MASOLI KOT
TYPE : COASTAL FORT
DISTRICT : PALGHAR
HEIGHT : 0
GRADE : EASY
उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने वसई ते दमण या समुद्री पट्ट्यात त्यांनी बांधलेले अनेक लहान मोठे गढीवजा कोट पहायला मिळतात. यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन फारच थोडे अवशेषरुपात शिल्लक आहेत. डहाणु किल्ल्याजवळ पोर्तुगीजांची निर्मिती असलेला मसोली कोट हा असाच एक लहानसा कोट. मसोली कोट डहाणु रेल्वे स्थानकापासुन फक्त २ कि.मी. वर असुन चालत अथवा खाजगी रिक्षाने कोटापर्यंत जाता येते. मसोली कोट स्थानिकांना देखील पुर्णपणे अपरिचित असल्याने कोटावर जाण्यासाठी पाटीलपाडा, हनुमान मंदीर अशी विचारणा करावी. हनुमान मंदिराजवळ पोहोचल्यावर मंदीराच्या समोरच झाडाझुडुपांनी वेढलेली मसोली कोटाची वास्तु पहायला मिळते. पोर्तुगीजांनी बांधलेल्या या टेहळणीच्या बहुतांशी वास्तु एकसमान व एक आकाराच्या दिसुन येतात. ३० x ३० फुट आकाराची हि दुमजली इमारत आज पुर्णपणे ढासळलेली असुन केवळ भिंती तग धरून आहेत.
...
या इमारतीच्या बांधकामात ओबडधोबड दगडांचा तसेच विटांचा वापर केलेला असुन आतील भिंतींना चुन्याचा गिलावा केलेला आहे. इमारतीच्या भिंतीत वरील मजल्यासाठी वासा रोवण्यासाठी खोबण्या दिसुन येतात. इमारतीच्या बांधकामात कोणतीही संरक्षण व्यवस्था दिसत नसल्याने येथे कोट असावा असे ठाम विधान करता येत नाही. या वास्तुचे स्थान व बांधकाम पहाता हि वास्तु म्हणजे प्रशासकीय ठिकाण असावे. कोटाची सध्याची अवस्था फारच दयनीय असुन कोट पाहण्यास ५ मिनिटे पुरेशी होतात. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. १७३९ च्या वसई मोहिमे दरम्यान डहाणु किल्ल्यासोबत हा भाग मराठ्यांच्या ताब्यात आला. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे.
© Suresh Nimbalkar