MULHER

TYPE : HILL FORT

DISTRICT : NASHIK

HEIGHT : 4120 FEET

GRADE : MEDIUM

नगर जिल्ह्यातील कळसुबाई पर्वतरांगेतील अलंग-मदन-कुलंग या दुर्गत्रिकुटावर भटक्यांचा सतत ओघ चालु असतो त्यामानाने नाशीक जिल्ह्यातील डोलबारी डोंगररांगेत असलेले मुल्हेर-मोरा-हरगड या दुर्गत्रिकुटावर फारच कमी पावले वळतात. २ ते ३ दिवसांची सवड असल्यास सालोटा-साल्हेर-मुल्हेर-मोरागड-हरगड अशी ५ किल्ल्यांची मस्त भटकंती करता येते. मुंबई पुण्याहुन जवळ असल्याने राजमाची किल्ला त्यावर असलेल्या मनरंजन व श्रीवर्धन या दोन बालेकिल्ल्यांमुळे चांगलाच प्रसिध्द आहे पण नाशिक जिल्ह्यातील डोलबारी डोंगररांगेत असलेला मुल्हेर किल्ला त्यावर मोरा-मुल्हेर--हरगड असे तब्बल तीन बालेकिल्ले असुनही प्रसिद्धीपासून खूपच दुर आहे. पश्चिमेकडील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि बागलाण यांच्या सीमेवर मुल्हेर हा बागुल राजांच्या राजधानीचा किल्ला वसलेला आहे. सटाणा तालुक्यात असलेल्या मुल्हेर गडावर जाण्यासाठी आपल्याला नाशीक-सटाणा-ताहराबाद मार्गे मुल्हेर गाव गाठावे लागते. ... नाशीक ते सटाणा हे अंतर ९० कि.मी.असुन सटाणा येथुन ताहाराबादमार्गे मुल्हेर ३५ कि.मी.अंतरावर आहे. मुल्हेर गावात गेल्यावर आपल्याला समोर मुल्हेरमाची व त्यावर डावीकडे मोरागड मध्यभागी मुल्हेर तर उजवीकडे हरगड असे बालेकिल्ल्याचे त्रिकुट दिसते. मुल्हेर गावातुन किल्ल्याचा पायथा ३ कि.मी. अंतरावर असुन खाजगी वाहन असल्यास थेट पायथ्यापर्यंत जाता येते. मुल्हेर गावातुन गडाच्या दिशेने जाताना गावात काही जुने वाडे पहायला मिळतात. गावातुन बाहेर पडताना डाव्या बाजुला टेकाडावर एक मंदिर तर उजव्या बाजुस अर्धगोलाकार घुमट असलेली इमारत दिसते. या इमारतीचे एकंदरीत बांधकाम पहाता हि कुणा मुस्लीम सरदाराची कबर असावी असे वाटते. मुल्हेरगडाचे माची व बालेकिल्ला असे दोन भाग पडलेले असुन माचीवरून मोरा-मुल्हेर-हरगड या तिन्ही बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी वाटा आहेत. मोरा व हातगड या दोन्ही बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी मुल्हेरमाची शिवाय इतर ठिकाणाहुन वेगळे दरवाजे असल्याने या दोन्ही किल्ल्यांचा स्वतंत्र किल्ले म्हणुन उल्लेख येतो. मी या दोन्ही किल्ल्यांचे स्वतंत्र वर्णन केलेले असुन येथे केवळ मुल्हेरमाची व मुल्हेर बालेकिल्ला याचे वर्णन दिलेले आहे.किल्ल्याच्या पायथ्यापासुन माचीवर जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर एक वाट सरळ माचीच्या दिशेने जाते तर दुसरी वाट उजवीकडे हरगडच्या दिशेने जाऊन तेथून वळसा मारून माचीवर येते. किल्ला नांदता असताना किल्ल्याच्या माचीवर जाण्यासाठी हे दोन मार्ग वापरात होते व या दोन्ही मार्गावर तीन-तीन दरवाजाची संरक्षक साखळी उभारली आहे. फक्त हरगड किल्ला करावयाचा असल्यास दुसरी वाट सोयीची आहे अन्यथा मुल्हेरमाचीवर जाण्यासाठी समोरील वाट योग्य आहे. मुल्हेरमाचीवर दुसऱ्या वाटेने गेल्यास अर्धा तास जास्त लागतो. मुल्हेर गावातुन चालत अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या पायथ्याशी येतो व तेथुन कच्च्या रस्त्याने २० मिनिटात किल्ल्याच्या पहील्या पश्चिमाभिमुख दरवाजात पोहोचतो. एका बाजुस बुरुज तर दुसऱ्या बाजुस तटबंदी असलेला हा दरवाजा आज पुर्णपणे नष्ट झाला असुन केवळ दरवाजा असल्याच्या