MAHIPATGAD
TYPE : HILL FORT
DISTRICT : RATNAGIRI
HEIGHT : 2960 FEET
GRADE : MEDIUM
अलंग –मदन- कुलंग या दुर्गत्रयीप्रमाणे भटकंतीसाठी प्रसिद्ध असलेली अजुन एक दुर्गत्रयी म्हणजे महिपतगड-सुमारगड-रसाळगड. एकाच डोंगररांगेवर उभे राहुन एकमेकांशी जवळीक साधणारे हे दुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील खेड या तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण २५ कि.मी. अंतरावर आहेत. यातील उत्तरेकडे असलेला महिपतगड हा सर्वात उंच असुन पुर्णपणे जंगलाने वेढलेला आहे. या किल्ल्याचे क्षेत्रफळ १२० एकर असल्याचे सांगीतले जात असले तरी वनखात्याच्या दफ्तरी याचे क्षेत्रफळ २०० एकर २९ गुंठे आहे. हे तीन किल्ले एकमेकांजवळ असल्यामुळे बहुतांशी दुर्गप्रेमी महिपतगड - सुमारगड - रसाळगड अशी भटकंती करतात. वडगाव,दहिवली, वाडी जैतापुर हि महिपतगडच्या घेऱ्यातील गावे असुन दहिवली व वाडी जैतापुर येथुन गडावर जाण्यासाठी मार्ग आहे. दहिवली गावातून वाडी-बेलदार गावामार्गे पायवाटेने वाटेने गडावर जाण्यासाठी ४ तास लागतात. २०१९ मध्ये वाडी जैतापुर ते वाडी-बेलदारपर्यंत कच्चा रस्ता झाल्यामुळे जीपसारख्या वाहनाने महिपतगडच्या पायथ्याशी असलेल्या वाडी बेलदार पर्यंत सहजतेने जाता येते अन्यथा ७ कि.मी. चढ असलेला हा रस्ता पायगाडीने पार करण्यास दोन तास लागतात. हि वाट कमी श्रमाची व जास्त सोयीस्कर आहे. बेलदार वाडी हि दहा-बारा घरांची लहानशी वस्ती असुन येथे चहापाण्याची तसेच जेवणाची चांगली सोय होते.
...
वाडीत मुक्काम करावयाचा असल्यास मारुतीचे मंदिर आहे. गडाची एक सोंड बेलदार वाडीत उतरलेली असुन या सोंडेवरूनच गडावर जाण्याचा मार्ग आहे. या वाटेवर एक लहानशी विहीर असुन उन्हाळ्यात याच विहीरीचे पाणी वाडी बेलदारचे गावकरी वापरतात. गडावरील पारेश्वर मंदीरात वीज गेली असल्याने या विजेच्या तारांखालुन मंदीरापर्यंत सहजतेने जाता येते. तसेच मंदिरामुळे या वाटेवर स्थानिकांचा वावर असल्याने वाट चांगली मळलेली आहे. गडाची सोंड चढुन थोडे वर आल्यावर डाव्या बाजुस एक बुरुज दिसतो. वाडीत प्रवेश करताना हा बुरुज सतत आपल्यावर नजर ठेऊन असतो. कधीकाळी या वाटेवर असलेला खेड दरवाजा आज पुर्णपणे नष्ट झालेला असुन आज त्याचा कोणताही अवशेष दिसत नाही. वाटेने थोडे पुढे आल्यावर आपण एका लहानसा घळीत पोहोचतो. येथे वरील बाजूस गोलाकार बुरुजासारखी भिंत असुन एक लहानशी पायवाट आपण वर येताना पाहीलेल्या डावीकडील बुरुजाकडे जाताना दिसते. या पायवाटेने आपण थेट बुरुजावर पोहोचतो. या बुरुजावरून वाडी बेलदार गाव तसेच आपण गडावर आलो तो मार्ग