MARKANDA

TYPE : ANCIENT SHIV MANDIR

DISTRICT : GADCHIROLI

विदर्भातील खजुराहो म्हणुन ओळखले जाणारे मार्कंडा हे देवस्थान विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात आहे. हा मंदिर परिसर भगवान शिव यांना समर्पित आहे. मार्कंड हे नाव शिवभक्त मार्कंडेय ऋषी यांच्यावरून आले आहे तर काही अभ्यासकांच्या मते मार्कंडा नाव मयूरखंड या नावाचा अपभ्रंश आहे. भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना खूप महत्त्व आहे. नदी त्यातही उत्तर वाहिनी म्हणजे अत्यंत पवित्र मानली जाते. अशा उत्तरवाहिनी नद्यांच्या काठावर अनेक तीर्थक्षेत्रे विकसित झालेली दिसतात. मार्कंडा हे असेच एक तीर्थक्षेत्र आहे. या गावाजवळ दक्षिणवाहिनी वैनगंगा वळसा घेउन उत्तरवाहिनी होते. उत्तरवाहिनी वैनगंगा आणि तिच्या तिरावरची अप्रतिम स्थापत्यशैली असलेली ही मंदिरे बघता क्षणी मनाला भुरळ घालणारी आहेत. मार्कंडा येथील देवालये दक्षिणोत्तर १९६ फूट लांब आणि पूर्व-पश्चिम १६८ फूट लांब अशी काटकोनात वसलेली आहेत. सभोवती ९ फूट उंचीची भिंत आहे आणि काटकोनी आकारामध्ये एकूण १८ देवळे आहेत. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करण्यासाठी नदीकाठी, समोर आणि बाजूलाअशी तीन प्रवेशद्वार आहेत. ... या देवळांपैकी मार्कंडेय, यमधर्म आणि महादेवाचे देऊळ हे उत्कृष्ट शिल्पकृतीचे नमुने आहेत. मंदिरांच्या या प्राकारात मार्कंडेय ऋषी, नंदिकेश्वर, यमधर्म, भृशुंडीमुनी, मृत्युंजय, विठ्ठल रखुमाई, उमाशंकर, दशावतार, शक्तिदेवी, हनुमान, गणेश, शंकर, विश्वेश्वर, भीमेश्वर, वीरेश्वर इ. मंदिरे आहेत. या गटातील सर्वात मोठे आणि सर्वात सुरेख कोरीवकाम केलेले मंदिर मार्कंडेय महर्षी आणि भगवान शिव यांना समर्पित आहे. अर्धमंडप, मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची योजना आहे. या मंदिराकडे बघतांना आपण खजुराहोची मंदिरे बघत असल्याचा भास होतो. येथील मंदिरांच्या भिंतींवर अनेक देवदेवतांची तसेच विविध सुरसुंदरींची चित्रे कोरलेली आढळतात. ज्या महाराष्ट्रातील इतर मंदिरांवर इतक्या संख्येने व विविधतेने सहजपणे आढळत नाहीत. यातील शुकसारिका पोपटाला भांड्यामधून दाणे खाऊ घालते आहे तर एकीच्या कंठातील मोती खाण्यासाठी शुक सरसावतो आहे. एक तर मुंगूस व साप या दोघांना धारण करून आहे. अनेक दर्पणा आरशात पाहून विविध प्रकारचा शृंगार करीत आहेत. अत्यंत बारीक नक्षीदार कलाकुसर हे या मंदिरांचे वैशिष्ट्य आहे. मानवी जीवनाच्या विविध छटा, आणि अनुभवांचे मूर्तिमंत चित्रण या मंदिरांमध्ये करण्यात आले आहे. मानवी आकृत्या चितारतांना चेहऱ्यावरचे हावभाव ठळकपणे चित्रित केले आहेत. 'मैथुन शिल्पे' हे मार्कंडा मंदिरांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. मंदिरांची प्रत्येक मूर्ती डोळ्यात साठवून ठेवावी अशीच आहे. पण त्यातही एके ठिकाणी असलेली एका युवतीची मूर्ती नितांत सुंदर म्हणावी अशी आहे. तिच्या हातात आंब्याची डहाळी आहे. बहुधा, ती 'आम्रपाली'चे द्योतक असावी. या मूर्तीवरचे अलंकार, वस्त्रे, सगळेच देखणे आहे. एवढेच नाही, तर आंब्याच्या डहाळीचे पान न् पान ठळकपणे जाणवते. खजुराहोतल्या मंदिरांप्रमाणे या मंदिराला