MUKHED

TYPE : ANCIENT SHIVMANDIR

DISTRICT : NANDED

मराठवाडा हा प्राचीन काळापासून संपन्न असा प्रदेश होता. सातवाहन, राष्ट्रकुट, यादव या बलाढय़ राजसत्ता इथे नांदल्या आणि या राजवटींच्या कालखंडात शिल्पकला आणि मंदिर स्थापत्य इथे बहरले. आज मराठवाडय़ात जेवढी शिल्पसमृद्ध मंदिरे व त्यावरील देखण्या मूर्ती पाहायला मिळतात तेवढय़ा महाराष्ट्रात इतरत्र पहायला मिळत नाहीत. मराठवाडयात नांदेडपासून ७५ कि.मी. अंतरावर मुखेड हे तालुक्याचे ठिकाण आहे. या तालुक्याच्या ठिकाणी गावातील वस्तीत साधारण ११ व्या शतकात बांधलेले दाशरथेश्वर म्हणुन ओळखले जाणारे महादेव मंदिर आहे. मंदिराची मोठया प्रमाणात पडझड झाल्याने जीर्णोद्धार करताना सिमेंटीकरणाने मुळच्या सुंदर मंदिराचे विद्रूपीकरण झाले आहे. मंदिराच्या सभागृहापुढे कॉंक्रीटचे सभागृह बांधले असुन मुळचा कळस कोसळल्याने त्या जागी सिमेंटचा कळस बांधला आहे तर गर्भगृहात निळ्या रंगाच्या चकचकीत लाद्या लावल्या आहेत. मुळ मंदीर एका चौथऱ्यावर उभे असुन त्यावर खुर,कलश व कमळ असे वेगवेगळे थर आहेत. एक मुखमंडप आणि दोन अर्धमंडप असलेला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी याची रचना आहे. ... मंदिर उत्तराभिमुख असून मंदिराच्या गर्भगृहात एक मीटर उंचीच्या भद्रपीठावर शिवलिंग आहे. मंदिराच्या अंतर्भागात मंडपाच्या मधोमध अंकण आहे. चौरस तळखडा, त्यावर अष्टकोनाकृती आणि वर्तुळाकृती घटक, त्यावर शीर्ष आणि कीचकहस्त असा मंदिरातील स्तंभांचा घटक क्रम आहे. या स्तंभावर सुंदर नक्षीकाम आणि मुर्ती कोरल्या आहेत एक-दोन स्तंभ मात्र याला अपवाद असून त्यांचा घटकक्रम काहीसा वेगळा आहे. मंदिरावर असलेली पाचही देवकोष्ठके आज रिकामी आहेत. मंदिराच्या बाहेरील मंडोवरावर सुरसुंदरी व अत्यंत दुर्मीळ अशा नृत्य करणाऱ्या सप्तमातृकांची शिल्पे कोरलेली आहेत. आज सात आसरा म्हणून पुजल्या जाणाऱ्या या देवता प्राचीन समाजात सप्तमातृका म्हणुन पुजल्या जात. अंधकासुर वधावेळी काही देवांनी आपल्या शक्ती शिवाला अर्पण केली व यातुन ब्राह्मणी, वाराही, कौमारी, इंद्राणी, माहेश्वरी, नरसिंही या शक्तींदेवतांचा उगम झाला व त्यांनी शिवासोबत दैत्याचा नायनाट केला अशी कथा शिवपुराणात येते. अनेक मंदिरांमध्ये एका ओळीत या सप्तमातृका त्यांच्या पायाशी त्यांची वाहने व अखेरीस गणेश असे कोरलेला शिल्पपट पहायला मिळतो. परंतु मुखेडच्या दशरथेश्वर महादेव मंदिराच्या बाह्यंगावर या मातृका नृत्य करताना कोरलेल्या आहेत. यातील काही शिल्पांचे हात भंगलेले असुन प्रत्येक मातृकांच्या पायाशी कमळपुष्प व त्यांचे वाहन कोरलेले आहे. या वाहनावरून त्या मातृकांची ओळख पटते. या सप्तमातृकांच्या डोक्यावर मुकुट व कानात कुंडले असुन पायात तोडे-पैंजण यासारखे अलंकार कोरले आहेत. अत्यंत देखण्या, प्रमाणबद्ध आणि नृत्यामध्ये रममाण झालेल्या या सप्तमातृका अत्यंत दुर्मीळ असुन मुखेडच्या मंदिरावर पहायला मिळतात. याशिवाय याच मंदिरावर आपल्याला ज्येष्ठा अथवा अलक्ष्मीचे अजुन एक दुर्मीळ शिल्प पहायला मिळते. महाराष्ट्रात ‘अक्काबाई’ म्हणून प्रसिद्ध असलेली ही लक्ष्मीची मोठी समुद्रमंथनाच्या वेळी प्रथम बाहेर आली म्हणून हिला ज्येष्ठा हे नाव मिळाले. लक्ष्मीचे लग्न श्रीविष्णूशी झाले पण मोठीबरोबर कोणी लग्न करण्यास तयार होईना तेव्हा कपिल मुनींनी तिच्याशी लग्न केले अशी कथा पुराणात आढळते. केरसुणी आणि कावळा ही अलक्ष्मीची चिन्हे असुन गाढव तिचे वाहन आहे. काही ठिकाणी या देवतेचे वर्णन रोगराई- मरीआई यांची देवता म्हणुनही येते. मुखेडच्या मंदिरावरील हिचे शिल्प अत्यंत देखणे आहे. येथे ही ज्येष्ठेचे शिल्प चतुर्भुज असून वरच्या उजव्या हातात केरसुणी आहे तर एका हातात सुप आणि एका हातात कपालपात्र धरलेले दिसते. मुर्तीच्या कानात कुंडले व डोक्यावर मुकुट कोरलेला असुन डाव्या खांद्यावरून लोंबणारी मुंडमाळा आहे. तिच्या शेजारी तिचे वाहन गाढव कोरलेले आहे. अत्यंत दुर्मीळ असे हे शिल्प नक्कीच वेगळे आहे. याशिवाय मंदिरावर गौरी, शिव,भैरव,वरुण,नृत्यगणेश,गजलक्ष्मी आदींची शिल्प कोरलेली आहेत. मंदिराबाहेर काही अंतरावर प्राचीन पुष्करणी आहे. मुखेडचे हे मंदिर त्यावरील अलक्ष्मीचे शिल्प व नृत्यमग्न सप्तमातृका यामुळे इतर मंदिरांपेक्षा वेगळे ठरते. असे हे आगळेवेगळे मंदिर पहाण्यासाठी मुखेडला जायलाच हवे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!