MAHIPALGAD

   

MAHIPALGAD

TYPE : HILL FORT

DISTRICT : KOLHAPUR

HEIGHT : 3215 FEET

GRADE : EASY

कोल्हापुर-बेळगाव जिल्ह्यांच्या सीमेवर लोकवस्तीत हरवलेला महिपालगड नावाचा गिरीदुर्ग आहे. वाढलेल्या लोकवस्तीमुळे भुइकोटाला येणारी दुर्दशा या गिरीदुर्गाच्या वाटयाला आली आहे. संपुर्ण गाव महीपालगडात वसलेले असल्याने या किल्ल्याचे नाममात्र अवशेष शिल्लक आहेत. महिपालगड कोल्हापूर जिल्हयात असला तरी तिथे जाण्यासाठी जवळचा मार्ग मात्र बेळगाव जिल्ह्यातुन जातो. बेळगाव मधून शिनोळी फाट्यामार्गे पाउण तासात आपण १२ कि.मी. अंतरावरील कोल्हापूर हद्दीतील देवरवाडी या गडपायथ्याच्या गावात पोहचतो. देवरवाडीतून ३ कि.मी.वर वैजनाथ मंदिर व पुढे ३ कि.मी.वर महिपालगड वसला आहे. महाराष्ट्र सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे पण प्राचीन काळात महिपाल नावाच्या राजाने हा गड बांधला व त्याचेच नाव गडाला मिळाले असे गावकरी सांगतात. महिपाल गडाखालील प्राचीन वैजनाथ मंदिर त्यांच्या विधानाला बळकटी देते व हा गड प्राचिन असल्याची ग्वाही देते. ... गडाची ऊंची समुद्रसपाटीपासून ३२२० फुट आहे. देवरवाडी या गावातूनच गडाच्या चढणीला सुरवात होते. अर्धा चढ चढुन आपण प्राचीन वैजनाथ व आरोग्य भवानी मंदिर परिसरात पोहचतो. वैजनाथचे मंदिर एक पुरातन तिर्थक्षेत्र म्हणुन नावाजलेले आहे. श्री गुरुचरित्राच्या १४ व्या अध्यायात या स्थानाचा उल्लेख दक्षिण महाक्षेत्र असा आला आहे. मुख्य मंदिर ११ व्या शतकातील असुन प्रवेशद्वारावर एक शिलालेख आहे. मंदिरासमोर नंदी असुन गाभाऱ्यात शिवलिंग आहे. वैजनाथ मंदिराशेजारी आरोग्य भवानी देवीचे मंदिर असुन, वेगवेगळी असलेली हि दोन्ही मंदीरे नंतरच्या काळात पाठीमागील भिंत घालुन जोडली गेली आहे. काळ्या कातळात बांधलेल्या या दोन्ही मंदिरांची रचना एकसमान असुन मंदिरातील सुंदर व सुबक खांब मंदीराची प्राचीनता दर्शवितात. मंदिराच्या मागे पाण्याचे घडीव दगडाने बांधलेले कुंड असुन या कुंडाच्या आतील भिंतीवर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. मंदिरामागुन जाणारा डांबरी रस्ता आपल्याला महिपालगडावर घेऊन जातो. या वाटेने जाताना डाव्या बाजूच्या डोंगरातील कातळामध्ये प्राचीन गुंफा व भुयारे आहेत. या गुहेच्या आतील बाजुस तीन दालने असुन मधील दालनाच्या १० ते १५ फुट आत एक चौकोनी आकाराची खोली आहे. डावीकडच्या गुहेमधे प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस अजुन एक छोटी गुहा आहे. पुढे ही गुहेतील वाट समोरून दिसणा-या गुहेच्या मागच्या भागात घेऊन जाते. तिथे एक ध्यान गुंफा असुन एक शिवलिंग व त्रिशुळ तिथे आहे. गुहेची उंची ४ ते ५ फुट असून आत जाताना विजेरी आवश्यक आहे या गुहेत पाणी भरलेले असुन मोठ्या प्रमाणात वटवाघुळे आहेत. या गुहेतुन बाहेर पडल्यावर उजव्या बाजूच्या गुहेमधे खाली उतरत जाणा-या पाय-या असून ४० पाय-या उतरून गेल्यावर डावीकडे पाण्याची विहीर आहे. या