जगती किंवा ओटा दिसत नाही. या मंदिराचे अधिष्ठान किंवा पाया हा अतिशय देखणी कलाकुसर केलेल्या वेगवेगळ्या पट्ट्यांनी सजलेला आहे. मंदिराचे अधिष्ठान ते छतापर्यंतची जी बाह्य भिंत असते, त्याला मंदिरस्थापत्याच्या परिभाषेत ‘मंडोवर’ असे म्हणतात. या मंडोवरावर ज्या भागांवरती शिल्प असतात, त्यांना ‘जंघा’ असा शब्द आहे. मंडोवरावर शिल्पांच्या एकावर एक किती रांगा आहेत, यावरून त्याचे वर्णन ठरते. मार्कंडा मंदिराच्या मंडोवरावर एकावर एक अशा शिल्पांच्या तीन रांगा आपल्याला दिसतात. त्यामुळे याला आपण ‘त्रिजंघायुक्त मंदिर’ असे म्हणू शकतो. खजुराहोची मंदिरे ही जंघायुक्त मंदिरे आहेत. कदाचित या गोष्टींमुळे मार्कंडा मंदिर हे आपल्याला खजुराहोच्या मंदिरांची आठवण करून देते. या मंडोवरावर ४०० पेक्षा जास्त देवी-देवता, नायक-नायिका, सुरसुंदरी, व्याल, अष्टदिग्पाल, प्रमुख देवता, रामायण-महाभारतातले प्रसंग हे शिल्पबद्ध केलेले दिसतात. हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या बरोबर समोर एक सुंदर नंदीमंडप दिसतो. इथूनच आपण मंदिरात प्रवेश करू शकतो. मंडपामध्ये प्रवेश करण्यासाठी उत्तर आणि दक्षिण बाजूनेदेखील द्वारांची रचना केलेली आहे. मंडपाच्या मधोमध असलेली रंगशिळा ही इतर मंदिरांपेक्षा थोडीशी उंचीवर असलेली दिसते. इथे जाण्यासाठी छोट्या पायर्‍यादेखील बांधलेल्या आहेत. दुर्दैवाने मंडपाचे मूळ छत आज भग्न झालेले आहे. आजूबाजूलादेखील चुन्याचा मोठ्या प्रमाणात वापर करून दुरुस्तीचे काम केलेले दिसते. या मंडपातून आपण अंतराळात प्रवेश करतो आणि तिथून काही पायर्‍या उतरून आपल्याला खाली गर्भगृहात जावे लागते आणि तिथेच वसलेला आहे मार्कंडेश्वर. मंदिराच्या अंतर्भागात अनेक सुंदर सुंदर शिल्पांची रचनादेखील केलेली दिसते. यातली बरीचशी शिल्पे कदाचित नंतरच्या काळात या ठिकाणी ठेवली असावी. या मंदिराच्या द्वाराशाखादेखील खूप लक्षवेधक आहेत. मार्कंडा मंदिराचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, इथे असणारी अतिशय दुर्मीळ आणि सुंदर शिल्पे. यातल्या काहींचा परिचय आपण इथे करून घेणार आहोत. शिवाचे विलक्षण चतुष्पाद सदाशिव असे एक दुर्मीळ शिल्प इथे दिसते. आठ हात आणि चार पाय अशी दुर्मीळ मूर्ती या मंदिरात आहे. सुदैवाने या मूर्तीचे आठही हात आज चांगल्या अवस्थेत आहेत. चार पाय असलेला शिव, शैव सिद्धांतातले चर्यापाद, क्रियापद, योगपाद आणि ज्ञानपाद हे चार मार्ग किंवा पायर्‍या सांगत असावा. अशा पद्धतीची मूर्ती खजुराहोमधील कंधार या महादेव मंदिरातदेखील आढळते. वेगवेगळे साधक वेगवेगळ्या देवतांची उपासना करत असतात. या अनेक वेगवेगळ्या मतांमधून एकवाक्यता निर्माण करण्यासाठी आणि वेगवेगळ्या देवतांच्या उपासकांना एकत्र आणण्यासाठी काही मिश्र मूर्ती तयार केल्या गेल्या. शिव आणि विष्णू यांची एकत्रित हरिहर मूर्ती असते, हे आपल्या सर्वांना परिचित आहेच; पण याहीपुढे जाऊन ब्रह्म, विष्णू, शिव आणि सूर्य अशा चार वेगवेगळ्या देवतांना एकत्र करून एक अतिशय सुंदर मूर्ती घडवली गेली. या मूर्तीला ‘ब्रह्मेशानजनार्दनार्क’ किंवा ‘हरिहरपितामहार्क’ अशा नावाने ओळखले जाते. या ठिकाणी ब्रह्म म्हणजे पितामह, शिव म्हणजे