MORALA
TYPE : FORTRESS
DISTRICT : BEED
HEIGHT : 0
बीड शहराच्या आसपास गढीकोटांची भटकंती करताना आपल्याला असंख्य लहानमोठ्या गढी पहायला मिळतात. मुळात हा प्रदेश सपाट भूभागावर पसरलेला असल्याने या भागात गिरीदुर्गा ऐवजी प्रशासकीय सोय म्हणुन लहान लहान गढीच मोठ्या प्रमाणात दिसून येतात. कधीकाळी त्या प्रांताचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या या गढ्या आता मात्र कुठेतरी आडबाजुला असल्यासारख्या वाटतात. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात आडबाजुला असलेले असेच एक गाव म्हणजे मोराळा. या गावात आजही (२०२२) जाण्यासाठी धड रस्ता नाही पण आडबाजुला असलेल्या या गावात बऱ्यापैकी सुस्थितीत असलेली गढी पहायला मिळते. आज जरी हि गढी आपल्याला आडबाजुला वाटत असली तरी हि गढी अहमदनगर – बीड या दोन शहरांच्या मध्यवर्ती भागात आहे. मोराळा हे गाव बीड शहरापासुन ६५ कि.मी.अंतरावर असुन आष्टी या तालुक्याच्या ठिकाणाहुन ३० कि.मी. अंतरावर आहे. अहमदनगर ते बीड हे अंतर साधारण ७० कि.मी.आहे. गावाच्या मध्यवर्ती भागात असलेली हि गढी एका उंचवट्यावर बांधलेली असल्याने दुरूनच नजरेस पडते,
...
त्यामुळे गढीचा पत्ता विचारण्याची गरज पडत नाही. चौकोनी आकाराची हि गढी साधारण अर्धा एकरवर बांधलेली असुन गढीच्या तटबंदीत लहानमोठे आकाराचे तीन बुरुज पहायला मिळतात. गढीची संपुर्ण तटबंदी ओबडधोबड दगडात बांधलेली असुन गढीचे बुरुज व दर्शनी भाग मात्र घडीव दगडात बांधलेलला आहे. गढीचे मुख्य प्रवेशद्वार फार मोठे नसले तरी एक गोलाकार बुरुजाच्या आडोशाला बांधलेले आहे. या बुरुजावर बंदुकीचा मारा करण्यासाठी असलेल्या जंग्या पहायला मिळतात. तटबंदीच्या एका भागात घडीव दगडात बांधलेला सज्जा असुन त्यावर विटांनी बांधकाम केलेले आहे. गढीचे एकुण बांधकाम पहाता हि गढी जुन्या व नवीन बांधकामाचा संगम असल्यासारखी वाटते. गढीच्या मुख्य दरवाजासमोर सपाट जागा असू सध्या तेथे सीताफळांची झाडे वाढलेली आहेत. गढीच्य दरवाजाने आत शिरल्यावर उजव्या बाजूस पहारेकऱ्यासाठी दोन देवड्या बांधलेल्या आहेत. गढीत सध्या कोणीच वास्तव्यास नसल्याने मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली आहे. या झाडीतून वाट काढत गेल्यास छप्पर नसलेल्या दोन वास्तु पहायला मिळतात. या दोनही वास्तु घडीव दगडात बांधलेल्या आहेत. गढीत झाडी वाढल्याने व माणसांचा वावर नसल्याने सरपटणारे प्राणी वाढलेले आहेत, त्यामुळे फारसे धाडस न करता आपली गडफेरी थोडक्यात आटोपती घ्यावी लागते. गढी पाहण्यासाठी तूर्तास १५ मिनिटे पुरेशी होतात पण झाडी नसल्यास गढी व्यवस्थितपणे फिरता येईल. गढीचा इतिहास फारसा माहित नसला तरी स्थानिक लोक या गढीस वंजारी राजे धर्माजी प्रतापराव गर्जे यांची गढी म्हणुन ओळखतात. प्रतापराव हि या घराण्याची पदवी असुन इ.स १८५७च्या उठावा आधी १८१८च्या सुमारास त्यांनी इंग्रज व निझाम यांच्याविरूद्ध लढा दिल्याचे सांगतात. मोराळा हे ठिकाण बीड जिल्हयात व नगर जिल्ह्याच्या सीमेजवळ असल्याने त्यांनी मराठवाडय़ात निजामाला तर नगर जिल्ह्य़ात इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. राजे अहिलाजीराव (रावसाहेब )प्रतापराव गर्जे यांनी क्रांतिसिंह नाना पाटलांना १०० बंदुका दिल्याची खबर ब्रिटीशांना लागल्यानंतर मोराळा येथील किल्ल्यातून ब्रिटीशांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रे जप्त केली. मोराळा ही वंजारी समाजाची राजधानी असुन तेथे गर्जे राजे १९६० सालापर्यंत महाराष्ट्रातील वंजारी समाजाचे न्यायनिवाडे करायचे व समाजातील एखाद्यावर अन्याय झाला तर त्याची दखल गर्जे राजे घेत असत अशी माहीती स्थानिक तरुणांनी दिली. ( सदर माहिती स्थानिकांनी दिलेली असुन केवळ ऐकीव माहिती आहे.)
© Suresh Nimbalkar