LONIMAVLA

TYPE : NAGARKOT

DISTRICT : AHMADNAGAR

HEIGHT : 0

GRADE : EASY

महाराष्ट्रात किल्ल्यांची भटकंती करताना किल्ल्यांमध्ये गिरिदुर्ग,जलदुर्ग,वनदुर्ग, भूदुर्ग असे अनेक प्रकार दिसुन येतात आणि या प्रत्येक प्रकारात विविधता दिसुन येते. असाच एक वेगळ्या प्रकारचा भुईकोट म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात लोनीमावळा येथे असलेला नगरदुर्ग. हा नगरदुर्ग म्हणजे गावाभोवती असलेली सरंक्षक तटबंदी होय. लोनीमावळा येथे जाण्यासाठी सर्वप्रथम शिरूर अथवा आळेफाटा गाठावे. शिरूर ते लोनीमावळा हे अंतर ३५ कि.मी. आहे तर आळेफाटा ते लोनीमावळा हे अंतर २८ कि.मी. आहे. लोनीमावळा गाव १४ एकर भुभागावर तटबंदीच्या आत वसलेले असुन षटकोनी आकाराच्या या तटबंदीत दरवाजाशेजारी दोन व प्रत्येक कोपऱ्यात एक असे एकुण नऊ गोलाकार बुरुज दिसुन येतात पण या बुरुजावर तसेच तटबंदीवर कोणत्याही प्रकारची सरंक्षण व्यवस्था दिसुन येत नाही. गावात प्रवेश करताना सर्वप्रथम नजरेस पडतो तो या कोटाचा भव्य दरवाजा. ... या दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक असुन एका दाराच्या खाली दिंडी दरवाजा दिसुन येतो. दरवाजाबाहेर मारुतीचे मंदीर असुन डाव्या बाजूच्या बुरूजा शेजारी कचऱ्याने अर्धवट भरलेली एक विहीर दिसुन येते. दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन बुरुज असुन त्यांची उंची साधारण तीस फुट आहे. बुरुजाचे व दरवाजाचे खालील १५ फुटांचे बांधकाम दगडी असुन वरील १५ फुटांचे बांधकाम विटांचे आहेत. बुरुजामध्ये बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या दिसुन येतात. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस देवड्या असुन आतील बाजुने दरवाजावर जाण्यासाठी दोन बाजुना जिने आहेत. यातील एक जिना ढासळलेला असुन दुसऱ्या जिन्याने दरवाजावर व बुरुजावर जाता येते. दरवाजासमोर काही अंतरावर एका लहानशा देवळीत गणेशाची मुर्ती स्थापन केलेली असुन बाहेरील बाजूस एक भग्न नंदी आहे. तटाची उंची १० फुट तर रुंदी साधारण ४ ते ५ फुट असुन संपुर्ण तटबंदीत कोठेही तटावर अथवा बुरुजावर चढण्यासाठी जिने दिसुन येत नाही. या तटबंदीची रचना एकावर एक दगड रचुन करण्यात आली असुन बांधकामासाठी कोणत्याही प्रकारचे मिश्रण वापरलेले नाही. मुख्य दरवाजातून आत शिरणारा रस्ता दुसऱ्या बाजुने तटबंदी फोडुन बाहेर काढला आहे. तटबंदीच्या कडेकडेने फिरत आपली गडफेरी पूर्ण होते. या फेरीत आपल्याला काही वाड्यांचे अवशेष, एक दर्गा व एक देवीचे मंदिर पहायला मिळते. या मंदिराबाहेर नव्याने बांधलेली एक दीपमाळ असुन या दिपमाळे शेजारी एक विरगळ ठेवलेली आहे. संपुर्ण कोट फिरण्यासाठी एक तास पुरेसा होतो. थोडासा वेगळा कोट पहायचा असल्यास या कोटाला नक्कीच भेट दयायला हवी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!