MANDAVGAN

TYPEर : FORTRESS / CITY FORT

DISTRICT : AHMEDNAGAR

HEIGHT : 0

सोलापुर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुका व अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका हा साधुसंतांची भूमी म्हणून ओळखला जातो. याच श्रीगोंदा तालुक्यात मांडव्य ऋषीच्या वास्तव्याने पावन झालेले मांडवगण गाव असुन निसर्गाने मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण या गावावर केलेली आहे. आणि यावर देखील मात करणाऱ्या अनेक प्राचीन व मध्ययुगीन वास्तु आपल्याला मांडवगण गावात पहायला मिळतात. मांडवगण गाव नगर शहरापासून ३५ किमी अंतरावर तर श्रीगोंदा या तालुक्याच्या ठिकाणाहुन ३० कि.मी. अंतरावर आहे. मांडवगण गावाला कटाक्ष व वटाक्ष या दोन नद्यांचा विळखा पडलेला असुन नदीच्या या पात्राने गावाचे दोन भाग केलेले आहेत. नदीच्या आतील दुआबात मुळ मांडवगण गाव वसलेले असुन नदीच्या दुसऱ्या काठावर गढीभोवती असलेली वस्ती हि होळकरांनी पेशवेकाळात वसवली असावी. नदीच्या दुआबात असलेल्या गावाला पुर्णपणे नदीचा विळखा पडलेला असुन नदीचे हे पात्र म्हणजे एक प्रकारचा गावाभोवती असलेल खंदकच म्हणता येईल. गावाचा फारच कमी भाग थेट जमिनीशी जोडलेला असुन या भागात तटबंदी व दरवाजा बांधुन संपुर्ण गाव संरक्षित करण्यात आले आहे. ... दरवाजाचे खालील अर्धे बांधकाम घडीव दगडात केलेले असुन त्यावरील बांधकाम विटांनी केलेले आहे. दरवाजाच्या वरील बाजुस बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या असुन आत पहारेकऱ्याची देवडी आहे. दरवाजाच्या आतील बाजुने तटाला लागुन तटबंदी तसेच दरवाजावर जाण्यासाठी जिना आहे. दरवाजाच्या समोरील बाजुस मारुतीचे मंदिर आहे. गावाच्या या भागात असलेले प्राचीन लक्ष्मी नारायण मंदिर गावाचे प्राचीनत्व सिद्ध करते. पुर्वाभिमुख असलेले हे मंदिर एका उंच चौथऱ्यावर उभारलेले असुन मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंदिरासमोर स्थानिकांनी नव्याने दगडी दिपमाळ उभारली आहे. मुखमंडपाच्या द्वारशाखेवर जयविजय कोरलेले असुन ललाटबिंबावर गणपती कोरलेला आहे. सभामंडपाच्या व गर्भगृहाच्या खांबावर अतिशय सुंदर असे कोरीवकाम केलेले आहे. संपुर्ण मंदीर परीसर साधारण दोन एकर असुन या परिसराला प्राकाराची दगडी भिंत आहे. या भिंतीत पडझड झालेले दोन बुरुज पहायला मिळतात. हि तटबंदी एखाद्या गढीप्रमाणे असल्याने स्थानिक लोक या मंदीराला गढी आईचे मंदिर म्हणुन ओळखतात. आता हे मंदिर पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून त्यांनी त्याची काही प्रमाणात डागडुजी केलेली आहे. लक्ष्मी नारायण मंदिर पाहुन झाल्यावर गावाच्या दुसऱ्या भागाकडे म्हणजे होळकर गढीकडे निघावे. खंदकवजा नदीवर बांधलेला छोटासा पुल पार करून आपण गावाच्या दुसऱ्या भागात पोहोचतो. येथुन प्रवेश करताना पुन्हा एकदा नगरकोटाचा दुसरा दरवाजा समोर येतो. या दरवाजाची रचना देखील आपण सुरवातीस प्रवेश केलेल्या