MANRANJAN

TYPE : HILL FORT

DISTRICT : PUNE

HEIGHT : 2560 FEET

GRADE : MEDIUM

गिरीमित्रांनी सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे राजमाची हा एकच किल्ला असुन या किल्ल्याच्या माचीवर मनरंजन व श्रीवर्धन हे दोन स्वतंत्र बालेकिल्ले आहेत. दोन बालेकिल्ले असणारा राजमाची हा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला. या किल्ल्याचा पसारा प्रचंड असुन अवशेष देखील मोठया प्रमाणात आहेत. निसर्गसुंदर अशा या किल्ल्याला भेट दिल्यावर आपल्या भटकंतीला पुर्ण न्याय मिळावा यासाठी या एका दुर्गाचे तीन भागात विभाजन केलेले आहे. पहिला भाग म्हणजे माचीचा भाग जो राजमाची म्हणुन संबोधला आहे. दुसरा भाग म्हणजे श्रीवर्धन बालेकिल्ला आणि तिसरा भाग म्हणजे मनरंजन. या तिघांपैकी बालेकिल्ला मनरंजन याची ओळख आपण तेथे करून घेणार आहोत. उल्हासनगर ज्या उल्हास नदीच्या काठावर वसले आहे त्या उल्हास नदीचा उगम लोणावळ्याच्या वायव्येस १५ कि.मी अंतरावर असलेल्या राजमाची किल्ल्यावर होतो. ... प्राचीन काळापासुन घाटमार्गावर असलेला हा किल्ला प्रचंड वनांनी वेढलेला आहे. राजमाची किल्ल्याची समुद्रसपाटी पासूनची उंची सुमारे २७०० फुट आहे. मनरंजन किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे कर्जतहून कोंदीवडे या गावात बसने अथवा रिक्षाने यावे. कोंदिवडे येथून खरवंडी मार्गे किल्यावर जाणारी पाउलवाट आहे. या वाटेने उधेवाडीत पोहोचण्यास सुमारे ३ तास लागतात. दुसरा मार्ग म्हणजे लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे उधेवाडी गावात यावे. ही वाट एकदंर १५ कि.मी ची आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास ५ तास लागतात.पुणे-मुंबई महामार्गाने लोणावळयाहुन खोपोलीला जाताना खंडाळ्याच्या घाटात घाट सुरु होताना राजमाची पॉईंट आहे. येथून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून दिसणारी शिखरे म्हणजेच राजमाची किल्ला. राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना जी खोल दरी आहे ती 'कातळदरा' या नावाने ओळखली जाते. या दरीच्या पश्चिमेकडील डोंगराला भैरोबाचा डोंगर म्हणतात. उधेवाडी गावातुन श्रीवर्धन आणि मनरंजन बालेकिल्ल्यांमध्ये असलेल्या दरीत जातांना वाटेच्या सुरवातीस डाव्या बाजुस खडकात खोदलेल्या गुहा असुन दरीच्या सखल भागात भैरवनाथाचे मंदिर आहे. मंदिरासमोरच ३ दिपमाळा आणि लक्ष्मीची मूर्ती आहे. येथून डावीकडे मनरंजन किल्ल्यावर जाणारी सोपी वाट आहे. या वाटेने अर्ध्या तासात आपण मनरंजन किल्ल्याच्या पुर्वाभिमुख दरवाजात पोहचतो. रणमंडळाची रचना असलेल्या या वाटेवरील तीन दरवाजे पार करून आपला किल्ल्यात प्रवेश करतो. या व्यतिरिक्त किल्ल्याच्या उत्तर भागात अजून एक दरवाजा असुन तिथे दोन दरवाज्यांची मालिका आहे. यातील एक दरवाजा अर्ध्या पेक्षा अधिक मातीत गाडला गेला आहे. मनरंजन गडाचे दोनही दरवाजाचे रणमंडळ अभ्यासनीय आहे. गडाच्या आत विस्तीर्ण पठार असून त्यामध्ये दोन मोठे तलाव , ८-१०पाण्याची टाकी, दारूगोळय़ाचे कोठार, किल्लेदाराच्या उद्ध्वस्त वाडय़ाचे अवशेष, सदर आदी वास्तू दिसतात. या अवशेषांमध्येच छत नसलेली, पण भिंती शाबूत असलेली एक इमारत लक्ष वेधून घेते. या इमारतीच्या प्रवेशद्वारावरील