MAGATHANE

TYPE : BUDDHIST LENI

DISTRICT : MUMBAI

मागाठाणे लेणी ही इ.स.सहाव्या शतकात कोरलेली महायान पंथांची बौद्ध लेणी आहेत. मुंबईतील बोरीवली रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस बाहेर पडल्यानंतर दत्तपाडा मार्गावरून मागाठाणेच्या दिशेला जाताना टाटा स्टीलच्या आधी उजवीकडे असलेल्या बैठ्या वस्तीमध्ये काहीशा आतल्या बाजूस ही लेणी पाहायला मिळतात. या वस्तीचे नाव बाळू निवास चाळ असे आहे. तिथे कित्येक वर्षे राहणाऱ्या स्थानिक लोकांनाही ही लेणी माहीत नाही किंवा माहित असूनही ते सांगत नाहीत. पूर्वीचे मागाठाणे आणि आताचे मागाठाणे यात फरक आहे. सध्या पश्चिम द्रुतगती मार्गाच्या एका बाजूस मागाठाणे बस डेपो आहे त्या परिसरालाच मागाठाणे म्हटले जाते. मात्र त्याच्या अलीकडे बोरिवलीच्या दिशेने जो भाग आहे तोही पूर्वी मागाठाणे म्हणूनच ओळखला जायचा. कान्हेरीच्या लेणींशी तर या लेणीचा घनिष्ठ संबंध आहे. ... ह्या परिसराचा उल्लेख कान्हेरी लेण्यांपैकी २१ क्रमांकाच्या लेण्यातील शिलालेखात 'इथूनच जवळ असलेल्या मग्गठाणे येथील अधेलीची जमीन कल्याण येथील व्यापारी अपरेणुकाने कन्हगिरीच्या या बौद्धभिक्खू संघाला दान दिली असून त्यातून येणाऱ्या उत्पन्नाचा वापर या भिक्खूसंघाच्या निर्वाहासाठी करण्यात यावा असा केला आहे. कान्हेरीच्या शिलालेखांमध्ये असलेल्या त्या जमिनीच्या बाजूला पाचव्या-सहाव्या शतकामध्ये या लेणींची निर्मिती करण्यात आली. लेणी असलेल्या परिसराला पूर्वी मागाठाणे असे म्हणत. मुळात या लेणींवरूनच त्या परिसराला हे नाव मिळाले आहे. मग्गस्थानक पासून अपभ्रंश होत त्याचे मग्गठाणे आणि नंतर मागाठाणे असे झाल्याचे मानले जाते. काहींच्या मते मग्ग म्हणजे मार्ग आणि त्यावर थांबण्याचे ठिकाण म्हणजे ठाणे होय. कारण कोणतेही असले तरी मागाठाणे हे प्राचीन ठिकाण आहे. मागाठाणे लेणी या पोईसर लेणी या नावानेही ओळखल्या जातात. पोईसर हे मागाठाणेच्या वेशीला लागून असलेले गाव आहे आणि ते या लेणींपासून तुलनेने जवळ आहे. या लेणींचा उल्लेख बॉम्बे गॅझेटिअरमध्येही सापडतो. बॉम्बे गॅझेटिअरमधील उल्लेखानुसार आजूबाजूला दाट हिरवी झाडी असल्याने त्या बाहेरून दृष्टीस पडत नाहीत असा आहे. आजही लेणी बाहेरून नजरेस पडत नाहीत फरक इतकाच की हिरव्या झाडीची जागा आता झोपडय़ानी घेतली आहे. लेणींची अवस्था कल्पनेपेक्षा भयानक आहे. लेणीचा ताबा स्थानिक लोकांनी घेतला असुन त्यांनी लेणी चक्क सिमेंटच्या भिंती बांधून बंद करून टाकली आहे. लेणीच्या आत दोन कुटुंबे रहात असुन लेण्यांना लाकडी दरवाजे लावले आहेत. लेणींचा दर्शनी भाग सिमेंटने बंदिस्त करून तिथे लोखंडी ग्रीलच्या खिडक्या लावण्यात आल्या आहेत. थोडक्यात लेण्याची ओळख पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहे. आत जाण्यासाठी प्रवेश नसल्याने माहितीसाठी एम. जी. दीक्षित यानी १९५०च्या दशकात पीएचडीसाठी लिहिलेल्या शोध प्रबंधाचा आधार घेतला आहे. लेण्याची अंतर्गत माहिती मिळण्याचा इतर कोणताही स्त्रोत उपलब्ध नाही. शोध प्रबंधाप्रमाणे ’मागाठाणे हे प्रामुख्याने शेतकऱ्यांचे आणि पशुपालकांचे गाव असून अनेकांनी