MALPUR

TYPE : GADHI

DISTRICT : DHULE

HEIGHT : 0

GRADE : EASY

खानदेश प्रांत साडे बारा रावलांचे वतन म्हणुन देखील ओळखला जातो. रावळ हि येथील कुळांना मिळालेली पदवी असुन या रावळात सिसोदिया, सोळंकी, परमार, प्रतिहार अशी वेगवेगळी कुळे आहेत. हि साडेबारा वतन म्हणजे १.दोंडाईचा २.मालपुर ३.सिंदखेडा ४.आष्टे ५.सारंगखेडा ६.रंजाणे ७.लांबोळा 8.लामकानी ९.चौगाव १०. हटमोईदा ११.रनाळे १२.मांजरे १३.करवंद हे अर्धे वतन खानदेशात व अर्धे खानदेश बाहेर असल्याने अर्धे वतन म्हणुन ओळखले जाई. यातील आष्टे, लांबोळा,चौगाव, हटमोईदा या ४ गढी पुर्णपणे नष्ट झालेल्या आहेत तर उरलेल्या ५ गढी त्यांचे अवशेष संभाळत काळाशी झुंज देत आहेत. यातील ४ गढी मात्र आजही त्यांच्या मूळ रुपात शिल्लक आहेत. संस्थाने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत पण मालपुरचा दरबारगड किल्ला मात्र याला अपवाद आहे. ... मालपुरचा दरबारगड किल्ला हा आजही त्याच्या मूळ स्वरुपात असुन त्याची योग्यप्रकारे निगा राखलेली आहे. सद्यस्थितीत दिगपालसिंह रावळ यांचे मालकीचा असलेला हा गढीकोट त्यांच्या परवानगीने पहाता येतो. मालपुरचा दरबारगड किल्ला साक्री तालुक्यात धुळ्यापासून ६४ कि.मी. अंतरावर तर नंदुरबारपासुन ३२ कि.मी. अंतरावर आहे. मालपुर गावातुन किल्ल्याकडे जाताना वाटेत तीन चार दगडी व लाकडी कोरीवकाम असलेले जुने वाडे पहायला मिळतात. अमरावती नदीच्या दक्षिण तिरावर व मालपुर शहराच्या उत्तरेस असलेला हा गढीवजा किल्ला साधारण तीन एकर परिसरात पसरलेला आहे. किल्ल्याच्या बाहेरील आवार दोन एकरचे असुन अंतर्गत परीसर एक एकरचा आहे. किल्ल्याच्या तटबंदीत एकुण आठ बुरुज असुन किल्ल्याचे पश्चिमाभिमुख मुख्य प्रवेशद्वार दोन बुरुजामध्ये बांधलेले आहे. मुख्य दरवाजात लहान दिंडी दरवाजा असुन हा मुख्य दरवाजा त्याची लाकडी चौकट व कमानीसकट आजही सुस्थितीत आहे. दरवाजाच्या वरील बाजुस तटावर बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या आहेत. सध्या हा दरवाजा बंद असुन गाडी वर जाण्यासाठी तटबंदी तोडुन बनविलेल्या मार्गाने किल्ल्यावर जाता येते. हा दरवाजा पहाण्यासाठी आपल्याला किल्ल्याच्या आवाराला वळसा घालुन नदीच्या दिशेला जावे लागते. तटबंदीची उंची जमीनीच्या बाजुने साधारण २५-३० फुट असुन नदीच्या बाजुने ७० फुट उंच असलेल्या या तटबंदीत व बुरुजावर तोफांच्या व बंदुकीच्या मारगीरीसाठी असलेल्या खिडक्या व जंग्या पहायला मिळतात. संपुर्ण तटबंदी पुर्णपणे सुस्थितीत असुन तटबंदीवर असलेल्या जुन्या चर्या दुरुस्त केलेल्या आहेत. किल्ल्याच्या आवारात एक खोल विहीर असुन या विहिरीचे पाणी आजही वापरात आहे. नव्याने बांधलेल्या वाटेने किल्ल्यात शिरल्यावर डाव्या बाजुस असलेल्या बुरुजावर तीन तोफा पहायला मिळतात तर दुसऱ्या बुरुजावर एक दुमजली इमारत पहायला मिळते. किल्ल्याच्या या भागात एक समाधीवजा छत्री असुन समोरच किल्ल्यातील चौसोपी वाड्याचा दरवाजा आहे. या दरवाजावर मालपुर संस्थानाचे राजचिन्ह पहायला मिळते. या वाडयाची बाहेरील भिंत नव्याने सजविलेली असुन वाड्यातील जुने लाकडी कोरीवकाम अतिशय सुंदर आहे. दरवाजातून आत शिरल्यावर डाव्या बाजूस असलेल्या देवडीत चार लहान तोफा ठेवलेल्या आहेत. वाडयाच्या या चौकात मोठया प्रमाणात कलाकुसर केलेली असुन जोत्यावर वेगवेगळ्या खोल्या आहेत. वाडयाच्या छताला टांगलेली जुनी काचेची वेगवेगळी झुंबरे व हंडया पहायला मिळतात. वाड्याचा व किल्ल्याचा इतर भाग खाजगी वापरात असल्याने इतर भागात मर्यादित प्रवेश दिला जातो. या भागात आणीबाणीच्या काळात किल्ल्याबाहेर पडण्यासाठी तटात बांधलेला एक चोर दरवाजा आहे. वाड्यात आपल्याला जुन्या काळातील छायाचित्रे व इतर काही वस्तु पहायला मिळतात. येथे आपले किल्लादर्शन पूर्ण होते. संपुर्ण किल्ला व परीसर पहाण्यास एक तास पुरेसा होतो. खिलजीच्या आक्रमणानंतर राजपुतांची २४ कुळे अभयसिंह रावल यांच्या नेतृत्वाखाली मांडूच्या दिशेने गेली. त्यांचा मुलगा अजयसिंह रावल याने इ.स १३३३ मध्ये अमरावती नदीकिनारी आपली जहागीर स्थापित करून दोंडाईचा किल्ला बांधला. अजयसिंह रावल यांचा लहान पुत्र बलबहादुरसिंह याने इ.स १४५५ मध्ये मालपुर येथे दरबारगड किल्ला बांधुन वेगळे वतन स्थापन केले. दोंडाईचा संस्थानाची सत्ता ५२ गावापर्यंत मर्यादित होती तर मालपुर संस्थानाची सत्ता थेट भामेरपर्यंत असल्याचे सांगितले जाते. औरंगजेबच्या मृत्युनंतर शाहु महाराज दक्षिणेत परतत असताना त्यांना या भागातुन सुरक्षित पाठविण्याची जबाबदारी मालपुरच्या रावलानी पार पडली होती व त्यासाठी त्यांना सातारा येथे बोलावून त्यांचा सन्मान करून सनद देण्यात आली होती. वेळोवेळी सत्ताबदल झाले तरी या रावलांचे अधिकारात त्या त्या काळातील सत्ताधीशांनी कोणतेच बदल केले नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!