MAHADAGAD

TYPE : HILL FORT

DISTRICT : NAGPUR

HEIGHT : 1320 FEET

GRADE : EASY

महाराष्ट्रातील एक भौगोलिक प्रदेश म्हणजे विदर्भ. विदर्भातील किल्ल्यांचा इतिहास जरी सातवाहन काळापर्यंत जात असला तरी आज आपल्याला पहायला मिळणारे बहुतांशी किल्ले हे गोंड राजसत्तेच्या काळात म्हणजे इ. स. १२-१३ व्या शतकात बांधलेले आहेत. गोंड राजसत्तेने बांधलेला असाच एक अपरीचीत गिरीदुर्ग आपल्याला नागपुर जिल्ह्यात पहायला मिळतो. नागपुर जिल्ह्यातील किल्ले म्हटले कि आपल्याला रामटेक, नगरधन व सिताबर्डी हे तीन किल्ले सांगितले जातात पण या तीन किल्ल्यांव्यतिरिक्त आपल्याला भिवगड, जलालखेडा, उमरेड, डोंगरतळा,महादागड यासारखे अपरिचित किल्ले देखील पहायला मिळतात. विदर्भाच्या पश्चिमेकडे म्हणजे नागपुर भागात गरमसूर, पिलकापार, महादागड या टेकड्या आहेत. यातील महादागड डोंगररागेवर आपल्याला महादागड हा गिरीदुर्ग पहायला मिळतो. नागपुर-अमरावती महामार्गावर नागपुर शहरापासुन केवळ ३५ कि.मी. अंतरावर असलेला हा किल्ला आजही पुर्णपणे अपरीचीत असुन स्थानिक लोक याला गोंड राजाचा किल्ला म्हणुन ओळखतात. ... महादागड किल्ल्यास भेट देण्यासाठी आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले खैरी गाव गाठावे लागते. खैरी हे गाव नागपूर शहरापासुन ३५ कि.मी.अंतरावर असुन नागपुर-अमरावती महामार्गापासून २ कि.मी.आत आहे. सार्वजनिक वाहनाचा वापर केल्यास हे अंतर पायी पार करावे लागते. या वाटेने जाताना उत्कर्ष कागद कारखाना लागतो. येथून सरळ पुढे आल्यावर एका वळणावर झाडाखालील चौथऱ्यावर देवतांचे तांदळा मांडलेले असुन मध्यभागी कोरीव नागमुर्ती स्थापन केलेली आहे. येथुनच गडावर जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने साधारण ५ मिनिटे चालत गेल्यावर एक ओढा आडवा येतो. हा ओढा पार करून गेल्यावर ५ मिनिटात आपण वनखात्याच्या लोखंडी फाटकापाशी पोहोचतो. पावसाळा वगळता खाजगी वाहनाने येथवर जाता येईल. येथुन डावीकडे गडावर जाण्यासाठी मळलेली पायवाट आहे. या वाटेने थोडे पुढे आल्यावर दरगाह शरीफ जाण्याचा मार्ग असा फलक लावलेला असुन हि मळलेली वाट आपल्याला थेट गडावर घेऊन जाते. दाट जंगलातून जाणारी हि वाट चांगली मळलेली असुन जागोजागी झाडांना दर्ग्यावरील चादरी खुणेसाठी बांधलेल्या असल्याने चुकण्याची शक्यता नाही. वाटेवर जागोजागी दिसणारी काळविटांची विष्ठा पहाता शांतपणे गेल्यास ते सहजपणे नजरेस पडतील. या वाटेने साधारण १० मिनिटे चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या भग्न तटबंदीपाशी पोहोचतो. गडाच्या तिन्ही बाजुस खोल दरी असुन केवळ हा भाग जमीनीशी थेट जोडलेला असल्याने या भागात दरीच्या दिशेने तटबंदी बांधलेली आहे. साधारण ८-१० फुट रुंद असलेली हि तटबंदी सध्या ५-६ फुट उंच असुन बहुतांशी गाडली गेली आहे. तटाच्या आसपास मोठ्या प्रमाणात झाडी असुन वाढलेल्या झाडांमुळे तटबंदी झाकली गेली आहे. त्यातील दरवाजाचा शोध घेणे जिकीरीचे आहे. तुटलेल्या तटबंदीमधुन आत शिरल्यावर सरळ जाणारी वाट आपल्याला बालेकिल्ल्याच्या दिशेने नेते. या भागात मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने येथील वास्तु अवशेष या झाडीत लपलेले आहेत. थोडे पुढे आल्यावर उजवीकडे शेंदूर फासलेला दगड असुन त्या शेजारी चादर अंथरलेला सिमेंट चौथरा आहे. येथून बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी उभा चढ सुरु होतो. या वाटेवर काही ठिकाणी घडीव दगडात पायऱ्या बांधलेल्या असुन वरील बाजुस दरीच्या काठावर असलेली गडाची तटबंदी नजरेस पडते. या वाटेने आपण बालेकिल्ल्याच्या भग्न दरवाजात पोहोचतो. वनखात्याच्या फाटकापासून येथे येण्यास अर्धा तास पुरेसा होतो. दरवाजाची दगडी चौकट आजही शिल्लक असुन त्यावरील कमान मात्र पुर्णपणे नष्ट झालेली आहे. गोंड राजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे कोरीव काम असलेले प्रवेशद्वार पण किल्ला दुर्लक्षित असल्याने व किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने ते मात्र येथे पाहायला मिळत नाही. संपूर्ण किल्ल्याची तटबंदी रचीव दगडांची असुन आजही सुस्थितीत आहे. दरवाजाच्या आतील बाजुस फरसबंदी पायवाट असुन आता ती मातीत गाडली गेली आहे. दरवाजाच्या आतील बाजुस उजवीकडे काही अंतरावर तटबंदी बाहेर कातळात कोरलेले पाण्याचे टाके पहायला मिळते. तटबंदीचा एक भाग वगळता संपुर्ण तटावरुन फेरी मारता येते. बालेकिल्ल्याच्या मध्यभागी पत्र्याच्या निवाऱ्यात थडगे बांधलेले असुन त्याच्या आसपास घडीव दगड विखुरलेले आहेत. मोठ्या प्रमाणात असलेले हे घडीव दगड पहाता येथे गडाची मुख्य वास्तु असावी. येथुन डावीकडील उतारावर तटाजवळ गडदेवतेचे उध्वस्त ठिकाण आहे. या मंदिराजवळच गडाखाली उतरणारा दुसरा मार्ग आहे. गडमाथ्यावरील झाडीतुन गडफेरी करताना तुरळक वास्तु अवशेष नजरेस पडतात. गडाचा माथा साधारण २ एकरवर पसरलेला असुन समुद्र सपाटीपासून १३२० फुट उंचावर आहे. माथ्यावरून दुरवर पसरलेले घनदाट जंगल नजरेस पडते. केवळ डोंगरच नव्हे तर किल्ल्याच्या आसपास असणारे घनदाट जंगल हे देखील किल्ल्याचे बलस्थान आहे. खैरी गावातुन किल्ला पाहुन परत जाण्यासाठी तीन तास पुरेसे होतात. गोंड राजवटीचा उदय इ. स. १३ व्या शतकाच्या मध्यार्धात पूर्व विदर्भात झाला व त्यांनी या प्रदेशावर आपली सत्ता स्थापन केली. गोंड राजांनी या भागावर जवळजवळ ४०० वर्षे राज्य केले. त्यामुळे त्यांनी बांधलेले किल्ले या भागात जास्त प्रमाणात आढळतात. बल्लारशहा, चंद्रपूर आणि नागपूर ही शहरे त्यांची राजधानीची ठिकाणे होती. अमरावतीहून नागपुर या राजधानीकडे येणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी महादागड या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली असावी. गोंड राजांनी सुरुवातीपासून मुस्लीम राजवटीचे मांडलिकत्व पत्करल्यामुळे त्यांना फार कमी प्रमाणात युद्धाला सामोरे जावे लागले. नागपूरकर भोसल्यांनी १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात विदर्भावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून अनेक किल्ल्यांचे नुतनीकरण केल्याचे उल्लेख सापडतात पण महादागडचा संदर्भ काही मिळत नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!