MORAGAD
TYPE : HILL FORT
DISTRICT : NASHIK
HEIGHT : 4135 FEET
GRADE : MEDIUM
महाराष्ट्रात एका माचीवर दोन बालेकिल्ले असलेले गड तसे कमीच आहेत. मुंबईपुण्याहुन जवळ असलेला राजमाची किल्ला त्याच्यावर असलेल्या मनरंजन व श्रीवर्धन या दोन बालेकिल्ल्यांमुळे गडप्रेमींमध्ये भटकंतीसाठी प्रसिध्द आहे पण नाशिक जिल्ह्यातील डोलबारी डोंगररांगेत असलेला मुल्हेर किल्ला त्यावर मुल्हेर-मोरा-हरगड असे एक दोन नव्हे तर तब्बल तीन बालेकिल्ले असुनही प्रसिद्धीपासून खूपच दुर आहे. मुल्हेरच्या बालेकिल्ल्यापेक्षा उंचीने जास्त असलेला हा डोंगर मुल्हेरचा दुसरा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जातो. मुल्हेरच्या परिघात असल्याने व त्यावर जाणाऱ्या दोन वाटा मुल्हेर गडावरूनच जात असल्याने हा किल्ला मुल्हेरचाच भाग म्हणुन ओळखला जात असला तरी काही ऐतिहासिक कागदपत्रात याचा वेगळा किल्ला म्हणुन उल्लेख येतो. काही अंशी हे खरे असावे कारण मुल्हेरवरून मोरागडावर येणाऱ्या दोन वाटाशिवाय गडावर येण्यासाठी एक स्वतंत्र तिसरी वाट आहे पण वापरात नसल्याने हि वाट सध्या पुर्णपणे नष्ट झाली आहे.
...
या वाटेच्या खुणा आजही गडावर दिसुन येतात पण हि वाट वापरणे धोक्याचे आहे. पण काहीही असले तरी मोरागडाचा उल्लेख मुल्हेरच्या नावाशिवाय पूर्ण होत नाही. पश्चिमेकडील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि बागलाण यांच्या सीमेवर मुल्हेर-मोरागड वसलेले आहेत. सटाणा तालुक्यात असलेल्या मोरागडावर जाण्यासाठी आपल्याला नाशीक-सटाणा-ताहाराबाद मार्गे मुल्हेर गाव गाठावे लागते. नाशीक ते सटाणा हे अंतर ९० कि.मी.असुन सटाणा येथुन ताहाराबादमार्गे मुल्हेर ३५ कि.मी.अंतरावर आहे. मुल्हेर गावात गेल्यावर आपल्याला समोर मुल्हेरमाची व त्यावर डावीकडे मोरागड मध्यभागी मुल्हेर तर उजवीकडे हरगड असे बालेकिल्ल्याचे त्रिकुट दिसते. मुल्हेर गावातुन गडाच्या दिशेने जाताना गावात नक्षीकाम केलेले जुने वाडे पहायला मिळतात. गावातुन बाहेर पडताना डाव्या बाजुला टेकाडावर एक मंदिर तर उजव्या बाजुला मुघल शैलीतील गोलाकार घुमट असलेली एक पुरातन वास्तु दिसते. मोरागडावर जाणाऱ्या दोन्ही वाटा मुल्हेर माचीतुनच गडावर जातात. यातील एक वाट मुल्हेरमाचीवर असलेल्या सोमेश्वर मंदिराकडून तर दुसरी वाट मुल्हेरच्या बालेकिल्ल्यावरून मोरागडावर जाते. आपण सोमेश्वर मंदिराकडून मोरागडावर जाणार असल्याने त्याच वाटेचे वर्णन केले आहे. मुल्हेर गडाकडे जाणारा पक्का रस्ता मुल्हेरगडाच्या पायथ्याशी व तेथुन पुढे कच्चा रस्ता माचीचे तीन दरवाजे पार करत आपल्याला मुल्हेर माचीवरील गणेश मंदिरापर्यंत घेऊन जातो. गणेश मंदिराकडून पुढे गेल्यावर एक मळलेली वाट डावीकडे मुल्हेर व मोरागडच्या खिंडीखाली असलेल्या सोमेश्वर मंदिराकडे जाते. या वाटेने सोमेश्वर मंदिरासमोरून उभा चढ चढत आपण आपण खिंडीत पोहोचतो. मुल्हेर-मोरागड या दोन्ही किल्ल्यामध्ये असलेल्या खिंडीचा हा भाग दोन्ही डोंगरसोंडेपर्यंत तटबंदीने बंदिस्त केला असुन आजही सुस्थितीत असलेल्या