MALKAPUR
TYPE : GADHI
DISTRICT : VARDHA
GRADE : EASY
विदर्भातील वर्धा जिल्ह्यात एकेकाळी बरेच किल्ले गिरीदुर्ग, भुईकोट व गढी स्वरुपात अस्तित्वात होते पण आज यातील हाताच्या बोटावर मोजण्या इतपत देखील गढीकोट पहायला मिळत नाहीत. जनमानसात या गढीकोटांची माहीती व त्याचे त्या काळातील महत्व माहित नसल्याने यांचा उल्लेख देखील अभावानेच येतो. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सरांच्या गडकिल्ले महाराष्ट्राचे या पुस्तकात वर्धा जिल्ह्यातील साधारण सात गढीकोटांचा उल्लेख येतो पण या व्यतिरिक्त अजुनही काही गढीवजा कोट वर्धा जिल्हयात आहेत जे जुने जाणकार वगळता स्थानिकांना देखील पूर्णपणे अपरिचित आहेत.वर्धा जिल्ह्यातील किल्ल्यांची शोधयात्रा करताना आम्हाला एकुण १० गढीकोट अवशेष रुपात पहायला मिळाले. आजच्या संगणक युगात आंतरजालावरही या किल्ल्यांची माहिती दिसुन येत नाही. या किल्ल्यांचा दौरा केला असता मिळालेली माहिती मी दुर्गभरारी या संकेतस्थळावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यातील बऱ्याच गढी पुर्णपणे नष्ट झाल्या असुन केवळ तटबंदीची एखादी भिंत अथवा एखादा बुरुज वा दरवाजा असे उर्वरित अवशेष काळाशी झुंज देत आहेत.
...
या १० किल्ल्यात २ गिरिदुर्ग १ सराई तर उरलेल्या ७ गढी आहेत. यातील विरूळ, कुरझडी व मलकापूर (बोदड) या तीन गढीचा मी येथे नव्याने सामावेश केलेला आहे. बहुतांशी गढीकोटात गाव ,मंदिरे वा दर्गा असल्याने या वास्तुनीच या कोटांच्या अवशेषांचा घास घेतला आहे तसेच स्थानिकांचे या वास्तु बद्दलचे अज्ञान व उदासीनता देखील या कोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. संस्थाने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत तर काही पार जमीनदोस्त झाले आहेत. देवळी तालुक्यातील मलकापुर(बोदड) गावात असलेली गढी यापैकी एक आहे. मलकापुर (बोदड) येथील गढीला भेट देण्यासाठी आपल्याला वर्धा शहर गाठावे लागते. वर्धा ते मलकापुर (बोदड) हे अंतर खाजगी वाहन असल्यास धोत्रामार्गे २२ कि.मी. आहे तर देवळी या तालुक्याच्या ठिकाणाहुन हे अंतर ३० कि.मी. आहे. देवळी येथुन मलकापुर (बोदड) जाण्यासाठी बस व रिक्षा उपलब्ध आहेत. गावात गढी फारशी माहिती नसल्याने आपण बस थांब्यावर उतरून गढीकडे जाताना गढी न विचारता मारुती मंदीर विचारणा करावी. या वाटेने जाताना मोठया प्रमाणात जुन्या धाटणीची मातीची प्रशस्त घरे पहात आपण थेट गढी समोरील आवारात पोहोचतो. चौकोनी आकाराची हि गढी एका लहानशा उंचवट्यावर १ एकर परिसरात बांधलेली असुन आज या गढीचे पडझड झालेले केवळ दोन बुरुज व काही प्रमाणात मातीची तटबंदी शिल्लक आहे. या बुरुजावर बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या दिसुन येतात. गढीच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने आत शिरता येत नाही. गढीचा दरवाजा पुर्वाभिमुख असुन तो पुर्णपणे नष्ट झाला आहे. गढीच्या तटबंदीला लागुन घडीव दगडात बांधलेली एक विहीर असुन तटबंदीवरून या विहिरीतील पाणी काढण्याची सोय दिसुन येते. गढीच्या तटबंदीला लागुन श्रीकृष्णाचे मंदीर असुन त्यात असलेल्या शिलालेखानुसार हे मंदीर १९६१ साली मलकापुर गावचे मालगुजार श्री.जानकी जवजे व गणुलाल खत्री यांनी बांधलेले आहे. म्हणजे हे मालगुजार या गढीचे मालक असावेत. विरूळ गढीचे मालक व त्यांचे वंशज असलेले शशिकांत वाणी ( कुरझडीकर ) यांनी दिलेल्या माहितीनुसार कुरझडीकर यांच्याकडे सोनेगाव, विरूळ, कुरझडी व मलकापुर अशी ४ गावाची मालगुजारी होती. सोनेगाव येथे असलेली गढी कुरझडीकर यांनी संत आबाजी यांना दान दिली व मलकापुर येथील मालगुजारी हक्क सोडुन काही कारणाने कुरझडी येथील मुक्काम हलवून विरूळ येथे स्थायिक झाले. गढीत आतून पाहण्यासारखे काही नसल्याने संपुर्ण गढी पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar