MANDANGAD

TYPE : HILL FORT

DISTRICT : RATNAGIRI

HEIGHT : 1670 FEET

GRADE : EASY

रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ मंडणगड हे मंडणगड किल्ल्याच्या नावाने ओळखले जाणारे तालुक्याचे ठिकाण आहे. या गावामागे असलेल्या टेकडीवर आपल्या इतिहासाची साक्ष देणारा मंडणगड किल्ला उभा आहे. रत्नागिरीतील सर्वात प्राचीन किल्ला म्हणून मंडणगडचा उल्लेख असुन प्राचीन कागदपत्रात याचा उल्लेख मंदगोर नावाने येतो. मुंबई-गोवा महामार्गावर महाडच्या अलिकडील टोळ फाट्यावरुन आंबेत-म्हाप्रळ मार्गे मंडणगडला जाता येते. मंडणगड हे तालुक्याचे ठिकाण किल्ल्यापासून ४ कि.मी.वर आहे. मंडणगड बसस्थानकापासुन सरळ जाणारा रस्ता थेट गडमाथ्यावर जात असल्याने किल्ला सहजपणे पहाता येतो. मंडणगडाचा विस्तार ब-यापैकी असून किल्ला दोन शिखरांत विभागला आहे. समुद्रसपाटीपासून १२०० फुट उंच असणाऱ्या या किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे २२ एकर असून गडाच्या पश्चिमेला खोल दरी आणि पायथ्याशी पाले हे गाव आहे. गडाच्या उजव्या बाजुच्या शिखरावर पाण्याच एक टाके वगळता इतर कोणतेही अवशेष दिसून येत नाही. ... डावीकडील शिखरावर मात्र आजही किल्ल्याचे काही अवशेष पहायला मिळतात. गाडी रस्त्याने गडावर प्रवेश करताच तुरळक तटबंदी आपले स्वागत करते. आत आल्यावर डावीकडे गणपतीचं नव्याने बांधलेले मंदिर आहे. मंदिराच्या समोरच एका उध्वस्त वास्तुचे अवशेष दिसुन येतात तर मागील बाजुस पाण्याने भरलेला एक मोठा तलाव आहे. कातळात कोरलेल्या या तळ्यात बारमाही पाणी असते. इथुन पुढे जाताना वाटेच्या डावीकडे एक कमान कोरलेला दगड असुन उजव्या बाजुस दुसरा मोठा तलाव दिसुन येतो. थोडे अजुन पुढे जाताच उजव्या बाजुस दोन कबरी दिसुन येतात. या वाटेने आपण गडाच्या उत्तर भागातील उंच सपाटीवर येतो. या भागात गडाचे मोठया प्रमाणात अवशेष दिसुन येतात. या ठिकाणी किल्लेदाराच्या वाड्याचा चौथरा व त्यात अर्धवट बुजलेले तळघर पहायला मिळते. या चौथऱ्याजवळ एक विहीर असुन या विहिरीत कायम पाणी असते. विहिरीच्या पलीकडील भागात एका चौथऱ्यावर ८ फूट लांबीची एक तोफ ठेवलेली आहे. १९९४ मध्ये गडावर खोदकाम करीत असताना ही तोफ सापडली. गडाच्या या अंतर्गत भागात ढासळलेला एक बुरुज असुन गडाच्या आतील भागावर नजर ठेवण्यासाठी त्याचा वापर होत असावा. गडावर मोठया प्रमाणावर दिसणारी उध्वस्त जोती व दोन मोठे तलाव यावरून गड नांदत असताना गडावर मोठया प्रमाणात वस्ती असावी. गडाच्या या पूर्व टोकाला उध्वस्त तटबंदी व काही घडीव दगड विखुरलेले दिसुन येतात. गडाची तटबंदी आजही काही ठिकाणी शिल्लक आहे. या सपाटीवरून परत येताना तळ्याच्या पुढे व बंद पडलेल्या शाळेच्या मागील बाजुस एक समाधी व धान्याचे कोठार आढळते. गडावरुन दुरवर जाणारे सावित्री नदीचे पात्र तसेच वरंधा घाट परिसर नजरेस पडतो. संपूर्ण किल्ला व्यवस्थित पहाण्यास दोन तास लागतात. प्राचिन काळी सावित्री नदीतुन बाणकोट खाडीमुखापर्यंत व्यापारी गलबतांची ये-जा चालत असे. या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी १२ व्या शतकात कोल्हापूर प्रांतावर राज्य करणारा राजा भोज याच्या कारकिर्दीत बाणकोट व मंडणगड या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर विजापुरच्या आदिलशाही काळात या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. १६६१ साली हा किल्ला जसवंतराव दळवी या आदिलशहा सरदारच्या ताब्यात होता. शिवाजीराजे पन्हाळ्यात अडकुन पडले असता याच दळवींनी विशाळगडाला वेढा दिला होता. उंबरखिंडीत कारतलबखानाचा पराभव करून महाराज दाभोळकडे निघालेले समजताच जसवंतराव दळवीं मंडणगड सोडून शृंगारपूरला पळून गेला व न लढताच किल्ला मराठयांच्या ताब्यात आला. नंतरच्या काळात या किल्ल्यावर सिद्दी व आंग्रे यांचा ताबा राहीला. इ.स.१८१८ मध्ये कोकणातील इतर किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला देखील ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!