LONZA

TYPE : HILL FORT

DISTRICT : AURANGABAD

HEIGHT : 1575 FEET

GRADE : EASY

औरंगाबाद जिल्ह्य़ातील पितळखोरा ते अजिंठा या सातमाळ डोंगररांगेत अनेक किल्ले आहेत पण दौलताबाद अंतुर यासारखे किल्ले सोडले तर इतर किल्ले तसे अपरीचीत आहे. इतकेच नव्हे तर काळाच्या ओघात काही किल्ले लोकांच्या विस्मरणात देखील गेले आहेत. लोकांच्या विस्मरणात गेलेला असाच एक किल्ला म्हणजे लोंझा किल्ला. महाराष्ट्राचा पर्यटन जिल्हा अशी ओळख असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात मुख्य पर्यटन ठिकाणे व त्यांना जोडणारे काही महामार्ग सोडले तर रस्त्याच्या बाबतीत भयानक स्थिती आहे. त्यामुळे या किल्ल्यांकडे फारसे कोणी फिरकत नाही. कन्नड तालुक्यात लेणी व पाण्याची टाकी यांनी सजलेला व रचनेच्या बाबतीत जवळच्याच सुतोंडा किल्ल्याशी समानता बाळगुन असलेला हा किल्ला परिसरात महादेव टाका म्हणुन ओळखला जात होता. किल्ला म्हणुन अस्तित्व हरवुन बसलेला व लोकांच्या पुर्णपणे विस्मरणात गेलेला हा किल्ला पुन्हा नव्याने लोकांसमोर आणण्याचे काम श्री. राजन महाजन व श्री. हेमंत पोखरणकर यांनी केले. ... खाजगी वाहनाने चालीसगावहून सुतोंडा व लोंझा हे दोन्ही किल्ले एका दिवसात पाहुन अंतुर किल्ल्यावर मुक्कामास जाता येते. लोंझा किल्ल्यास भेट देण्यासाठी आपल्याला पांगरा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव गाठावे लागते. येथील रस्त्यांची भयानक अवस्था पहाता मुंबई-पुण्याहुन येथे जाताना चाळीसगावमार्गे जाणे हा बऱ्यापैकी पर्याय आहे. चाळीसगाव पांगरा हे अंतर २५ कि.मी.असुन चाळीसगाव-नागद मार्गाने किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाता येते. औरंगाबादहुन आल्यास हे अंतर १०० कि.मी.असुन औरंगाबाद-वेरूळ-कन्नड-नागद मार्गे पांगरा येथे येण्यास ५ तास लागतात. नागदहून बनोटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नागद पासून १ किमी अंतरावर उजवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर महादेव टाका अशी पाटी आहे. या परिसरात लोंझा किल्ला महादेव टाका या नावाने प्रसिद्ध असल्याने लोंझाच्या रस्त्याची चौकशी करताना महादेव टाका असे विचारावे. येथून लोंझा किल्ला ७ किमी अंतरावर आहे. फाटयापासून ५ किमी अंतरावर पांगरा गाव आहे. वाहनांची सोय केवळ पांगरापर्यंत असल्याने स्वतःचे वाहन नसल्यास पुढील अंतर पायी कापावे लागते. पांगरा गावातून उजवीकडे जाणारा रस्ता २ कि.मी.वरील तलावाकाठच्या आश्रमाकडे जातो. या रस्त्याने जाताना डाव्या बाजुला एक प्राचीन उध्वस्त शिवमंदिर दिसते. मंदिराचा सभामंडप पुर्णपणे ढासळलेला असुन गर्भगृह कसेबसे उभे आहे. मंदिर ढासळले असले तरी त्याच्या अवशेषावरील कोरीव आवर्जुन पहाण्यासारखे आहे. लोंझा किल्ला मुख्य डोगरापासुन सुटावलेल्या एका उंच टेकडीवर आहे. आश्रमाकडून किल्ल्यावर जाण्यासाठी सिमेंटच्या पायऱ्या बांधल्या आहेत. या वाटेने