MEHUNARAJA
TYPE : NAGARKOT
DISTRICT : BULDHANA
HEIGHT : 0
GRADE : EASY
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यात मेहुणा राजा नावाचे लहानसे खेडे आहे. संतश्रेष्ठ चोखामेळा ह्यांचे जन्मस्थानं असलेले हे ठिकाण इतिहासात राजे लखोजीराव जाधव ह्यांच्या वतंनदारीतिल एक महत्वाचे गाव होते. इतिहासाशी आपले नाते सांगणाऱ्या जाधवांच्या दोन उध्वस्त गढ्या व या गावाचा नगरदुर्ग आजही ताठ मानेने उभा आहे. मेहुणा गाव बुलढाणा शहरापासुन ७० कि.मी.अंतरावर तर देऊळगाव राजा या तालुक्याच्या ठिकाणापासुन केवळ १५ कि.मी.अंतरावर आहे. मेहुणाराजा गाव मुख्य रस्त्याहुन १.५ कि.मी. आत असुन मुख्य रस्त्यावरून आत शिरल्यावर गाव येण्याआधी रस्त्याच्या डाव्या बाजुस २० फुट उंचीचा एक प्रशस्त दरवाजा दिसतो. घडीव दगडानी चुन्यात बांधकाम केलेल्या या दरवाजा शेजारी असलेले दोन्ही बुरुज मोठया प्रमाणात ढासळलेले असुन या दोन्ही बुरुजांच्या आतील बाजुस कमानी असलेली सुंदर अशी दुमजली इमारत आहे.
...
या इमारतीच्या भिंतीवर पंजात दोन हत्ती पकडलेले शरभशिल्प या भिंतीत मुख्य दरवाजाच्या वरील बाजुस तसेच आतील इमारतीच्या वरील मजल्यावर जाण्यासाठी कमान असलेला दरवाजा आहे. दरवाजाच्या आतील बाजुस कोणतेही अवशेष नसुन केवळ लांबवर पसरलेल्या पडझड झालेल्या तटबंदीचा पाया आहे. हे बहुदा एखाद्या गढीचे अर्धवट झालेले बांधकाम असावे. येथुन ५ मिनिटात आपण मेहुणा गावात पोहोचतो. कधीकाळी तटबंदीच्या आत वसलेल्या या गावाची तटबंदी आज पुर्णपणे नष्ट झाली असुन या तटबंदीत असलेले दोन्ही दरवाजे मात्र शिल्लक आहेत. यातील आपण वाहनाने प्रवेश करतो तो दरवाजा पश्चिमाभिमुख असुन दुसरा दरवाजा उत्तराभिमुख आहे. आपण प्रवेश केलेला दरवाजा हा या कोटाचा मुख्य दरवाजा असुन हा दरवाजा दोन बुरुजामध्ये बांधलेला आहे. या दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन दरवाजाच्या कमानीची इमारत दुमजली आहे. यातील जिन्याने या इमारतीच्या वरील मजल्यावर तसेच दरवाजाच्या वरील भागात व बुरुजावर जाता येते. दरवाजा व बुरुज यांचे बांधकाम दगडात केलेले असुन फांजीवरील बांधकाम विटांनी केलेले आहे. फांजीवरील भागात बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या आहेत. या दरवाजाच्या पुढील भागात काही अंतरावर एक लहान दरवाजा आहे. हा या नगरदुर्गाच्या आत असलेल्या गढीचा दरवाजा असुन जाधवरावांची हि गढी आज पुर्णपणे नष्ट झाली असुन या गढीचे दोन दरवाजे व केवळ एक बुरुज शिल्लक आहे. गढीच्या बुरुजाला लागुनच गढीचा दुसरा लहान दरवाजा आहे. गढी परिसरात जाधवरावांच्या वंशजांची घरे आहेत. गढीच्या बुरुजाला वळसा मारून उत्तरेच्या दिशेने गेल्यावर काही मिनिटात आपण कोटाच्या दुसऱ्या दरवाजात पोहोचतो. येथे आपली मेहुणा राजा कोटाची भटकंती पुर्ण होते. गावाभोवती फेरी मारल्यास काही ठिकाणी तुरळक तटबंदीचे अवशेष दिसतात मात्र स्थानिक माहीतगार सोबत असायला हवा. हा संपुर्ण परीसर पहाण्यास एक तास पुरेसा होतो. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जाधव घराणे प्राचीन आहे. निजामशाही व आदिलशाही काळात स्वतःच्या कर्तुत्वावर व पराक्रमावर काही मराठा घराणी उदयास आली त्यात सिंदखेडकर जाधवराव हे एक प्रमुख घराणे होते. सोळाव्या शतकात सिंदखेडची देशमुखी मुळे घराण्याकडे होती. गावातील रविराव ढोणे याने बंड करुन मुळे घराण्याची कत्तल केली यात मुळे घराण्यातील यमुनाबाई ही गर्भवती स्त्री वाचली. ती दौलताबादला निजामशहाचे सरदार असलेल्या लखुजी जाधवांच्या आश्रयाला गेली. या काळात सिंदखेड परगणा लखुजी जाधव यांच्याकडे होता. त्यांनी रविरावचे बंड मोडून काढले. मुळेंच्या कुटुंबात देशमुखी सांभाळणारा वारस न आल्याने लखुजी जाधवाना १५७६ला सिंदखेडची देशमुखी मिळाली व सिंदखेडच्या भरभराटीला सुरवात झाली. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई हि लखुजी जाधवरावांची कन्या होती. २५ जुलै १६२९ रोजी राजे लखुजी जाधव, त्यांचे दोन पुत्र अचलोजी व राघोजी आणी नातु यशवंतराव यांचा निजामशहाने देवगिरीच्या दरबारात खुन केला. सिंदखेडराजा येथे त्यांची समाधी पहायला मिळते. राजे लखुजी जाधव यांच्या चार पुत्रांच्या वंशजशाखा त्यांना वतनी असलेल्या सिंदखेडराजा, देऊळगावराजा, आडगावराजा, किनगावराजा, मेहुणाराजा, उमरद व जवळखेड या ठिकाणी विस्तारल्या आहेत. यातील मेहुणाराजा गावाला केवळ ऐतिहासिक नव्हे तर वारकरी संप्रदायाचा वारसा देखील लाभला आहे. वारकरी संप्रदायातील महत्वाचे संतकवी असलेले संत चोखामेळा यांची हि जन्मभुमी आहे.
© Suresh Nimbalkar