Mahabaleshwar- Krishnabai MANDIR
TYPE : ANCIENT SHIVMANDIR
DISTRICT : SATARA
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण तसेच पर्यटन स्थळ आहे. इतिहासात डोकावले असता यादव कालापासूनच महाबळेश्वरचा उल्लेख मिळतो. तेथील जुने महाबळेश्वर हे क्षेत्र महाबळेश्वर या नावानेही ओळखले जाते. क्षेत्र महाबळेश्वर येथे अतिप्राचीन असे श्री महाबळेश्वर, श्री पंचगंगा आणि श्री कृष्णादेवी यांचे भव्य देवालय आहे. महाबळेश्वराला पर्यटनासाठी येणारा प्रत्येक हिंदू श्री महाबळेश्विर, श्री पंचगंगा देवालयाला भेट देतात, परंतु श्री महाबळेश्वर देवालयाच्या मागच्या भागात असलेल्या श्रीकृष्णामाईच्या देवालयात मात्र कमी प्रमाणात पर्यटक जातात. श्री कृष्णामाईचे देवालय म्हणजे कृष्णानदीचे उगमस्थान आहे. कृष्णा नदीचा उगम येथे झालेला असुन ती महाराष्ट्, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वहाते. महाबळेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात रुद्राक्षरूपी श्री शंकराच्या पिंडीच्या मस्तकावर पाच नद्यांचे वास्तव्य आहे.
...
बारा महिने तेवढेच पाणी असते, त्या प्रवाही नाहीत व तेथूनच गुप्त होतात व नंतर महाबळेश्वर मधील पुराणकालीन महादेव मंदिराचे जवळील गोमुखातून उगम पावतात अशी कथा आहे. याची अशीही दंतकथा आहे की सावित्रीने विष्णुला शाप दिला आणि विष्णूची ही कृष्णा झाली. शिवाय हिच्या वेण्णा आणि कोयना या उपनद्या म्हणजे शिव आणि ब्रम्हा आहेत. येथून बाहेर पडल्यानंतर कृष्णा नदी स्वतंत्र वहाते. येथील एका कड्यावर सर्वात प्राचीन असे हेमांडपंथी शिवमंदिर आहे. त्यात ठेवलेल्या कृष्णेच्या मुर्तीमुळे त्याला कृष्णाबाई मंदिर असेही म्हणतात. या मंदिराच्या बाहेरच्या बाजूस तसेच मुख्य खांबावरती नागप्रतीमा कोरल्या आहेत. कृष्णेच्या पुढे पितृमुक्ती कुंड, अरण्यकुंड व मलापटतीर्थ ही कुंडे आहेत. पितृमुक्ती कुंडावर सध्या क्रियाकर्म विधी केले जातात. येथे कृष्णा नदी प्रकट होते व खोऱ्यात उतरते. १३ व्या शतकात इ.स १२१५ मध्ये सिंघन या देवगिरीच्या यादव राजाने या देवालयाची निर्मिती केली आहे. संपूर्ण देवालय दगडांपासून बनविलेले आहे. पूर्ण मंदिराचे छतासह दगडी बांधकाम हे विशेष वैशिष्ट्य आहे. तेथील गर्भगृहात भव्य शिवलिंग आहे. त्याच्या खालून पाण्याची सतत धार चालू असते. येथूनच कृष्णेचा उगम झाला आहे. गर्भगृहासमोर एक कुंड आहे. त्या कुंडात गोमुखातून अखंडितपणे पाण्याची धार वाहत असते. तीच पुढे नदीरूपाने वाहत जाते. गोमुखातून वाहणारे हे पाणी म्हणजे चैतन्यमय तीर्थ आहे. या देवळासमोर मनमोहक असा नैसर्गिक देखावा आहे. या देवालयाच्या मागच्या बाजूने कळस आणि भिंतीच्या भागाची पडझड झालेली आहे. वर्षभरात लाखो पर्यटक महाबळेश्वयर येथे येतात, परंतु त्यातील अल्प लोक श्री कृष्णामाईच्या देवालयाला भेट देतात कारण येथील मुख्य दर्शनीय स्थळांमध्ये श्री कृष्णामाईच्या देवालयाचे नाव नाही तसेच देवालयापर्यंत जाणारा मार्ग कच्चा मातीचा व काही ठिकाणी कच्च्या पायऱ्याचा आहे. प्रत्यक्ष देवळाच्या परिसरात प्रवेश करण्यासाठीच्या पायऱ्याही केवळ दगड रचून केलेल्या आहेत. श्री कृष्णामार्इ देवळाकडे जाण्यासाठी अरुंद वाट असुन स्थानिक मार्गदर्शक पर्यटकांना तेथपर्यंत नेत नाहीत. मंदिराजवळ अथवा मार्गात कोठेही या वास्तुची माहिती सांगणारा कोणताही फलक लावलेला नाही. भारतीय पुरातत्व खात्याकडे देशभरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याची जबाबदारी असुन ते प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळे अन् देवालये स्वत:च्या ताब्यात घेण्याचेच काम करत आहे, परंतु प्राचीन इतिहासाचे वैभवाचे प्रतीक असलेल्या या स्थळांच्या देखरेखीविषयी मात्र उदासीनता दाखवत आहे. महाबळेश्वर येथील श्रीकृष्णामाईचे देवालय पुरातत्व विभागाकडून अत्यंत दुर्लक्षिले गेलेले आहे. आपण आपल्या अस्मितेची प्रतीके असलेल्या स्थळांचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी पुरातत्व विभागाकडे आग्रह धरायला हवा. ऐतिहासिक स्रोत असलेली स्थळे नष्ट होण्यापूर्वी जागृत होऊन आपल्या लक्षात आलेली आणि पुरातत्व खात्याद्वारे दुर्लक्षिलेली वास्तू संदर्भातील माहिती लोकांसमोर आणावी यासाठी हा छोटासा प्रयत्न!
© Suresh Nimbalkar