MALTHAN

TYPE : FORTRESS

DISTRICT : PUNE

HEIGHT : 0

GRADE : EASY

वर्तमानकाळात व इतिहासातील राजकारणात प्रसिध्द असलेल्या अनेक घराण्यापैकी एक घराणे म्हणजे माळव्यांतील परमार ऊर्फ पवार घराणे. उत्तर हिंदुस्थानाच्या माळवा प्रांतातील परमार ऊर्फ पवार हे रजपुत घराणे शिवकाळापुर्वी दक्षिणेत आले. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर देखील या घराण्याच्या अनेक गढी व वाडे पहायला मिळतात. अशीच एक पवारांची गढी आपल्याला पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मलठण या गावात पहायला मिळते. मलठण हे गाव पुणे शहरापासुन ५५ कि.मी.अंतरावर तर पुणे -नगर महामार्गावरील शिक्रापूरपासून २० कि.मी. अंतरावर आहे. शिरूर या तालुक्याच्या ठिकाणापासुन हि गढी साधारण १७ कि.मी. अंतरावर आहे. मलठण गावात प्रवेश केल्यावर रस्त्यावरूनच गढीची तटबंदी व तिच्या टोकावर असलेले बुरुज नजरेस पडतात. चौकोनी आकाराची हि गढी साधारण दीड एकरवर पसरलेली असुन गढीच्या तटबंदीत चार टोकाला चार बुरुज आहेत. गढीचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेला असुन तटबंदीच्या मध्यावर बांधलेला आहे. या दरवाजा बाहेर डावीकडील बाजुस आपल्याला पायऱ्या असलेली विहीर पहायला मिळते. ... दरवाजाच्या वरील बाजुस नगारखाना बांधलेला आहे. या दरवाजाची लाकडी दारे कोसळल्याने त्या जागी लोखंडी दरवाजा लावलेला असुन मुळची लाकडी दारे आपल्याला आत पहायला मिळतात. तटबंदीचा फांजीपर्यंतचा भाग दगडात बांधलेला असुन त्यावरील भाग विटांनी बांधलेला आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन त्यातील एका देवडीत तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. गढीत प्रवेश केल्यावर आपल्याला समोरच एका चौसोपी वाड्याचा प्रशस्त चौथरा पहायला मिळतो. गढीतील हि मुख्य वास्तु असुन काळाच्या ओघात तिची पडझड झालेली आहे पण शिल्लक असलेल्या अवशेषावरून तिच्या भव्यतेची कल्पना करता येते. गढीच्या डावीकडील तटबंदीला लागुन दुसरा दुमजली वाडा आहे पण पवार यांच्या वंशजांचे तेथे वास्तव्य असल्याने प्रवेश नाही. हा वाडा आजही सुस्थितीत असुन तो बहुदा नंतरच्या काळात बांधला गेला असावा. या गढीत असलेली सर्वात सुंदर वास्तु म्हणजे येथील विहीर. गढीतील हि विहीर विटांनी बांधलेली असुन या विहीरीत दोन मजले आहेत. विहिरीत उतरण्यासाठी बंदिस्त मार्ग असुन वरील मजल्याला सहा कमानी तर खालील मजल्याला पाच कमानी अशी या विहिरीची रचना आहे. विहीर पुर्णपणे भरल्यास दोन्ही मजले पाण्याखाली जातात पण उन्हाळ्यात पाणी कमी होत गेल्यास या मजल्यांचा वापर वातानुकुलीत खोल्यासारखा केला जात असे.विहिरीतील पाणी काढण्यासाठी दोन रहाट असुन एक रहाटाने थेट वाड्यात पाणी खेचण्याची सोय आहे. गढी पहाताना आवर्जुन पहावी अशी हि वास्तु आहे. गढी भोवती फेरी मारताना पूर्वेकडील तटबंदीत दगडांनी बंदिस्त केलेला एक लहान दरवाजा पहायला मिळतो. संपुर्ण गढी फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गढीचे मालक व पवार यांच्या मलठण शाखेचे सध्याचे वंशज श्री उदयसिंह पवार हे पुणे मुक्कामी असल्याने गढी बंद असते. पण ते गढीत आले असता वा इतर वेळेस पुर्व परवानगीने गढी पाहता येते. याशिवाय गावात तटबंदी असलेली अजुन एक गढी असुन तिची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. या गढीचे केवळ मातीचे बुरुज व दरवाजा अवशेष रुपात शिल्लक आहे. मध्यभारतातील प्राचीन धारानगरी म्हणजेच आजचे धार हे परमार राजवंशाच्या काळात एक संपन्न नगर म्हणुन प्रसिद्ध होते. धारच्या या परमार राजवंशात राजा भोज सारखा पराक्रमी सम्राट होऊन गेला. माळवा प्रांतात असलेले परमार घराण्याचे राज्य इ.