MANDVA KOT

TYPE : COASTAL FORT

DISTRICT : RAIGAD

HEIGHT : 210 FEET

GRADE : EASY

मनरंजन व श्रीवर्धन कोटांची नावे घेतली कि आपल्याला आठवतात ते राजमाचीचे बालेकिल्ले. पण याच नावाचे दोन कोट कधीकाळी अलिबाग परीसरात असल्याची माहीती फार कमी दुर्गप्रेमीना आहे. शिवकाळात नोंद आढळत नसलेले हे कोट सिद्दीच्या अनुषंगाने पेशवे दफ्तरात वारंवार वाचनात येतात व अखेरीस मराठ्यांनीच म्हणजे तुळाजी आंग्रे यांनी हे किल्ले पाडल्याची नोंद येते. या कोटांच्या उरल्यासुरल्या अवशेषांचे दर्शन होते का हे पहाण्यासाठी आम्ही या ठिकाणाचा मागोवा घेतला व मिळालेली माहिती येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. श्री.भगवान चिले यांच्या वेध जलदुर्गांचा हे पुस्तक वगळता या कोटांची माहिती व उल्लेख येत नसल्याने हे कोट दुर्गप्रेमींच्या यादीत देखील दिसुन येत नाही. पुणे मुंबईहून अलिबागला येण्यासाठी थेट बस उपलब्ध आहे. रस्त्याने अलिबाग हे मुंबईपासून अवघे ११० कि.मी. अंतरावर आहे. गेट वे ऑफ इंडियावरुन जलमार्गाने दीड तासात अलिबागला पोहोचता येते तर रस्त्याने पनवेल-पेण-अलिबाग हे अंतर सुमारे तीन तास आहे. खाजगी वाहनाने येणाऱ्यांसाठी पुणे मुंबई महामार्गावरून खोपोली-पेण मार्गे अलिबागला येता येते तर रेल्वेने अलिबागला येण्यासाठी पेण हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे.पेणपासून पुढे आपण खाजगी वाहनाने किंवा बसने अलिबागला जाऊ शकतो. ... अलिबागपासुन मांडवा बंदर २० कि.मी.अंतरावर असुन थळमार्गे बस अथवा रिक्षाने मांडवा जेट्टी येथे जाता येते. मुंबईहुन भाऊचा धक्का येथुन रेवस जेट्टीवर आल्यास रेवस जेट्टी ते मांडवा जेट्टी हे अंतर ११ कि.मी.आहे. मांडवा जेट्टीतुन बाहेर मुख्य रस्त्यावर आल्यावर एक लहान रस्ता सरळ समुद्रकाठाने जाताना दिसतो. या रस्त्याने थोडे पुढे आल्यावर डाव्या बाजुस एक कच्चा रस्ता आमराईच्या दिशेने टेकडीवर जाताना दिसतो. टेकडीच्या पायथ्याशी चहूबाजुस खाजगी बंगले असल्याने टेकडीवर जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. या रस्त्याने थोडे चढुन आल्यावर एक लहान लोखंडी फाटक आहे. हे फाटक पार केल्यावर टेकडीवरील मनोऱ्याकडे जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. या पायऱ्या चढुन गेल्यावर आपण इंग्रजांनी निरीक्षणासाठी उभारलेल्या दगडी मनोऱ्याजवळ पोहोचतो. हा मनोरा आतील बाजुस पोकळ असुन आत जाण्यासाठी एक लहान दरवाजा आहे. मनोरा साधारण चाळीस फुट उंच असुन त्याच्या वरील भागात जाण्यासाठी आडवे गज ठोकले आहेत. या मनोऱ्याच्या आसपास असलेल्या झाडीत शोधाशोध केली असता तटबंदीचे तुरळक अवशेष पहायला मिळतात. आपली शोधमोहीम सुरु होताक्षणीच संपून जाते. आज हो कोट केवळ नावापुरता उरलेला आहे. रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग तालुक्याला रेवस ते कुंडलिका खाडीपर्यंत तीस ते पस्तीस कि.मी. लांबीची किनारपट्टी लाभली आहे. येथे असलेल्या आक्षी, नागाव, किहीम, आवास, सासवणे, रेवस, चौल, रेवदंडा या आठ प्रमुख गावांमुळे हि किनारपट्टी ‘अष्टागर’ म्हणुन ओळखली जाते. या अष्टागरात उत्तर पश्चिमेकडील धरमतर खाडीवरील पहिले गाव म्हणजे रेवस तर दक्षिण-पूर्वेकडील कुंडलिका खाडीवरचे शेवटचे गाव म्हणजे रेवदंडा. या दोन्ही खाडीतून सागरी मार्गाने अष्टागरात प्रवेश करणे साध्य असल्याने पोर्तुगीजांनी कुंडलिका खाडीच्या मुखावर रेवदंडा किल्ला बांधला व आपले बस्तान तेथे बसवले. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी धरमतर खाडी म्हणजे अष्टागराचे प्रवेशद्वार हे ओळखुन धरमतर खाडीच्या मुखाशी एका बाजुस असलेल्या रेवस येथे मनरंजन कोटाची तर दुसऱ्या बाजुस असलेल्या मांडवा येथील टेकडीवर श्रीवर्धन कोटाची बांधणी केली. पेशवेकाळात या कोटांच्या बांधकामाची नोंद येत नसल्याने हे कोट शिवकाळापासूनच अस्तित्वात असावे. या किल्ल्याचा कागदोपत्री उल्लेख येतो तो पेशवेकाळातच. ७ एप्रिल १७३७ मधील एका पत्रात या कोटाचा खालीप्रमाणे उल्लेख येतो. श्रीवर्धन कोट ( मांडवी) सिद्दीच्या ताब्यात असताना किल्ला जिंकण्याची जबाबदारी बरवाजी ताकपीर या सरदारावर सोपविण्यात आली होती. ३ एप्रिल १७३७ रोजी बरबाजी ताकपीरने मांडवीस वेढा दिला व एका तोफेने किल्ल्याचा दरवाजा रोखुन धरला. त्यानंतर दादराहून अजुन दोन तोफा आणुन त्यांचाही मारा सुरु केला गेला व लवकरच हा कोट मराठ्यांच्या ताब्यात आला. पुढे या कोटाची मदत कमी व सिद्धीचा सतत कोटास होणारा त्रास पाहुन मराठ्यांनी कोट पाडण्याचा निर्णय घेतला. इ.स. १७५१ मध्ये खुबलढा व मनरंजन या दोन कोटासोबत मांडवी उर्फ श्रीवर्धन कोट देखील पाडण्यात आला. मनरंजन कोट मराठ्यांनीच इ.स. १७५१ साली पाडल्याने इंग्रजांनी बांधलेला निरीक्षण मनोरा व झाडीत विखुरलेली जुजबी तटबंदी वगळता इतर कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत.या कोटाचे मोक्याचे ठिकाण पाहण्यासाठी या ठिकाणास एकदा तरी भेट दयायला हवी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!