जाताना पत्र्याच्या निवाऱ्यात एक शिवलिंग व शनीदेवाची मुर्ती पहायला मिळते. किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा असुन आश्रमाकडून जाणारी वाट मुख्यतः वापरात आहे. किल्ल्यावर जाणारी दुसरी वाट आपण चढत असलेल्या वाटेच्या विरुद्ध बाजूस असुन तेथुन ढासळलेल्या दरवाजातून ती गडावर येते. पायऱ्यांच्या वाटेने १० मिनिटात आपण खिंडीत पोहोचतो. येथे वरील बाजुस उध्वस्त तटबंदीचे अवशेष दिसुन येतात. पाय-यांची वाट उजवीकडे वळते तिथे एक झिज झालेली शेंदूर फासलेली मारूतीची मूर्ती आहे. येथुन २५-३० पायऱ्या चढून किल्ल्याच्या उध्वस्त प्रवेशव्दारातुन आपण गडप्रवेश करतो. पायथ्यापासून इथवर येण्यासाठी अर्धा तास लागतो. किल्ल्याचे पश्चिमाभिमुख प्रवेशव्दार पुर्णपणे उध्वस्त झालेले असुन त्याचा केवळ तळभाग शिल्लक आहे. समुद्रसपाटीपासून १५७१ फुट उंचीवर असलेला हा गोलाकार किल्ला ८ एकर परिसरावर पसरलेला आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच कातळात दोन दालनात कोरलेली पाणी साठलेली गुहा पहायला मिळते. या गुहेकडून उजव्या बाजूस आल्यावर अजुन एक टाके व त्यापुढे एका खाली एक अशी दोन मोठी पाण्याची टाकी पहायला मिळतात. या टाक्यांच्या वरील बाजुस एका खाली एक अशी ३ पाण्याची टाकी असुन त्यांच्या वरील बाजूस अजुन दोन भली मोठी पाण्याची टाकी आहेत. या सर्व टाक्यांशेजारी त्यांच्यावर झाकण टाकण्यासाठी जमिनीमध्ये खळगे कोरलेले आहेत. तसेच टाक्यात पाणी जमा करण्यासाठी वरील बाजूस चर खोदलेले आहेत. या टाक्यांच्या खालील बाजुस एक चौकोनी सुकलेले टाके दिसते. या टाक्याकडे जातांना वाटेत एक लेणीवजा खांबटाके दिसते. या टाक्याच्या खालील बाजूस काही प्रमाणात तटबंदीचे अवशेष दिसुन येतात. किल्ल्याच्या या भागात पहिली पाण्याने भरलेली गुहा सोडल्यास एकुण १० टाकी पहायला मिळतात. चौकोनी टाके पाहून माथ्याला प्रदक्षिणा घालत पुढे गेल्यावर डोंगर उतारावर एका झाडाखाली अजुन एक लेण्यासारखे भलेमोठे खांबटाके पहायला मिळते. डोंगरावरून आलेली माती साठत असल्याने हे टाके बुजत चालले आहे. हे टाके पाहुन झाल्यावर पुढील वाटेने टेकडीच्या माथ्यावर जावे. गडमाथ्यावर भिंतीचे व दोन वास्तुंचे चौथरे पहायला मिळतात. यातील एका चौथऱ्यावर कबर उभारलेली असुन त्यापासून काही अंतरावर हनुमानाची मुर्ती ठेवलेली आहे. गडमाथा पाहून प्रवेशव्दाराच्या दिशेने खाली उतरताना वाटेत २ घरांची जोती पाहायला मिळतात. प्रवेशव्दाराकडून डावीकडे जाणारी एक मळलेली वाट असुन या वाटेच्या डाव्या बाजूस लोखंडी सरंक्षक कठडे बांधलेले आहेत. या वाटेने पुढे आल्यावर काही अंतरावर उजव्या बाजूस कातळात कोरलेली ४ खांबी प्रशस्त गुहा आहे. या गुहेचा आकार साधारण ४० x ३८ फूट लांबरुंद आणि सहा फूट उंच असा आहे. या गुहेचा मार्ग बनविताना गुहेसमोरचा कातळ आतील बाजूस कोरून त्यातून गुहेची वाट काढलेली आहे. त्यामुळे समोरून केवळ कातळभिंत व त्यातील प्रवेशमार्ग