या तटबंदीत तीन बुरुज आहेत. या तटबंदीमुळे हे दोन्ही किल्ले एकमेकांना जोडले गेले आहेत. खिंडीच्या खालील बाजुने या तटबंदीपर्यंत जाण्यासाठी तीन दरवाजे असुन यातील दोन दरवाजे व त्याच्या कमानी पुर्णपणे कोसळल्या असुन तटबंदीत जाणारा दरवाजा त्याच्या कमानीसकट पुर्णपणे शिल्लक असला तरी दगडाखाली गाडला गेला आहे. त्यामुळे या दगडावर चढूनच आपला खिंडीतील तटबंदीवर प्रवेश होतो. मुल्हेरच्या बालेकिल्ल्यावरून येणारी लहान दरवाजाची वाट देखील या ठिकाणी तटबंदीवर उतरते. गडाच्या पायथ्यापासुन इथवर येण्यास दोन तास लागतात. तटबंदीवर मुल्हेर डोंगराच्या पोटात खडकात खोदलेले टाके असुन त्यातील पाणी मात्र शेवाळलेले आहे. तटबंदीवरून डावीकडील वाटेने मोरागड चढायला सुरवात केल्यावर सुरवातीच्या ढासळलेल्या दोन-तीन पायऱ्या सावधपणे चढल्यावर पुढे कातळात कोरलेल्या प्रशस्त पायऱ्यांनी आपण या वाटेवर असलेल्या किल्ल्याच्या पहिल्या पुर्वाभिमुख दरवाजात पोहोचतो. दरवाजाच्या बाहेरील बाजूस कोनाड्यात गणपती व देवीचे शिल्प कोरलेले असुन कमानीवर आतबाहेर कमळाची फुले कोरलेली दिसुन येतात. दरवाजाच्या आत पुढील भागात असलेले छत मात्र ढासळलेले आहे. दरवाजातून वर आल्यावर समोरच खडकात खोदलेले भलेमोठे टाके दिसते. इथुन वर पहिले असता कडयाच्या टोकावर दोन बुरुजामध्ये बांधलेला गडाचा दुसरा पुर्वाभिमुख दरवाजा व त्याखाली खडकावर कोरलेल्या पायऱ्या दिसतात. मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्यापासुन हा दरवाजा सतत आपल्याला दिसत असतो. या दरवाजाकडे जाताना कड्याला लागुन एक वाट उजवीकडे जाताना दिसते. या वाटेने काही अंतर गेले असता तीन दालन असलेली एक गुहा पहायला मिळते. या गुहेच्या तोंडावर काही प्रमाणात बांधकाम केलेले आहे. गुहा पाहुन मागे फिरल्यावर आल्यावाटेने उभ्या कड्यातुन आपला गडावर प्रवेश होतो. गडाची समुद्रसपाटीपासून उंची ४१५० फुट असुन गडाचा परीसर साधारण १० एकरवर उत्तरपुर्व पसरलेला आहे. गडाचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठार आहे. दरवाजातुन आत शिरल्यावर डाव्या बाजूस तटबंदीला लागुन असलेल्या उध्वस्त कोठाराचे अवशेष नजरेस पडतात. कोठार पाहुन सरळ वाटेने पुढे निघाल्यावर डावीकडे गवताने व मातीने भरलेले साचपाण्याचे टाके दिसुन येते. वाटेच्या पुढील भागात सपाटीवर कातळात खोदलेली पाण्याची दोन लहान टाकी दिसतात. यातील एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. पुढे गेल्यावर डाव्या बाजुस अजुन एक कोरडे पडलेले मोठे टाके दिसुन येते. या टाक्यापासून पुढे गेल्यावर डोंगर उतारावर दोन बाजुंनी घडीव दगडांनी बांधलेला भला मोठा तलाव आहे, या तलावाचे पाणी हिरवेगार असुन ते पिण्यायोग्य नाही. तलावाच्या आत असलेल्या एका कातळावर सुंदर शिवलिंग कोरलेले आहे. तलावाच्या परिसरात मोठया प्रमाणात उध्वस्त वास्तुंचे अवशेष दिसुन येतात. तलावाच्या पुढील भागात गडाचे उत्तरेकडील टोक असुन या टोकावर एक बुरुज बांधलेला आहे. या बुरुजावर चौकीचे अवशेष आहेत. या बुरुजाच्या