पुर्णपणे नजरेस पडतो. पुढे दरीकाठाने बुरुजाच्या उजवीकडे गेल्यास आपण पाण्याच्या प्रवाहमार्गावर येतो. गडाची हि पश्चिम बाजु असुन येथे झाडीत एका चौथऱ्यावर लहान शिवलिंग व नंदी ठेवलेला आहे. कधीकाळी या प्रवाहाच्या ठिकाणी गडाचा दरवाजा होता व येथे असलेला पाण्याचा उगम व शिवमंदिर यामुळे हा दरवाजा शिवगंगा म्हणुन ओळखला जात होता. हा परीसर पाहुन झाल्यावर परत वाटेवर येऊन आपली पुढील वाटचाल सुरु ठेवावी. वर आल्यावर आपण आपण खालुन पाहीलेली गोलाकार भिंत म्हणजे पाणी अडविण्यासाठी बांधलेला बंधारा असल्याचे दिसुन येते. बंधारा पुर्ण क्षमतेने भरल्यावर त्यातील पाणी वाहुन जाण्यासाठी वरील दगडी ठरत गोलाकार नाळी कोरलेली आहे. सध्या या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात माती साठलेली आहे. या बंधाऱ्याच्या पाणीसाठ्यात उजवीकडील काठावर एक भलीमोठी विहीर पहायला मिळते. या विहिरीचे पाणी वर्षभर उपलब्ध असुन नळाने खाली बेलदार वाडीत नेलेले आहे. बंधाऱ्याच्या डावीकडून दाट झाडीतुन जाणारी वाट आपल्याला पारेश्वर मंदिरात घेऊन जाते. या वाटेने जाताना आसपासच्या झाडीत मोठ्या प्रमाणात वास्तुंचे अवशेष व एका ठिकाणी मळलेल्या चुन्याचा ढीग पहायला मिळतो. वाडीबेलदारहून गडदर्शन करत पारेश्वर मंदिर गाठण्यास १ तास पुरेसा होतो. या ठिकाणी गडाची समुद्रसपाटीपासून उंची २९६० फुट आहे. गडावर मुक्काम करण्यास हे अतिशय सुंदर ठिकाण असुन यात २० ते २५ जणांची राहण्याची सोय होते. मंदिरासमोर एक लहानशी विहीर असुन उजव्या बाजूस कोरडे पडलेले तळे आहे. मंदिराच्या डाव्या बाजूस सदरेचा चौथरा असुन सध्या तेथे काही अनघड देव विराजमान झालेले आहेत. पारेश्वर मंदिर गडाच्या मध्यवर्ती भागात असल्याने आपले सामान या मंदीरात ठेऊन उर्वरीत भटकंतीस सुरवात करावी. मंदिराच्या उजवीकडे काहीशा अंतरावर घडीव दगडात बांधलेल्या दोन नक्षीदार समाध्या नजरेस पडतात. या समाधीकडून उत्तरेकडे सरळ जाणारी वाट आपल्याला कोतवाल दरवाजाकडे घेऊन जाते. या वाटेवर आपल्याला अजुन एक समाधी चौथरा पहायला मिळतो. स्थानीक ग्रामस्थ याला होळीचा माळ म्हणुन ओळखतात. या वाटेने वीस मिनिटे चालत आपण कोतवाल दरवाजाजवळ पोहोचतो. येथे एका चौथऱ्यावर भग्न झालेली मारुतीची मूर्ती ठेवलेली खाली उतरत जाणारी वाट आपल्याला कोतवाल गावात घेऊन जाते पण आता हि वाट वापरात नसल्याने पुर्णपणे मोडलेली आहे. या ठिकाणी दरवाजाचे अवशेष दिसत नसले तरी दरीकाठावर असलेली रचीव दगडाची तटबंदी व चौकीचे अवशेष दिसुन येतात. या दरवाजाच्या खालील भागात घडीव दगडात बांधलेले दोन बुरुज असुन ते येथुन नजरेस पडत नसल्याने दरवाजाच्या उजवीकडील टेकडावर चढुन जावे लागते. येथुन खाली जगबुडी नदीचे खोरे, दूरवर कोतवाल गाव, ईशान्येला प्रतापगड व महाबळेश्वरची डोंगररांग तर पूर्वेला असलेला हातलोट घाट मधु-मकरंदगड, चकदेव, परबत अशी सह्याद्रीची डोंगररांग नजरेस पडते. येथे समोरच पुसाटी कडा असुन या कड्याखालुन एक वाट गडावर येते. या ठिकाणी वर येण्यासाठी शिडी लावलेली आहे. या दरवाजाच्या पुढील भागात लालदेवडी दरवाजा आहे. कोतवाल दरवाजाचा हा परिसर पाहुन झाल्यावर पुन्हा पारेश्वर मंदीराकडे यावे. आता मंदिरासमोरून जाणऱ्या वाटेने पुढील गडफेरीस सुरवात करावी. हि वाट आपल्याला यशवंत दरवाजाकडे घेऊन जाते. या वाटेने जाताना एका ठिकाणी उजवीकडे कोरडा पडलेला तलाव पहायला मिळतो. साधारण अर्धा तास वाटचाल केल्यावर आपण यशवंत दरवाजाजवळ पोहोचतो. या भागातील तटबंदी घडीव दगडात तसेच चुन्यामध्ये बांधलेली आहे. कोतवाल दरवाजा प्रमाणे हे बुरुज देखील एकमेकांपासुन काही अंतरावर असुन या दोन बुरुजांच्या बेचक्यामधुनच यशवंत दरवाजाची वाट वर चढते. या भागात झाडी नसल्याने दोन्ही बुरुजावर तसेच बुरुजाच्या खालील भागात जाता येते. येथे देखील दरवाजाचे कोणतेही अवशेष दिसुन येत नाहीत. या भागात खुप मोठ्या प्रमाणात चुन्याचे ढीग दिसुन येतात. यशवंत दरवाजा पाहुन झाल्यावर पुन्हा आपला मोर्चा पारेश्वर मंदीराकडे वळवावा व मंदीरात ठेवलेल्या पाठपिशव्या घेऊन गडावर आलेल्या वाटेने आपला परतीचा प्रवास सुरु करावा. परत जाताना वाटेच्या डाव्या बाजुस आपल्याला चुन्याचा ढिगारा पहायला मिळतो. येथे डाव्या बाजुस एक वाट जंगलात शिरताना दिसते. या वाटेवर साधारण ५ मिनिटे चालल्यावर दाट झाडीत साधारण १० फुट उंचीच्या चौथऱ्यावर सरळ रेषेत घडीव दगडात बांधलेल्या ७०-८० फुट लांबीच्या चार भिंती नजरेस पडतात. या वास्तुचे नेमके प्रयोजन लक्षात येत नाही. येथुन थोडे पुढे आल्यावर एका चौथऱ्यावर ठेवलेली मारुतीची व गणपतीची मुर्ती नजरेस पडते. कधीकाळी दोन स्वतंत्र राउळात असणाऱ्या या मुर्ती आज एका झाडाखाली विराजमान झाल्या आहेत. या मंदिराकडून पायऱ्यांची एक प्रशस्त पायवाट खाली उतरताना दिसते. गडाचा खेड दरवाजा या पायऱ्यांच्या खालील बाजूस असल्याचे स्थानिक सांगतात पण येथील कडा पहाता ते शक्य वाटत नाही. महिपतगडच्या चहुबाजूंनी तुटलेले कडे असल्याने फारशी तटबंदी उभारलेली दिसत नाही पण जिथे कडा चढण्यास सोपा होता तिथे तटबंदी उभारली आहे. सध्या मात्र ही तटबंदी पडलेली आहे. किल्ल्याचे एकुण बांधकाम, त्यावरील चुन्याचे ढीग तसेच एकही न दिसणारा दरवाजा व किल्ल्याखाली असलेली बेलदार