MANOR
TYPE : COASTAL FORT
DISTRICT : PALGHAR
HEIGHT : 100 FEET
GRADE : EASY
मुंबईमुळे कोकण प्रांताचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग पडले आहेत. वसई ते दमण हा पट्टा उत्तर कोकण म्हणुन तर अलीबाग ते कारवार हा पट्टा दक्षिण कोकण म्हणुन ओळखला जातो. यातील उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने वसई ते दमण या समुद्री पट्ट्यात त्यांनी बांधलेले अनेक लहान मोठे गढीवजा कोट पहायला मिळतात. यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन थोडेफार शिल्लक असलेले अवशेष पहायला मिळतात. पालघरजवळ १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला मनोर हा असाच एक किल्ला. मनोर हे प्राचीन गाव असुन १५ व्या शतकात माहिमच्या बिंब राजाने बांधलेल्या या किल्ल्याची नंतरच्या काळात पोर्तुगीजांनी पुनर्बांधणी केली असावी. या किल्ल्याचा अनेक ठिकाणी उल्लेख आलेला असुन हा किल्ला पुर्णपणे नष्ट झाल्याचे म्हटले आहे पण प्रत्यक्षात आजही हा किल्ला ठामपणे उभा असुन आपली स्थान निश्चिती करत आहे. पालघर जिल्हयाच्या पालघरच्या पूर्वेस १८ कि.मी.वर वैतरणा नदीकाठी मनोर हे गाव असून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग या गावाजवळून जातो.
...
पालघर बस स्थानकातुन मुंबई-अहमदाबाद महामार्गावर जाणाऱ्या कोणत्याही बसने मनोर गावात जाता येते. मनोर गावात असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिराजवळून या किल्ल्यावर जाणारी वाट आहे. या वाटेने चालत ५ मिनिटात आपण किल्ल्याजवळ पोहोचतो. मनोर गावातील सर्वात उंच ठिकाणावर हा किल्ला असुन चौकोनी आकाराचा हा किल्ला अर्ध्या एकरवर पसरलेला आहे. किल्ल्याची ४-५ फुट उंचीची तटबंदी आजही शिल्लक असुन या तटबंदीत एक चौकोनी तर एक गोल असे दोन बुरुज पहायला मिळतात. तटबंदीत एका ठिकाणी कोरीव शिल्प असलेला दगड तट बांधण्यासाठी वापरलेला दिसतो. किल्ल्याची तटबंदी बांधण्यासाठी ओबडधोबड दगडांचा तसेच चिकणमाती व चुन्याचा वापर केलेला आहे. चारही बाजुना विखुरलेली तटबंदी वगळता इतर कोणतेही अवशेष नसल्याने १५ मिनिटात आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ल्यावरून दूरवर पसरलेले वैतरणा नदीचे पात्र व काळदुर्ग, तांदुळवाडी, कोहोज, अशेरी, टकमक हे किल्ले नजरेस पडतात. १५ व्या शतकाच्या आधी माहिमच्या बिंब राजाने बांधलेला हा किल्ला इ.स. १४२९ साली गुजरात सुलतानाच्या ताब्यात गेला. इ.स. १५५६ मध्ये पोर्तुगीज गव्हर्नर फ्रान्सिको बातेरो याने मनोर किल्ला घेतल्यावर तो उत्तर कोकणातील एक महत्त्वाचे ठाणे बनला. मनोर हे प्राचीन बंदर असून वैतरणा खाडीचे पाणी भरतीच्या वेळी आजही मनोर बंदरापर्यंत येते. पोर्तुगिजांनी मनोर परगणा करून परगण्याचे मुख्यालय केले. पोर्तुगीज इतिहासकार द कुटो याने उत्तर कोकणातील दोन भक्कम किल्ल्यांमध्ये मनोर आणि अशेरी किल्ल्यांची नोंद केली आहे. इ.स. १६३४व्या एका नोंदीनुसार अहमदनगरचा निजामशहा,कोळी व समुद्री चाचे यांच्यापासून संरक्षण व्हावे म्हणून पोर्तुगिजांनी हा किल्ला बांधला. किल्ल्यातील मोठा बंगला दुमजली होता. खालच्या मजल्यावर मनो-याच्या संरक्षणाकरिता खांबांवर आधारलेले चार व्हरांडे होते. किल्ल्यात शिसे व दारूगोळयाचा साठा होता. किल्ल्यात सहा तोफा, सत्तर बंदुका, तीस लोखंडी तोफगोळे आणि तीस मशाली होत्या. या बंगल्याभोवती लाकडी मेंढेकोट होता. मधोमध मनोरा असून उरलेल्या भागात २० पोर्तुगीज कुटुंबे, २३ ख्रिश्चन कुटुंबे, ८० हिंदू-मुसलमान व इतर तिरंदाजांची वस्ती होती. किल्ल्याच्या कप्तानाला १६३४च्या सुमारास मनोर परगण्यापासून १६,०७९२ रुपये १० आणे एवढा महसूल प्राप्त झाला होता. मनोर किल्ल्यावरून संभाजी महाराजांनी चालविलेल्या मोहिमेची माहिती दोतोरे लुईस गोन्साल्विस कोत याने मे १६८४च्या सुरुवातीस गोव्याच्या विजराईस कळविली-‘‘शत्रूने चेऊलचा लढा उठविला; पण