MADHUMAKRANDGAD
TYPE : HILL FORT
DISTRICT : SATARA
HEIGHT : 4038 FEET
GRADE : EASY
जावळीच्या घनदाट जंगलात वासोटा आणि प्रतापगड यांच्या मध्यावर वसलेली दुर्गजोडी म्हणजे मधुमकरंदगड. घाटावरून कोकणात उतरणाऱ्या हातलोट घाटाच्या रक्षणासाठी या किल्ल्याची निर्मीती करण्यात आली असावी. फारशी प्रसिद्धी नसलेली व जावळीच्या घनदाट जंगलात लपलेली हि दुर्गजोडी त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी करावी लागणारी यातायात यामुळे सामान्य पर्यटकांच्या कुवतीबाहेर आहे. इतकेच नव्हे तर नेहमी दुर्गभ्रमंती करणारे दुर्गप्रेमी देखील या किल्ल्यास फार कमी प्रमाणात भेट देतात. मधु-मकरंद हे जोड किल्ले पूर्व- पश्चिम पसरलेल्या डोंगरावर वसलेले असुन पुर्वेच्या शिखरावर मकरंदगड तर पश्चिमेच्या शिखरावर मधुगड आहे. मधुमकरंदगडाच्या माचीवर घोणसपूर हि २०-२२ घरांची जंगम लोकांची वस्ती असुन चतुर्बेट व हातलोट हि किल्ल्याच्या पायथ्याशी दोन दिशांना असणारी गावे आहेत. या दोन्ही गावातुन किल्ल्यावर जाण्यासाठी मळलेल्या वाटा आहेत. हातलोट गावातुन किल्ल्यावर जायचे असल्यास दाट जंगलातुन दीड तास उभा डोंगर चढुन किल्ल्याच्या माचीवर असलेल्या घोणसपूर गावात यावे लागते तर चतुर्बेटमार्गे घोणसपूर गावात जाण्यासाठी कच्चा गाडीमार्ग आहे. या रस्त्याने घोणसपूर गावातुन थेट गडाच्या पायथ्याशी असलेल्या मल्लिकार्जुन मंदिरापर्यंत जाता येते पण यासाठी जीप सारखे वाहन सोबत असायला हवे.
...
महाबळेश्वरहून चतुर्बेट हे गाव ३१ कि.मी. अंतरावर आहे . महाबळेश्वर - पोलादपूर रस्त्यावर महाबळेश्वर पासून १५ किलोमीटरवर डाव्या बाजूला एक रस्ता जातो या ठिकाणी एक कमान असून रामवरदायिनी मंदिर , पार असे यावर लिहिलेले आहे. हा रस्ता थेट चतुर्बेट गावापर्यंत जातो. चतुर्बेट गावाच्या पुढे घोणसपूरला जाणारा ६ कि.मी. कच्चा रस्ता आहे. जीपसारखे वाहन सोबत असल्यास किल्ल्यावर जाण्यासाठी करावी लागणारी बरीच पायपीट वाचते. चतुर्बेट गावातुन किल्ला नजरेस पडत नसला तरी घोणसपूर गावात प्रवेश करताच समोरील डोंगरावर असलेली मधु-मकरंद शिखरे आपले लक्ष वेधुन घेतात. किल्ल्याच्या माचीवर असलेले घोणसपूर गाव म्हणजे कधीकाळी किल्ल्याचे मेट असावे. गावाबाहेर काहीशा उंचीवर मल्लिकार्जुन मंदिर असुन दाट वनराईत लपलेले हे मंदिर म्हणजे सह्याद्रीतील मुक्कामाचा आनंद घेण्यासाठी योग्य ठिकाण आहे. शिवकाळापुर्वी चंद्रराव मोऱ्यांनी ज्या सात शिवपुरी निर्माण केल्या त्यातील एक शिवपुरी म्हणजे हे मल्लिकार्जुन मंदिर. दगडी बांधणीचे हे कौलारू मंदिर मध्ययुगीन काळातील असुन मंदिराच्या आवारात एक विरगळ व झीज झालेल्या काही मुर्ती पहायला मिळतात. मंदिराच्या गाभाऱ्यात चौकोनी आकाराचे शिवलिंग असुन त्यामागे भैरवाची मुर्ती