खुणा शिल्लक आहेत. दरवाजा बाहेरील कातळात हनुमान व गणपतीचे शिल्प कोरलेले आहे. या दरवाजाने किल्ल्यात प्रवेश केल्यावर काही अंतरावर माचीचा दुसरा पश्चिमाभिमुख दरवाजा असुन याची अवस्था देखील पहील्या दरवाजाप्रमाणे आहे. या दरवाजातुन आत आल्यावर मुख्य वाट उजवीकडे वळते पण आपण न वळता तटाच्या काठावरून झाडाझुडपातून १०-१२ मिनिटे सरळ चालत गेल्यावर ८ फुट लांबीची तोफ पहायला मिळते. या ठिकाणी चांगलीच झाडी वाढलेली असुन तोफ सहजपणे दिसुन येत नाही. तोफ पाहुन मागे फिरावे व मुख्य वाटेने माचीच्या तिसऱ्या पुर्वाभिमुख दरवाजात पोहचावे. पायथ्यापासुन या दरवाजात येण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. या दरवाजाची कमान आजही शिल्लक असुन दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या अलंगा आहेत. दरवाजा शेजारील तटबंदीने संपुर्ण माचीला वेढा घातलेला आहे. दरवाजातुन आत आल्यावर समोरच काही अंतरावर सुबक बांधणीचा गणेश तलाव असुन तलावाच्या पश्चिम काठावर गणेश मंदिर आहे. तलावाच्या पुर्व काठावर उध्वस्त वास्तु अवशेष असुन मध्यभागी दगडी खांब आहे. पुर्णपणे घडीव दगडात बांधलेल्या या मंदिराचे सभामंडप व गर्भगृह असे दोन भाग पडलेले असुन सभामंडपाच्या तीन कमानी सहा खांबावर तोललेल्या आहेत. या संपुर्ण मंदिरावर मोठया प्रमाणात कोरीवकाम केलेले असुन एका खांबावर मंदिराच्या बांधकामाची माहिती देणारा शिलालेख आहे. या शिलालेखात हे मंदिर ‘‘शके १५३४ परिधावी नाम संवत्सरे/ ते दिवसी हजरत प्रतापशहा राजे/साल्हेर- मोरेर (मुल्हेर) स्थापित मोरेश्वराची/मंडप केले असे. वै. शृ. पाच बुधवार.’’ असा उल्लेख येतो. याचा अर्थ हे मंदिर इ.स.१६१२ दरम्यान राजा प्रतापशहाने बांधले आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी सभामंडपाच्या उत्तर व दक्षिण भिंतीत लहान दरवाजे असुन गर्भगृहातील कोनाडयात गणेशमुर्ती व त्यासमोर जमीनीवर शिवलिंग कोरलेले आहे. मंदिरा शेजारी तलावात उतरण्यासाठी लहान पायऱ्या आहेत. गणेश मंदिराच्या मागील बाजुने झाडीतुन वाट काढत गेल्यावर आपण रामेश्वर मंदिराजवळ पोहोचतो. हे मंदिर म्हणजे कळस असलेले गर्भगृह असुन याच्या दर्शनी भागात मोठया प्रमाणात कोरीवकाम केले आहे. मंदिराच्या उंबरठयावर किर्तीमुख कोरलेले असुन त्याशेजारी द्वारपाल व ललाटबिंबावर गणपती कोरलेला आहे. दरवाजाशेजारी कोरीवं कोनाडे असुन वरील बाजुस दोन गजशिल्प आहेत. मंदीराचे नाव रामेश्वर असले तरी आतील कोनाड्यात नव्याने स्थापन केलेली देवीची मुर्ती आहे. मंदिराशेजारी काळ्या घडीव दगडात बांधलेले मोठे टाके असुन या टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. रामेश्वर मंदिर पाहुन पुन्हा गणेश तलावाजवळील मुख्य वाटेवर यावे. थोडासा चढ असलेल्या या वाटेने सरळ पुढे गेल्यावर आपण पायवाटेच्या चौकात येतो. येथुन डावीकडे जाणारी वाट सोमेश्वर मंदीराकडे, उजवीकडील वाट मुल्हेर व हरगडच्या खिंडीत तर सरळ जाणारी वाट बालेकिल्ल्याकडे जाते. डावीकडील वाटेने सोमेश्वर मंदीराकडे निघाल्यावर वाटेच्या उजव्या बाजुस एका प्रशस्त वास्तुच्य जोत्यावर पत्र्याच्या निवाऱ्यात ठेवलेली देवीची मुर्ती दिसते. चौथरा असलेली हि वास्तु राणीमहाल म्हणुन ओळखली जाते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजुस झाडीत जाणारी एक लहानशी पायवाट दिसते. या पायवाटेने गेले असता या झाडीत