MOHOL

TYPE : NAGARKOT

DISTRICT : SOLAPUR

HEIGHT : 0

GRADE : EASY

पुणे-सोलापूर रस्त्यावर टेंभूर्णीपासुन ५६ कि.मी.अंतरावर तर सोलापुरपासून ३५ कि.मी. अंतरावर मोहोळ हे तालुक्याचे गाव आहे. गाव फार जुने असुन मराठा कालखंडात मोहोळ येथे सुभ्याची कचेरी होती. येथे एक भुईकोट किल्ला आहे असे म्हणण्याऐवजी होता असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. आज आपल्याला किल्ला सलग असा पहाता येत नाही तर त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी कोटाचे विखुरलेले अवशेष पाहावे लागतात. मोहोळ गावात किल्ला म्हणुन विचारले असता गावकऱ्याना ठोसपणे सांगता येत नाही म्हणुन किल्ल्याऐवजी नागनाथ मंदीर विचारावे व तेथुन किल्ला पहाण्यास सुरवात करावी. गावाबाहेर ओढ्याच्या काठी प्रशस्त असे नागनाथ मंदीर असुन या भागात बरेचसे अवशेष पहायला मिळतात. मध्ययुगीन बांधकामाची साक्ष देणाऱ्या नागनाथ मंदिराभोवती दगडी तटबंदी असुन संपुर्ण तटबंदीत ओवऱ्या आहेत. मंदीराचे दगडी बांधकाम सुबकतेने रंगविलेले आहे. ... मंदिराचे बांधकाम किल्ल्याप्रमाणे असुन दरवाजावर नगारखाना आहे. मंदिरासमोरील वाटेने पुढे जाताना अजुन दोन नव्याने बांधलेली मंदीरे दिसतात. मंदिरे जरी नवीन असली तरी मंदिराच्या आवारात विरगळी व प्राचीन मुर्ती आहेत. यातील एका मंदिराबाहेर राशीचक्राचे दुर्मीळ शिल्प आहे. वाटेच्या शेवटी डाव्या बाजुला दोन बुरूजात बांधलेले किल्ल्याचे प्रवेशद्वार व शेजारी ढासळलेली तटबंदी दिसते तर उजव्या बाजुस जमीनीशी समांतर एक भली मोठी चौकोनी बारव आहे. हि बारव खर्गतीर्थ म्हणुन ओळखली जाते. या बारवमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या असुन आत चारही बाजुला ओवऱ्या बांधलेल्या आहेत. या ओवऱ्याच्या कोनाड्यात विरगळ व शिल्पे ठेवलेली आहेत. बारवच्या वरील बाजुस पाणी खेचण्यासाठी दोन दगडी मोटा असुन पाणी वाहण्यासाठी दगडी पाट बांधलेला आहे. बारवच्या समोरील बाजुस एका चौथऱ्यावर झुडुपात दगडात कोरलेल्या सहा कबरी दिसतात. हे पाहुन झाल्यावर आपण आधी पाहिलेल्या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे निघायचे. या दरवाजातून आपण सरळ बालेकिल्ल्याकडे जातो. मोहोळचा किल्ला नगरदुर्ग या प्रकारातील असुन संपुर्ण गावाभोवती तटबंदी व आत खाशा लोकांसाठी तटबंदी व बुरूज असलेली गढी किंवा बालेकिल्ला अशी याची रचना असावी. कधीकाळी मोहोळच्या भुईकोटाच्या बाहेरील तटबंदीत एकुण नऊ दरवाजे होते पण आज मात्र गावाच्या खालील बाजुस आपण प्रवेश केलेला म्हणजेच दक्षिण दिशेला असणारा किल्ल्याचा मुख्य दरवाजा व ढासळलेली तटबंदी पहायला मिळते. बालेकिल्ल्याचे तीन बुरूज व दोन बाजुची तटबंदी सध्यातरी काही प्रमाणात पहायला मिळतो. बालेकिल्ल्याच्या तटबंदीतील भागात देशमुखांचा वाडा आहे. दरवाजापुढे एक घुमटी असुन त्यात एक मुर्ती विरगळ व नागशिल्प मांडुन ठेवले आहेत. बालेकिल्ल्याचा दरवाजा वाड्याच्या दरवाजाप्रमाणे बांधलेला असून चांगल्या स्थितीत आहे पण आतील दालन मात्र अलीकडे ढासळलेले आहे. दरवाजातील प्रवेश L आकारात असुन दुसऱ्या दरवाजाच्या आतील उजव्या बाजुस तळामध्ये कन्नड भाषेत कोरलेला एक शिलालेख आहे. बालेकिल्ल्याला एकुण चार बुरूज असुन तीन ढासळलेल्या अवस्थेत आहेत तर चौथा बुरूज व त्या बाजुची तटबंदी वाटेत येत असल्याने नगरपालिकेने २०१६ साली पाडून टाकली. याशिवाय मोहोळमध्ये अकराव्या शतकातील चालुक्यकालीन भानेश्वर हे शिवमंदीर आहे. मंदिराची पडझड झाली असली तरी त्यावरील शिल्पे पाहण्यासारखी आहेत. मोहोळच्या किल्ल्याचा इतिहास फारसा ज्ञात नसला तरी स्थानिक देशमुखांच्या सांगण्यानुसार या किल्ल्याची बांधणी राजाराम महाराजांच्या काळात झाली व जिंजीला जाताना त्यांनी मोहोळ येथे एक दिवस मुक्काम केला होता पण याला ठोस पुरावा नाही. गावात आढळणारे अवशेष मात्र मोहोळच्या प्राचीनतेची साक्ष देतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!