी अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. १५ व्या शतकाच्या अखेरीस इ.स.१४८६ मध्ये बहमनी राज्याचे पाच तुकडे झाले व त्यातील एक मलिक अहमदशहा बहिरी याने निजामशाहीची स्थापना केली. इ.स.१४९० मध्ये सीना नदीकाठी भिंगार गावाजवळ अहमदशहाने बिदरचा सेनापती जहांगीर खान याचा पराभव केला व तेथे कोटबाग निजाम नावाचा महाल बांधुन शहर वसवण्यास सुरुवात केली. अहमदशहाच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर किल्ला निजामशहाची राजधानी बनले. त्याकाळी या शहराची तुलना कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे.त्या काळात या किल्ल्याचा तट मातीचा होता. सध्या दिसणारी दगडी तटबंदी इ.स.१५६२च्या सुमारास हुसेन निजामशहा याने पोर्तुगीजांच्या मदतीने उभारली. निजामशाहीच्या काळात हा किल्ला अतिशय महत्वाचा होता. इ.स.१५९६ मधे मुघलांनी हा किल्ला घ्यायचा प्रयत्न केला पण चांदबिबीने मोठ्या हिमतीने मुघलांचा प्रतिकार केला. अहमदनगरच्या या किल्ल्यात फंदफितुरीची कारस्थाने शिजली व चार वर्षांनी जुलै १६०० मध्ये चांदबिबीच्या मृत्यूनंतर मोगलांनी अहमदनगर किल्ल्यावर कब्जा केला. अहमदशहा, बु-हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे १६३६ पर्यंत नांदत होती. मोगल बादशहा शाहजहानने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगर काबीज केले. शिवाजी महाराजांच्या सैन्यानं हा प्रांत तीन वेळा लुटला यावरून इथल्या सुबत्तेची कल्पना येते. त्या काळात मुघलांचा सरदार मुफलतखान अहमदनगरची बाजू सांभाळत होता. मोगलांचा किल्लेदार मुफलतखान याने सर्व संपत्ती किल्ल्यात आणून ठेवल्याने मराठी सैन्याच्या हाती फारसं काही लागलं नाही. पुढे इ.स.१७५९ साली पेशव्यांनी मोघलांचा सरदार कवीजंग याला वैयक्तिक जहागिरी बहाल करून मुत्सुद्देगिरीनं हा किल्ला मराठयांच्या अमलखाली आणला व इ.स.१७९७ साली शिंदे घराण्याच्या ताब्यात दिला. १२ ऑगस्ट इ.स.१८१७ रोजी जनरल वेलस्लीने हा किल्ला जिंकुन अहमदनगरवर विजय मिळवला. अहमदनगर किल्ल्याचा वापर अनेक राजकीय कैदी ठेवण्यासाठी केला गेला. मुघल, पेशव्यांपासून इंग्रजांपर्यंत अनेकांचे बंदिवान या किल्ल्यात कैद होते. सन १७६७ मध्ये तोतया सदाशिव भाऊ, १७७६मध्ये पेशव्यांचे सरदार सखाराम हरी गुप्ते, नाना फडणवीस, मोरोबादादा, बाळोबा तात्या इत्यादींना या किल्ल्यात कैदी म्हणून राहावे लागले होते. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर इंग्रजांनी अनेक जर्मन कैद करून ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला. चौथ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गूढ मृत्यूही याच किल्ल्यात झाला. ब्रिटिशांच्या काळात किल्ल्यात बरेच बदल झाले. किल्ल्याच्या पूर्वेला असलेला झुलता पूल १९३२ साली ब्रिटिशांनी बांधला व काडतुसे निर्मितीचा कारखाना किल्ल्यात उभारला. १९४२च्या चले जाव आंदोलनात पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यासारख्या राष्ट्रीय नेत्यांना १० ऑगस्ट १९४२ पासून २८ एप्रिल १९४५ या काळात ब्रिटीशांनी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात स्थानबध्द केले होते. पंडित जवाहरलाल नेहरुंनी या किल्ल्यातील काळात डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिध्द ग्रंथ लिहिला तर याच किल्ल्यात डॉ. प्रफुल्लचंद्र घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. अहमदनगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व मौलाना आझाद यांनी गुबार-ए-खातिर हे ग्रंथ लिहिले. इ.स.१९४७ ला हा किल्ला भारतीय सैन्यदलाच्या ताब्यात देण्यात आला.
© Suresh Nimbalkar