MIRGAD

TYPE : HILL FORT

DISTRICT : RAIGAD

HEIGHT : 1150 FEET

GRADE : MEDIUM

महाराष्ट्रात सोनगड/सोनगीर नावाने ओळखले जाणारे अनेक किल्ले आहेत. यातील एक सोनगीर किल्ला पेण शहराजवळ असलेल्या महालमिऱ्या डोंगरावर उभा आहे. महालमिऱ्या डोंगरावर असल्याने हा किल्ला मिरगड या नावाने देखील ओळखला जातो. किल्ल्याचा आकार व त्यावरील ठरावीक अवशेष पहाता या किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी केला जात असावा. मुंबई-पुण्याहुन जवळ असलेला हा किल्ला एका दिवसात सहजपणे पहाता येतो व वेळेचे काटेकोर नियोजन केल्यास या किल्ल्यासोबत जवळच असलेला रत्नदुर्ग किल्ला देखील पहाता येतो. झापडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव मुंबईहुन १०२ कि.मी.अंतरावर तर पुण्याहुन १४० कि.मी.अंतरावर आहे. झापडी गावात जाण्यासाठी पेण-वडखळ-पाबळ-कोंढवी-झापडी असा गाडीमार्ग असुन मुंबई गोवा महामार्गावर वडखळहुन १० कि.मी. अंतरावर पाबळला जाणारा फाटा आहे. या फाट्यावरून झापडी गाव १० कि.मी. आत आहे. झापडी गावातुन एक कच्चा रस्ता गडाच्या माचीवर असलेल्या सोनगीरवाडी या १०-१२ घरांच्या वस्तीकडे जातो. ... जीपंसारखे वाहन असल्यास आपण थेट किल्ल्याच्या माचीवर असलेल्या या वाडीत पोहोचतो अथवा २ कि.मी.चे हे अंतर पायी पार करावे लागते. या रस्त्यावरील दोन वळणावर मोठया प्रमाणात भुसभुशीत माती असल्याने मोटरसायकल देखील घसरते हि गोष्ट लक्षात ठेवावी. गावातील तरुण मात्र त्यांच्या रोजच्या सरावाने हा रस्ता सहज पार करतात. सोनगीरवाडीत शिरताना समोरच आपल्याला चार टेकड्या दिसतात. यातील डावीकडुन दुसरी व तिसरी टेकडी म्हणजे सोनगीर उर्फ मिरगड किल्ला. वाडीबाहेर आल्यावर तिसऱ्या टेकडीच्या टोकाकडील खिंडीतून किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. गावकरी या किल्ल्यावर नाचणीची शेती करत असल्याने तसेच त्यांची गुरे चरायला नेत असल्याने वाट पुर्णपणे मळलेली आहे तरीसुद्धा वाट गावकऱ्याकडून नीट समजुन घ्यावी किंवा वाटेच्या सुरवातीपर्यंत सोबत घ्यावी. सोनगीर वाडीतून किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची १०४० फुट असुन किल्ल्याचे अवशेष असलेला परीसर साधारण १ एकर आहे. किल्ल्याच्या पहिल्या टेकडावर वास्तुचे तुरळक अवशेष असुन या ठिकाणी असलेल्या झाडीत गावकऱ्यांनी किल्ल्यावर सापडलेल्या २-३ मुर्ती आणुन ठेवल्या आहेत. येथुन समोर टेकडावर असलेला किल्ला व त्यावरील संपुर्ण अवशेष नजरेस पडतात. या टेकडावरुन खाली खिंडीत येउन दुसऱ्या टेकडावर जाताना उध्वस्त तटबंदीतुन आपला गडावर प्रवेश होतो. गडाचा दरवाजा आज पुर्णपणे नष्ट झाला आहे. गडावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजुस एका मंदिराचे जोते असुन डाव्या बाजुस गडाचा ढासळलेला बुरुज आहे तर समोरच कातळात खोदलेले पाण्याचे मोठे टाके दिसते. सध्या हे टाके कोरडे पडलेले आहे. बुरुजाशेजारी असलेला वास्तुचा चौथरा त्यावर केलेल्या नाचणीच्या शेतामुळे ठळकपणे दिसुन येत नाही. टाक्याच्या पुढील भागात काही वास्तु अवशेष पसरलेले असुन उजवीकडील उंचवट्यावर एक मोठा चौथरा पहायला मिळतो. या उंचवट्याच्या पुढील बाजुस एक लहान सुकलेल पाण्याच टाक आहे. किल्ल्याच्या या उंच भागातुन दुरवर कर्नाळा व माणिकगड तर समोरच रत्नदुर्ग किल्ला नजरेस पडतो. किल्ला पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. इ.स.१६६२ मध्ये मुघल सरदार नामदारखान याने पेण परिसरावर हल्ला केला असता मिरगडच्या परिसरात झालेल्या लढाईत शिवाजी महाराजांनी भाग घेतल्याचे उल्लेख येतात. यानंतर किल्ल्याचे उल्लेख येतात ते पेशवे-आंग्रे यांच्या पत्रव्यवहारातुन. मार्च १७४० दरम्यान बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवे व चिमाजीअप्पा मानाजी आंग्रे यांच्या मदतीसाठी आले असता त्यांनी तुळाजी आंग्रे यांस कैद करून पाली, मिरगड हा भाग ताब्यात घेतला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!