ईशान, विष्णू म्हणजे जनार्दन आणि सूर्य म्हणजे अर्क होय. सात अश्वांच्या रथावरती ही मूर्ती आहे, हे झाले सूर्याचे लक्षण. हातांमध्ये असणारा शंख आणि चक्र ही झाली विष्णूची लक्षणे. स्त्रुवा आणि अक्षमाला ही ब्रह्मदेवाची, तर त्रिशूळ हे शिवाचे लक्षण म्हणून इथे दाखवले आहे. या शिल्पामध्येच भुदेवीदेखील दिसते. तसेच दंड आणि पिंगळ हे सूर्याचे दोन साथीदारदेखील कोरलेले आहेत. या शिल्पांबरोबरच या मंदिरावर रामायणातील सुवर्ण मृग दर्शन, रावणाचे भिक्षेकरता येणे, पुन्हा मूळ दशमुख रूपात येत सीताहरण, रावण जटायू युद्ध, राम जटायू भेट, जटायुमरण, वाली-सुग्रीव युद्ध, इत्यादी कथा दिसतात. तसेच महाभारतातील भीम दुर्योधन युद्ध, दुर्योधनाची मांडी फोडणे हे प्रसंग सहजपणे ओळखता येतात. सरस्वती, गजलक्ष्मी, नरसिंह, कार्तिकेय, चामुंडा, गणपती, भैरव, नटराज आणि अनेक वेगवेगळ्या सुरसुंदरीदेखील इथे कोरलेल्या आहेत. इथले उत्तम स्थापत्य, सुंदर शिल्प आणि समृद्ध संकुल, कदाचित याच गोष्टींमुळे मंदिर स्थापत्य आणि मूर्ती शास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. देगलूरकर या जागेला ‘चक्रवर्ती देवालय’ म्हणत असावे. मार्कंडाला महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते. छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर यात्रेकरू इथे दर्शनाला येतात. पण एरवी ही मंदिरे वर्दळीपासून काहीशी दूर आहेत. मार्कंडा हे नाव मार्कंडेय महर्षी यांच्या नावावरून पडले आहे. आख्यायिका अशी आहे की जेव्हा मार्कंडेय महर्षींना वयाच्या १६ व्या वर्षी त्यांच्या जन्माची आणि त्यांच्या मृत्युची बातमी कळली तेव्हा ते त्यांच्या पालकांच्या आशीर्वादाने वैनगंगा नदीकडे निघाले. याच ठिकाणी तरुण मार्कंडेयने भगवान शिवाकडून अमरत्वाचे वरदान मिळविण्यासाठी तप केले. यमराज मार्कंडेयला नेण्यासाठी त्यांच्या नेमलेल्या वेळी आले आणि त्यांच्या गळ्यात फास बांधला. यावेळी भगवान शिव शिवलिंगातून प्रकट झाले आणि त्यांनी यम धर्मराजाला त्यांच्या भक्ताला घेऊन जाण्यापासून परावृत्त केले. भगवान शंकरांनी मार्कण्ड ऋषींचा वयाच्या सोळाव्या वर्षी होणारा मृत्यू परतवून लावून त्यांना त्यांना शाश्वत वैभव आणि जीवनाचा आशीर्वाद दिला. इ.स. १८७३ मध्ये कनिंगहॅम यांनी या मंदिरांकडे जगातील लोकांचे लक्ष वेधले. त्यांनी नोंदल्याप्रमाणे येथे २४ मंदिरे होती. सन १७७७ च्या सुमारास येथे वीज पडून देवळाचे बरेच नुकसान झाले अशी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालात नोंद आहे. सन १९२४-१९२५ चे सुमारास आणखी काही मंदिरे कोसळली. सध्या तेथे दखल घेण्याजोगी १८ मंदिरे आहेत. या मंदिरांचा उभारणीकाळ ११ वे शतक वा त्यानंतरचा असावा, असे पुणे येथील संशोधक गो.बं. देगलूरकर यांचे मत आहे. हे बांधकाम आठव्या ते बाराव्या शतकात ‘एलिचपूर’ सध्याचे ‘अचलपूर’ येथे राजधानी असलेल्या राष्ट्रकूट राजवंशाने केले आहे. हजारो वर्षापूर्वी बांधलेली ही मंदिरे भारतीय शिल्पकृतीचे देखणे उदाहरण आहे. मार्कंडा मंदीराचे हे अद्भुत वैभव एकदा स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवायलाच हवे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!