MEHKAR
TYPE : GADHI
DISTRICT : BULDHANA
HEIGHT : 0
GRADE : EASY
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर हे तालुक्याचे शहर येथे असलेल्या शारंगधर बालाजी म्हणजेच विष्णुच्या मुर्तीमुळे तीर्थक्षेत्र म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. अकराव्या शतकातील ११ फुट उंच व ४ फुट रुंद असलेली हि मुर्ती संपुर्ण भारतातातील सर्वात मोठी विष्णुमूर्ती असावी. पैनगंगा नदीकाठी वसलेल्या या शहराचा इतिहासात प्राचीन काळापासून अनेक ठिकाणी उल्लेख येतो पण बालाजी मंदीरातील विष्णूमुर्ती वगळता इतिहासाची साक्ष देणारी कोणतीही वास्तु या शहरात ठळकपणे दिसुन येत नाही. बालाजी मंदीर परिसरात एक १० फुट उंचीचा दगडी बांधकामातील बुरुज व त्याला लागुन काही प्रमाणात तटबंदी दिसुन येते पण हा नेमका कोणत्या वास्तुचा भाग आहे ते ठामपणे सांगता येत नाही. याची एकुण रचना पहाता हा बहुदा एखादया गढीचाच भाग असावा असे वाटते. याशिवाय इ.स. १८८८ साली मेहकर येथे गढीचे खोदकाम सुरू असताना बालाजीची मूर्ती सापडल्याचे वाचनात येते.
...
त्यावेळी इंग्रज जिल्हाधिकारी टेंपल यांनी ही मूर्ती लंडनला नेण्याचे ठरवले परंतु स्थानिकांचा विरोध पाहून त्यांनी मुर्ती इथेच ठेवली पण मुर्ती सोबत असलेल्या इतर वास्तु मात्र लंडनला नेण्यात आल्या. यात मूर्तीचे दागिने व तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले शिलालेख यांचा उल्लेख येतो. १८९२ मध्ये बालाजी मंदिराचा दगडी गाभारा व बाहेरील सभामंडपाचे काम झाले. मंदीर परिसरात असलेली मंदीरे नंतरच्या काळात बांधली गेली असावी. मेहकर हे अजिंठा पर्वतरांगेत वसलेले महत्वाचे शहर आहे. महानुभाव पंथाचे भगवान चक्रधरस्वामी यांचा काही काळ मेहकरात मुक्काम होता. लीळाचरित्रातील ६२, ६३, ६४ या लीळा मेहकरच्या संदर्भात आहेत. येन ए अकबरी या अकबरनामाच्या तिसऱ्या भागात अलबेरुनी याने मेहकर हे हिजरी सनापूर्वी ७९५ वर्षे आधी अस्तित्वात असल्याचे म्हटले आहे. मध्ययुगीन काळात मेहकर हे एक प्रमुख बाजारपेठ तसेच सुभ्याचे मुख्य ठिकाण असुन आसपासच्या गावांचा महसुल येथे जमा होत असे. २२ मार्च १७६९ ला जानोजी भोसले व पेशवे यांच्यात झालेल्या तहावेळी थोरले माधवराव पेशवे यांचा मुक्काम मेहकरला असल्याची पेशवे दफ्तरात नोंद आढळते. लोणार व सिंदखेडराजा हे दोन तालुके वेगळे होण्यापुर्वी या तालुक्यांचा सामावेश मेहकर तालुक्यात होत होता. माझी मेहकर येथील भटकंती गढीच्या संदर्भात होती पण फारशी माहीती मिळाली नाही पण अप्रतिम अशी विष्णुमुर्ती पहायला मिळाली.. मेहकर शहर बुलढाणा येथुन ७० की.मी.वर तर लोणारपासुन २२ कि.मी.अंतरावर आहे.
© Suresh Nimbalkar