कातळावरील पठारावर भारतीय सैन्यदलाचा नियमित युध्द सराव चालू असतो. गुहा पाहुन पुन्हा मागे फिरुन रस्त्यावर यावे. या डांबरी वाटेने आपण गडावरील गावात पोहचतो. हा गाडीरस्ता किल्ल्यातून गेलेला असुन गडावर वरपर्यंत गाडी जाते. गडावरील वस्ती सुरु होण्यापुर्वी आपणास उध्वस्त तटंबदी प्रवेशद्वाराचे अवशेष व तटबंदीचे विखुरलेले दगड दिसतात. येथून पुढे आल्यावर वाटेच्या उजव्या बाजुस शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा दिसतो. गावात शिरल्यावर वस्तीमधुन जाणाऱ्या लहान रस्त्याने चालत पुढे आल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या उत्तराभिमुख दरवाजात पोहोचतो. हा दरवाजा आजही चांगल्या स्थितीत असुन कमानीच्या वरील बाजुस गणेशशिल्प कोरले आहे. या शिल्पाची मोठया प्रमाणात झीज झालेली आहे. बालेकिल्ल्याचा हा भाग तटबंदीने माचीपासून वेगळा केलेला आहे. दरवाजातून आत आल्यावर काही काही अंतरावर कातळात खोदलेली प्रचंड मोठी व खोल विहिर आहे. गडाच्या बांधकामात वापरला गेलेला दगड याच विहिरीतुन काढला गेला असावा. या विहीरीत उतरण्यासाठी दगडात पायरीमार्ग कोरला असुन दुसऱ्या बाजुस रहाटाने पाणी काढण्याची सोय केली आहे. या विहिरीमागे काही अंतरावर अंबाबाई मंदिर असुन तेथुन उजव्या बाजुने पुढे गेल्यावर अलीकडेच संवर्धन केल्याने सुस्थितीत असणारा निशाण बुरुज लागतो. या बुरुजावर चढण्यासाठी पायऱ्या असुन बुरुजाजवळ नव्याने बांधलेले शिवमंदिर आहे. या तटबंदीच्या काठाने फेरी मारत सरळ पुढे गडाचे दुसऱ्या टोकावर जाताना गेल्यावर तटातून खाली जाणारा रस्ता दिसतो. या रस्त्याने पुढे गेल्यावर जांभ्या दगडात खोदलेली (सध्या ढासळलेली) काही कोठारे दिसतात. वाटेच्या पुढील भागात दोन बुरुजात बांधलेला नामशेष झालेला दरवाजा दिसतो. गडाची बहुतांशी तटबंदी ढासळलेली असुन त्यातील बुरुज उध्वस्त झाले आहेत. या तटबंदीत काही ठिकाणी शौचकुप पहायला मिळतात. गडावरील लोकांनी तटावर गवताच्या गंज्या रचल्याने व शौचालय बांधल्यामुळे तटबंदीची अवस्था फार बिकट झाली आहे. गडावरील काही घरासमोर आपल्याला ढोणी म्हणजेच जुन्या काळातील पाणी भरुन ठेवण्याची दगडी भांडी दिसतात. आल्या वाटेने परत जाताना आपल्याला अजून एक उध्वस्त बुरुज दिसतो. या बुरुजाशेजारी आपल्याला दगडात खोदलेले आयताकृती आकाराचे मोठे कोरडे टाके दिसुन येते. सध्या या टाक्यात मोठया प्रमाणात गवत साठवले जात असल्याने पुढील काळात हे टाके बुजण्याची शक्यता आहे. या बुरुजावरून नजर फिरविली असता गडाचा पुर्ण पसारा नजरेस पडतो. याशिवाय गडाच्या उत्तर भागात पिण्याच्या पाण्याची एक विहीर दिसून येते. गडातून बाहेर पडताना तटबंदी बारकाईने पहिली असता गडातील सांडपाणी वाहून गडाबाहेर टाकणारी पाईपची तोंडे नजरेस पडतात. महिपालगड हे पुर्ण गावच गडावर वसलेले असुन वस्तीने गड व्यापून टाकला आहे. संपुर्ण गड फिरण्यासाठी २ तास पुरेसे होतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!