चंदनबाव नावाची घडीव दगडात बांधलेली षटकोनी विहीर असुन या विहिरीत उतरण्यासाठी एका बाजुने पायऱ्या बांधलेल्या आहेत. या विहिरीच्या आतील भागात कोनाडे असुन पायऱ्यावर भग्न कमान आहे. या कमानीवर काही प्रमाणात नक्षीकाम केलेले आहे. विहिरीच्या आत व पायऱ्यावर मोठया प्रमाणात पालापाचोळा जमा झाला असल्याने आत उतरणे धोक्याचे आहे. या विहिरीच्या आसपास मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असुन त्यात अनेक वास्तु लपलेल्या आहेत. हि विहीर पाहण्यासाठी शोधमोहीम करावी लागते. चंदनबाव पाहुन पुढे आल्यावर आपण सोमेश्वर मंदिराच्या खालील बाजुस येतो. सोमेश्वर मंदिर व गणेश मंदिर यांची रचना थोडयाफार फरकाने सारखीच आहे. हि दोन्ही मंदिरे मुघल-रजपूत स्थापत्य शैलीतील असुन सोमेश्वर मंदीर इ.स.१४८० दरम्यान महादेवशहा राठोड या बागुल राजाने पुत्रप्राप्ती प्रित्यर्थ बांधले आहे. सोमेश्वर मंदिराच्या दर्शनी भागात असलेला हौद आज पुर्णपणे बुजून गेला असुन सध्या त्याच्या जीर्णोद्धाराचे काम सरू आहे. या मंदिराची रचना गणेश मंदिरासारखी असली तरी याचे गर्भगृह मात्र तळघरात आहे. सभामंडपात घडीव नंदी असुन सभामंडपाचे कमानीदार छत सहा खांबावर तोललेले आहे. गर्भगृहाच्या दरवाजाच्या ठिकाणी लहान गवाक्ष असुन त्यातुन आतील शिवलिंगाचे दर्शन घेता येते तर तळघरात उतरण्यासाठी डावीकडे पायरीमार्ग आहे. हा मार्ग अतीशय लहान असुन आत अंधार असल्याने कपाळमोक्ष होणार नाही याची काळजी घेत तळघरात उतरावे लागते. मंदिरात इ.स. १३३० ते इ.स. १६९२ पर्यंत मुल्हेरचे राज्यकर्ते, किल्लेदार, राजवटी यांची माहिती देणारा फलक बागलाण प्रतिष्ठानने लावला आहे. मंदिराच्या मागील बाजुस चौथऱ्यावर शिवलिंग बांधलेले असुन भिंतीला टेकुन गणपती,हनुमान व देवीची मुर्ती आहे. गणपतीच्या मुर्तीजवळ लहानमोठे चार तोफगोळे ठेवलेले आहेत. मंदिराच्या मागील बाजुस पाण्याचे टाकी बांधलेली असुन माचीवरील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यातून येथे पाणी आणलेले आहे. त्यामुळे या मंदीरात मुक्काम केल्यास पाण्याची चांगली सोय होते. सोमेश्वर मंदिराच्या वरील बाजुस झाडीमध्ये गुलाब टाके नावाचे कातळात कोरलेले पाण्याचे टाके असुन त्यात उतरण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पहील्या दरवाजातून सोमेश्वर मंदिराकडे येताना आपला माचीचा डावीकडील भाग पुर्णपणे पाहुन होतो. मुल्हेरच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी तीन वाटा असुन दोन वाटा मुल्हेर माचीतुन तर एक वाट माचीच्या विरुद्ध बाजुने थेट बालेकिल्ल्यावर येते पण हि वाट वापरात नसल्याने पुर्णपणे नष्ट झाली आहे. माचीच्या दोन वाटातील एक वाट मुल्हेरमाचीवर असलेल्या सोमेश्वर मंदिराकडून तर दुसरी वाट मुल्हेरच्या बालेकिल्ला असलेल्या दोन डोंगराच्या घळीतून वर जाते. आपण सोमेश्वर मंदिराकडून वर चढुन घळीच्या वाटेने खाली उतरणार असल्याने त्याच वाटेचे वर्णन केले आहे. या वाटेने कमी वेळात व कमी श्रमात संपुर्ण किल्ला पाहुन होतो. सोमेश्वर मंदिरातून समोर मोरागडकडे पाहीले असता मुल्हेर-मोरा बालेकिल्ल्यांना जोडणारी खिंड नजरेस पडते. या खिंडीच्या डावीकडे एक डोंगरसोंड सोमेश्वर मंदीराकडे उतरताना दिसते. या सोंडेवरूनच या खिंडीतील दरवाजात जाण्यासाठी वाट आहे. सोमेश्वर मंदिराकडून मळलेल्या वाटेने थोडं पुढे गेल्यावर एक