वसईमध्ये त्याने पुष्कळ नुकसानी केली आहे. कल्याण, सायवान आणि मनोर घेऊन अशेरीगडही काबीज केला. यावरून संभाजी महाराजांनी मे १६८४ मध्ये मनोरचा किल्ला जिंकून घेतला होता. वसईहून आलेला पाद्री आंतोनियू व्हाज रिस्काद याने यावेळी सांगितले की, ‘पोर्तुगिजांचे पुष्कळ लोक कैदेत आहेत. त्यात स्त्रिया, पुरुष व मुले आहेत. त्यांपैकी पुष्कळांचे हात, पाय, कान, नाक शत्रूने छाटले असून सर्व लोक भयभीत झाले आहेत. ज्या ठिकाणी शत्रू पोहोचला, तेथील चर्च त्याने ताब्यात घेतली. मनोर येथील किल्ला व चर्च त्याने जमीनदोस्त केले. इ.स. १६८५ मध्ये पोर्तुगिजांबरोबर झालेल्या तहानुसार जिंकलेला सर्व मुलुख व किल्ले संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांना परत केले. तेव्हा मनोर किल्ल्याची पोर्तुगिजांनी पुनर्बाधणी केली असे दिसते. पेशवे दप्तरातही मनोर किल्ल्याचे उल्लेख मिळतात. इ.स. १७२८ मधील वर्णनानुसार हा किल्ला एका मोठया खडकावर उभारण्यात आला असून त्याच्या तटबंदीच्या भिंती घराच्या भिंतीपेक्षा मोठया नाहीत. किल्ल्यात असलेल्या आठ तोफांपैकी पाच तोफा कुचकामी होत्या. किल्ल्यात १०५ लोकांची शिबंदी व तीन पठ्ठे होते. २७ फेब्रुवारी १७३१ रोजी मराठयांनी २,००० पायदळ व ५०० घोडेस्वार घेऊन मनोरवर स्वारी केली. १ मार्च १७३१ पर्यंत मराठयांनी किल्ल्याच्या आसपासचा प्रदेश काबीज केला व किल्ल्याचे पाणीही तोडले. मराठयांनी तटापासून गोळीच्या टप्प्याबाहेर मोर्चे उभारून किल्ल्याला वेढा घातल्याने येणारी कुमक बंद झाली. ५ मार्च १७३१ रोजी अँटोनिओ हा पोर्तुगीज अधिकारी वसईहून २०० शिपाई किल्ल्याच्या मदतीसाठी घेऊन आला. ही कुमक किल्ल्यात पोचू नये म्हणून मराठयांनी प्रयत्न केले पण अँटोनिओने बंदुकीच्या मा-यांनी किल्ल्यात प्रवेश मिळवलाच. या झटापटीत मराठयांचे ६० घोडेस्वार व १५० सैनिक कामी आले व मराठयांना वेढा उठवावा लागला. एप्रिल-मे १७३७ मध्ये मराठयांनी चिमाजी आप्पाच्या नेतृत्वाखाली उत्तर कोकण मोहीम हाती घेतली. तांदूळवाडीच्या विजयानंतर बरवाजी तपकीर, आवजी कवडे, विठ्ठल विश्वनाथ हि मंडळी मनोर येथे आली व १५ मे १७३७ रोजी मनोर किल्ल्याला वेढा दिला. मनोरला मोर्चे उभारल्यानंतर चिमाजीअप्पाने होनाजी शिंदे यांना या वेढयाच्या मदतीसाठी पाठविले. या वेळेपर्यंत किल्ल्याभोवती पाच-सात मोर्चे बसून ते किल्ल्याच्या नजीक येऊन पोचले होते. २९ मे १७३७ रोजी किल्ल्याने कौल घेतला. किल्ल्याने ज्या दिवशी कौल घेतला त्याच दिवशी कडदिनने वसईहून २९ गलबते व सहा शिवाडे भरून माणसांची व दारूगोळयाची मदत मनोरकडे रवाना केली. इन्फ्रंट्रीच्या तीन तुकडया व एतद्देशीय सैनिक अशी ही कुमक होती. अँटिनोओ ब्रितो द सिल्व्हा हा त्याचा मुख्य अधिकारी होता. तो मनोर खाडीत प्रवेश करताच ही बातमी मराठयांना समजली व लगेच त्यास खाडीत रोखण्यासाठी आवजी कवडे, बरवाजी तपकीर वगैरे सरदार जेजाला घेऊन खाडीच्या दिशेने गेले. सुमारे दोन तास निकराचे युद्ध झाले. गलबतातून व शिवाडातून केलेल्या गोळीबाराला मराठे ऐकत नाहीत हे पाहुन पोर्तुगीज सैन्य नौकांमधून पायउतार होऊन जमिनीवरून मराठयांवर चालून आले. त्यावेळी झालेल्या लढाईत पोर्तुगिजांची बरीच माणसे जखमी झाली. आवजी कवडयाची दोन घोडी व एक माणूस जखमी झाला. मराठयांनी शत्रूस पुन्हा गलबतावर परतवले. पण अँटिनिओ ब्रितो द सिल्व्हा हा चिवट पोर्तुगीज सेनानी मराठयांवर बंदुकींचा मारा करीत मनोर किल्ल्याजवळ येऊन पोचला. पण किल्ल्याने आधीच कौल दिल्याने ३१ मे १७३७ रोजी किल्ला मराठयांकडे देऊन आपली गलबते घेऊन तो वसईस परत गेला. अशा प्रकारे किल्ला मराठयांचे ताब्यात आला व पोर्तुगीजाचे या भागातून कायमचे उच्चाटन झाले. त्यानंतर किल्ल्यावर महत्त्वाच्या घटना घडल्या नाहीत. प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने मनोर किल्ल्यास अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar