MAATH VENGURLA
TYPE : HEROSTONE
DISTRICT : SINDHUDURG
कुडाळ-वेंगुर्ले रस्त्यावर कुडाळपासून १६ कि.मी. अंतरावर आणि वेंगुर्लेपासून ५ कि.मी. अंतरावर मठ हे इतिहासप्रसिध्द गाव लागते. हिरवेगार डोंगर, आंबा-फणसाचे दाट झाडी, बाभळी सुरुची उंच झाडे, काजूबागा, माडांवर झुलणारी सुगरणीची घरटी, वड, पिंपळ, चिंच, साग आदी मोठे वृक्ष त्यातून बाहेर पडणारे वेलींच्या माळांनी गुंफलेले जंगल, विलोभनीय सृष्टीसौंदर्याची उधळण, डोंगराच्या तटबंदीत वसलेले असे मठ गाव. हे गाव कला, क्रीडा, शिक्षण यासह सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. भारतीय सैन्यदलात दिले जाणारे परमवीरचक्र हे शौर्यपदक ज्या सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले त्या याच गावच्या सूनबाई आहेत. तर ६०० वर्षापूर्वीचे शिलालेख हे या गावचे खास वैशिष्टय़ सांगता येईल.या गावाला मठ हे नाव का पडले याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. मठ गावाची स्थापना कोणी केली, याबाबत दुमत असले तरी मठ गाव ऐतिहासिक परंपरा लाभलेले व निसर्गसंपन्न आहे.
...
आज हे गांव कोकणातील एखाद्या सर्वसामान्य खेडे गावाप्रमाणेच प्रथम दर्शनी दिसेल, परंतू प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासात या गावाला फार मोठे महत्त्व आहे. कुडाळ प्रातांच्या प्राचीन इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे या गावी घडले. रणवीरांचा हा गाव! या होडावडे गावाचा आजचे ’मठ’ गांव हा एक भाग होता. या गावात इतिहासप्रसिध्द ’मांगल्याचा मठ’ आहे. सावंतवाडी संस्थानचे राजे खेम सावंत यांचा मूळपुरुष ’मांग’ सावंत यांची समाधी म्हणजेच हा मांगल्याचा मठ! घाटमाथ्यावरून मांगसावंत येथे आले. त्यांना सध्या असलेल्या मंदिराजवळ स्वयंभू शिवलिंग मिळाले. तेथे त्यांनी देऊळ बांधले. तसेच आपल्या पूर्वजांचे मांगसावंत यांचे देऊळ बांधले. मांगसावंतांनी बांधलेला मठ, त्यामुळे पुढे मांगल्याचा मठ हे नाव पडल्याचे येथील जाणकार सांगतात. गावच्या मध्यवर्ती ठिकाणी मांगल्याचे देऊळ आहे.’मठ’ गावात शिवलिंगाची शेजारी शेजारी अशी दोन देवालये आहेत. त्यातील एक देवालय मोठे आणि प्राचीन असुन त्यातील शिवपिंडी स्वयंभु मानली जाते. त्याच्या बाजूलाच एक छोटेसे देवालय आहे. या मंदिरास मांगसावंताची छत्री असे म्हणत. पण ही छत्री नसून शिवालय आहे. हे पुरातन मंदिर मांगसावंताच्या काळातील आहे. त्यास ’मांगल्याचे देवालय’ म्हणून ओळखले जाते. या मांगल्याच्या देवालयात भिंतीला टेकवून उभे ठेवलेले सहा वीरगळ आहेत. यातील डावीकडून उजवीकडे असलेल्या तिसऱ्या विरगळवर एक शिलालेख दिसून येतो. देवळात असलेल्या शिलालेखावरील अक्षरे आज ६०० वर्षानंतरही सहज वाचता येतात. त्यावर शके १३१९ चा उल्लेख असुन या शिलालेखाचा अर्थ असा “ मांग सावंत हा मांगलादेव होय जो मठामध्ये आहे, त्याचा वंशज होडावडयामध्ये नांदला त्याजवर बेळगावाहून सैन्याची स्वारी होऊन त्यात तो मारला गेला त्याचे नाव भाम सावंत त्याचा पुत्र देव दळवी” भाम सावंतचा मुलगा देव दळवी याने हे देऊळ बांधण्यासाठी काही पैसा देऊन पुढे पुजानैवद्यासाठी काही जमीनही दिली होती असे या शिलालेखावरून दिसून येते. महाराष्ट्रात विरगळवर शिलालेख असणे दुर्मिळ आहे. शिलालेख असणारी ही महाराष्ट्रातील एकमेव विरगळ असावी. हाच आहे इतिहासप्रसिध्द मठगावचा ’’शिलालेख.
© Suresh Nimbalkar