मंदिरासारखी उध्वस्त वास्तु दिसते. या वास्तूच्या डावीकडून जाणारी वाट खिंडीकडे जाते. सोमेश्वर मंदिरासमोरून उभा चढ चढत पाउण तासात आपण मुल्हेर बालेकिल्ला व मोरागडच्या खिंडीत पोहोचतो. मुल्हेर-मोरागड या दोन्ही किल्ल्यामध्ये असलेल्या खिंडीचा हा भाग ३० फुट उंच तटबंदीने बंदिस्त केला असुन आजही सुस्थितीत असलेल्या या तटबंदीत तीन बुरुज आहेत. या तटबंदीमुळे हे दोन्ही किल्ले एकमेकांना जोडले गेले आहेत. खिंडीच्या खालील बाजुने या तटबंदीपर्यंत जाण्यासाठी तीन दरवाजे असुन यातील दोन दरवाजे व त्याच्या कमानी पुर्णपणे कोसळल्या असुन तटबंदीत जाणारा दरवाजा त्याच्या कमानीसकट पुर्णपणे शिल्लक असला तरी दगडाखाली गाडला गेला आहे. त्यामुळे या दगडावर चढूनच आपला खिंडीतील तटबंदीवर प्रवेश होतो. गडाच्या पायथ्यापासुन इथवर येण्यास दोन तास लागतात. तटबंदीवर उजव्या बाजुस मुल्हेर डोंगराच्या पोटात खडकात खोदलेले टाके असुन त्यातील पाणी मात्र शेवाळले असल्याने पिण्यायोग्य नाही. तटबंदीच्या डावीकडे मोरागडवर जाण्यासाठी पायऱ्या असुन उजव्या बाजुस मुल्हेरच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी लहान दरवाजा आहे. सध्या ह्या दरवाजात मोठया प्रमाणात दगड पडले असले तरी अंग चोरून त्यातून वाट काढता येते. दरवाजाच्या आतील बाजुस कातळात कोरलेली गुहा असुन त्यात वरील भागात जाण्यासाठी पायऱ्या कोरल्या आहेत. वरील बाजुने दरड कोसळल्याने सध्या या गुहेत मोठया प्रमाणात दगड जमा झाले आहेत. गुहेच्या वरील बाजुस किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी पायऱ्या कोरलेल्या असुन पायऱ्यांच्या टोकाला बुरुज बांधलेला आहे. गुहेवर व पायऱ्यावर आडवे खांब टाकण्यासाठी कातळात असलेले खाचे पहाता या गुहेवर व पुढील येथील पायऱ्यावर छप्पर असावे. किल्ल्याच्या माथ्यावर प्रवेश केल्यावर दूरवर पुर्वपश्चिम पसरलेले पठार व त्यावरील वास्तु नजरेस पडतात. समोरच एका मोठया वास्तुच्या जोत्यावर औदुंबर वृक्ष असुन त्याखाली बांधलेल्या चौथऱ्यावरील देवळीत भडंगनाथ या नाथपंथीय साधुचे स्थान आहे. फरसबंद असलेल्या या चौथऱ्यावर झीज झालेला मराठी शिलालेख असुन घुमटीमध्ये भडंगनाथाचा तांब्याचा मुखवटा आहे. मंदिराच्या आसपास बांधकामाचे अनेक अवशेष असुन डाव्या बाजुस उतारावर व दरीच्या काठावर कोरडा पडलेला आयताकृती आकाराचा मोठा तलाव असुन याच्या मध्यभागी दगडी खांब आहे. तलावाच्या एका बाजुस किल्ल्याचा उतार असुन उर्वरीत तीन बाजु घडीव दगडात बांधलेल्या आहेत. या तलावाच्या पुढील भागात कोरडा पडलेला दुसरा तलाव असुन याची रचना देखील पहील्या तलावासारखी आहे. या तलावाच्या काठावर असलेल्या झाडीत भग्न शिवलिंग व मस्तक नसलेली तीन फुट उंचीची कोरीव मुर्ती ठेवलेली आहे. पुढे जाताना वाटेच्या दोन्ही बाजुस मोठया प्रमाणात घरांचे तसेच चौकीचे चौथरे दिसुन येतात. येथुन समोर पाहीले असता दूरवर एक दरवाजाची कमान दिसते. आपण त्या कमानीच्या दिशेने आपली वाटचाल सुरु करायची. कमानीकडे जाताना वाटेच्या डाव्या बाजुस कातळात कोरलेले कोरडे ठणठणीत टाके दिसते. या वाटेवर बुरुजासारख्या गोलाकार आकाराच्या दरवाजा नसलेल्या दोन वास्तु आहेत पण त्याचे नेमके प्रयोजन कळून येत नाही. मुल्हेरचा बालेकिल्ला दोन निमुळत्या डोंगराचा बनलेला असुन हे दोन्ही डोंगर एकमेकाला चिटकल्याने याच्या पुर्व बाजुस एक व पश्चिम बाजुस एक अशा