MALICHINCHORA
TYPE : FORTRESS
DISTRICT : AHMEDNAGAR
HEIGHT : 0
अहमदनगर जिल्ह्यात आपल्याला किल्ल्याच्या बरोबरीने गढी देखील बहुसंख्य प्रमाणात पहायला मिळतात. किल्ले हे जरी प्राचीन काळापासुन अस्तित्वात असले तरी येथील गढ्या मात्र मध्ययुगीन काळात म्हणजे निजामशाहीपासुन पेशवे काळापर्यंत बांधल्या गेल्या आहेत. मध्ययुगीन काळाशी नाते सांगणारी पण इतिहासाबाबत अबोल असणारी अशीच एक गढी आपल्याला माळीचिंचोरा गावात पहायला मिळते. नेवासा तालुक्यात असलेले हे गाव तालुक्याच्या ठिकाणाहुन १४ कि.मी. अंतरावर तर अहमदनगर शहरापासुन ४५ कि.मी.अंतरावर आहे. गढी गावाच्या बाहेर असुन गावात मलिक दर्गा विचारल्यास आपण सहजपणे या गढीच्या तटबंदीजवळ पोहोचतो. या तटबंदी जवळ असलेला दर्गा म्हणजे गढी बाहेर पत्र्याचा लहान निवारा असुन त्यात दगड ठेवुन त्यावर हिरवी चादर टाकलेली आहे. आयताकृती आकाराची हि गढी साधारण दीड एकरवर पसरलेली असुन गढीची खुप मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. संपुर्ण गढीची तटबंदी ढासळलेली असुन या तटबंदीत आजही लहानमोठे सहा बुरुज पहायला मिळतात. तटबंदी कोसळलेली असल्याने तटावर अथवा बुरुजावर जाण्याचा मार्ग शिल्लक नाही. यातील एका बुरुजाबाहेर आलेले नक्षीदार दगड पहाता या बुरुजावर हवा खाण्यासाठी सज्जा असावा असे वाटते.
...
गढीचे बांधकाम बहुदा दोन वेगवेगळ्या कालखंडात करण्यात आले असावे कारण आता शिल्लक असलेली गढीची अर्धी तटबंदी हि घडीव दगडात बांधलेली असुन उर्वरीत तटबंदी ओबडधोबड दगडात बांधलेली आहे. या तटाची व बुरुजाची उंची साधारण २५ फुट असुन हे संपुर्ण बांधकाम दगडात केलेले आहे. गढीचा दरवाजा व आतील अवशेष पुर्णपणे नष्ट झाले असुन त्यावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने हा दरवाजा नेमका कुठे व कसा असावा याचा अंदाज येत नाही. कोसळलेल्या तटबंदीचे दगड आसपासच्या घरांच्या बांधकामात वापरलेले दिसुन येतात. गढीच्या अंतर्गत भागात नव्याने बांधलेली लहानशी घुमटी असुन त्यात देवाचा शेंदुर फासलेला तांदळा आहे. गढीतील पाण्याची सोय म्हणजे पुर्वी तटबंदी बाहेर दर्ग्याजवळ पाण्याच्या दोन विहिरी होत्या ज्या आता बुजविण्यात आल्या आहेत अशी माहीती स्थानिकांनी पुरवली. गढीच्या बाहेरील बाजुस नव्याने बांधलेले भैरवनाथाचे मंदिर आहे. गावकऱ्यांनी स्वच्छ भारत कार्यक्रमाला हरताळ फासलेला असुन झाडीच्या आडोशाने गढीचा वापर शौचालय म्हणुन केला जात आहे. कधीकाळी वैभवात नांदलेल्या या गढीची आजची अवस्था पाहुन मनाला यातना झाल्याशिवाय रहात नाही. पण कालाय तस्मै नमः अजुन काय. गढीच्या इतिहासाची व वंशजाची स्थानिकांकडे चौकशी केली असता त्यांचे ज्ञान देशमुखांची गढी यापुढे जात नाही. याशिवाय गावात प्रवेश करण्यासाठी वेस असुन या वेशीला पुर्वी दरवाजा होता. वेशीचा हा दरवाजा पहाता कधीकाळी गावाभोवती तटबंदी असावी असे ठामपणे सांगता येत नाही. संपुर्ण गढी पाहण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात.
© Suresh Nimbalkar