MANIKGAD

TYPE : HILL FORT

DISTRICT : RAIGAD

HEIGHT : 1870 FEET

GRADE : MEDIUM

मुंबई पुणे महामार्गावरून जातांना घाटमाथ्याखाली पांडवगड,प्रबळगड, इरशाळगड, कर्नाळा यासारखे अनेक किल्ले आपले लक्ष वेधुन घेतात. या सर्वांच्या बरोबरीने असलेला अजून एक किल्ला म्हणजे माणिकगड. रायगड जिल्ह्यातील कर्जत पनवेल डोंगररांगेत असलेल्या कर्नाळा, सांकशी या किल्ल्यांबरोबर माणिकगड हा देखणा दुर्ग आजही उपेक्षित आहे. माणिकगडची उंची समुद्रसपाटीपासून २५०० फूट आहे. माणिकगड पातळगंगा एम.आय.डी.सी.च्या जवळ असल्याने तेथे जाण्यासाठी अनेक पर्याय आहेत. माणिकगडला पनवेल किंवा खोपोली मार्गे जाताना आपटे फाट्यामार्गे रसायनीला यावे. रसायनीमधून सावरोली खारपाडा रस्त्याने सावणे गावात यावे. येथवर येण्यासाठी पक्का रस्ता तसेच एस.टी.बसेसची सोय आहे. सावणे गावातुन एक कच्चा रस्ता १ की.मी.वरील मोदीमाळ या जांभिवली धरणा शेजारील वाडीत जातो. हे अंतर पनवेलपासुन २३ कि.मी आहे. पनवेलहून इथपर्यंत येण्यास एक तास पुरतो. ... पावसाळा सोडुन या वाडीपर्यंत खाजगी वाहनाने जाता येते. माणिकगडला जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग असुन इतर वाटेने गेल्यास लागणाऱ्या वेळेपेक्षा एक तास कमी व एक डोंगर चढण्या उतरण्याचे श्रम वाचतात तसेच चुकण्याची शक्यता कमी होते. माणिकगडावर प्रथमच जात असल्यास गावातील एखादा वाटाडय़ा बरोबर घेणे चांगले. मोदीमाळ हि वाडी माणिकगड पठाराच्या पायथ्याशीच असुन गावाच्या मागील डोंगरावर माणिकगड दिसतो. गडाच्या दिशेने चालत निघाल्यावर दहा मिनिटात आपण जंगलात शिरतो व लगेचच खडय़ा चढणीला सुरूवात होते. इथुन डोंगराच्या पठारावर जाण्यास एक तास पुरतो. लांबलचक पठार पार करून आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. या मार्गावरून जाताना डावीकडे एक मारुतीची मूर्ती असलेला चौथरा आहे. किल्ल्याचा डोंगर डावीकडे ठेवत जंगलातून जाणारी ही पायवाट परिसरातील लोकांच्या वावरामुळे बऱ्यापैकी मळलेली आहे. तेथून दाट झाडीतील खड्या चढणीची वाट चढून आपण किल्ल्याला पूर्ण वळसा घालून किल्ल्याच्या गावातून दिसणाऱ्या बाजूच्या विरुध्द बाजूस पोहोचतो. इथपर्यंतचा हा प्रवास निर्धोक असून या संपूर्ण पायपिटीमध्ये माणिकगडाचे हिरवेगार जंगल आपली सोबत करते. माणिकगडाच्या मुख्य पहाडावर दोन सुळके आहेत. किल्ल्याचा मुख्य डोंगर आणि सुळका यांच्यातील घळीतून किल्ल्यावर जाण्यासाठी एक अवघड वाट आहे. पण आपण मात्र दुसरा राजमार्ग धरत किल्ल्याला वळसा घालत पुढे निघावे. माणिकगड व त्याच्या शेजारचा डोंगर यांच्या खिंडीतुन ही वाट किल्ल्यावर पोहोचते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर एक घळ लागते. या घळीतून वर चढून गेल्यावर किल्ल्याची तटबंदी दिसण्यास सुरवात होते. इथुन उध्वस्त तटबंदीतुन आपला गडाच्या खालील भागात म्हणजे माचीवर प्रवेश होतो. येथे गडाचा दरवाजा असावा कारण किल्ल्याच्या या बाजूच्या कडय़ावर दोन भग्नावस्थेतील बुरूज आणि तटबंदीचे अवशेष आहेत. माचीवर पाण्याचे एक टाके व काही चौथरे पहायला पहायला मिळतात. पाण्याच्या टाक्याकडून थोडे पुढे आल्यावर उजव्या बाजुस टेकडीवर बालेकिल्ल्याची उध्वस्त तटबंदी दिसते. हा चढ चढून गेल्यावर पूर्वेकडून तुटलेल्या तटबंदीतून आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो. पायथ्याच्या मोदीमाळ वाडीतुन किल्ल्यावर इथपर्यंत येण्यास २ तास लागतात. किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच कातळात कोरलेला चुन्याचा घाणा दिसतो. या चुन्याच्या घाण्याजवळच त्याची छोटी प्रतिकृती कोरलेली आहे. चुन्याच्या घाण्याजवळून सरळ चालत गेल्यास आपण उत्तराभिमुख प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. पुर्वी येथून खाली उतरण्यासाठी वाट असावी असे दिसते. गडाचा दरवाजा पहारेकऱ्यासाठी असणाऱ्या देवड्या उध्वस्त झालेल्या आहेत. दरवाजाच्या आतल्या बाजूस घुमटी असुन त्यात एक शेंदुर फ़ासलेली मुर्ती ठेवलेली आहे. गडाच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूस दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. या प्रवेशद्वाराची चौकट आजही तग धरून असुन दरवाजाच्या कमानीवर गणेशपट्टी कोरलेली आहे. हा दरवाजा म्हणजे किल्ल्यावरील एखादया मोठ्या वास्तुचे प्रवेशद्वार आहे. हा दरवाजा ओलांडुन आपण गडाच्या सर्वोच्च भागात प्रवेश करतो. येथे उजव्या बाजूस वाड्याचे अथवा सदरेचे अवशेष आहेत. त्याच्या पुढे गडावरील सर्वात मोठे टाक असुन त्यापुढे दुसरे लहान टाके आहे. ते पाहून पुढे गेल्यावर खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. त्या उतरून गेल्यावर गडाच्या उत्तर टोकावरील उध्वस्त बुरुजावर आपण पोहोचतो. येथुन उजवीकडे बुजलेला चोर दरवाजा नजरेस पडतो. पुढे गेल्यावर उजव्या बाजूस पाण्याची २ बुजलेली टाक असुन त्याच्या पुढे एका लहान कुंडात उघड्यावर शंकराची पिंड व कुंडाच्या काठावर नंदी ठेवलेला आहे. तेथेच एक शेंदुर फ़ासलेली भग्न गणेशमुर्ती आहे. यापुढे एका रांगेत सलग चार टाकी असुन यातील एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. उन्हाळ्यात या टाक्यातील पाणी खाली जात असल्याने पाणी काढण्यासाठी १-२ फुट दोरीची गरज भासते. या टाक्यांच्या समोरच दरीच्या बाजूस झीज झालेले प्राण्याचे शिल्प असुन त्यावर शेंदुर फ़ासलेला आहे. या शिल्पाच्या मागील बाजूस दरीकाठावर अजुन एक पाण्याचे लहान टाके आहे. टाकी पाहून पुढे गेल्यावर आपण गडाच्या पूर्व टोकावरील बुरुजावर पोहोचतो. या बुरुजाच्या बाजूला असलेल्या पायऱ्यानी आपल्याला पुन्हा गडावर जाता येते. बुरुजावरुन तटबंदीच्या बाजूने चालत जातांना ही तटबंदी अनेक ठिकाणी तुटलेली दिसते. या वाटेने आपण गडाच्या माथ्यावरील बुरुजापाशी पोहोचतो. सुस्थितीत असलेल्या या बुरुजाच्या चर्या आजही शिल्लक आहेत. या बुरुजाच्या पुढील भागात पायऱ्या असुन त्याखाली बालेकिल्ल्याच्या उध्वस्त दरवाजाचे अवशेष आहेत. या दरवाजातून खाली उतरल्यावर आपण गड पहायला सुरवात केलेल्या ठिकाणी येऊन पोहचतो. गडाच्या माथ्यावरून कर्नाळा, इरशाळगड, माथेरान, प्रबळगड, आणि सांकशीच किल्ला इतका विस्तीर्ण परिसर दिसतो. माणिकगडाचा माथा आटोपशीर असल्याने तासाभरात गडफेरी पुर्ण होते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!