दोन घळी आहेत. वाटेने थोडे पुढे आल्यावर डाव्या बाजुस किल्ल्याची पुर्व दिशेची घळ आहे. घळीच्या वरील बाजुस पाणी अडविण्यासाठी लहान बंधारा बांधलेला असुन त्याशेजारी कातळात कोरलेले लहान टाके आहे. या घळीच्या दोन्ही बाजुच्या काठावर भक्कम तटबंदी बांधलेली असुन घळीच्या तोंडावर दरवाजा बांधलेला आहे. या भागात मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने खाली उतरता येत नाही. येथील दरवाजा पहाता हा मुल्हेर माचीवर न येता दुसऱ्या बाजुने थेट गडावर येण्याचा मार्ग असावा जो काळाच्या ओघात वापर नसल्याने पुर्णपणे नष्ट झाला आहे. घळीकडे जाण्यासाठी सोंडेच्या दोन्ही बाजुस पायऱ्या बांधलेल्या आहेत. घळीच्या दुसऱ्या बाजुस असलेल्या टोकाच्या मागील बाजुस गेले असता कातळात कोरलेली एक प्रचंड मोठी गुहा आहे. गुहेचे तोंड काही प्रमाणात बंदिस्त केलेले असुन पुढील बाजुस बुरुज बांधलेला आहे. हि गुहा दारुकोठार,कैदखाना कि पाण्याचे टाके नेमकी कशाची आहे याचा बोध होत नाही. गुहा पाहुन पुन्हा मुळ वाटेकडे येऊन कमानीच्या दिशेने आपली पुढील गडफेरी सुरु करायची. कमानीच्या थोडे अलीकडे उजव्या बाजुस कातळात कोरलेले चौकोनी आकाराचे मोठे टाके आहे पण सध्या ते कोरडे पडलेले आहे. टाक्यापासून काही अंतरावर राजवाड्याच्या दरवाजाची कमान आहे. राजवाडा केव्हाच जमीनदोस्त झाला असुन हि कमान त्याच्या सौंदर्याची जाणीव करून देण्यासाठी पुरेसी आहे. येथुन राजवाड्याच्या उजवीकडे असलेल्या किल्ल्याच्या दुसऱ्या भागात गेले असता कातळात एका रेषेत कोरलेले नउ टाकी आहेत. यातील टोकावरील टाके चांगलेच मोठे असुन त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. उर्वरित आठ टाकी शेवाळाने भरलेली आहेत. गडाचे हे टोक हरगडच्या दिशेने पसरलेले असुन या टोकावर काही वास्तुंचे चौथरे आहेत. टाक्याच्या वरील बाजुस उंचवट्यावर दुसऱ्या वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. किल्ल्याचा हा सर्वात उंच भाग असुन या ठिकाणी किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ४२६५ फूट आहे. येथुन मुल्हेरमाचीवर असलेले सर्व अवशेष स्पष्टपणे पहाता येतात. येथुन मोरागड, हरगड, न्हावीगड, मांगीतुंगी आणि साल्हेर-सालोटा हे किल्ले व आसपासचा परिसर दिसतो. येथुन सरळ पुढे आल्यावर आपण किल्ल्याच्या पश्चिम बाजुस असलेल्या घळीच्या तोंडावर येतो. मुल्हेरमाची वरून बालेकिल्ल्यावर येणारा दुसरा मार्ग या घळीतून वर येतो. या घळीत किल्ल्याच्या रक्षणासाठी एकामागे एक चार दरवाजाची साखळी उभारली आहे. यात खालील तीन दरवाजाच्या मध्यभागी नाकाबंदी करणारी भिंत बांधुन हि संपुर्ण वाट नागमोडी करण्यात आली आहे. बालेकिल्ल्यावरून खाली उतरताना सुरवातीचे दोन दरवाजे एकमेकाजवळ काटकोनात बांधलेले असुन या दोन दरवाजा मधील भागात कातळात कोरलेली पहारेकऱ्याची देवडी आहे. हे दोन्ही दरवाजे आजही सुस्थितीत असुन दुसऱ्या दरवाजाच्या एका बाजुस तटबंदीची भिंत तर दुसऱ्या बाजुस बुरुज बांधलेला आहे. दरवाजातून खाली उतरणारी वाट तीव्र उताराची असुन यावर पायऱ्या बांधलेल्या आहेत. काही पायऱ्या उतरल्यावर आपण गडाच्या तिसऱ्या दरवाजात पोहोचतो. हा दरवाजा आकाराने लहान असुन याच्या चौकटीवर कमळाचे फुल कोरले आहे तर उजव्या बाजुस तटबंदीत गणेशाचे शिल्प आहे. दरवाजाच्या डावीकडे थोडी उंचावर कातळकडयात आयताकार आकाराची गुहा असुन येथुन काही पायऱ्या उतरल्यावर आपण गडाच्या चौथ्या पश्चिमाभिमुख दरवाजात पोहोचतो. दरवाजाची कमान आजही सुस्थितीत असुन त्यावर नक्षीकाम केलेले आहे. दरवाजाच्या अलीकडे डाव्या बाजुस तटबंदीला लागुन एक पायवाट कडयाच्या दिशेने गेलेली दिसते तर उजव्या बाजुस कडयालगत कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. या टाक्याच्या पुढील बाजुस तटबंदी मधील बुरुज आहे. डावीकडील वाटेवर कातळात कोरलेल्या दोन मोठया गुहा असुन पहील्या गुहेत पाण्याची टाकी तर दुसऱ्या गुहेत काही दालने कोरलेली आहेत. गुहेच्या अलीकडे कातळात कोरलेले लहान टाके असुन गुहेजवळ अर्धवट कोरलेले दुसरे टाके आहे. पावसाळा वगळता या गुहेत रहाता येईल पण पाण्याची सोय मात्र जवळपास नाही. चौथ्या दरवाजातुन बाहेर आल्यावर येथील भक्कम भिंतीचे बांधकाम पहाता या ठिकाणी पहाऱ्याची चौकी अथवा गडाचा पाचवा दरवाजा असण्याची शक्यता आहे. घळीची वाट उतरून खाली आल्यावर डाव्या बाजुस कडयाच्या कातळात कोरलेले ५ फुट उंचीचे मारुती शिल्प पहायला मिळते. माचीवरून फिरताना शेंदुर फासलेले हे शिल्प सहजपणे नजरेस पडत असल्याने बालेकिल्ल्याची वाट चुकण्याची शक्यता नाही. येथुन थोडे खाली उतरल्यावर दोन वाटा असुन डावीकडील डोंगराला समांतर जाणारी वाट हरगडकडे जाते तर उजवीकडे उतरणारी वाट मुल्हेर माचीकडे जाते. हरगडचा पायथा हा मुल्हेरगडचाच भाग असल्याने तेथे गेल्याशिवाय आपले दुर्गदर्शन पुर्ण होत नाही. कातळकडयाला लागुन सरळ जाणाऱ्या या वाटेने गेल्यावर मुल्हेरचा बालेकिल्ला व त्यापुढील डोंगराच्या खिंडीत तटबंदी बांधलेली आहे. या खिंडीतुन थोडे खाली उतरून हरगडच्या दिशेने जाताना कडयाच्या पोटात कोरलेले कातळकोरीव टाके आहे. यातील पाणी हिरवेगार असल्याने पिण्यायोग्य नाही. या वाटेने कडयाच्या काठाने आपण मुल्हेरमाची व हरगड मध्ये असलेल्या खिंडीत पोहोचतो. या खिंडीला डाकिणदरा असं नाव आहे. मुल्हेर-हरगड या दोन्ही किल्ल्यामध्ये सहजपणे ये-जा करता येऊ नये यासाठी खिंडीचा हा भाग डोंगरसोंडेपर्यंत तटबंदीने बंदिस्त केला असुन त्याला दोन्ही गडाच्या दिशेने दोन दरवाजे ठेवलेले आहेत. सध्या या तटबंदीची बरीचशी पडझड झालेली असुन दरवाजाशेजारील केवळ बुरुज शिल्लक आहेत. हरगड किल्ला असलेल्या डोंगराची एक सोंड या खिंडीत उतरली आहे. मुल्हेर बालेकिल्ल्याच्या घळीतून येथे येण्यासाठी एक तास पुरेसा होतो. येथुन परत फिरल्यावर आल्या वाटेने न जाता त्या वाटेच्या खालील बाजुस असलेल्या दुसऱ्या वाटेने आपला परतीचा प्रवास सुरु करावा. या वाटेने जाताना मुल्हेर माचीतुन हरगडकडे येणारा दरवाजा आहे. आज हा दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन त्या शेजारील केवळ बुरुज व चौकट शिल्लक आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर पाच मिनिटे चालल्यानंतर डावीकडे जाणारी पायवाट दिसते. या पायवाटेने चालत गेल्यावर आपण सुरवातीस सांगितलेली मुल्हेर गावातुन येणारी दुसरी वाट या पायवाटेला मिळते. या वाटेने मुल्हेरमाचीवर प्रवेश करताना तीन पश्चिमाभिमुख दरवाजे असुन या तीनही दरवाजांच्या कमानी शिल्लक आहेत. यातून जाणारी पायवाट असली तरी आसपास प्रचंड प्रमाणात झाडी वाढली असुन त्यात मोठया प्रमाणात अवशेष आहेत. या झाडीचे प्रमाण इतके जास्त आहे की जवळ जाईपर्यंत दरवाजे दिसुन येत नाही. काही ठिकाणी हि वाट कातळात कोरलेल्या टाक्यांच्या काठावरून