आहे. मल्लिकार्जुन मंदिराजवळून गडमाथ्यावर जाण्यासाठी प्रशस्त पायवाट असुन किल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी नसल्याने गावातुन पुरेसे पाणी सोबत घेऊन गड चढण्यास सुरवात करावी. प्रशस्त पायवाटेने मकरंदगडाखालील धारेवर आले असता समोर मधु व मकरंदगडाची शिखरे आणि त्यांना जोडणारी डोंगरसोंड दिसुन येते. या डोंगरधारेवरुन १५ मिनिटाचा चढ चढुन आपण किल्ल्याच्या उध्वस्त दरवाजात पोहोचतो. किल्ल्याचा दरवाजा हा कातळ फोडून निर्माण केलेला असुन त्याच्या शेजारच्या कातळाला दगडांनी बंदीस्त करून बुरुज बांधले आहेत. या सर्व बांधकामाची आता बहुतांशी पडझड झालेली आहे. दरवाजाने वर आल्यावर दोन वाटा असुन डावीकडील वाट किल्ल्याच्या माथ्यावर जाते तर उजवीकडील वाट डोंगराला वळसा घालून किल्ल्याच्या मागील बाजुस जाते. आपण डावीकडील वाटेने गड चढण्यास सुरवात करावी. या वाटेने वर आल्यावर डावीकडे सोंडेच्या टोकावर कातळात कोरून काढलेला व थोडेफार बांधकाम असलेला लहान बुरुज आहे. बुरुज पाहुन पुढे आल्यावर वाटेवर सतत वहाणाऱ्या वाऱ्यामुळे जमिनीवरील कातळात तयार झालेले एक नेढे पहायला मिळते. एक माणुस ओणवा होऊन यातुन ये-जा करू शकेल इतपत त्याचा आकार आहे. येथेच डावीकडे कड्याला लागुन एक वाट पुढे जाताना दिसते. मुख्य वाट सोडून या वाटेने थोडे पुढे गेले असता कातळात कोरलेले व मातीने अर्धवट बुजलेले कोरडे टाके दिसते.बांधकामासाठी दगड काढल्याने हे टाके निर्माण झाले असावे. येथे डावीकडे कड्याच्या पोटात एक गुहा असुन तिथे जाण्याची वाट मात्र मोडलेली आहे. टाके पाहील्यावर मुख्य वाटेवर परतुन आपली पुढील गडफेरी सुरु करावी. वाटेवर काही उध्वस्त घरांचे चौथरे नजरेस पडतात. शेवटच्या टप्प्यात गडाच्या माथ्यावर प्रवेश करताना ८-१० पायऱ्या असुन येथे कधीकाळी दरवाजा असावा. या पायऱ्या चढुन आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. गडमाथा समुद्रसपाटीपासून ४०३८ फुट उंचावर असुन पुर्वपश्चिम साधारण पाउण एकरवर पसरलेला आहे. माथ्यावर प्रवेश केल्यावर समोरच श्री मल्लिकार्जुन शंकराचे मंदिर असुन त्यासमोर पत्र्याचा निवारा उभारून त्यात नंदीची स्थापना केलेली आहे. मंदीरात तांब्याचा नाग बसविलेले शिवलिंग असुन त्यामागे काळ्या पाषाणातील मल्लिकार्जुनाची मूर्ती आहे. गडमाथ्यावर असणारी थोडीफार सपाटी या मंदिराच्या आसपास आहे. मंदिरा समोर एक उध्वस्त वास्तुचा चौथरा असुन त्यावर समाधी बांधलेली आहे. मंदीराच्या मागील बाजुस गडाची निमुळती डोंगरसोंड असुन कोणतेही अवशेष नाहीत. सावधगिरी बाळगुन या सोंडेच्या टोकावर गेले असता मधुगडाचे सुंदर दर्शन होते. गडाच्या माथ्यावरून पूर्वेला कोयना खोरे व महाबळेश्वराचे दर्शन होते तसेच प्रतापगड, महिपतगड, सुमारगड,रसाळगड, मंगळगड, महिमंडणगड