MALTHAN-DADOJI KONDDEV
TYPE : CITY FORT
DISTRICT : PUNE
HEIGHT : 0
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात भीमा नदीच्या काठावर मलठण नावाचे ऐतिहासिक गाव वसलेले आहे. पूर्वी हे गाव मल्लांच ठाण म्हणून प्रसिद्ध असल्याने या गावास मलठण हे नाव पडले असे स्थानिक लोक सांगतात. पण आपल्यासारख्या दुर्ग व इतिहासप्रेमीना हे गाव परीचीत आहे ते ९१ कलमी बखरीतील “दादोजी कोंडदेव कुलकर्णी मौजे मलठण ता. पाटस परगणे या उल्लेखाने. मलठण हे दादोजी कोंडदेव यांचे जहागिरिचे गाव व त्यांचा वाडा आजही इतिहासाची साक्ष देत या गावात उभा आहे. पुण्यापासून जवळपास १०० कि.मी. अंतरावर असलेले मलठण हे गाव पुणे- सोलापूर महामार्गावरील भिगवण गावापासून १५ कि.मी. अंतरावर आहे. गावात प्रवेश करतानाच कधीकाळी हे गाव नगरकोटाच्या आत वसलेले असल्याच्या खुणा दिसुन येतात. हि तटबंदी दोनतीन ठिकाणी काही प्रमाणात शिल्लक असुन उर्वरीत तटबंदी वाढलेल्या गावाच्या पोटात गडप झालेली आहे. गावाच्या वेशीतुन गावात प्रवेश करताना दरवाजा शेजारी असलेले दोन बुरुज व त्याला जोडुन असणारी तटबंदी दिसुन येते. पण या बुरुजात असणारा दरवाजा काळाच्या ओघात नष्ट झाला असुन त्याजागी नव्याने कमान बांधण्यात आली आहे.
...
गावच्या या मुख्य वेशीसमोर दक्षिणमुखी असलेले जुने हनुमान मंदिर आहे. वेशीतून आत शिरल्यावर डाव्या बाजुस बंदीस्त मैदान असुन स्थानिक लोक या ठिकाणाचा आजही पागा म्हणुन उल्लेख करतात. हे ठिकाण म्हणजे दादोजी कोंडदेव यांची घोड्याची पागा असावी. येथुन थोडे पुढे म्हणजे साधारण १०० फुट अंतरावर शिवकालीन गणेशमंदिर आहे. मंदिर जुने असुन मंदिराच्या बांधकामात शके १७०९ कोरल्याचा एक शिलालेख आहे. याचा अर्थ हे मंदिर इ.स. १८८७ साली बांधले गेले आहे. मंदिराच्या सभामंडपास तीन कमानी असुन आतील बाजुस गर्भगृह आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात दगडी चौथऱ्यावर ३.५ फूट उंचीची श्रींगणेशाची मूर्ती स्थापन केली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यावर घुमटाकार शिखर बांधलेले असुन शिखराच्या बाहेरील बाजुस अष्टदेवता कोरलेल्या आहेत. या मंदिराच्या मागील बाजुस विठ्ठल –रखुमाई मंदिर असुन या दोन्ही मंदिराच्या बांधकामातील साम्य पहाता हि दोन्ही मंदीरे समकालीन आहेत. या मंदिराच्या आवारात एक समाधी चौथरा असुन त्यावर तुळशी वृंदावन आहे. या तुळशी वृंदावनाला लागुन एक विरगळ ठेवलेली आहे. तिथून पुढे १५-२० पावले चालल्यावर उजव्या हातालाच गुरुदेव दादोजी कोंडदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अशी पाटी दिसते. हि शाळा म्हणजेच दादोजी कोंडदेव यांचा वाडा आहे. या वाड्यामध्ये शाळेची कोनशिला असुन त्यावर दादोजी कोंडदेव यांचे ७ वे वंशज रुक्मिणीबाई गोविंदमहाराज उपळेकर (माहेरचे नाव दुर्गाबाई विष्णू लक्ष्मण राजहंस ऊर्फ कुलकर्णी) यांनी त्यांचे पुर्वज गुरुदेव दादोजी कोंडदेव यांच्या स्मरणार्थ भीमथडी शिक्षण संस्था, दौंड यांना सोमवार दि. २२ मे १९७२ रोजी हा वाडा बक्षीसपञ करुन दिल्याचा उल्लेख आहे. दादोजी कोंडदेव यांच्या वाड्याच्या वास्तूत आजही विद्यालय भरत आहे. शाळेसाठी वापरात असल्याने वाड्याची तटबंदी आणि दरवाजा आजही चांगल्या स्थितीत आहेत. वाड्याचे एकुण बांधकाम व आकारमान पहाता कधीकाळी या वाड्यावर दुसरा मजला असल्याचे जाणवते. रविवारी शाळेला सुट्टी असल्याने दरवाजाला कुलुप लावल्याने