गेलेली आहे. माचीच्या या भागाला संवर्धनाची गरज आहे. या झाडीतुन वाट काढत माचीच्या उत्तर-पश्चिम टोकावर गेल्यवर ८ फुट लांबीची एक तोफ पहायला मिळते. या भागात कोणाचा वावर नसल्याने वाट अशी नाहीच. त्यामुळे येथे वावरणाऱ्या स्थानिकांची अथवा गुराख्यांची मदत घ्यावी. तोफ पाहुन मागे फिरावे व आता प्रवेश केलेल्या माचीच्या तिसऱ्या दरवाजाजवळ यावे. येथुन सरळ जाणाऱ्या वाटेने आपण गणेश मंदिराकडून आलेल्या पायवाटेच्या चौकात पोहोचतो. या वाटेने जाताना वाटेच्या डाव्या बाजुस काही कोरडी टाकी पहायला मिळतात. या चौकात उजवीकडे वळून पुन्हा बालेकिल्ल्याच्या दिशेने निघाल्यावर माचीवरील सर्वात मोठी वास्तु असलेला राजवाडा नजरेस पडतो. पण याच्या परीसरात देखील मोठया प्रमाणात झाडी असल्याने नीट फिरता येत नाही. वाडयाच्या आवारात एक विहीर असुन पडझड झालेले भुयार/तळघर आहे. वाटेने सरळ पुढे गेल्यावर आपण दोन टाक्याजवळ पोहोचतो. यातील एका टाक्याचे नाव हत्ती टाके असुन दुसऱ्याचे नाव मोती टाके आहे. यातील हत्तीटाके कोरडे पडले असुन मोती टाक्यात पाणी आहे. मोती टाक्याचे पाणी पिण्यायोग्य असुन सध्या गडावर याच टाक्याचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. येथुन डावीकडील वाट सोमेश्वर मंदिराच्या दिशेने जाते तर उजवीकडील वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या दिशेने गेले असता वाटेच्या डाव्या बाजुस कातळात कोरलेली दोन मोठी टाकी आहेत. टाकी पाहुन मागे फिरावे व परतीचा मार्ग धरावा. गणेश तलावाजवळ आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. मुल्हेरमाची, मोरागड व मुल्हेर बालेकिल्ला व्यवस्थीत फ़िरण्यासाठी दीड दिवस हाताशी हवेत. मुल्हेर किल्ल्याचा इतिहास थेट महाभारत काळाशी जोडला जातो. प्राचीनकाळी रत्नपूर नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नगरात मयूरध्वज नावाचा राजा राज्य करत होता व त्याच्याच नावाने या नगराला मयूरपूर आणि किल्ल्याला मयूरगड नाव पडले. नवव्या शतकात या भागावर यादव घराण्यातील दृढप्रहार राजाची सत्ता होती. पुढे त्याचा अपभ्रंश होत मुल्हेर हे नाव अस्तित्वात आले. किल्ल्याचा कागदोपत्री इतिहास सुरु होतो तो चौदाव्या शतकाच्या पहिल्या दशकापासून. तारिख-इ-फीरोझशाही, आईन-इ-अकबरी, तारिख-इ-दिलखुश या फार्सी ग्रंथांतून मुल्हेरची माहिती मिळते. चौदाव्या शतकात या भागावर अभीर घराण्यातील जगतछाया राजाची सत्ता असताना इ.स. १३४० मध्ये कनोज येथील राठोड घराण्यातील नानदेव राठोड या बागुलराजांनी येथील सत्ता काबीज केली व मुल्हेरचा किल्ला बांधला. इ.स. १३०८ ते १६३८ पर्यंत ३५० वर्षे बागुलांनी येथे राज्य केले. या संपुर्ण काळात मुल्हेर हि बागलाणची राजधानी होती. या घराण्याच्या नावावरूनच परिसराला बागुलगड व त्याचा अपभ्रंश होत बागलाण हे नाव पडले. त्या काळात मुल्हेरची बाजारपेठ ऐश्वर्यसंपन्न बाजारपेठ होती. बागुल घराण्याच्या काळातच येथे बनलेल्या तलवारीच्या मुठीचा घाट हिंदुस्तानात मुल्हेरी मुठ म्हणुन प्रसिद्ध होता. बागुल घराण्यात एकूण ११ राजे झाले असुन त्यांना बहिर्जी ही पदवी होती. इ.स. १३४० मध्ये तारिख-इ-फीरोझशाही या ग्रंथात मुल्हेर-साल्हेर प्रांत नानदेव राजाच्या ताब्यात असल्याचे उल्लेख येतात. खानदेशातील फारुकी राजसत्तेने वारंवार प्रयत्न करूनही बागलाणचे स्वतंत्र अबधित राहिले. इ.स.