अलीकडे उत्तरेकडील सोंडेवरून खाली उतरणाऱ्या वाटेचे अवशेष असुन आज हि वाट पुर्णपणे नामशेष झाली आहे. येथुन मागे फिरल्यावर पठारावरून आलेल्या वाटेच्या दुसऱ्या बाजुने आलेल्या दरवाजाकडे निघावे. वाटेच्या सुरवातीला काही घरांचे चौथरे दिसुन येतात. हे चौथरे पार केल्यावर पुढे काही अंतरावर सपाटीवर खडकात खोदलेले पाण्याचे मोठे जोडटाके दिसते मात्र यातील पाणी पिण्यायोग्य नाही. हि टाके पार केल्यावर पुढे काही अंतरावर डोंगरउतारावर खडकात कोरलेले पाण्याचे अजुन एक सुंदर टाके आहे. गडावर स्वच्छ आणि चवदार पाणी असलेले हे एकमेव टाके आहे. या टाक्यावरून पुढे गेल्यावर उजव्या बाजुस एका प्रशस्त वाड्याचे अवशेष दिसतात. हि गडावरील सदर अथवा किल्लेदाराचा वाडा असावा. वाडा पाहुन पुढे आल्यावर आपण गडाच्या दरवाजात पोहोचतो व आपली गडफेरी येथे पूर्ण होते. मोरागडाच्या माथ्यावरून आपल्याला नजरेत भरते ते मुल्हेरचं विस्तीर्ण पठार. येथुन मुल्हेर गडावर असलेले सर्व अवशेष अगदी स्पष्टपणे पहाता येतात. येथुन मुल्हेरमाची, मुल्हेरगड, हरगड,न्हावीगड, मांगीतुंगी आणि साल्हेर-सालोटा हे किल्ले व आसपासचा परिसर दिसतो. संपुर्ण गडमाथा फ़िरण्यास एक तास पुरेसा होतो. येथुन खाली खिंडीत उतरून तटबंदीतील लहान दरवाजाने आपण मुल्हेरगडावर जाऊ शकतो किंवा आल्या वाटेने खाली उतरू शकतो. पुन्हा मुल्हेर माचीवर जाऊन पलीकडून मुल्हेरचा माथा गाठण्यापेक्षा हा मार्ग सोपा आहे. सध्या ह्या दरवाजात मोठया प्रमाणात दगड पडले असले तरी अंग चोरून त्यातून वाट काढता येते. मोरागडचा इतिहास हा मुल्हेर गडाशीच संबंधीत असल्याने या गडाचा फारसा वेगळा असा इतिहास आढळत नाही. महाभारतात मुल्हेरचा उल्लेख रत्नपूर या नावाने येतो. त्या काळात येथे असलेल्या मयूरध्वज राजाच्या नावावरून या नगराला मयूरपूर नाव पडले व पुढे त्याचा अपभ्रंश होत मुल्हेर हे नाव अस्तित्वात आले. मुल्हेर ही बागलाणची राजधानी व मोरा-हरगड या किल्ल्यांची बांधणी बागुलवंशीय राजांनी केली. त्या काळात मुल्हेरची बाजारपेठ ऐश्वर्यसंपन्न बाजारपेठ म्हणून होती. सुरतेपासून दक्षिणेस जोडलेला व्यापारी मार्ग हा येथून जात असे. मुल्हेर गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात असताना त्याने येथील टांकसाळीत महमुदी रुपये पाडल्याची नोंद आढळुन येते. याशिवाय मुल्हेरी तलवार मुठीसाठी मुल्हेरवाडी प्रसिद्ध होती. मोगल सरदार मुहम्मद ताहिर याने बागलाणवर हल्ला चढवला तेव्हा राजा बहिर्जी याचे राज्य होते. युद्धात होणारा टाळण्यासाठी त्याने औरंगजेबाशी तह करून मुघल मनसबदारी स्वीकारली आणि ऐश्वर्यसंपन्न बागलाण मुघलांच्या ताब्यात गेले. बागलाण मुघलांच्या ताब्यात गेल्यावर मुल्हेरबरोबर मोरागड देखील त्यांच्या ताब्यात गेला. १६७२ मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी मुल्हेरबरोबर मोरागड स्वराज्यात दाखल करून घेतला. एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीस इतर किल्ल्यांप्रमाणे मोरागड इंग्रजांच्या ताब्यात गेला.
© Suresh Nimbalkar