वाडा आतुन पहाता आला नाही. पण बाहेर असलेल्या शाळेतील मुलांनी दिलेल्या माहितीनुसार दरवाजाच्या आतील भागात घडीव दगडात बांधलेला चौक आहे. वाड्याच्या मागील बाजुस घडीव दगडात बांधलेली भिंत असुन या भिंतीत लहान दिंडी दरवाजा आहे. वाड्याच्या बाहेरील बाजुस किंवा वाड्याच्या आवारात महादेवांचे शिवकालीन मंदिर आहे. या मंदिरासमोर एक चौथरा असुन त्यावर नंदीचे एक आगळेवेगळे शिल्प आहे. हा नंदी एका अखंड दगडात कोरलेला नसुन धड व शीर असा दोन भागात घडवलेला आहे. मानेच्या ठिकाणी खाच कोरलेली असुन त्यावर वेगळ्या दगडात कोरलेले नंदीचे शिर ठेवलेले आहे. तेथे बनवलेल्या गोलाकार खाचेमुळे हे शिर कोणत्याही दिशेला फिरवता येते. हा वाडा पाहुन पुढे जाताना ओस पडलेला अजून एक जुना दुमजली वाडा पहायला मिळतो. वाड्याचा दुसरा मजला लाल विटांनी बांधलेला असल्याने हा वाडा लालवाडा म्हणुन ओळखला जातो पण वाडा कोणाचा हे स्थानिकांना सांगता येत नाही. वाड्याच्या आत मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे असल्याने आत शिरता येत नाही. वाड्यासमोरील गल्लीत भैरवनाथाचे मंदिर असुन या मंदीराच्या आवारात तीन विरगळ पहायला मिळतात. येथुन पुढे गेल्यावर गावाच्या गल्लीतील चौकात एका चौथरा असुन त्यावर घोड्याचे शिल्प ठेवलेले आहे. हा चौथरा म्हणजे कुणा रजपूत सैनिकाच्या घोड्याची समाधी असल्याचे सांगितले जाते. येथुन पुढे आल्यावर आपण जवळपास गावाबाहेर पडतो. येथे भुइसपाट झालेल्या वाड्याचे अवशेष असुन या अवशेषात आपल्याला जमिनीखाली घडीव दगडात बांधलेले एक तळघर अथवा बळद पहायला मिळते. या बळदात उतरण्यासाठी वरील बाजूने जेमतेम एक माणुस उतरेल असा अतिशय चिंचोळा पायरीमार्ग आहे. या तळघराला कमानीवजा छत असुन तळघराची लांबी २५ फुट तर रुंदी १० फुट आहे. हे ठिकाण म्हणजे दादोजी कोंडदेव यांचा जुना वाडा असल्याचे सांगितले जाते. या शिवाय गावाच्या वेशीसमोर रस्त्याच्या दुसऱ्या बाजुस एका शेतात घडीव दगडात बांधलेल्या चार समाधी पहायला मिळतात. या समाधीचे एकुण बांधकाम पहाता त्या एखाद्या तालेवार घराण्यातील असामींच्या असाव्यात. संपुर्ण मलठण गावाची भटकंती करण्यास एक तास पुरेसा होतो. आता थोडे मलठण गावाच्या इतिहासाकडे वळूया. शहाजीराजांनी निजामशाही सोडली पण पुणे परगण्याचा मोकासा मात्र त्यांनी आपल्या ताब्यातून सोडला नाही. ते विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रुजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. पण प्रत्यक्षात त्यांची रवानगी कर्नाटकात बंगलोर येथे करण्यात आली त्यामुळे त्यांना स्वतःस जहागिरीचा कारभार पहाण्यास उसंत नव्हती. म्हणून त्यांनी जहागिरीची व्यवस्था पहाण्याची जबाबदारी दादोजी कोंडदेवांकडे सोपविली. दादोजी कोंडदेव हे देखील शहाजीराजांप्रमाणे आदिलशाहीचे चाकर कोंढाणा किल्ल्याचे सुभेदार. दादोजी कोंडदेव हे मुळचे पाटस परगण्यातील मलठण गावाचे कुलकर्णी . देशस्थ ॠग्वेदी ब्राम्हण गोत्र शांडिल्य. ९१ कलमी बखरीनुसार “ दादोजी कोंडदेव कुलकर्णी मौजे मलठन ता. पाटस परगणे “. जेधे शकावलीत देखील दादोजी कोंडदेव मलठणकर असा उल्लेख येतो. शिवाजीराजे पुण्यास आल्यावर त्यांना शहाजीराजांनी मावळ कर्यात पोट मोकासा म्हणून दिली. मावळ कर्यात छत्तीस गावे होती. आदिलशाही सरदार मुरारपंत याने इ.