पोर्तुगिजांच्या कालखंडामध्ये म्हणजेच १७ व्या शतकात ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला दिसतो. जोगेश्वरीच्या लेणींचा विशेष म्हणजे तिथे लेणी खाली आणि जमीन खूप वर आहे तसेच चित्र आपल्याला मागाठाणे लेणींमध्येही पाहायला मिळते. येथील विहाराच्या छताचा काही भाग पडल्याचे दीक्षितांची नोंद वाचताना लक्षात येते. आजूबाजूचा पहाता असे लक्षात येते की इथे मध्यभागी मोठ्या सभागृहाप्रमाणे असलेला भाग होता. त्याची लांबी-रुंदी सुमारे पंचवीस बाय सहा फुटांची असावी. लेणींच्या पूर्वेकडील बाजूस व्हरांडा असून तिथे असलेल्या स्तंभांवर डबल क्रिसेंट पद्धतीचे अलंकरण आहे. अशा प्रकारचे अलंकरण कोकणातील कुडा आणि कान्हेरी या अगदी सुरुवातीच्या काळातील लेणींमध्ये पाहायला मिळते. डावीकडच्या बाजूस या लेणींचे मुख्य प्रवेशद्वार असून तिथे दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या होत्या. त्यावर दगडी झाकणेही होती. हि दगडी झाकणे आता गायब असुन ह्या दोन्ही टाक्या सध्या घाणीने भरलेल्या दिसतात. हा भाग स्वच्छ केला तर त्या कुंडातून निघणाऱ्या घाणीमध्येही अनेक पुरातन अवशेष सापडतील असे पुरातत्त्व तज्ज्ञांना वाटते. आतमध्ये असलेल्या चैत्यामध्ये सहा ते सात स्तंभांवर शंखाकृती रचना असून त्यावर फारसे अलंकरण नाही. सहाव्या शतकातील लेणींचा हा विशेष इथे पाहायला मिळतो. इथे एक सर्वात महत्त्वाचे चैत्यही आहे. किंबहुना ते या लेणींमधील सर्वात महत्त्वाचे लेणे आहे असे म्हणता येईल. हे आकारानेही सर्वात मोठे असून लेणींच्या वायव्येस आहे असा उल्लेख गॅझेटिअरमध्ये सापडतो. दीक्षितांनी ही नोंद केली त्या वेळेस या चैत्यामध्ये बाहेरच्या बाजूने आतमध्ये पाण्याची मोठी गळती सुरू होती. दीक्षित त्यांच्या नोंदीमध्ये लिहितात ’हे चैत्य म्हणजे एक मोठे चौकोनी आकाराचे सभागृह असून त्याच्या दोन्ही बाजूला बसण्यासाठी बाकासारखे दगडी बांधकाम करण्यात आले आहे. समोरील भिंतीच्या एका बाजूला पद्मासनात बसलेल्या गौतम बुद्धाची शिल्पाकृती पाहायला मिळते. शिल्पाकृतीचा मधला काही भाग पडलेला आहे. तर या मोठ्या बुद्ध शिल्पाकृतीच्या दोन्ही बाजूस हातात मोठे कमळपुष्प घेतलेल्या अवलोकितेश्वराची शिल्पाकृती होती. ती आता धूसर दिसते. या बुद्धमूर्तीच्या दुसऱ्या बाजूस धर्मचक्र मुद्रेमधील ध्यानमग्न बुद्धाच्या विविध पाच छोटेखानी शिल्पाकृती दिसतात. इथे असलेली तोरणाची कलाकृती अप्रतिम असून त्यावर उत्तम कोरीव काम करण्यात आल्याचे दीक्षितांनी म्हटले आहे. या चैत्यामध्ये असलेल्या तोरणाची तुलना दीक्षितांनी वेरुळच्या नक्षीकामाशी केली आहे. ते लिहितात. ’त्यावर हत्ती, मकर, उडणाऱ्या अप्सरा अतिशय उत्तम पद्धतीने कोरलेल्या आहेत. वेरुळमधील विश्वकर्मा लेणींशी समांतर जाणारी अशी ही कलाकृती आहे’ येथील शिल्पाकृतींवरून या लेणींची निर्मिती सहाव्या शतकात झाल्याचे दीक्षितांनी लिहिले आहे. पश्चिम महाराष्ट्रात अजंठा-वेरुळशी नाते सांगणाऱ्या लेणी फारशा नाहीत म्हणून अवस्था कशीही असली तरीही मागाठाणे लेणींची जपणूक होणे महत्त्वाचे आहे!
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!