LOHARA-JALGAON

TYPE : MANSION

DISTRICT : JALGAON

HEIGHT : 0

GRADE : EASY

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात लोहारा नावाचे मध्यम आकाराचे गाव आहे. आसपासच्या पंचक्रोशीत हे गाव येथील बालाजी मंदिरासाठी प्रसिद्ध असले तरी बाहेरील जगाला मात्र तसा या गावचा फारसा परिचय नाही. पण या गावास ग्रामदरवाजा ,तटबंदी व बुरुज यासारखे अवशेष आजही शिल्लक असल्याचे माझ्या वाचनात आल्याने आमची शोधयात्रा या गावाजवळ येऊन पोहोचली. पाचोरा तालुक्यात असलेले हे गाव पाचोरा या तालुक्याच्या ठिकाणाहुन २७ कि.मी.अंतरावर तर जळगाव येथुन नेरीमार्गे ४० कि.मी.अंतरावर आहे. लोहारा गावचा बाजार जेथे भरतो त्या बाजार पेठेजवळच या गावाला असलेल्या कोटाचा उद्ध्वस्त दरवाजा आहे. दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन आज केवळ त्याची कमान व त्याशेजारी विटांनी बांधलेला उध्वस्त बुरुज शिल्लक आहे. या कमानीला देखील सिमेंटचा गिलावा करण्यत आला आहे. या दरवाजाने आत शिरणारा रस्ता बालाजी मंदिर रोड म्हणुन ओळखला जातो. ... हा रस्ता आपल्याला थेट बालाजी मंदिराजवळ घेऊन जातो. हे मंदिर मध्ययुगीन काळातील आहे. या मंदिराजवळच आपल्याला देशमुख यांचा दुमजली प्रशस्त वाडा पहायला मिळतो. लोहारा येथे गढी असल्याचे उल्लेख असले तरी येथे गढी नसुन प्रशस्त वाडा आहे. या देशमुख वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार सागवानी लाकडाचे बनवले असून वाड्याच्या संपूर्ण बांधकामात कारागिरांनी केलेले नक्षीकाम त्या काळातील कलेची ओळख करून देतात. वाड्याच्या वरील भागात पहारेकऱ्यास टेहळणी करण्यासाठी वेगळी सोय केलेली आहे. वाड्यात विहिरी असून त्यांना अद्यापही पाणी आहे. वाड्याच्या आत साधारण १००० पोती राहतील या आकाराची दोन पेव (बळद) आहेत. या वाडयात कोणत्याही प्रकारची संरक्षण रचना दिसुन येत नाही. वाड्याचा दर्शनी भाग घडीव दगडात बांधलेला असुन उर्वरीत बांधकाम विटांनी केलेले आहे. विटांच्या या बांधकामाची बऱ्याच ठिकाणी पडझड झालेली आहे. वाडयात काही कुटुंबे वास्तव्यास असुन त्यांना या वाड्याचा पर्यायाने येथील देशमुखांचा फारसा इतिहास माहित नाही हे दुर्दैव आहे. या भागातील प्रशासन व्यवस्था येथील स्थानिक वतनदार घराण्याकडून सांभाळली जात असल्याने मध्यवर्ती सत्ता कोणाचीही असो, त्यांच्याशी जुळवुन घेण्याचे काम हे स्थानिक वतनदार करत असत. हे वतनदार त्यांचा बहुतांशी कारभार त्याच्या गढीतुन सांभाळत असत त्यामुळे या भागात गढीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसुन येते. हे वतनदार या गढीत वास्तव्यास असल्याने तेथील सुरक्षाव्यवस्था चोख असे पण या वाड्यात तसे काही दिसुन येत नाही. वाड्याची एकुण उंची पहाता त्याच्या वरील बाजूने संपुर्ण लोहारा गाव नजरेस पडत असावे पण आता वरील बाजुस पडझड झाल्याने तेथे जाता आले नाही. लोहारा गावची भटकंती करण्यास एक तास पुरेसा होतो. येथील देशमुखांनी दिलेल्या माहीतीनुसार त्र्यंबक नारायण देशमुख यांनी ब्रिटिश सरकारच्या काळात लोहारा व बडोदा येथे वाघाची शिकार केली होती म्हणून सयाजीराजे यांचे सरदार अंबोजीराजे पांढरे यांची मुलगी शांताबाई हिच्याशी त्यांचे लग्न झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याशी त्यांचा नातेसंबंध असल्याचे येथील देशमुख सांगतात. देशमुख घराण्यात ब्रिटिश काळात १२०० एकर जमीन होती असे देशमुख यांनी सांगितले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!