दरवाजासारखी आहे. या दरवाजाने आत शिरण्यापूर्वी नदीच्या अलीकडून डावीकडे गेले असता एक दगडी चौथरा पहायला मिळतो. या चौथऱ्यावर हत्तीचे शिल्प कोरलेली शिळा आहे. हि होळकरांच्या हत्तीची समाधी असुन त्याची माहीती देणारा शिलालेख तेथे असल्याचे सांगीतले जाते पण मला तो शिलालेख तेथे आढळला नाही. स्थानिक लोक या समाधीस हत्तोबा म्हणुन ओळखतात. हि समाधी पाहुन पुन्हा नगरकोटाच्या दरवाजात यावे. या दरवाजाने आत शिरल्यावर डाव्या बाजुस एक वाडा असुन त्याच्या शेजारील बोळीने आत शिरल्यावर पुर्णपणे घडीव दगडात बांधलेली सुंदर बारव आहे. या बारवमध्ये उतरण्यासाठी दोन बाजुना पायऱ्या असुन एका पायरीच्या वाटेवर कमान बांधलेली आहे. बारवेच्या एका भिंतीस दगडी मंडप बांधलेला असुन त्याच्या आतील बाजुस देवडी आहे. या मंडपावरून बारव मधील पाणी खेचण्याची सोय आहे. बारवेच्या चारही बाजुस असलेल्या दगडी भिंतीत कोनाडे बांधलेले आहेत. बारव पाहुन झाल्यावर सरळ जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने थोडे पुढे आल्यावर प्रवेश केलेल्या दरवाजाने सरळ चालत गेल्यावर आपण होळकर गढीजवळ पोहोचतो. चौकोनी आकाराची हि गढी साधारण अडीच एकरवर पसरलेली असुन गढीच्या चार टोकावर चार व मुख्य दरवाजा शेजारी दोन असे एकुण सहा बुरुज गढीच्या बांधकामात आहेत. गढीचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असुन दोन बुरुजात बांधलेला आहे. हा दरवाजा अंबारीसकट हत्ती जाईल इतका प्रशस्त आहे पण त्याच्या कमानीवरील बांधकाम मात्र आता कोसळले आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन या देवड्याच्या आतील भागात त्यांना रहाण्यासाठी खोल्या आहेत. दरवाजाबाहेर दोन्ही बाजुस असलेल्या साखळ्या दोन हत्ती बांधण्यासाठी असल्याचे सांगितले जाते पण ते खरे नाही कारण अनेक गढीच्या दरवाजाबाहेर अशा साखळ्या पहायला मिळतात. गढीच्या दरवाजाने आत शिरल्यावर समोरच १९५७ साली सुरु झालेल्या शाळेची इमारत दिसते. शाळेची हि इमारत बांधताना गढीतील वाडा व इतर वास्तु पुर्णपणे भुइसपाट करण्यात आल्या आहेत. शाळेच्या इमारतीशेजारी गढीतील वाडयाला पाणी पुरवठा करण्यासाठी असलेली विहीर वापर नसल्याने २०२१ साली बुजविण्यात आली. गढीची तटबंदी १०-१२ फुट रुंद असुन उंची १८ फुट आहे. तटबंदीवर जाण्यासाठी ठिकठिकाणी पायऱ्या बांधलेल्या असुन तटावरून बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. तटबंदीला लागुन असलेल्या चौथऱ्यावर शाळेचे वर्ग बांधलेले आहेत. मुख्य दरवाजा शिवाय गढीच्या दक्षिण दिशेच्या तटबंदीत दुसरा लहान दरवाजा असुन या दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. गढी पाहुन झाल्यावर मुख्य दरवाजाने बाहेर पडुन सिध्देश्वर मंदीराकडे निघावे.