MADHESHWARI

TYPE : MEDIEVAL DEVIMANDIR

DISTRICT : SOLAPUR

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीची प्रतिरूपे सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी दिसून येतात. त्यांमध्ये प्रसिद्ध असलेली तीन ठिकाणे म्हणजे सोलापूरची रूपाभवानी, करमाळ्याची कमलाभवानी आणि माढ्याची माढेश्वरी. माढा हे सोलापूरच्या माढा तालुक्याचे गाव. माढेश्वरी देवीच्या नावापासून माढा या नावाची व्युत्पती झाली आहे. येथील ग्रामदैवत माढेश्वरी देवीच्या नावावर या गावाला व तालुक्याला माढा असे नाव पडले. महादजी निंबाळकर यांच्या दासीपुत्राचा मुलगा रंभाजी निंबाळकर यांना १७१० नंतर माढ्याची जहागिरी मिळाली. त्यांनंतर त्यांनी मनकर्णिका नदीच्या काठावर माढेश्वंरी देवीचे मंदिर उभारले. मंदिराचे बांधकाम मुस्लीम सत्तेच्या प्रभावाखाली झाल्याने तसेच बांधकामासाठी दक्षिणेमधुन कारागीर आणले गेल्याने मंदिराच्या बांधकामावर दक्षिण शैली व मुस्लीम शैलीचा प्रभाव जाणवतो. संपुर्ण मंदीर परीसर दोन एकरात पसरलेला असुन मंदिराचे बंदीस्त प्रांगण अर्ध्या एकरमध्ये सामावले आहे. ... पुर्व-पश्चिम पसरलेल्या या मंदिराच्या चारही बाजुस तटबंदी असुन मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पुर्वाभिमुख आहे. तटबंदी मधील प्रवेशद्वार पाच मजली असुन वर जाण्यासाठी अरुंद गोलाकार जिना आहे. येथुन संपुर्ण मंदिर परीसर व माढा किल्ला पहाता येतो. मंदिराच्या मागील बाजुस म्हणजे पश्चिमेला दुसरा लहान दरवाजा असुन या बाजुस रहदारीचा मुख्य रस्ता असल्याने सध्या याच दरवाजाने ये-जा होत असते. मंदीराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरचा दगडी बांधकामातील मुख्य मंदिर दिसते. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात जगदंबेची म्हणजेच माढेश्वरी देवीची मुर्ती असुन पुढील भागात कोरीव खांबावर तोललेला सभामंडप आहे. सभामंडपाच्या उजवीकडील गाभाऱ्यात विठ्ठलरुक्मिणी असुन डावीकडील गाभाऱ्यात शिवलिंग आहे तसेच मंदिराच्या मागील बाजुस डावीकडे एक लहान खोली असुन त्यात गणेशाची स्थापना केली आहे. मंदिराच्या तटबंदीला लागुन तीन बाजुना ओवऱ्या असुन चौथ्या बाजुस पुजाऱ्यांची घरे आहेत. या ओवऱ्यात उत्तर दिशेला एका ठिकाणी बंदिस्त दरवाजाचे बांधकाम असुन पूर्वी माढा किल्ल्यापासून माढेश्वरी मंदिरापर्यंत भुयारी वाट अस्तित्वात होती व ती वाट येथे बाहेर पडत असल्याचे स्थानिक सांगतात. मंदिराच्या परिसरापासून काही अंतरावर माढा किल्ला आहे. मंदिराच्या आसपास बराच मोठा परिसर असुन यात आपल्याला काही मोठया विरगळ व पाच सुंदर समाध्या दिसुन येतात. समाधीच्या एकुण बांधकाम व आकारमानावरून त्या राज घराण्यातील व्यक्तींच्या असाव्यात पण माहिती अभावी त्यांची नीटशी निगा राखली जात नाही. याशिवाय मंदिराच्या पुर्व भागात तटबंदी बाहेर अजुन तीन लहान घुमटीवजा मंदिरे दिसुन येतात. आश्विन महिन्यात नवरात्रामधे देवीची नऊ दिवसाची यात्रा व उत्सव असतो. देवळाच्या आवारात हत्ती, घोडा, नंदी अशी देवीची लाकडी वाहने आहेत. त्या वाहनांवरून रात्री बारा वाजता देवीचा छबिना निघतो. मंदिराच्या बाहेरील बाजूस मातंगी आईचे मंदिर आहे. त्या मंदिरापर्यंत छबिना जातो व परत येतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!