MALLIKARJUN MANDIR

TYPE : ANCIENT SHIVMANDIR

DISTRICT : PUNE

मल्लिकार्जुन मंदिर बारामती तालुक्यात लोणी भापकर येथे मोरगाव –बारामती रोडवर असुन बारामती लोणीभापकर हे अंतर ३० कि.मी. तर पुणे लोणीभापकर हे अंतर ७५ कि.मी. आहे. बारामतीहुन पुण्याकडे जाताना लोणीभापकर गावाबाहेर पडल्यावर मल्लिकार्जुन मंदिर दुर्लक्षित अस्वस्थेत दिसुन येते. मल्लिकार्जुन मंदिर हे येथील प्राचीन मंदिर असुन नागर शैलीतील या उत्तराभिमुख मंदिराची गर्भगृह, अंतराळ, सभामंडप व मंदिरासमोर पुष्करणी अशी रचना आहे. हे मंदिर व पुष्करणी यादव काळात बांधले गेले असावे. मुळच्या विष्णुमंदिराचे काळाच्या ओघात शिवमंदिरात रुपांतर झाले आहे. मंदिराचा मूळ कळस कोसळल्याने नव्याने विटांचा वेढब कळस बांधलेला आहे. मंदिराचा दर्शनी भागच तैलरंगात रंगवलेला असुन सुदैवाने उर्वरीत मंदिर आजही काळ्या पाषाणात आहे. सभामंडप कोसळल्याने आपण थेट गाभाऱ्यापुढील अंतराळात प्रवेश करतो. ... अंतराळाच्या प्रवेशद्वारावरील रत्न, रूप,स्तंभ शाखावर व्याल, वेलबुट्टी आणि मूर्ती कोरलेल्या असुन तळात द्वारपाल कोरलेले आहेत. अंतराळाबाहेरील भिंतीत नक्षीदार व जाळीदार खिडक्या आहेत. हा अंतराळवजा मंडप एखाद्या लेणीसारखा घडवीला आहे. अंतराळाचा मंडप कोरीव नक्षीदार स्तंभांवर तोललेला असुन प्रत्येक स्तंभांवर वरील बाजूला भारवाहक यक्षिणी आहेत. या य़क्षिणींना चार हात दाखवलेले असून त्या हातांवर त्यांनी ते स्तंभ तोललेले आहेत प्रत्येक य़क्षिणीमध्ये काही ना काही फरक आहेच. यातील एका यक्षिणीने स्तंभ तीन हातांवर तोललेला असून एक हात कानावर ठेवलेला आहे जणू मंदिराच्या सभामंडपात चाललेले गायन वादन ती ऐकत आहे. स्तंभांच्या मधल्या चौकटीत विविध प्रसंग कोरलेले आहेत. एका खांबांबर वादक वाद्य वाजवतांना तर नर्तिका नृत्यमुद्रेत दाखविलेल्या आहेत तर दुसरीकडे एका खांबांबर सीताहरणाचा प्रसंग कोरलेला आहे. एका स्तंभावर कुस्तीचा प्रसंग कोरलेला असुन दुसरीकडे नागकन्यांबरोबर नृत्य दाखवलेले आहे. याशिवाय एका स्तंभावरील शिल्पात शरभ हत्तीचा पाठलाग करताना दाखवलेला असुन हंस आणि व्यालमुखे कोरलेली दिसतात. मंदिराच्या छतावर कोरलेली दगडी झुंबरे अप्रतिम आहेत. याशिवाय विविध कृष्णलीला, शिवपार्वती आराधना यासारखी अनेक शिल्पे पहायला मिळतात. मंदिराबाहेरील पुष्करणी देखील पुर्णपणे अलंकारिक आहे. चारही बाजूंनी बांधीव असे मोठे कुंड, आत उतरण्यासाठी एका बाजुला पायऱ्या व कोरीव मंडप, भिंतीत जागोजागी देवतांसाठी २८ देवकोष्टके आणि मध्यभागी पाणी अशी या पुष्करणीची रचना आहे. पुष्करणीतील देवकोष्टकावर मंदिराप्रमाणे कोरीव शिखरांची रचना केली आहे. यातील एकाही कोष्टकात सध्या मूर्ती दिसत नाही. पुष्करणीतील कोरीव मंडप बहुधा विष्णूच्या वराह अवतारासाठी बांधण्यात आला असावा. पुष्करणीच्या पश्चिम दिशेला असलेला हा वराहमंडप एका चौथऱ्यावर उभा असुन मंडपाच्या तळात हत्तींमस्तके कोरलेली आहे. जणू या मंडपाचा भार त्यांनी पेललेला आहे. त्याच्या वरील थरात रामायणातील काही प्रसंग व दशावतार कोरलेले आहेत. याशिवाय काही ठिकाणी पौराणिक प्रसंग व कामशिल्पे साकारली आहेत. हा मंडप सध्या रिकामा असुन यातील वराहमुर्ती पुष्करणीच्या मागे एका मोकळय़ा जागेत पडली आहे. वराह हा दशावतारातील तिसरा अवतार. या वराह अवताराची मूर्ती नृवराह आणि यज्ञवराह रूपात दाखवली जाते. यातील नृवराहाचे धड मानवाचे तर शिर वराहाचे असते तर यज्ञवराह मूळ वराहाच्या रूपातच दाखवला जातो. लोणी भापकर येथील यज्ञवराहाचे हे सुंदर शिल्प तीन फूट लांब आणि दोन फूट उंच असुन यज्ञवराहाचे सालंकृत रूप आहे. या वराहाच्या पायाशी शेषनाग असुन चार पायांजवळ शंख, चक्र, गदा आणि पद्म ही विष्णूची प्रतीके कोरलेली आहेत. पायांना नागदेवतेचे तोडे घातलेले असुन पाठीवर लहान आकाराच्या १४२ विष्णुमुर्ती कोरलेल्या आहेत. संपुर्ण मंदिर पहाण्यास १ तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!