वाडी पहाता हा किल्ला व त्याचे दरवाजे पुर्णपणे बांधुन झाले नसावेत असे वाटते. इतक्या मोठ्या किल्ल्यासाठी अपुरी असणारी पाण्याची सोय हे त्याचे मुख्य कारण असावे. किल्ल्याचे पठार म्हणजे एक जंगलच आहे. बांधकामाची अनेक जोती दाट झाडीमध्ये झाकलेली असून तेथपर्यंत सहज पोहोचता येत नाही. अनेक प्रकारचे अवशेष या झाडीत लपलेले आहेत. या सर्वांचा अभ्यास होणे फार आवश्यक आहे. किल्ल्यावर असलेल्या दाट जंगलामुळे चुकू नये यासाठी स्थानिक वाटाड्या सोबत घ्यावा पण तो पुर्ण किल्ला दाखवेल अशी अपेक्षा ठेऊ नये. गावातील वाटाडे पुसाटी दरवाजा व त्याच्या अलीकडे असलेल्या लालदेवडी दरवाजाकडे जाण्यासाठी नकार देतात व त्यांच्या सोयीसाठी गडाला चारच दरवाजे असल्याचे तुणतुणे वाजवत रहातात. आमच्या सोबत आलेल्या वाटाड्याला आमची भटकंती व दुर्गप्रेम याच्याविषयी काही देणेघेणे नव्हते तर त्याचे नाते फक्त मिळणाऱ्या मानधनाशी होते. त्याने किल्ला दाखवण्यायेवजी आम्हाला शक्य तितक्या कमी वेळात किल्ला फिरवण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्याला दाद दिली नाही हि गोष्ट वेगळी. पुरी गावातुन एक पुजारी शनिवार-रविवार गडावर पुजेसाठी येतात. त्यांना संपुर्ण गड माहीत असुन शक्य झाल्यास त्यांनाच वाटाड्या म्हणुन सोबत घेणे. संपुर्ण गड फिरण्यासाठी एक पुर्ण दिवस हाताशी हवा. थोडक्यात गड फिरण्यास दोन ते तीन तास पुरेसे होतात. शिवकाळात १६६०-६१ च्या दरम्यान महिपतगड स्वराज्यात सामील झाला. इ.स.१६७१सालच्या एका पत्रातील नोंदीनुसार महिपतगडच्या दुरुस्तीसाठी शिवरायांनी ५००० होनांची तरतूद केली होती. महिपतगडचा उल्लेख रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संबंधाने येतो. या किल्ल्याशी संबंधित एक पत्र उपलब्ध असुन त्यात इ.स.१६७६ मध्ये महिपतगड स्वराज्यात असताना दसमाजी नरसाळा हा गडाचा हवालदार होता. महाराजांच्या आज्ञेवरून मोरोपंत पिंगळे यांनी महिपतगडाच्या हवालदाराला ८ ऑगस्ट १६७६ रोजी एक पत्र लिहिले होते. यात श्री रामदास स्वामी हे गडावर रहावयास येतील तेव्हा त्यांची व्यवस्था करण्याविषयी बजावले आहे. जुलै १७०४ मध्ये जंजिऱ्याचा सिद्दी याकुतखान याने हा गड मराठ्याकडून जिंकून घेतला. औरंगजेबने गडाचे नामकरण याकुतगड करत गडावर त्यावर १००० सैनिकांची शिबंदी नेमली. त्यानंतर गड मराठ्यांच्या ताब्यात नेमका केव्हा आला हे कळत नसले तरी गडाचे सुभेदार म्हणुन रामचंद्र बल्लाळ हे भगवंतराव त्रिंबक प्रतिनिधी यांच्या वतीने कामकाज पहात होते. इ.स. १८६२ मध्ये किल्ल्यावर चार तोफा असल्याची नोंद मिळते.
© Suresh Nimbalkar