स.१३०५ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर लयास गेल्यावर धारच्या परमार घराण्याचे वंशज निरनिराळ्या प्रांतात जाऊन स्थायिक झाले. त्यातील एक शाखा महाराष्ट्रात आली व पवार म्हणुन उदयास पावली. प्राचीन राजधानी धार येथून आल्यामुळे हे घराणे धार पवार म्हणून इतिहासात प्रसिद्धिस आले.शंभूसिंग परमार ऊर्फ साबूसिंग पवार यांना या घराण्याचे मूळ पुरुष मानले जाते. साबुसिंग पवार यांनी घोडेस्वार व पायदळ बाळगुन अहमदनगर जवळ हंगे गावाच्या रानात आपले ठाणे बनविले. इ.स.१६५८ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याणवर स्वारी केली त्यावेळी साबुसिंग महाराजांसोबत होते. पुढे त्यांनी अहमदनगर सुभ्यात सुपे गाव वसविले व या गावची पाटीलकी मिळवली. साबुसिंग यांना कृष्णाजी नावाचा पुत्र होता. महाराजांनी विजापूरकरांच्या मुलखावर केलेल्या स्वाऱ्यात कृष्णाजी पवार सामील होते. अफझल खानच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजलखान ह्याच्याबरोबर झालेल्या झटापटीत कृष्णाजी पवार यांचे नाव पुढे येते. कृष्णाजी पवारांच्या कामगिरीवर त्यांना कणगी व करणगावची पाटीलकी मिळाली. कृष्णाजी पवारांच्या मृत्युनंतर त्यांचे तीन पुत्र बुबाजी, रायाजी व केरोजी शिवाजी महाराजांच्या सेनेत सामील झाले. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठेशाहीवर कोसळलेल्या संकटात ज्या मराठा सरदारांनी मोगलांशी झुंज दिली त्यात या पवार बंधुंचे नाव दिसुन येते. बुवाजी पवार यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात मुलुखाचा बंदोबस्त करताना लढाया करून अनेक बंडे मोडून काढली. राजाराम महाराजांनी टाकलेल्या विश्वासामुळे बुबाजी व केरोजी यांच्या फौजानी मोगलांच्या वऱ्हाड आणि गंगाथडी मुलखात घौडदौड करून चौथाई वसुल करत मोगल फौजेस हैराण करून सोडले व मराठ्यांचा दरारा वाढवला. या कामगिरीमुळे राजाराम महाराजानी जिंजीहून महाराष्ट्रात परत आल्यावर बुबाजीस विश्वासराव हा किताब व सरंजाम तर केरोजीस सेना सेनाबारासहस्त्री हि पदवी व वस्त्रे दिली. मलठण, सुपे, कवठे यमाई, आमदाबाद, हिंगणी, गणेगाव, चितेगाव, नगरदेवळे हि गावे त्यांना सरंजामी वतने होती. छत्रपती राजाराम महाराजांनी दिलेल्या विश्वासराईच्या सरंजामाच्या वाटणीच्या यादीत यशवंतराव पवार मलठणकर यांचा उल्लेख येतो. त्यानंतर यशवंतरावांचे नातू व संभाजी यांचे पुत्र उदाजी पवार (इ.स. १७०८ ते १७६०) यांची माळवा गुजराथ प्रांतात मराठ्यांचा जम बसविण्यास चांगलीच मदत झाली. इ.स. १७३४ मध्ये सिद्दी, अंबर अफवाणी याच्याशी झालेल्या लढाईत उदाजी पवार यांनी त्याचे शिर कापून आणले. त्यांच्या पराक्रमाबद्दल बोलताना जहा उदा वहा खुदा 'असे म्हटले जाई यावरूनच त्यांच्या पराक्रमाची कल्पना येते. शाहूमहाराज व पेशवे यांनी विश्वासराईच्या सरंजामाशिवाय उदाजी पवारांना गुजराथ, माळवा, मेवाड, मारवाड, बुंदेलखंड वगैरे प्रांतांतील मोकासे दिले. याखेरीज दहकाचा सरंजाम उदाजी पवार व मानाजी पवार यांना देण्यात आला. हेच उदाजी, आनंदराव व जगदेवराव पवार यांनी धार संस्थानाचा पाया रचला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!