हे किल्ले नजरेस पडतात. गडमाथा पाहुन झाल्यावर मंदीराच्या उजवीकडील मळलेल्या पायवाटेने गड उतरण्यास सुरवात करावी. या वाटेवर काही ठिकाणी पायऱ्या बांधलेल्या असुन साधारण १००-१२५ फुट खाली उतरल्यावर समोरच कातळात कोरलेले पाण्याचे टाके नजरेस पडते. या टाक्यात पाणी असले तरी ते वापरात नसल्याने पिण्यायोग्य नाही. हे टाके बारा खांबावर तोललेले असुन टाक्याच्या दर्शनी भागात कातळावर कोरलेले हनुमानाचे शिल्प आहे. हे खांबटाके गडाच्या प्राचिनत्वावर शिक्कामोर्तब करते. या टाक्याकडून पुढे जाणारी वाट गडाचे दुसरे शिखर म्हणजे मधुगडावर जाते. सध्या हि वाट वापरात नसल्याने ठिकठीकाणी मोडलेली आहे. वाट मोडल्यामुळे मधु गडमाथ्यावर जाण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने गिर्यारोहण साहीत्य आणि दोर वापरणे आवश्यक आहे. मधुगडच्या माथ्यावर तीन कोरडी टाकी आणि एक दोन घरांची जोती वगळता इतर कोणतेही अवशेष नाहीत. खांब टाक्याकडून मागे फिरणारी वाट आपल्याला गडावर प्रवेश केलेल्या ठिकाणी घेऊन जाते. या ठिकाणी डावीकडे वळुन आपण गड चढण्यास सुरवात केली होती. या वाटेने परत फिरल्यावर डावीकडे दरीत असलेले हातलोट गाव एखाद्या चित्राप्रमाणे भासते. पुढे उजव्या बाजुस कड्यात कोरलेले एक फुटके टाके असुन या टाक्याच्या वरील बाजुस एक लहान गुहा कोरलेली आहे. गडाच्या दरवाजात आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ला पहाण्यासाठी दीड तास पुरेसा होतो. मधुमकरंदगड नेमका कोणी उभारला हे ठाऊक नसले तरी गडावर असलेले खांबटाके पहाता गड प्राचीन काळापासुन अस्तित्वात असावा. शिवकाळापुर्वी शिर्के आणि त्यानंतर हा प्रदेश जावळीच्या मोऱ्यांच्या ताब्यात होता. जावळीमध्ये पराभव झाल्यावर चंद्रराव मोरे मकरंद गडाखाली असलेल्या कोंडनाळेच्या वाटेने खाली उतरून रायगडाकडे गेल्याचे उल्लेख येतात. इ.स.१६५६ मधे जावळी ताब्यात घेतल्यानंतर हा गड शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. सातारा जिल्हा गॅझेटिअरप्रमाणे हा गड शिवाजी महाराजांनी बांधल्याचा उल्लेख येतो पण सभासद बखरीतील नोंदीत, हणमंतराव म्हणून चंदररायाचा भाउ चतुर्बेट म्हणून जागा जावलीचा होता तेथे बल धरुन राहिला. त्यासही मारले. असा उल्लेख येतो. याचा अर्थ हा गड अस्तित्वात असावा व महाराजांनी जावळी ताब्यात घेतल्यावर प्रतापगड बांधताना याची दुरुस्ती केली असावी. अफझलखानाच्या वधानंतर झालेल्या प्रतापगडच्या युद्धात मधुमकरंदगडाचा कोठेही उल्लेख येत नाही. इ.स.१८१८ मधील मे महिन्यात प्रतापगड बरोबर मधुमकरंदगड देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला. टीप- घोणसपूर गाव पूर्णपणे शाकाहारी असुन या गावात मांसाहार करण्यास मनाई आहे.
© Suresh Nimbalkar