दिसतो. गुहेच्या खिडक्या- दारांना बसवलेल्या सिमेंटच्या चौकटी आणि लोखंडी जाळ्यांमुळे गुहेला आधुनिक स्वरूप आले आहे. गुहेत शिवलिंग स्थापन करून भिंतीवर हनुमान प्रतिमा कोरली आहे तसेच एक होमकुंडही बांधलेले आहे. या गुहेत सध्या एका साधूचे वास्तव्य असुन गुहेत २५ ते ३० जण सहजपणे राहु शकतात. गुहेच्या बाजूला एक मोठे ५ खांबी बारमही पाण्याचे टाके असुन या टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. या टाक्याच्या वरील बाजूस पाण्याचं अजुन एक कोरड टाक आहे. त्याच्या जवळच १०० फुट लांबीचे ५ खांबी लेणं आहे. लेणी पाहुन कठड्याकडील मूळ वाटेवर परतुन पुढे निघावे. या वाटेने पुढे आल्यावर नागद गावाकडे जाणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. किल्ल्याचा नागद दरवाजा काळाच्या ओघात नामशेष झाला असला तरी येथील बांधकाम व अवशेष आपल्याला पूर्वीच्या काळी येथे दरवाजा असल्याची जाणीव करून देतात. येथुन काही पायऱ्या उतरून खाली आल्यावर वाटेच्या डाव्या बाजूला कातळात झीज झालेली शेंदुर लावलेली मुर्ती पहायला मिळते. येथुन खाली जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या असुन पुढील वाट नागद गावाकडे जाते. येथे आपले किल्ला दर्शन पुर्ण होते. संपुर्ण किल्ला फिरण्यासाठी एक तास पुरेसा होतो. लोंझा किल्ल्यावरून उत्तरेला अंतुर किल्ला दिसतो. किल्ल्याच्या निर्मितीविषयी अंदाज बांधणे कठीण असले तरी एकंदर भौगोलिक स्थान व रचनेवरून तसेच तटबंदीच्या बांधकामावरून किल्ल्याची निर्मिती मध्ययुगीन कालखंडाच्या आधी टेहळणीसाठी झाली असावी. औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी हे यादवांच्या राजधानीचे ठिकाण होते. त्यामुळे यादवकाळात राजधानीकडे येणाऱ्या मार्गांवर टेहळणीसाठी किल्ल्यांची साखळी निर्माण केली गेली. अंतुर हा या परिसरातील एक महत्वाचा किल्ला असल्याने त्याच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या दिशेने जाणा-या घाटमार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या प्रभावळीत जे किल्ले बांधले गेले त्यातील एक म्हणजे लोंझा किल्ला. ज्येष्ठ लेणी अभ्यासक डॉ. दाऊद दळवी यांच्या मते ही हिनयान पंथीय बौद्ध लेणी असून ती चौथ्या किंवा पाचव्या शतकात कोरली असावी. बौद्ध धर्माची उतरती कळा व त्यामुळे पुरेसे आर्थिक पाठबळ न मिळाल्याने हि लेणी अर्धवट राहिली असावीत. यावरून या किल्ल्याचा इतिहास चौथ्या शतकापर्यंत जातो. यादवांचा पराभव झाल्यानंतर देवगिरीचे महत्व कमी झाले. त्यामुळे टेहळ्णीसाठी बनवलेल्या किल्ल्यांचे महत्वही कमी झाले व आडमार्गावर असल्यामुळे हळूहळू हे किल्ले लोकांच्या विस्मरणात गेले. हा डोंगरमाथा परिसर महादेव टाका डोंगर म्हणून ओळखला जात असला तरी औरंगाबाद गॅझेटिअरमध्ये या ठिकाणाचा उल्लेख लोंझा नावाने असल्याने या किल्ल्याला लोंझा नाव दिले गेले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!