सुरेख गणेशपट्टी, बाजूचे चंद्र, सूर्य या शुभचिन्हांमुळे गडावरील ही एखादी महत्त्वाची वास्तू असावी. गडाच्या पुर्व बाजुच्या दरवाज्याजवळ दोन मोठया गुहा असुन गुहेचे दरवाजे घडीव दगडांनी बांधले आहेत. यातील एका गुहेत पाण्याची सोय आहे. मनरंजनवर असणारे बांधकाम श्रीवर्धनपेक्षा अधिक आणि जास्त बळकट वाटते. श्रीवर्धनच्या तुलनेत उंचीने कमी असलेल्या मनरंजनला मजबुत करण्यासाठी त्याच्या सभोवार मजबूत तट घातला आहे जो आजही मोठया प्रमाणात शाबूत आहे. तटावर दोन ठिकाणी दोन तोफा दिसून येतात. मनरंजनवरून पश्चिमेकडचा देखावा खूपच रमणीय दिसतो म्हणूनही या बालेकिल्ल्याला मनरंजन म्हणतात असेही सांगितले जाते. इथून आपल्याला उल्हास नदीचे पात्र दिसते. येथून कर्नाळा, प्रबळगड, ईरशाळगड, ढाकबहिरी, नागफणीचे टोक, माथेरान हा सर्व परिसर दिसतो. समोर पुणे मुंबई रेल्वेचा भोरघाटाचा थोडा भाग व तिथुन जाणाऱ्या रेल्वे दिसतात. या किल्ल्याला फार ज्वलंत नसला तरी प्रदीर्घ असा इतिहास आहे. कल्याणा नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे. या बंदरापासून नाणेघाटप्रमाणे बोरघाट हा देखील घाटावर जाणारा प्राचीन व्यापारी मार्ग. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी घाटमाथ्यावर असलेल्या किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे किल्ले राजमाची. राजमाची किल्ल्याच्या पश्चिम उतारावर कोंढाणे बौध्द लेणी आहेत. सातवाहनकाळात खोदलेली हि लेणी पहाता या लेण्यांची निर्मिती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. या किल्ल्याने सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूल, यादव, कदंब, बहमनी, आदिलशाही, शिवशाही, पेशवाई या सा-या राजवटी पाहिल्या असून किल्ल्याच्या जडणघडणीत या सा-यांचे हात लागले असल्याचे गडावर पहायला मिळते. राजमाची किल्ल्यास कोंकणचा दरवाजा संबोधण्यात येत असे. इ.स.१६५७ च्या कल्याण मोहीमेत राजमाची ,लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर हे किल्ले स्वराज्यात सामील झाले व हा संपुर्ण प्रदेश मराठयांच्या वर्चस्वाखाली आला. यानंतर इ.स.१६८९ मध्ये संभाजी महाराजांच्या काळात हा किल्ला मराठयांच्या ताब्यात दिसतो. औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आल्यावर इ.स. १७०४ मध्ये राजमाची किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला पण औरंगजेबाची पाठ फिरताच मराठय़ांनी राजमाचीवर पुन्हा भगवा फडकवला. यानंतर १७१३मध्ये शाहुमहाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा किल्ला दिला. इ.स. १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला. १७७६मध्ये सदाशिवराव भाऊचा तोतया संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटापर्यंत पोहचला. त्याने राजमाची किल्ला घेतला. यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला व आसपासचा परिसर ताब्यात घेतला. इ.स.१८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आला. किल्ला पाहण्यासाठी किमान दोन दिवस वेळ काढणे गरजेचे आहे. किल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या उधेवाडी गावात राहण्या-खाण्याची उत्तम सोय होते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!