या रस्त्याने जाताना आपल्याला नगरकोटाचा तिसरा उत्तराभिमुख दरवाजा लागतो. हा दरवाजा चांगलाच उंच असुन पुर्णपणे घडीव दगडात बांधलेला आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन दरवाजाबाहेर दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे. या दरवाजाच्या एका बाजूचा बुरुज व तटबंदी काही प्रमाणात शिल्लक असुन दुसऱ्या बाजुचे बांधकाम मात्र ढासळलेले आहे. पुढे सिध्देश्वर मंदीराकडे जाताना डाव्या बाजुस अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली मंदीराची तटबंदी व त्याला लागुन असलेला नदीकाठावरील घाट नजरेस पडतो. सिध्देश्वर मंदिराभोवती प्राकारची दुहेरी भिंत असुन पहिल्या प्राकारात प्रवेश करण्यापुर्वी डावीकडे नदीकाठी चक्रधर स्वामींचे स्थान आहे. पहिल्या प्राकारात प्रवेश केल्यावर समोरच साधारण ४० फुट उंच दिपमाळ असुन प्राकाराच्या भिंतीला लागुन भाविकांना रहाण्यासाठी ओवऱ्या बांधलेल्या आहेत. मुख्य मंदिराभोवती प्राकाराची दुसरी भिंत असुन या प्रवेशद्वारावर जिर्णोद्धार केलेला तीन मजली नगारखाना आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर समोर अजुन दोन दीपमाळा व दोन्ही बाजुस ओवऱ्या असुन ४-५ लहान मंदीरे आहेत. या शिवाय मंदिर परिसरात अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली अजुन एक बारव पहायला मिळते. सिद्धेश्वर मंदीरातील शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी बंदिस्त केलेले २०x४० फुट आकाराचे भुयारी टाके आहे. मंदिरापासून काही अंतरावर मध्ययुगीन काळाशी नाते सांगणारी एक मशीद व अहमदनगरच्य निजामाच्या समाधीशी साम्य दर्शविणाऱ्या घुमट असलेल्या दोन समाधी पहायला मिळतात. मांडवगणचा इतिहास हा थेट पौराणिक काळापासुन सुरु होतो. मांडवगणपासून २ कि.मी. अंतरावर असलेले निंबवडी हे ठिकाण मांडव्यऋषींची तपोभुमी मानली जाते. मांडव्य ऋषींनंतर त्यांचे त्यांचे शिष्यगण येथे वास्तव्य करून होते. त्यामुळे मांडव्याचा गण याचा अपभ्रंश होऊन ते मांडवगण झाले अशी या गावाच्या नावाच्या उत्पत्तीची कथा सांगितली जाते. इ.स.१७६० मध्ये निजामाबरोबर झालेल्या उदगीरच्या लढाईसाठी जात असताना सदाशिवरावभाऊ पेशवे यांच्या सैन्याचा मांडवगण येथे तळ पडला होता. यावेळी सैन्याचा मुक्काम वेताळमाळावर तर पेशव्यांचा मुक्काम सिद्धेश्वर मंदिरात असल्याचे सांगितले जाते. पण गावात होळकरांचा वाडा असताना व गावाभोवती तटबंदी असताना पेशवे मंदीरात थांबतील हे संयुक्तिक वाटत नाही. येथुन जाताना पेशव्यांनी सिद्धेश्वर मंदिरातील मुख्य शिवलिंगाला अभिषेक केल्याचे सांगितले जाते. यानंतर इ.स.१७८८ मध्ये सुभेदार तुकोजी होळकर यांच्या काळात निजामाने या परिसरावर हल्ला केला असता येथील स्थानिक देशमुखांनी तो रोखून धरला व होळकरांचे सैन्य आले असता निजामाच्या सैन्याने माघार घेतली. यावेळी झालेल्या लढाईत होळकर यांचा भैरव नावाचा हत्ती जखमी झाल्याने मरण पावला. या हत्तीची समाधी आपल्याला गढीच्या मागील बाजुस पहायला मिळते. संपुर्ण मांडवगण गाव,गावची वेस, होळकर गढी व येथील मंदीरे पाहण्यास साधारण तीन तास लागतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!