१५९५ च्या सुमारास अकबराने खानदेश जिंकला त्यावेळी येथे असलेल्या नारायणशहा व त्याचा पुत्र प्रतापशहा याने मुघलांना मदत करून मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. इ.स.१६१० मध्ये मुल्हेरवर प्रतापशहा बागुल याची सत्ता असताना इंग्रज प्रवासी फिंच याच्या प्रवास वर्णनात मुल्हेर येथे टांकसाळ असुन त्यात गुजरातच्या सुलतान महमुद याचा महमुदी रुपया पाडला जात असल्याची नोंद येते. हीच नाणी बागलाणात चलन म्हणुन वापरली जात होती. शहाजहानच्या काळापर्यंत मुल्हेर किल्ला बागुल राजांच्या ताब्यात होता. जुलै १६३६ मध्ये औरंगजेबाची दक्षिणेचा सुभेदार म्हणुन नेमणुक झाल्यावर १६३८ मध्ये मोगलांनी बागलाणवर हल्ला केला. यावेळी बागुल राजा बहीरमशहा याने किल्ला मोठ्या शर्थीने लढवला पण युद्धात आपला पराभव होणार हे दिसल्यावर त्याने औरंगजेबाशी तह करून मुघल मनसबदारी स्वीकारली आणि ऐश्वर्यसंपन्न बागलाणचे हिंदु साम्राज्य लयास गेले. १५ फेब्रुवारी १६३८ रोजी किल्ला मुघलांच्या ताब्यात आला. मुल्हेर किल्ला ताब्यात आल्यावर औरंगजेबने किल्ल्याचे नाव औरंगगड ठेवले. किल्ल्यावर महंमद ताहिर याची किल्लेदार म्हणून नेमणूक करण्यात आली. या ताहिरने मुल्हेरजवळ ताहीर नावाचे गाव वसवले ज्याचे आज ताहराबाद नामकरण झाले आहे. इ.स.१६६० मध्ये ख्वाजा बेग हा मुल्हेरचा किल्लेदार होता तर १६६२ मध्ये कुलीबेग हा किल्ल्याचा किल्लेदार होता. याच्या कारकीर्दीत मुल्हेर किल्ल्यातील सैनिकांनी पगारासाठी बंड केल्याचे उल्लेख येतात. ऑक्टोबर १६७० च्या दुस-या सुरत लुटीनंतर शिवाजी महाराजांनी बागलाण मोहीम उघडली. मराठयांनी १६७१ मध्ये प्रथम मुल्हेरवर हल्ला केला पण किल्लेदार नेकनामखानने तो परतवुन लावला. मात्र साल्हेरच्या लढाईनंतर पेशवा मोरोपंत यांच्या नेतृत्वाखाली १८ फेब्रुवारी १६७२ मध्ये मराठयांनी मुल्हेरगड जिंकून घेतला पण १६८० दरम्यान तो पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेला असावा कारण १६८१ साली देवीसिंह येथील किल्लेदार होता. इ.स.१६९० साली मनोहरदास गौड हा राजपुत येथील किल्लेदार होता तर इ.स.१६९२ साली बहरोजखान येथे किल्लेदार होता. इ.स. १७५२ च्या भालकीच्या तहानुसार मुल्हेरसकट खानदेशमधील सर्व प्रदेश मराठयांच्या हाती आला व त्रिंबक गोविंद मुल्हेरचा किल्लेदार झाला. इ.स.१७६५ मध्ये किल्ल्यावर गुप्तधन असल्याच्या नोंदी पेशवे दफ्तरात येतात. सन १८१८ च्या शेवटच्या इंग्रज मराठा युद्धात किल्लेदार रामचंद्र जनार्दन फडणीस याने न लढता १२ जुलै १८१८ रोजी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात दिला. यावेळी बालेकिल्ल्यावर फत्तेलश्कर, रामप्रसाद, शिवप्रसाद व मार्कंडेय या ८ फुट लांबीच्या चार तोफा असल्याचे उल्लेख येतात. यातील मार्कंडेय तोफ इंग्रजांनी वितळवली व उर्वरित दोन तोफा किल्ल्यावर पहायला मिळतात पण एका तोफेचा पत्ता लागत नाही. इ.स. १८२५ मध्ये सटाणा परिसरात शिवरामच्या नेतृत्वाखाली ८०० आदिवासींनी अंतापूरवर हल्ला करून मुल्हेर किल्ला ताब्यात घेतला. इंग्रज अधिकारी औट्रमने शिवराम आणि अन्य शेकडो आदिवासीना पकडून तुरुंगात डांबले. पुढे ब्रिटिशांनी या प्रांताचे विभाजन करून सटाणा हे प्रांताचे मुख्य ठिकाण केले. (टीप-किल्ल्याच्या माचीवर दाट झाडी असल्याने सांभाळून भटकंती करावी.)
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!