स. १६३० च्या दरम्यान पुण्यावर हल्ला करून पुण्यात सर्वत्र जाळपोळ केली व पुणे उधवस्त केले. लोखंडी प्रहार ठोकून गाढवाचा नांगर फिरवला. त्यामुळे पुणे ओसाड पडले. पुंड –पाळेगार मनमानी करू लागले व सर्वत्र अराजक माजले. अशातच इ.स १६३१ च्या दरम्यान भीषण दुष्काळाची झळ पुणे प्रांतास लागली. पुणे परगणा उजाड झाला. या सर्व उजाड मुलखाचे पुनर्वसन करण्याचे काम दादोजी कोंडदेवांनी केले. सुभेदार नात्याने या पुणे परगणा परिसरात दादोजीने दक्ष कारभाराने परिस्थितीत आमूलाग्र सुधारणा घडवून आणली. लोकांना सुरक्षित वाटण्यासाठी योग्य ते उपाय केले, निवाडे दिले, जमिनींचे मालकी हक्क निश्चित केले, जमिनींची प्रतवारी लावून मलिक अंबरची जमीन महसूल पद्धत आवश्यक त्या फेरबदलाने सर्व जहागिरीत लागू केली. सारा पिकांच्या उत्पन्नावर सारा निश्चित केला, शेती आणि बागाइतीला उत्तेजन दिले, तगाईच्या स्वरूपात शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आणि शेतीव्यसायात सुधारणा व्हावी म्हणून काही वर्षे शेतसारा माफ केला. पुण्यातील आंबील ओढ्याला धरण बांधले. पुणे प्रदेशाच्या सुरक्षिततेची दादोजीने चोख व्यवस्था केली. गोतसभातून पुणे वतनातील तंट्यांचे निवाडे करताना दादोजी कोडदेवांच्या उपस्थितीचे, तसेच उजाड मुलूख लागवडीखाली आणण्याचे दाखले देणारे उल्लेख काही ऐतिहासिक कागदपत्रांतून तसेच बखरीतून आढळतात. पुरंदरे दफ्तर खंड ३ दादोजी कोंडदेव यांच्या कामगिरीवीषयी खेडबऱ्याच्या देशपांडे करीन्यातील आलेला उल्लेख “ दादोजी कोंडदेव सुभेदार कसबीयात होते . ते वेळेस राजश्री श्रीसाहेब ( शिवाजीराजे ) फार लहान होते . राजेश्री महाराज साहेबी ( शहाजी महाराज ) मातोश्री आऊसाहेब व तुम्हास खेडेबारीयात दादाजीपंताशी पाठविले. त्यावेळी रहावयास वाडा बापूजी मुदगल यांच्या वाडीयात होता आणि तुम्हास वाडा बांधण्याची तजवीज केली . उद्यमी लोकांची घरे पाडून ती जागा वाडीयास केली. त्या उद्यमी लोकांच्या कुळास वसाहतीस जागा पाहिजे म्हणून कसबियाचे शिवारात पेठ वसवावयाचा तह केला . पेठेचे नाव शिवापूर ठेविले. तेथील उद्यमी लोकांना बारा वर्षपर्यंत करात सवलत दिली जाईल असा कौल दिला. दादोजी कोंडदेवाने खेड येथे शहाबाग केली . दादोजीने शिवापूर येथे शहजीराजाच्या नवे बाग करून या बागेला ” शहाबाग “ असे नाव दिले. संभाजीराजे व शिवाजीराजे यांच्या नावे त्यांना अनुक्रमे संभापूर व शिवापूर अशी नावे ठेवली. अशी दोन नवी गावे वसवली. निवाडे देताना ते निष्पक्ष आणि न्यायी होते. जरब बसवताना त्याने एका कुलकर्ण्यास मृत्युदंडही घडविल्याचे उल्लेख आहेत. दादोजी कोंडदेवांनी दिलेले निवाडे छ. शिवाजी महाराजांनी मान्य केले होते. दादोजी कोंडदेवांनी केले ते रास्तच' असा महाराजांना त्यांच्याबद्दलचा विश्वास होता.दादोजी कोंडदेवांचा मृत्यू इ.स.१३ जुलै १६४६ ते १९ जुलै १६४७ यमध्ये झाला. दादोजी कोंडदेव वारल्यावर छ. शिवाजीमहाराजांनी पुरंदरचा किल्लेदार महादजी नीळकंठराव यांना दिलेल्या एका पत्रात असे म्हटले आहे की...दादो कोंडदेव आम्हांजवळ वडिली ठेवून दिल्हे होते. ते मृत्यो पावले आता आम्ही निराश्रित झालो. दादोजी एक लहानसाच ब्राह्मण पण त्याने केलेले निवाडे औरंगजेबासही मान्य झाले, असे पहिल्या शाहूने त्याच्याविषयी उद्गार काढले आहेत. याशिवाय सवाई माधवराव पेशव्याच्या रोजकीर्दीत येसाजी देवकाते व गोविंदराव देवकाते यांना मौजे मलठण येथे वतन असल्याचे नोंद आढळून येते. याच अर्थ पेशवेकाळात मलठण गावची पाटिलकी हि देवकाते घराण्याकडे होती.
© Suresh Nimbalkar